१२/०९/२०२१

Article about rape in sakinaka mumbai

 इंसाफ का तराजू

अशा घटनांमुळे भारतासारख्या सांस्कृतिक परंपरा असलेल्या, स्त्री शक्तिचे अर्थात  देवीचे नवरात्र साजरे करणा-या  देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होते म्हणून बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्यांना अशी शिक्षा व्हावी की तसे कृत्य  करण्याची  पुन्हा दुसरा कुणी हिम्मत करणार नाही. तेव्हाच या भारतीय न्याय प्रणालीचा इंसाफ का तराजू हा खरंच न्यायदानाचे एक उत्कृष्ट प्रतीक असल्याचे या देशातील जनतेला वाटेल.

साकीनाका येथे अंगावर शहारे येतील अशाप्रकारे एका स्त्रीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर व त्यापूर्वी घडलेल्या पुण्यातील एका अशाच घटनेनंतर तसेच निर्भया दिल्ली व कोपर्डी येथे पुर्वी घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर समाज, देश हेलावलेला आहे. कायदा व सुव्यवस्था आहेत की नाही ? का त्या फक्त वसुली साठी आहेत ? असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. साकीनाका, मुंबईच्या बलात्काराच्या घटनेनंतर तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया जनमानसात, समाज माध्यमांवर प्रकट होत आहेत. मुख्यमंत्री व इतर राजकीय नेते कठोरात कठोर कारवाई आरोपीवर केली जाईल असे म्हणतात. परंतु प्रत्यक्षात मात्र दिर्घकाळ चाललेल्या खटल्यांंमुळे ही कठोरात कठोर म्हटली जाणारी कारवाई होण्यास मोठा विलंब  होत असतो. आजच्या काळातील कठोरात कठोर कारवाई म्हणजे काय हा सुद्धा एक प्रश्नच आहे. फाशीची शिक्षा ही एक शिक्षा आहे खरी परंतु तीची सुद्धा अंमलबजावणी होण्यास मोठा वेळ खर्च होत असतो, शिवाय  दयेचा अर्ज हि एक सुविधा आहेच. पुर्वी जसे हात पाय कलम करणे, कडेलोट अशाप्रकारच्या कठोर शिक्षा असत तशा तर आता नाहीत मग सांप्रत कायद्यान्वये नेते मंडळी कोणते कठोर शासन करण्याचे म्हणतात देव जाणे. तसेच तारीख पे तारीख या प्रकारच्या खटल्यांंमुळे हे आरोपी कायद्याच्याच आधारे आपला बचाव करण्यासाठी नाना प्रकारचे आटोकाट प्रयत्न करत असतात. अनेक लोकांनी साकीनाकाच्या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुर्वी मुलींना व महिलांना पुण्या-मुंबईसारख्या शहरात एकटीने फिरताना भीती वाटत नव्हती आज मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. बलात्कार, स्त्री अत्याचार थांबविण्यासाठी सर्वात प्रथम करायची जी गोष्ट असेल तर ती म्हणजे कायद्याचा वचक प्रस्थापित करण्याची. देशात अनेक गैरकायदेशीर कृत्ये होत आहेत याला कारण कायद्याचा वचक नाही हेच आहे. याच पार्श्वभूमीवर 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या इंसाफ का तराजू या चित्रपटाचे स्मरण झाले. प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचा हा चित्रपट. हा चित्रपट काळाच्या पुढे असणारा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या चित्रपटावर ऐंशीच्या दशकात बरीच टीका झाली होती. या चित्रपटात मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका मुलीवर बलात्कार होतो पुढे न्यायालयीन प्रक्रिया होते परंतु आरोपी निर्दोष सुटतो व राजरोसपणे व्यवसाय करू लागतो काही काळाने या बलात्कारित मुलीची लहान बहीण त्याच आरोपीच्या कार्यालयात मुलाखतीसाठी जाते तेव्हा हाच आरोपी तिच्यावर सुद्धा बलात्कार करतो. यावेळी मात्र ती मॉडेल मुलगी तिच्यावर झालेल्या अन्यायाची पुनरावृत्ती तिच्या बहिणीबाबत सुद्धा होऊ नये म्हणून पुर्वानुभवाने न्यायाची प्रतिक्षा न करता आरोपीची हत्या करते. असे कथानक या चित्रपटाचे होते. अर्थात हा चित्रपट होता ,प्रत्यक्षात असे कायदा हाती घेऊन आरोपीस मारणे हे शक्य करणे दुरापास्त आहे व योग्य सुद्धा नाही. बलात्काराच्या घटना, वाढते स्त्री अत्याचार रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यात पुुढिल काहि उपाय करता येतील का याचा अशा घटनांचा अभ्यास करणा-या संघटना, तज्ञांंनी जरूर विचार करावा.

1. कायद्याचा असा वचक निर्माण व्हावा की  आरोपी गुन्हा करण्यास धजावणारच नाही. 

2. बाल्यावस्थे पासून पालकांनी व शिक्षकांनी मुलांना आदर्श मुल्ये, आदर्श वागणूक, स्त्रियांचा सन्मान करणे याचे धडे वारंवार देत राहणे. 

3.बिकट प्रसंग आला तर मुलींनी किंवा महिलांनी त्या प्रसंगात कसा बचाव करता येईल तात्काळ मदत कशी मिळवता येईल याचे प्रशिक्षण सुद्धा त्यांना देणे. 

4.मानवाधिकाराचा आदर्श उपयोग कसा करता येईल याबाबत सुद्धा संबंधित संघटनांनी विचार मंथन करणे.

5.राजेशाही मध्ये काही गुन्ह्यांना जसे कठोर शासन असे, तसे बलात्कार, पाशवी अत्याचार यासारख्या गुन्ह्यांना लोकशाहीमध्ये सुद्धा कसे करता येईल यावरसुद्धा विचार व्हावा किंबहुना स्त्री संघटनांनी तशी मागणीच करावी.

5. माध्यमांनी सुद्धा या अशा घटनांची वृत्ते संवेदनशीलतेनी द्यावीत,  टी आर पी वाढवण्याच्या हेतूने नव्हे. 

     यासारख्या उपाय योजना शासनाने प्राथमिकतेने व मनावर घेऊन करणे आवश्यक आहे. 

   या अशा घटनांमुळे भारतासारख्या सांस्कृतिक परंपरा असलेल्या, स्त्री शक्तिचे अर्थात  देवीचे नवरात्र साजरे करणा-या  देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होते म्हणून शासनाने व कायदा व सुव्यवस्था यंत्रणेने वरील उपाय योजना विचारात घ्याव्यात. इंसाफ का तराजू सिनेमात बलात्कार झाल्यावर न्याय न मिळाल्याने नायिकेला जसा कायदा हातात घ्यावा लागला व आरोपीला शासन करावे लागले तसे प्रत्यक्षात होऊ नये. पिडित महिलांना असा न्याय मिळावा की त्या सन्मानाने पुन्हा उभ्या राहतील व बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्यांना अशी शिक्षा व्हावी की तसे कृत्य  करण्याची  पुन्हा दुसरा कुणी हिम्मत करणार नाही. तेव्हाच या भारतीय न्याय प्रणालीचा इंसाफ का तराजू हा खरंच न्यायदानाचे एक उत्कृष्ट प्रतीक असल्याचे या देशातील जनतेला वाटेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा