०१/०९/२०२२

Article about appointing teachers for various works.

 शिक्षक काय काय करणार?

निवडणूका , जन गणना इथपर्यंत ठीक आहे,  ते समजू शकतो त्यात देशाच्या कार्यात मदत आहे परंतू चाकरमान्यांची आवभगत करण्यासाठी शिक्षकाची नियुक्ती म्हणजे अति झाले.

काल समाज माध्यमांवर एक पत्र मोठ्या प्रमाणात प्रसारीत होत आहे. पंचायत समिती राजापूर यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार राजापूर यांच्या सूचनांनुसार दिलेले हे पत्र आहे. या पत्रातील मायन्यानुसार गणपती उत्सवासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर व महाराष्ट्रातील इतर भागांतून चाकरमाने हे कोकणात येत असतात. त्यांचे स्वागत, त्यांना वाहन व्यवस्था, चहा-पाणी इत्यादींसाठी तलाठ्यांच्या सुचनांनुसार काम करायचे आहे. यासाठी शिक्षकांच्या यादया तयार झाल्या असून त्यांना पाठवण्यात सुद्धा आल्या आहेत. या पत्रांन्वये शिक्षकांना दिलेल्या वेळेत एस.टी. डेपो वर हजर राहून आलेल्या चाकरमान्यांचे स्वागत कराचे आहे. विशेष म्हणजे हे पत्र तातडीचे आहे. आता असाच कित्ता पुढेे राज्यभरात पालख्या वाऱ्या इतर सण इत्यादींच्या वेळेस सुद्धा शासन असाच कित्ता गिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही व   पुन्हा शिक्षकांना वेठीस धरले जाईल.

आता मुद्दा हा आहे की शिक्षक हा नियुक्त झालेला असतो ते विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्याच्याकडून शिक्षणाव्यतिरिक्त आणखी कोणकोणती कामे सरकार करून घेणार आहे. निवडणूका , जन गणना इथपर्यंत ठीक आहे,  ते समजू शकतो त्यात देशाच्या कार्यात मदत आहे परंतू चाकरमान्यांची आवभगत करण्यासाठी शिक्षकाची नियुक्ती म्हणजे अति झाले. "अतिथी देवो भव" हे शिक्षकच शिकवत असतो हे मान्य आहे, ती आपल्या भारताची संस्कृतीच आहे. परंतू गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी येणा-या चाकरमान्यांची एवढी आवभगत कशासाठी? गणपती आपल्या सर्वांचीच इष्ट देवता आहे. परंतू त्याच्या उत्सवासाठी जाणा-यांनी त्यांच्या- त्यांच्या सोयीने जावे. त्यात शासकीय यंत्रणा कशासाठी जुंपायच्या ? तलाठी आवभगत करण्याच्या सूचना देण्यासाठी  डेपो वर जाणार मग त्याच्याकडे कामासाठी येणा-या जनतेला नाहक त्रास होणार. उगीच नवीन काही सुरू करायचे व भार वाहण्यासाठी शिक्षक वेठीस लावायचे. आज चहा पाणी  सुरू केले , उद्या जेवणावळी घालणे सुरू करतील , मग जातील शिक्षक वाढपी म्हणून. काय लावले काय ? भक्त , पाहुणे यांची आवभगत  करणे ही आपली संस्कृती आहे हे वर सांगीतलेच परंतू आपल्याकडचे लोक त्यांचा काय भरवसा चहा नाही भेटला तर शिक्षकांना " ए चहा आण रे लवकर" अशा आज्ञा देतील , अनुचित काही बोलण्याचाही नेम नाही. शासनाने वृथा नवीन काही पायंडे पाडणे बंद करावे व पायंडे घालायचेच असतील तर त्यासाठी मनुष्यबळाचा विचार आधीच करून ठेवावा विनाकारण शिक्षकांना वेठीस धरू नये. अनुदान देत नाही , नाना निकष लावतात , वेतनेतर अनुदान देत नाही , जुनी पेन्शन देत नाही, त्यांना शिक्षक त्याच्या समस्या आदी आठवत नाही ,  केसरकर जुन्या पेन्शन बाबत बोलताना शिक्षकांच्या पेन्शनची 2045 पर्यंतची आकडेवारी काढतात, त्यांनी आमदार खासदार यांना 2045 पर्यन्त काय काय सवलती , मानधन मिळते याची सुद्धा आकडेवारी सांगावी. तुम्हाला जसे पाहिजे असते , तसे किंवा त्यापेक्षा कमीच असे शिक्षकांना अपेक्षित नसावे का?  प्रगाढ गुरु परंपरा असलेल्या आपल्या देशात गुरुला कोणतीही कामे करण्यास भाग पाडले जाणे हे योग्य नाही. आमदार लोक किती हलक्या भाषेत बोलतात हे प्रशांत बंब यांची ध्वनीफित ऐकून जनतेला समजलेच आहे,  जनता सुद्धा जो त्यांच्या पाल्यांना शिक्षण देतो , त्यांना हिताच्या गोष्टी सांगतो त्या शिक्षकाकडे हल्ली सन्मानाने पाहत नाही. एकेकाळी ज्या भारतात गुरुला/शिक्षकाला मोठा सन्मान मिळत असे राजदरबारी सुद्धा त्याला राजाप्रमाणे आदर मिळत असे राजा सुद्धा त्याचे ऐकत असे अशा शिक्षकांना आज शासन वेठीस धरून कोणतीही कामे बहाल करत आहे  शिक्षणेतर विविध कार्य करून शिक्षक हे मानसिकरित्या त्रस्त झालेले आहेत त्यांचे जे ज्ञानदानाचे मुख्य कार्य आहे त्याच कार्याकडे शासनामुळेच त्यांना पूर्णपणे झोकून देऊन लक्ष देता येत नाही. शासनाची जर शिक्षकांप्रती अशीच भावना असेल तर शिक्षणाचा दर्जा हा घसरणारच शिक्षकाला त्याचे शैक्षणिक कार्य करू द्या आणि तुमच्या ज्या विनाकारणच्या योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना चहापाणी देण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्ती करू नका हेच सांगण्यासाठी हा पत्र प्रपंच.

✍️विनय वि.वरणगांवकर ©

३ टिप्पण्या: