०५/०५/२०२२

500th Article

 लिखता चला जाऊं , Article 500


जननिनाद मधील स्तंभ व तदनंतर ब्लॉग सुरु करून 8 वर्षे झाली.लेखन सुरु केले त्यावेळी असे वाटले नव्हते की आपण इतके लिहू.परंतु वाचकांचा उदंड प्रतिसादवेळोवेळी मिळणाऱ्या प्रतिक्रियाप्रेरणा यामुळे आजच्या या पाचशेव्या लेखापर्यंत येऊन पोहचलो
प्रतिसादाबद्दल खामगाव परिसरातील 
वाचकवर्ग तसेच वृत्तपत्र इंटरनेट आवृत्तीब्लॉग, फेसबुकच्या 
माध्यमातून वाचणारे तसेच जन-निनाद , तरुण भारत, वृत्तकेसरी, देशोन्नतीचे संपादक, आणि 
कर्मचारीवृन्दांचे आभार.

     कुणीही कोणतेही कार्य सुरू केले , ते अविरत सुरूच ठेवले , त्या कार्यास वर्षपुर्ती झाली , 25 वर्षे झाले , 50 वर्षे झाले की मग  झालेली ती वर्षपुर्ती, गाठलेला तो टप्पा साजरा करण्याची प्रथा सर्वदूर आहे. विविध संस्था, कार्यालये, राजकीय पक्ष सुद्धा असे करतात.  आजकाल वाढदिवस तर मोठया जोशात साजरे केले जातात. ही प्रस्तावना देण्याचे प्रयोजन असे की, 2013 पासून दर गुरुवारी एक लेख याप्रमाणे आजचा हा 500 वा लेख आहे. वृत्तपत्र व ब्लॉग मिळून हे 500 लेख आहेत. लिखाण सुरु केल्यावर काही कालांतराने  ब्लॉग लिहिणे सुरु केले त्यामुळे या 500 लेखांपैकी 433 लेख हे ब्लॉगवर आहेत, सुरुवातीचे 67 लेख ब्लॉगवर पोस्ट झाले नाहीत. कोणतेही एक कार्य नियमित करावे असे म्हटले जाते इतर माहीत नाही परंतु लेखन कार्य का कोण जाणे मी नियमित करू लागलो. कदाचित समाजातील विघटनवाद, निराशावाद, अपप्रवृत्ती, नक्षलवाद, शहरी नक्षलवाद, भ्रष्ट नेते, नोकरशहा अशा बाबी व अनेक सकारात्मक बाबींनी लेखनास प्रवृत्त केले व या कार्यात नियमितता आजपावेतो तरी राखू शकलो. सहज म्हणून एक लेख लिहिला, लेख काय 15-20 ओळी रखडल्या होत्या. पण ते लिखाण सांज दैनिक जन निनादचे आमचे मित्र अ‍ॅड. अनिल चांडक यांना आवडले, तो दिवस गुरुवार होता, ते म्हणाले, ”छान लिहिले आता दर गुरुवारी लिहीत जा” , “काय लिहिणार एवढे ?” असे मी उत्तरल्यावर ,”भरपूर विषय असतात , लिहा” चांडक यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पहिलाच लेख स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लिहिल्या गेला व चांगला प्रारंभ झाला. मग दुसरा, तिसरा असे लेख दर गुरुवारी नेमाने लिहीत गेलो, कित्येकदा गुरुवार व्यतिरिक्त सुद्धा काही प्रासंगिक लेख लिहिले, तरुण भारत , देशोन्नती, लोकमत, वृत्तकेसरी, साप्ताहिक जनमंगल  या वृत्तपत्रातून सुद्धा लेख प्रकाशित झाले. दोन लेख ई-बुक मध्ये सुद्धा प्रकाशित झाले. लेख प्रकाशित होत होते, या लेखातील विचार माझ्या मनातून प्रसवले जात होते, मी जरी लिहीत असलो तरी संत तुकाराम ज्याप्रमाणे “गोविंद वदवी तेच म्हणे” असे म्हणाले होते या ओळींचे स्मरण मला कित्येकदा व्हायचे , नव्हे होतच असते. तसेच माझ्या या लेखांच्या लिहवित्यास सुद्धा मी मनोमन नमन करत होतो. कित्येकदा वरीष्ठांच्या मुखाने ऐकलेले “आपण केवळ निमित्तमात्र असतो” हे वाक्य सुद्धा स्मरणात आहेच. लेखामागून लेख लिहिल्या गेले, वाचकांचे चांगले अभिप्राय येत गेले, त्यातून आणखी लिहिण्याची उर्मी होत गेली व लेखनाचे जणू व्यसनच जडले. खामगांव शहरातील जुन्या परंतू आता भग्न, भकास झालेल्या स्थळांबद्दलची, खामगांवातील खाद्य संस्कृतीची, वेड्यांविषयीची अशा तीन लेख मालिका सुद्धा लिहिल्या. वाचकांच्या प्रतिक्रिया येतच होत्या ज्या मला आणखी लिहिण्यास भाग पाडत होत्या. मी लहान शहरातील एका सांज दैनिकातून लिहीत असल्याने माझ्या लेखांचे वाचक हे निमशहरी व ग्रामीण आहेत ,हो पण सोशल मीडियामुळे, माझ्या ब्लॉगमुळे व जन निनादच्या इंटरनेट आवृत्तीमुळे माझे लेख देश-विदेशातील उच्चशिक्षित लोक सुद्धा वाचत आहेत. पण पंक्चर दुरुस्तीच्या दुकानदाराने, ऊसाच्या रसाच्या गाडीवाल्याने टँकर वाल्याने वा इतर किरकोळ विक्रेत्यांनी किंवा तळागाळातील वाचकांनी जेंव्हा माझ्या लेखांबद्दल मला प्रतिक्रिया दिली तेंव्हा मला विशेष आनंद झाला. कारण खरा भारत ग्रामीण भागातच दिसतो असे म. गांधींनी म्हटले होते, व त्याच ग्रामीण भागातील हे लोक होते. यातील काहींनी त्यांना माझ्या कित्येक लेखातील सर्वांना घेऊन चालण्याची भाषा, जातीभेद न पाळण्याबाबत केलेले आवाहन, संत व थोर पुरुष हे सर्वांचेच आहेत, आपली विचारसारणी कोणती का असेना पण राष्ट्र प्रथम असले पाहिजे असे उल्लेख खुप भावल्याचे व्यक्त केले. मंगळवार/बुधवार आला की आगामी लेखासंबंधीत विचार मनात येण्यास सुरुवात व्हायला लागते व गुरुवारी लेख प्रकाशित होतो. लेख प्रकाशित झाल्यावर सोशल मिडीयावर तो शेअर पण करतो. ते आवश्यक आहे की नाही माहीत नाही कारण भगवंताने गीतेत सांगून ठेवले आहे की , “...मा कर्मफलहेतुर्भुर्मा..” अर्थात हे अर्जुना कर्माच्या फळाप्रती आसक्ती ठेवू नको. माझ्या लेखातून मात्र मला आपण निर्मिलेली गोष्ट इतरांना कळावी, त्यांना ती आवडावी ही ईच्छा म्हणजे एक प्रकारची फलप्राप्तीची सुप्त आशा कुठेतरी असतेच, लोकेषणाच ती. त्यामुळे मी करीत असलेले लेखन हे ईश्वरपर्यावसायी होत नव्हते व हे लेखन कर्म लौकिक अर्थाने जरी यशस्वी वाटत असले तरी आध्यात्मिक दृष्टीकोनातून मात्र कदाचित वाया जाणारे कर्म आहे. असे सर्व विचार हा 500 वा लेख लिहितांना मनात आले व लेखनाचा हा छंद जडल्यावर “जीवनभर लिखता चला जाऊं” असेच वाटत आहे फक्त या कर्मातून अहंकार निर्माण न होवो हेच भगवंताकडे निवेदन. 

   हा प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला ते  वाचकवृंद व ज्यांच्यामुळे हे लेख वाचकांपर्यंत पोहचू शकले त्या सर्व वृत्तपत्रांच्या संपादक महोदय व कर्मचारी वृंद यांचे मनस्वी आभार.