२७/०१/२०२२

Article in the memory of a super duper hit old movie Johny Mera Naam

जॉनी मेरा नाम 

(an unforgettable hindi movie )

"जॉनी मेरा नाम" हा चित्रपट प्रदर्शित होऊन  50 वर्षे पूर्ण झाल्याची पोष्ट वाचली व डोळ्या समोर हा सुपर हिट सिनेमा तरळून गेला. 2022 मधील तरुण पिढीस या चित्रपटाबाबत कितपत माहिती असेल याचा अंदाज नाही परंतू या चित्रपटाबाबत लिहिण्यास कुणास ठाऊक का पण बोटे शिवशिवू लागली व हाच विषय हाती घेतला.
भारतातील जनतेचे आवडते विषय म्हणजे क्रिकेट , राजकारण , खाणे-पिणे आणि सर्वात आवडीचा , ग्लॅॅमर , गॉसिप असलेला आणखी एक विषय  म्हणजे सिनेमा. राजा हरीश्चंंद्र ने सुरुवात झालेला भारतातील मूकपट पुढे आलमआरा या चित्रपटानंतर बोलका झाला, तदनंतर रंगीत झाला. इस्टमन कलर, ओखा कलर इ. रंगीत तंत्रज्ञान असलेली नांवे  चित्रपटाच्या नामावलीत दिसू लागली. सुमधुर संगीत , मेहनती संगीतकार आणि गोड गळ्याचे गायक-गायिका हे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य करू लागले. देव-राज-दिलीप या तीन सुपरस्टारच्या काळात तर कितीतरी सुमधुर चित्रपट झळकले. राज कपूरच्या आवारा ने रशियन जनतेला भुरळ घातली. सिनेमा बहरत गेला. कित्येक ऐतिहासिक, पौराणिक चित्रपट गाजले. देशभक्तीपर, युद्धपटांंनी  जनतेच्या मनात देशभक्तीची भावना रुजवली. हे असे कितीतरी दाखले भारतीय सिनेमा व सिनेमाप्रेमी जनतेबाबत देता येतील. आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, 
      त्या दिवशी फेसबुक वर "जॉनी मेरा नाम" हा चित्रपट प्रदर्शित होऊन 11 नोव्हे 2020 रोजी 50 वर्षे पूर्ण झाल्याची पोष्ट वाचली व डोळ्यासमोर हा सुपर हिट सिनेमा तरळून गेला. 2022 मधील तरुण पिढीस या चित्रपटाबाबत कितपत माहिती असेल याचा अंदाज नाही परंतू या चित्रपटाबाबत लिहिण्यास कुणास ठाऊक का पण बोटे शिवशिवू लागली व हाच विषय हाती घेतला. "अब बोल तेरा नाम क्या है ?" असे प्राण ने विचारल्यावर "जॉsssनी मेsssरा नाम" असे आपल्या नेहमीच्या आवाजाच्या चढ उताराच्या लकबेने मारामारीच्या दृश्यांच्या वेळी देव आनंदने दिलेले उत्तर आठवले. मारामारी करतांना देव आनंदला पाहणे म्हणजे सुद्धा एक गंमतच होती. एकदम ढिले शरीर करून त्याची मारामारी असे. पण देव साब सारखा देखणा , चिरतरूण, सदाबहार, चॉकलेट हिरो, इंग्रजीवर मोठे प्रभुत्व असलेला, MA इंग्रजी शिक्षण झालेला, स्टायलिश पेहराव असणारा, कामात स्वत:ला झोकून देणारा असा  दुसरा अभिनेता कुणी झाला नाही व होणारही नाही.  जॉनी मेरा नाम या चित्रपटाच्या गाण्यांची एक कॅॅसेट माझ्याकडे होती, नव्हे आहे. परंतू आता पेटीत पडलेली आहे. एकापेक्षा एक सरस गीते असलेला हा कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेला सिनेमा आहे. देव आनंद व राजेश खन्ना यांच्या चित्रपटांच्या गीतांच्या कॅॅसेटचे एक वैशिष्ट्य असे. यात गाण्याच्या सुरुवातीला या अभिनेत्यांचा एक संवाद सुद्धा असे.  मग गाण्यासह ते संवादही पाठ होऊन गेले. 
"जब दरवाजा खुला तो दो हसीन आंखे मेरी तरफ देख राही थी , दिल धडक धडक के कह रहा था , की जॉनी बेटे आज तेरी तकदीर खुलनेवाली है | लेकीन कंही अगर इनको पता चल गया की चोर है , उचक्का है , छोटी मोटी चोरीयोंंके बारे मे बार बार जेल जा चुका है | तो इन हसीन आंखो मे सिवाय नफरत के कुछ नही रहेगा |"
आणि मग किशोरकुमारच्या आवाजात गाणे वाजत असे "नफरत करनेवालो के सिनेमे प्यार भर दु|" असे संवाद , अशी गाणी मग डोक्यात फिटच होऊन गेली. माझ्या काकांकडे अँबेसॅॅडर होती, या कारने आम्ही खुप प्रवास केला. या कारवर सुरुवातीला बाळू भाऊ म्हणून एक चालक होता. याला हिंदी सिनेमातील गाणी म्हणायला आवडत असे.तो आमच्या घराच्या मागेच राहत होता. अनेकदा तो मोठ्या आवाजात गाणी गात असे या आम्हा भावंडांना त्याचे ते गाणे म्हणणे आवडत असे. 1970 च्या काळात महाविद्यालयीन तरुण असलेला बाळू भाऊ देव आनंद / किशोर कुमार हे कॉम्बिनेशन असलेली गाणी मोठ्या आवडीने गात असे. असेच एकदा आम्ही काही मित्र प्रवासात असतांना कारटेपवर गाणे लागले. चित्रपट हाच जॉनी मेरा नाम, गाणे होते , "ओ मेरे राजा खफा न होना , देर से आई , दुरसे आई फिरभी मैने वादा तो निभाया" नायक नायिकेचे  संवादात्मक असलेले हे गाणे सर्वांनाच आवडले मग काय पुन्हा रिव्हर्स , पुन्हा प्ले असे किती वेळा आम्ही ते गाणे ऐकावे ? कुणाला विश्वास वाटणार नाही परंतू त्यावेळी आम्ही 19 वेळा ते गाणे ऐकले होते. देव व हेमा हे मागावर असलेल्या पोलिसांना प्रेमाचा दिखावा करून गुंगारा देतात असे पहायला सुद्धा सुंदर असे हे गीत आहे. सर्वच अवीट मधुर गीते असलेला जॉनी मेरा नाम हा चित्रपट म्हणजे लोकांच्या दीर्घकाळ स्मृतीत राहिलेला सस्पेन्स , थ्रीलर  सिनेमा आहे.  "ओ बाबुल प्यारे" , कित्येक खिडक्या असलेल्या घरात चित्रित केलेले "पल भरके लिये कोई हमे प्यार करले झूठाही सही" , पद्मा खन्नावर चित्रीत "हुस्न के लाखो रंग" , आणि  " चुप चुप मीरा रोये" अशी गाणी व कथानक असलेला हा सिनेमा रसिकांनी डोक्यावर  घेतला होता.
    चित्रपटात प्राण व देव आनंद यांच्या वडिलांचा खून होतो मग पुढे लॉस्ट अँड फाउंड , प्रेमनाथ ने रंगवलेला "रुपयो के लिये देश को बेचनेवाला" रायसाब भूपिंदरसिंग हा खलनायक , सज्जन ने रंगवलेला अगतिक बाप , नवयौवना , ड्रीम गर्ल हेमा मालिनी , तिहेरी भूमिका करणारा आय .एस . जौहर , जीवन  अशी मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक सुपरहिट सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शन वेळी म्हणजे 1970 मध्ये देव आनंद 50 वर्षांचा होता. राजेश खन्ना, अमिताभ, धर्मेंद्र, जितेंद्र यांचे सिनेमे गाजत असतानांही नेहमी अंग हालवत भूमिका करणारा देव आनंद मात्र वयाच्या पन्नाशीतही सिनेसृष्टीत घट्ट पाय रोवून उभा होता. 1970 मध्येच मेरा नाम जोकर हा सुद्धा सिनेमा आला होता. परंतू जॉनी मेरा नाम प्रंचड गाजला व मेरा नाम जोकर साफ कोसळला.  नांवात थोडेफार साम्य असल्याने जॉनी मेरा नामचा नवोदित निर्माता गुलशन राय यांच्यात व राज कपूर यांच्यात वाद सुद्धा झाला होता. 
    जॉनी मेरा नाम या चित्रपटात आपल्या आवडीच्या अभिनेत्यासह भूमिका मिळाल्याने हेमा मालिनी खुश होती. पुढे दोघांनी अनेक सिनेमे केले. जॉनी मेरा नाम चे विविध भाषांत रिमेक सुद्धा निर्माण झाले. जॉनी गद्दार या 2007 मध्ये आलेल्या सिनेमात सुद्धा जॉनी मेरा नाम मधील दृश्य वापरले होते. एका मालिकेत "पल भरके लिये" हे गाणे सुद्धा वापरले होते. मेहनतीने , झोकून देऊन कोणत्याही क्षेत्रात कार्य केले तर ते गाजतेच, यशाचे उच्चांक प्रस्थापित करते. जॉनी मेरा नाम या चित्रपटास प्रदर्शित होऊन 52 वर्षे झाली म्हणजे अर्धे शतक लोटले तरी रसिकमनावर आजही हा चित्रपट व यातील गाणी अधिराज्य करीत आहे. 
आता अनेक वाहिन्या आहे परंतू जुना सिनेमा या वाहिन्यांवरून हद्दपार झाला आहे. पण यु ट्यूब वर आपण ते पाहू शकतो. अनेक चांगले कथानक असलेले चित्रपट लिहिणा-या के.ए. नारायण यांनी लिहिलेला व विजय आनंद या प्रख्यात दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला जॉनी मेरा नाम हा सुद्धा एक पाहण्यासारखा सिनेमा आहे. आज जमाना बदलला आहे "जुना पुराना सिर्फ भंगार वालोको ही चाहिये" पण तरीही जॉनी मेरा नाम सारखे जुने चित्रपट, काही जुन्या वास्तू, जुने कलाकार हे अधून-मधून साद घालतात व मग त्याबाबत लिखाण करण्यास कोणतीतरी अज्ञात शक्ती भाग पाडते.

1 टिप्पणी: