३०/०९/२०२१

PART - 8, MAD

वेडयांच्या विश्वात - भाग 8 

थैलीवाली बाई  


एक दिवस मात्र मला धक्काच बसला, मी माझे काम संपवून कोर्टा समोरून घरी येत होतो पाहतो तर काय जी बाई कोर्टात केसच्या कामाने येत असे ती चक्क एका हातात एक कागदपत्रांची थैली घेऊन व दुस-या हातात वर्तमानपत्राची गुंडाळी घेऊन मोठमोठ्याने एकटीच बोलत होती. ज्या बाईला मी चांगल्या मानसिक अवस्थेत पाहिले होते तीला या अशा अवस्थेत पाहून मला मोठी खंत वाटली.

मागील भागापासून पुढे...

हक्का-बक्का,MIDC,सुमा,बावरी व महादू हे सर्व मी बालवयात असतांना पाहिलेले वेडे. नंतर कोर्टाच्या बाजुला राहायला आलो. बाजूला म्हणजे इतके की कोर्टाची आणि आमची कुंपणाची एकच भिंत आहे. म्हणजे कोर्टाची पायरी चढायला जराही वेळ लागणार नाही इतके कोर्टाला लागून. वडील म्हणतात बेटा इथपर्यंतच ठीक आहे "याच्या पुढे जावे लागेल असे काही करू नको” अर्थात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हा त्यांचा सांगण्याचा उद्देश. तरी बरेच वर्षे पर्यंत आम्हाला कोर्टात जायचे काम पडायचेच अर्थात दावे वगैरेसाठी म्हणून नव्हे तर तेंव्हा कोर्टाच्या आवारातून लोक ये-जा करू शकत होते म्हणून. 

     कोर्टाजवळ राहायला आल्यावर सुद्धा काही वेडे पाहण्यात आले. कपड्यांचे एक मोठ गाठोडे सोबत असलेली एक बाई नेहमी आमच्या गल्लीत येऊन शहरातील मोठ्या-मोठ्या लोकांना तसेच कोर्टाच्या दिशेने पाहून खुप काहीबाही बोलत असे. शहरातील अनेक प्रतिष्ठित लोकांच्या नावाचा ती बाई उद्धार करीत असे. कोर्टाकडे पाहून या लोकांना असे का बोलता ? असे विचारल्यावर मात्र ती हसून "दिसते तसं नसते भाऊ" असे म्हणून आपली बडबड सुरू ठेवत असे. पण आज ज्या बाईबद्दल मी लिहीत आहे ती बाई ही नव्हे. ही कहाणी तर ज्या बाईची मानसिक अवस्था चांगली असतांना मी पाहिले आहे अशा एका दुस-या बाईची आहे. संध्याकाळची वेळ होती उन्हाळ्याचे दिवस होते , 1990 च्या दशकात मोबाईल नव्हते , वाहिन्यांचा सुळसुळाट व त्यावर भरमसाट मालिकांचा व बाष्कळ विनोदी कार्यक्रमांचा मारा सुरू झालेला नव्हता, त्यामुळे आम्ही संध्याकाळी सहकुटुंब अंगणात बसत असू. इथे मग निरनिराळ्या विषयांवर चर्चा , हास्य विनोद होत असत. अशाच एका सायंकाळी जेंव्हा कार्यालयीन वेळ संपलेली होती , कर्मचारी , अभ्यागत घरी परतत होते तेंव्हा आमच्या फाटकात एक बाई आली बाहेरूनच “पाणी मिळेल का प्यायला” ती म्हणाली. चष्मा घातलेली , उंचशी , चांगली साडी नेसलेली ती महिला ग्रामीण भागातील परंतू सुशिक्षित अशी वाटत होती. तिला अंगणात बसायला खुर्ची दिली व पाणी दिले. “कोर्टात केस सुरु आहे म्हणून यावे लागते” असे तिने सांगितले दोन चार वाक्ये बोलून ती बाई निघून गेली. त्यानंतर खुप काळ लोटला, शैक्षणिक , प्रापंचिक कार्यात गुंतलो , संध्याकाळचे ते अंगणात बसुन गप्पा मारणे सुद्धा कमी झाले पण क्वचित वेळा ती बाई मात्र कोर्टात येतांना किंवा जातांना दिसत असे. पण एक दिवस मात्र मला धक्काच बसला, मी माझे काम संपवून कोर्टा समोरून घरी येत होतो पाहतो तर काय जी बाई कोर्टात केसच्या कामाने येत असे ती चक्क एका हातात एक कागदपत्रांची थैली घेऊन व दुस-या हातात वर्तमानपत्राची गुंडाळी घेऊन मोठमोठ्याने एकटीच बोलत होती. ज्या बाईला मी चांगल्या मानसिक अवस्थेत पाहिले होते तीला या अशा अवस्थेत पाहून मला मोठी खंत वाटली, मोठा धक्काच मला बसला. "अरेरे ! , ही बाई आता काही दिवस अगोदर पर्यंत चांगली होती आणि आता अशी एकटीच का बडबड करीत आहे ?" मी मनातल्या मनात बोललो. आणि पुढे निघालो. मग ही बाई मला याच परीसरात रोजच दिसू लागली. 

ती कोर्टाच्याच आजूबाजूला कुठल्यातरी आडोशाने राहात असावी. पुढे तिच्या हातात एक ऐवजी दोन थैल्या आल्या. दोन्ही थैल्या कुठल्यातरी कागदपत्रांनी भरलेल्या असत व वजनदार असत. त्याचे वजन सुद्धा त्या बाईला पेलवत नसे. आता ती बाई पुर्वीपेक्षाही अधिक कृश दिसू लागली होती. कुण्या तरी व्यक्तीने तिला फसवल्यामुळे तिची अवस्था तशी झाली अशी काही लोकांकडून माहिती मिळाली. कुणी फसवल्यामुळे अथवा खटला हरल्यामुळे तीची मानसिक अवस्था ढासळली असावी. 

आपल्या देशात न्यायालयीन प्रक्रिया ही एक दीर्घ अशी प्रक्रिया आहे. निष्पाप व्यक्ती दोषी ठरू नये हे जरी खरे असले तरी न्यायाला विलंब सुद्धा नको. या विलंब व दीर्घ प्रक्रियेमुळे कित्येक व्यक्ती मेटाकुटीला येतात, मनुष्य ताण-तणावाने ग्रस्त होतो , खंगतो , आर्थिक व मानसिक झळ पोहचत असते. कित्येकदा मनसिक स्वास्थ्य सुद्धा बिघडते. या बाईचे सुद्धा असेच काहीसे झाले असावे का ? मला प्रश्न पडला पण त्याचे उत्तर मात्र मला मिळणार नव्हते. ही बाई नंतर कुठे गेली काही ठाऊक नाही पण कुठल्यातरी खटल्याच्या निमित्ताने ती कोर्टात येत होती असे तिनेच सांगितले होते. या संबंधीत बाबीमुळेच तिचा मानसिक तोल गेला असावा हे अगदीच खात्रीने म्हणू शकत नाही परंतू तसे वाटत मात्र होते. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण कशी काय जन्मली कुणास ठाऊक परंतू या म्हणीच्या रचयित्याने सुद्धा कधी काळी उपरोक्त बाईसारखे उदाहरण अनुभवले असावे असे मला वाटले.

                                                    क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

1 टिप्पणी: