०६/०१/२०२२

Part 10- Agrawal Cold drinks and Dharav Tea Stall , Food Culture of Khamgaon

 खामगांवची खाद्य संस्कृती भाग-10

दुध है वंडरफुल 

 "होम डिलिव्हरी" ची सुविधा देणा-हॉटेलला नागरीक सुद्धा पसंती देतात. आजकाल तर ही सुविधा कित्येक निरनिराळे व्यावसायिक देतात. पण ही "होम डिलिव्हरी"ची सुविधा 60 वर्षे आधी पासून खामगांवकरांना देणारे आजचे हे हॉटेल म्हणजे खामगांव पंचक्रोशीतील एकमेव ठिकाण होते, आजही आहे...

मागील भागापासून पुढे...

मागील लेखात आलेल्या जय भारत हॉटेलकडे जाण्याच्या अगोदर म्हणजे पोलीस स्टेशन कडून महावीर चौकाकडे जाणा-या रस्त्यावरून गजानन टॉकीजकडे वळलो की आजचे हे ठिकाण आहे. तसे आजचे हे हॉटेल म्हणजे खाद्य पदार्थांचे हॉटेल नसून शीतपेय व चहा, दुध मिळणारे खामगांवातील खुप जुने व प्रसिद्ध असे ठिकाण आहे. लोकप्रियतेचे उच्चांंक गाठलेला शोले हा चित्रपट न पाहिलेला व्यक्ती जसा विरळा तसे खामगांवात हे हॉटेल माहित नसलेला मनुष्य सुद्धा विरळाच. हे ठिकाण म्हणजे "अग्रवाल कोल्ड्रिंक्स". गजानन टॉकीजला लागून इंग्रजी "कॅॅपिटल एल" या अक्षराच्या आकाराचे हे दुकान आहे. या एल ची उभी दांडी थोडी जाड आहे. याचे कारण म्हणजे या बाजूने एक लांबट फॅमिली रुम आहे. ही रस्त्याकडची बाजू आहे. तर खालच्या आडव्या रेषेप्रमाणे जी जागा आहे ती थोडी लहान आहे. हॉटेल मध्ये गेल्यावर स्वच्छता व नीटनेटकेपणा जाणवतो. मालकाच्या काऊंटरवर या तंत्र समृद्ध काळातही पाटी व लेखण छोट्या हिशेबासाठी म्हणून असते. हे हॉटेल म्हणजे "अग्रवाल कोल्ड्रिंक्स" 1963 च्या मार्च महिन्यातील 3 तारखेला म्हणजे भर उन्हाळ्यात रुपचंद अग्रवाल , ब्रिजमोहन गोयनका व गोवर्धनदासजी गोयनका यांनी भागीदारीत या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. भर उन्हाळ्यात थंड आईस्क्रीम , लस्सी अशा पदार्थांची सोय खामगांवकर नागरिकांना मिळाली. त्यातही एक विशेष सुविधा या हॉटेलने त्या काळात देणे सुरु केले. ती सुविधा होती "होम डिलिव्हरी"ची. आजकाल नागरिकांना "होम डिलिव्हरी" चे मोठे आकर्षण आहे व शहरांच्या वाढत्या आकारमानानुसार ते सोयीस्कर सुद्धा आहे. "होम डिलिव्हरी" ची सुविधा देणा-या हॉटेलला नागरीक सुद्धा पसंती देतात.आजकाल तर ही सुविधा कित्येक निरनिराळे व्यावसायिक देतात. पण ही "होम डिलिव्हरी"ची सुविधा 60 वर्षे आधी पासून खामगांवकरांना देणारे "अग्रवाल कोल्ड्रिंक्स" म्हणजे खामगांव पंचक्रोशीतील एकमेव ठिकाण होते, आजही आहे. पुर्वी येथे 20/25 माणसे कामाला असायची. जेन्ट्स सायकलच्या दांड्याला


