२८/०४/२०२२

Leaders should start movement for public problems

 एक नजर इधर भी.....

दुस-याच्या घरासमोर हनुमान चालिसा , आपल्या नेत्याविरुद्ध कुणी तक्रार करत असेल तर कर त्याच्यावर हल्ला , इडी चौकशी करीत असलेल्या नेत्यांचे स्वागत , नेत्यांसाठी व पक्षासाठी आंदोलने , एकमेकांची उणीदुणी , भ्रष्टाचार हे करण्यापेक्षा नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांबाबत आंदोलने करावीत. जनतेची पाणी समस्या , भारनियमन यासंबंधी तोडगा काढण्याचे प्रयत्न करावे.

नुकतेच राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलन छेडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ते मुंबईला पोहोचल्यावर त्यांना अडवण्यासाठी कित्येक शिवसैनिक ठाण मांडून बसले होते. त्यापुर्वी राज्यात विरोधी पक्ष व मविआ यांच्यात एकमेकांवर शाब्दिक हल्ले , कुरघोड्या एकमेकांच्या नेत्यांच्या तक्रारी , त्यावरून पुन्हा खडाजंगी कुणाच्या मागे इडी तर कुणाच्या मागे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग असे मविआ सत्तेत आल्यापासून सुरुच आहे. कुणी कुणाचा बंगला पाडण्यास निघते तर कुणी हनुमान चालिसा म्हणण्यास. राज्य शासन सुद्धा राज्याचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विरोधकांना निस्तरण्यातच जास्त व्यस्त आहे. मुख्यमंत्री  घंटाधारी / गदाधारी हिंदू असा हिंदूंमध्ये भेद करतात तर सरकार मधील मंत्री जातीयवादी भाषणे , हिंदू समाज व हिंदू विधी यांची खिल्ली उडवतात व त्या खिल्लीवर उपस्थित मंत्री खळखळून हसतात व तद्नंतर केविलवाणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात. विरोधक सत्ताधा-यांचे गुंडांशी संबंध असल्याचे सांगतात तर सत्ताधारी विरोधकांचेच गुंडांशी संबंध असल्याचे सांगतात. ते म्हणतात यांचे दाऊदशी व्यवहार आहे तर हे म्हणतात राणा दाम्पत्याने लकडावाला कडून कर्ज घेतले आहे. काय चालले काय आहे राज्यात ? जनतेला हा प्रश्न पडला आहे. जनता लोकप्रतिनिधींचा हा कलगीतुरा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे? एकमेकांवर होणारे यांचे आरोप प्रत्यारोप पाहून कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाही हे जनतेला या नेत्यांनीच लक्षात आणून दिले आहे. या लोकप्रतिनिधींना जनता का निवडून देते ? तर जनतेचे प्रश्न सुटावेत म्हणून , विकास व्हावा म्हणून परंतू हे त्याकडे काहीही लक्ष न देता बहुतांश वेळ एकमेकांची प्रकरणे काढण्यात खर्ची घालतात , सभागृहात शांततेत चर्चा न करता राज्याच्या कित्येक प्रश्नांकडे कानाडोळा करतात , एकमेकांवर आरोप , गोंधळ यातच हे सभागृहाचा बहुमोल वेळ खर्ची घालत असतात. 

        उन्हाळा सुरु आहे राज्यात अनेक ठिकाणी पाणी प्रश्न आहे , काही ठिकाणी धरणात पाणी असूनही भारनियमनामुळे टाक्या भरल्या जात नाहीत व नळ वेळेवर येत नाही. काही शहरात बसवलेले नवीन मिटरचे नळ शोभेची वस्तू बनले आहेत, काही पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्या आहे. उन्हाळ्यात वीज व पाण्याची वाढती मागणी असतांना वीज कंपन्यांना दीड/ दोन दिवसांचा कोळसा शिल्लक असतांना जाग येते. उन्हाची काहिली सुरु असतांना जनता घामाच्या धारात भिजत असते नेते मात्र वातानुकुलीत गाड्या व वातानुकुलीत कक्षात बसलेले असतात. भारनियमन , पाणी यांसह बेरोजगारी , आरोग्य , स्वच्छता , कर्मचा-यांचे प्रश्न , पेट्रोलवर राज्याचा कर , असे कित्येक प्रश्न आहेत.  लोकप्रतिनिधींना प्रकृती स्वास्थ्य खराब असेल तर निधी मिळतो , आमदारांना घरे देण्याची सुद्धा कल्पना यांच्या सुपीक डोक्यातून निघाली होती. स्वत:च्या पात्रात तुप ओढणे यांना बरोबर जमते कर्मचा-यांना, शिक्षकांना जुनी पेन्शन देतांना मात्र पैसे नसतात. जनता हे सर्व जाणून आहे परंतू जनतेने आता लोकप्रतिनिधी निवडतांनाचे आपले जुने विचार त्यागून काम करणा-यास निवडून देणे आवश्यक झाले आहे, चांगल्या देशप्रेमी तरुणांनी सुद्धा राजकारणात येण्याचा विचार करावा.

      दुस-याच्या घरासमोर हनुमान चालिसा , आपल्या नेत्याविरुद्ध कुणी तक्रार करत असेल तर कर त्याच्यावर हल्ला , इडी चौकशी करीत असलेल्या नेत्यांचे स्वागत , नेत्यांसाठी व पक्षासाठी आंदोलने , एकमेकांची उणीदुणी , भ्रष्टाचार हे करण्यापेक्षा नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांबाबत आंदोलने करावीत. जनतेची पाणी समस्या , भारनियमन यासंबंधी तोडगा काढण्याचे प्रयत्न करावे. जनतेच्या प्रश्नांसाठी प्राथमिकता द्यावी हेच जनतेला अपेक्षित आहे. निव्वळ आम्ही असे तुम्ही तसे हे घसा फाडून , रोज सकाळी पत्रकारांसमक्ष येऊन , पत्रकार परिषदा घेऊन सांगण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना हात घातल्या गेला पाहिजे , त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, हे जनतेला अपेक्षित आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकाणाचा स्तर हा पुर्वीसारखाच राखल्या गेला पाहिजे. सत्तेचा उपयोग शिवाजी महाराज जसा रयतेसाठी करीत तसा सत्ताधा-यांनी सुद्धा जनता जनार्दनासाठी करणे महत्वाचे नाही का? विरोधक व सत्ताधारी दोघेही एकमेकांची प्रकरणे / भ्रष्टाचार / चौकशी यातच मश्गुल आहेत जनतेच्या अनेक प्रश्नांकडे  त्यांची साफ डोळेझाक होत आहे. त्यांची नजर केवळ आणि केवळ सत्त्तेकडे आहे म्हणूनच त्यांना एक नजर इधर भी... अर्थात जनतेकडे व जनतेच्या प्रश्नांकडे सुद्धा एक नजर असू द्या असे सांगावेसे वाटते.

०७/०४/२०२२

Article about Raj Thackray Speech on Gudhi Padawa 2022

 ...क्या बहिरा हुवा खुदाय ? 




संत कबीर यांच्या 550 वर्षांपुर्वीच्या दोह्यात शीर्षकातील हा प्रश्न उपस्थित केला होता.या दोह्याची आठवण राज ठाकरे यांच्या भाषणामुळे झाली.विविध जात,पंथ,धर्म असलेल्या या भारत वर्षात सर्वांनाच समान अधिकार, वागणूक , न्याय, ईश्वर आराधना इ. सर्वांत समानता असावी असेच राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. देवाची प्रार्थना एकाची भल्या मोठ्या आवाजात तर दुस-यास मात्र ती अनुमती नाही मग कुठे गेले आपले समानतेचे तत्व ? 

     परवाच्या राज ठाकरे यांच्या भाषणांवरुन सध्या चांगलाच वाद पेटलाय. संत कबीर यांच्या 550 वर्षांपुर्वीच्या दोह्यात शीर्षकातील हा प्रश्न उपस्थित केला होता.या दोह्याची आठवण राज ठाकरे यांच्या भाषणामुळे झाली. राज यांचे भाषण अनेकांच्या जिव्हारी लागलेले दिसते.  म्हणूनच त्यानंतर नेत्यांना रंग बदलणारा सरडा , अक्कल दाढ , वस्तरा , भोंगा , बी टिम, सी टिम अशा प्रकाराच संज्ञा आठवायला लागल्या आहेत. राज ठाकरे हे काल मशिदी वरील भोंग्यांबाबत बोलले. हनुमान चालिसा सुद्धा भोंग्यांवरून म्हटला जावा असेही भाष्य त्यांनी केले. याच मुद्द्यावरून अबु आझमी यांनी सुद्धा हिंदू उत्सवात वाजणा-या डिजेवर आक्षेप घेतला. सर्वांनाच ज्याचा-त्याचा धर्म, भाषा, संस्कृती ,देव हे प्रिय असतात, त्यांच्याविषयी अभिमान आणि भावना जोडलेल्या असतात परंतू घराबाहेर पडतांना आपल्या जाती धर्माला घरीच सोडून बाहेर निघाले पाहिजे. "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो" या सावरकरांच्या वचनाचा विसर आता सर्वांनाच पडलेला दिसतो म्हणूनच देशाचा विकास, देशहित याबाबत बोलण्यापेक्षा आपल्या भारतात राजकारणी धर्म , जात केंद्रीतच राजकारण करतांना दिसतात. परंतू राज ठाकरे जे बोलले ते कित्येक सर्वसामान्यांच्या मनात आहेच. विविध जात,पंथ,धर्म असलेल्या या भारत वर्षात सर्वांनाच समान अधिकार, वागणूक , न्याय, ईश्वर आराधना इ. सर्वांत समानता असावी असेच राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. देवाची प्रार्थना एकाची भल्या मोठ्या आवाजात तर दुस-यास मात्र ती अनुमती नाही मग कुठे गेले आपले समानतेचे तत्व ? हेच शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आहे गुणप्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया यात विद्यार्थ्यांना कुठे समानतेने पाहिले जाते ? पण असे कुणी स्पष्ट बोलले , लिहिले की मग वाद निर्माण होतो, विविध प्रतिक्रिया व्यक्त होतात, त्या प्रतिक्रियांची सुद्धा चर्चा होऊ लागते व मुख्य मुद्दा मात्र बाजूस पडतो. हे आपल्या देशात होतच आले आहे. राज ठाकरे बोलल्यानंतर नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात जानवे सुद्धा आलेच. एक बोलला की त्यावर प्रतिक्रिया द्यायची व मध्ये तिस-यालाच विनाकारण घुसडायचे हे सुद्धा राजकारणी हेतुपुरस्सर करीत असतात. तुलसीदास रचित हनुमान चालिसा यावर कुण्या जातीचा अधिकार नाही तो सर्वच हिंदू गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणत आले आहे मग जानवे मध्येच का आणायचे? या दशकात राजकारणात जेंव्हा नवीन पिढी येऊ लागली तेंव्हा असे वाटले होते की हे उच्चविद्याविभूषित, परदेशात शिकून आलेले तरुण विकासाभिमुख राजकारण करतील परंतू ते सुद्धा पुर्वापार चालत आलेल्या राजकारणाचीच री ओढत आहेत हे दुर्दैवी आहे. जात,पंथ, धर्म केंद्रीत राजकारण तुष्टीकरण, मतपेढीसाठी लांगूलचालन हे आपल्या देशातून कधी हद्दपार होईल देव जाणे. एकास एक न्याय व दुस-यास वेगळा असे व्हायला नको. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात लिहीलेल्या आपल्या घटनेत सुद्धा समानता हे तत्व आहे मग त्या तत्वाचे अनुसरण होतांना का दिसत नाही? प्रत्येक धर्मियांनी व त्यांच्या नेतृत्वाने यावर सखोल विचार करणे अत्यंत जरूरी आहे. आपआपले देव , धर्म यांना घरातच ठेवले पाहिजे व बाहेर आपण सर्व भारतीय असल्याची भावना रूजवली गेली पाहिजे. आपल्या देशातील सर्व धर्मियांतील संत महात्म्यांनी सुद्धा आपल्याला “जे जे भेट भूत तया जाणिजे भगवंत” अशी शिकवण दिली आहे. ईश्वरची आराधना करण्याचे मार्ग सुद्धा सांगितले आहेत. या आराधनेत दिखावा नको असेच सर्व संत महात्म्यांनी सांगितले आहे. म्हणूनच संत कबीर म्हणतात,

कांकर , पाथर जोडी के

मस्जिद देयी चुनाय |

तां चढी मुल्ला बांग देयी,

क्या बहिरा हुवा खुदाय ?

म्हणूनच सर्वांनी आपआपल्या धर्माचे आचरण करावे परंतू त्याचा त्रास आपल्याच देशबांधवांना होऊ नये याची काळजी घ्यावी व “देहा कडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो” या सावरकरांच्या विचाराचे सुद्धा स्मरण ठेवावे.