अग्रवाल कोल्ड्रिंक्स अशी पाटी लिहिलेली सायकल घेऊन हि माणसे दिलेल्या लँँड लाईन फोनवर ऑर्डर आल्यावर खामगांव  शहराच्या हद्दी बाहेर सुद्धा ऑर्डर घेऊन जायची मग ती एक किंवा दोन कप चहाची ऑर्डर का असेना. लाकडाच्या आईस्क्रीम पॉट मध्ये बर्फ टाकून दुध , पावडर टाकून आईस्क्रीम त्या काळात बनवले जात असे. बदलत्या काळानुसार अग्रवाल कोल्ड्रिंक्स ने विविध प्रकारच्या लस्सी , दुध कोल्ड्रिंक्स व रात्री गरम दुध हे सुद्धा सुरु केले. पण काळ कुणासाठी थांबत नाही उपरोक्त भागीदार संस्थापक काळाच्या ओघात निवर्तले. गोवर्धनदासजी गोयनका यांचे तर गत महिन्यात 6 डिसेंबर रोजी दु:खद निधन झाले. आता गोवर्धनदासजी गोयनका यांचे सुपुत्र पत्रकार व शांत सुस्वभावी राजकुमार गोयनका यांचे समवेत ओमप्रकाश अग्रवाल व नवीन पिढी आता या हॉटेलची धुरा सांभाळत आहे. ज्या काळात आईस्क्रीम आदी पदार्थ खामगांव सारख्या शहरात दुरापास्त होते, आईस्क्रीमच्या विविध कंपन्या नव्हत्या त्या काळात खामगांवकरांना थंडगार आईस्क्रीम, लस्सी , दुध कोल्ड्रिंक्स असे पदार्थ उपलब्ध करून देणारे "अग्रवाल कोल्ड्रिंक्स" हे एकमेव होते. 
अग्रवाल कोल्ड्रिंक्स  येथे मँगो लस्सीचाआस्वाद घेतांना तीन मित्र.

आजही अनेक खामगांवकर येथील शीतपेये व चहाला पहिली पसंती देतात. रात्रीच्या वेळी
येेेथे गरम दुग्ध प्राशनाचा आस्वाद घेतात. येथील मँँगो आईस्क्रीम तर आजही प्रचंड लोकप्रिय आहे. अग्रवाल कोल्ड्रिंक्स स्पर्धेच्या आजच्या जमान्यातही उत्कृष्ट शीतपेये , उष्ण पेये , स्वच्छता , त्वरीत सेवा इ गुणांव्दारे घट्ट पाय रोवून उभे आहे.

    या लेखमालिकेतील प्रत्येक लेखात एकच प्रतिष्ठान घेतले आहे. परंतू आजच्या या लेखात "दुध" या समान विषयामुळे अग्रवाल कोल्ड्रिंक्सच्या अगदी समोरच असलेल्या धारव यांच्या चहा व दुध सुविधा देणा-या हॉटेलचा सुद्धा समावेश करावासा वाटतो. धारव टी स्टॉल हे तसे नवीन 35 वर्षांपुर्वीचे परंतु येथील गरम दुध सुद्धा प्रसिद्ध आहे. थोर सेवाव्रती बाबा आमटे कुटुंबियांशी पारिवारिक संबध असलेले धारव बंधूंचे टी स्टॉल सुद्धा प्रसिद्ध आहे.

    दुध हे आम्हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य असा पदार्थ आहे. गोपालन करणारा मुरलीधर कृष्ण तमाम गवळी समाजासह आम्हा सा-या भारतीयांचे आराध्य दैवत आहे. बाल गोपाळांचा आवडता देव आहे. हाच मुरलीधर गीता सांगणारा भगवंत कृष्ण जेंव्हा सुदर्शन हाती घेतो तेंव्हा तो आम्हाला अन्याय झाल्यास आम्ही शस्त्र सुद्धा हाती घेऊ शकतो असे सांगणारा आहे. दत्त गुरूच्या पाठीशी सुद्धा गाय असते, कामधेनुला आम्ही मानतो, कित्येक सेवाधारी लोक गोरक्षण करतात. पुर्वी धारोष्ण दुध पिले जायचे अशा या आपल्या देशात दुधाची महती पुर्वीपासूनच ज्ञात आहे. योगायोगाने दुग्धजन्य थंड व गरम पदार्थ विक्रीच्या व्यवसायाची स्थापना करणा-या अग्रवाल कोल्ड्रिंक्सच्या दोन संस्थापकांची नावे सुद्धा त्या मधुसुदनाचीच एक ब्रिजमोहन तर दुसरे गोवर्धन.

     नवीन पिढीने सुद्धा त्यांच्या आहारात चांगल्या प्युअर दुधास समाविष्ट करणे जरुरी आहे. "दुध है वंडरफुल पी सकते है रोज ग्लास फुल दुध" अशी जाहिरात पुर्वी दूरदर्शनवर झळकायची. आज खामगांव शहरात अनेक हॉटेल , शीतपेये , गरम दुध मिळणारी चांगली ठिकाणे आहेत. पण दुध पिल्यावर "दुध है वंडरफुल" अशी भावना मनात उत्पन्न होते ती केवळ क्वालिटी दूध व इतर पदार्थ देणारे अग्रवाल कोल्ड्रिंक्स व धारव टी स्टॉल येथेच.

क्रमश:      

२ टिप्पण्या: