२०/१०/२०२२

Article about Mohasin Butt visit to India on the occasion of Interpol Summit.

मोहसिन बट यांची बरेच काही सांगून जाणारी चुप्पी

 


  इंटरपोल संघटना, इंटरपोल महासभा, त्या अनुषंगाने भारतात आलेले पाकिस्तानचे सिमा सुरक्षा , गुन्हा अन्वेषण , व गुप्तचर संघटनेचे प्रमुख मोहसिन बट व  पत्रकारांच्या प्रश्नांवरची त्यांची चुप्पी यांबाबत थोडेसे 

परवा इंटरपोलच्या (Interpol) महासभेचे उद्घाटन झाले. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महासभेचे उद्घाटन झाले. तर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे शुक्रवारी या महासभेच्या समापन समारोहात उद्बोधन करणार आहे. 1997 नंतर ही बैठक भारतात होत आहे. प्रगती मैदान, दिल्ली येथे होत असलेली ही 4 दिवसीय महासभा  इंटरपोलची 90 वी वार्षिक महासभा आहे. या महासभेच्या अनुषंगाने दिल्लीतील वाहतूक सुद्धा इतर मार्गानी वळ्वण्यात आली आहे. चार दिवसांच्या कार्यक्रमात 195 देशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान कार्यालया कडून आलेल्या माहितीव्दारे या प्रतींनिधींमध्ये सदस्य देशांचे  मंत्री, पोलिस प्रमुख, केंद्रीय ब्यूरोचे प्रमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. पीएमओ ने दिलेल्या माहितीनुसार महासभा म्हणजे  इंटरपोलची सर्वात महत्वपूर्ण अशी सभा असते जी वर्षातून एकदा संपन्न होत असते. या बैठकीत इंटरपोलच्या कामकाजा बाबत समीक्षा होत असते तसेच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात. या बैठकीत अनेक आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचाराच्या विभिन्न प्रकरणावर चर्चा केली जाणार आहे. या महासभेच्या उद्घाटनपर भाषणांत बोलतांना मोदी यांनी भ्रष्टाचारी, दहशतवादी, मादक पदार्थांचे तस्कर, शिकार करणा-या टोळ्या, संघटीत गुन्हेगार  यांना कोणत्याही देशाने आश्रय देऊ नये व दहशतवादाविरुद्ध सर्व राष्ट्र एकजूट असावे. असे आवाहन केले. याप्रसंगी इंटरपोलचे अध्यक्ष युनायटेड अरबचे अहमद नासीर अल रईसी हे उपस्थित होते. मोदी आणि त्यांच्या हस्ते 100 रुपयांच्या नाण्याचे विमोचन झाले.            आता प्रथम  इंटरपोल बाबत जाणून घेऊ व तद्नंतर या महासभेत पाकिस्तानच्या प्रतींनिधीची कशी फजिती झाली ते पाहू. 

 इंटरपोल या आंतर्राष्ट्रीय संघटनेची स्थापना ही 7 डिसेंबर 1923 रोजी व्हीएन्ना, ऑष्ट्रीया येथे झाली असून या संघटनेचे मुख्य कार्यालय फ्रांस देशातील लीऔं (लियॉन)  येथे स्थित आहे.  इंटरपोल अनेक गुन्हेगारी संबंधीत प्रकरणांमध्ये सदस्य देशांना सहकार्य करीत असते. आंतर्राष्ट्रीय गुन्हे, दहशतवाद, सायबर क्राईम रोखण्याबाबत प्रशिक्षणे सुद्धा आयोजित करीत असते. या संघटनेच्या व्यापक कार्यक्षेत्रात बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, अमली पदार्थ, राजकीय भ्रष्टाचार, बौद्धिक संपदा चौर्य हे सुद्धा येतात असे या संघटनेबाबत संक्षिप्तरित्या सांगता येईल.

 इंटरपोलच्या याच महासभेच्या अनुषंगाने पाकिस्तानी सिमा सुरक्षा, गुन्हा अन्वेषण, व गुप्तचर संघटनेचे प्रमुख मोहसिन बट हे सुद्धा भारतात आलेले आहे. पाकिस्तान हे राष्ट्र दहशतवाद पोसते आहे हे जगजाहीर आहे. बायडेन यांनी सुद्धा नुकत्याच पाकिस्तानला कानपिचक्या दिल्या होत्या. पाकिस्तान मध्ये अंतर्गत प्रश्न अनेक असूनही , तेथील अर्थव्यवस्था डबघाईस गेली असूनही हे राष्ट्र निव्वळ भारत विरोधासाठी दहशतवादरूपी भस्मासुराला पोसत आहे. हा भस्मासुरच एक दिवस पाकिस्तानच्या डोक्यावर हात ठेऊन त्याची राखरांगोळी निश्चित करणार आहे व तशी वेळ जवळ आल्याची चिन्हे दिसतच आहे. दहशतवाद, दाऊद सारख्या डॉनला आश्रय देणे, इतर दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना अभय देणे, आश्रय देणे हे आज जरी पाकिस्तानला चांगले वाटत असले तरी भविष्यात या कुरापतखोर राष्ट्राचा घात करणार आहे. मोहसिन बट प्रमुख असलेली पाकिस्तानी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी  ही गुप्तचर संस्था  इंटरपोलशी समन्वयाचे काम करीत असते. बट प्रगती मैदान येथील हॉल मध्ये आले असता पत्रकारांनी त्यांना दाऊद, जैशे मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर तसेच मुंबई वरील हल्ल्याचा सुत्रधार हाफिझ सईद यांच्या बाबत तसेच त्यांचा ठावठिकाणा कुठे आहे हे बट यांचेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चुप्पी साधली होती. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न केला व भोजन कक्षातच घुटमळत राहिले. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाची घोषणा होताच त्यांनी सभास्थानी प्रवेश केला परंतू पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही,  बट यांची ही चुप्पी बरेच काही सांगून गेली.  

१३/१०/२०२२

Article about Karwa Chauth , a hindu festival

करवा चौथ 


आज करवा चौथ, पुर्वीचे हिन्दी चित्रपट म्हटले की  गाजर का हलवा , मुली के पराठे , एक पियानो  व पियानो गीत तसेच करवा चौथचा एक  प्रसंग असे समीकरणच असायचे. यातील करवा चौथ या सणाविषयी थोडेसे...

हिंदू संस्कृती म्हणजे नाना प्रकारचे उत्सव, सण , व्रत वैकल्ये साजरी करणारी संस्कृती. झाडे , पशू , पक्षी , जल पूजन करणारी व पंचमहाभूतांप्रती आदर बाळगणारी जगातील एकमेव अशी संस्कृती , एक विचारधारा. भारताच्या सर्वा दिशांत निरनिराळे सण साजरे केले जातात, असाच एक  सण म्हणजे करवा चौथ. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो. भारताचा उत्तर भागात व पश्चिम भागात हा  सण साजरा केला जातो. करवा चौथ हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. भारताच्या  जम्मू कश्मीर , हिमाचल प्रदेश, पंजाब , उत्तर प्रदेश , हरियाणा , मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांत मुख्यत: हा सण साजरा केला जातो. करवा चौथ या सणाची माहिती देशभरातील जनतेला ठाऊक झाली ती मुख्यत्वे 80 च्या दशका पर्यन्त आलेल्या हिंदी चित्रपटातून. माझ्याप्रमाणेच अनेकांना करवा चौथ हा सण चित्रपटांनीच लक्षात आणून दिला आहे. पत्नी आपल्या पतीसाठी चाळणीतून चंद्राकडे पाहते एवढीच काय ती करवा चौथ या सणाबाबतची माहिती. चित्रपटातील नटी आपल्या पतीला "आज मैने तुम्हारे लिये  करवा चौथ का व्रत रखा  है | असे म्हणत असते नट मात्र कुठेतरी नशेत किंवा इतर कुणाच्या प्रेमात पडलेला असा असतो , थिएटर मध्ये लेडीज स्टॉल मध्ये अश्रूंच्या धारा लागतात , चित्रपटात मग नट पुन्हा नटीला भेटतो व मग नंतर सर्व सुरळीत होते  थिएटर मध्ये सुद्धा हास्य फुलते असा मेलोड्रामा अनेक हिन्दी चित्रपटातून पाहिला व करवा चौथ ची माहिती झाली. पुर्वीचे हिन्दी चित्रपट म्हटले की  गाजर का हलवा , मुली के पराठे , एक पियानो  व पियानो गीत व एक करवा चौथ प्रसंग असे समीकरणच असायचे. असो ! परंतू पुढे करवा चौथ या सणाची माहिती झाली. हा सण ग्रामीण तथा शहरी स्त्रिया मोठ्या उत्साहाने साजरा करतात (आज काल इंस्टाग्राम , फेसबुक , व्हाट्स अप यावर फोटो शेअर करण्यासाठी म्हणून जरा जास्तच उत्साह असतो) शास्त्रानुसार करवा चौथ हे व्रत कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करायचे असते. पतिच्या दीर्घायु ष्यासाठी व अखण्ड सौभाग्यासाठी म्हणून या दिवशी भालचन्द्र गणेशाचे पूजन केले जाते.  संकष्टी चतुर्थी प्रमाणे उपवास ठेऊन रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर मग भोजन करायचे असते. प्रत्येक घरी त्या-त्या घरच्या रिती रिवाजानुसार महिला हा सण साजरा करतात. स्त्रिया चन्द्रोदयापर्यन्त उपवास ठेवतात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला कारक चतुर्थी असे म्हणतात तसेच करवा म्हणजे मातीचे पसरट भांडे व भांड्यांची सुद्धा पुजा केली जाते.  स्त्रिया या भांड्यांची आदान प्रदान सुद्धा करतात  त्यावरून करवा-चौथ हा शब्द रूढ झाला. या दिवसाची एक  कथा सुद्धा सांगितली जाते. एकदा एका स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी चंद्रोदया पर्यन्त उपवास ठेवला ,काहीही खाल्ले नाही तेंव्हा तिच्या भावांना तिची चिंता वाटली तेंव्हा भावांनी एक युक्ती केली पिंपळाच्या झाडावर चाळणी व दिवा घेऊन चढले व दिव्याचा प्रकाश चाळणीतून बहिणीला दाखवला खाली असलेल्या भावानी बहिणीला आवाज दिला व तो प्रकाश दाखवून चंद्रोदय झाला असे सांगितले तिने भोजन केले. भोजन झाल्यावर तिचा पती मरण पावला. राणीने तिला तू  व्रत तोडले म्हणून पती मरण पावला असे सांगितले व पुन्हा वर्षभर हे व्रत पालन कर असे सांगितले. तिने तसे केल्यावर तिचा पती जिवीत झाला म्हणून हिंदू महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण साजरा करीत असतात. हा सण केवळ विवाहित स्त्रियाच साजरा करीत असतात. कोणत्याही जाती, वर्ण, संप्रदायातील स्त्रीला हा दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. 12 किंवा 16 वर्षांनंतर या व्रताचे उद्यापन केले जाते किंवा ज्या स्त्रियांना आजीवन हे व्रत करण्याची इच्छा असेल तर त्यांना तशी अनुमती आहे. सध्या अनेक दिवस साजरे केले जातात त्यानुसार आजकाल करवा चौथ या दिवसाला  पती दिवस असे संबोधले  जाते.  महाराष्ट्रातील अनेक हिन्दी भाषिक हिंदू महिला गेल्या कित्येक वर्षांपासून हा सण उत्साहाने  साजरा करत असतात. महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेला या सणाची माहिती मात्र अल्पशीच आहे त्यासाठीच हा लेख. करवा चौथची ही "साठा उत्तरी कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण"॰

 ✍️विनय वि.वरणगांवकर©



०४/१०/२०२२

Article about Ram Madhav ji on the occasion of Vijayadashmi and his Khamgaon city visit.

राम माधव यांचे व्याख्यान; 

खामगांवकरांनो वैचारीक सोने लुटा


राम माधवजी यांच्या सारख्या नामांकित, प्रभावी वक्त्याच्या, राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय स्तरावर कार्य करणा-या नेत्याच्या
 सभेला सुज्ञ खामगांवकर जनतेने सहपरिवार उपस्थित राहावे व यंदाच्या  विजयादशमीचे वैचारीक सोने लुटावे.

        राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा उत्सवांपैकी विजयादशमी उत्सवास विशेष महत्व आहे. संघ हा उत्सव देशभर साजरा करत असतो. देशात अनेक ठिकाणी या अनुषंगाने देशहित, देशाच्या समस्या, देशकार्य याबाबत लाखो वक्त्यांची बौद्धिके होत असतात. सरसंघचालकांच्या बौद्धिकाकडे तर जनता, माध्यमे व संपूर्ण जगाचे लक्ष केन्द्रित झालेले असते. यंदा विजयादशमी उत्सवाच्या अनुषंगाने आपल्या खामगांव नगरीत 8 ऑक्टोबर रोजी नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर राम माधवजी प्रमुख वक्ते म्हणून येणार असल्याचे वृत्त काही दिवस आधी स्थानिक वृत्तपत्रात झळकले होते. 

        राम माधवजी म्हणजे एक वैचारिक क्षेत्रातील  मोठे मानले जाणारे नांव. बालपणीच संघ संस्कार रुजलेले, अनेक वर्षे पत्रकारितेत घालवलेले असे ते नेते आहेत. "भारतीय प्रज्ञा" या मासिकाचे ते संपादक आहे,  त्यांनी अनेक पुस्तकांचे इंग्रजी व तेलगु भाषेत लेखन सुद्धा केले आहे."पार्टिशंड फ्रिडम, "अनइजी नेबर्स  इंडिया अँँड चायना आफ्टर 50 इअर्स ऑफ वॉर " सारखी त्यांची ग्रंथसंपदा आहे.  2003 ते 2014 या काळात ते संघाचे प्रवक्ते होते तदनंतर भाजपा सरचिटणीस व आता पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारणीत ते आहे. भाजपा सरचिटणीस पदाच्या कार्यकाळात (2014 ते 2020) त्यांनी काश्मीर मध्ये राजकीय स्थिती हाताळली तर  उत्तर पुर्व भारतात पक्ष विस्तार केला. 1981 पासून ते संघाचे पुर्णवेळ स्वयंसेवक आहे. 370 कलम हटविण्यापुर्वी ते काश्मीरला प्रभारी होते. "इंडीया फाऊंडेशन" म्हणून नवी दिल्ली येथे असणा-या राजकारण, देश विकास आदी बाबत कार्य करणा-या "थिंक टँक" म्हणून ओळखल्या जाणा-या संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहे. तसेच "व्हिजन इंडीया फाऊंडेशन" या युवकांमधून सामाजीक क्षेत्रात नवीन नेतृत्व निर्माण करणा-या संस्थेचे ते पालक म्हणून काम पाहतात, भारताच्या विदेश नीती मध्ये सुद्धा त्यांची भूमिका असते. कॅॅनडा , चीन , थायलंड  व इतर अनेक  देशांत ते विविध शांतीपूर्ण चर्चांसाठी गेलेले आहे. राम माधवजी यांचा  जन्म 22 ऑगस्ट 1964 रोजी आंध्र प्रदेशात झाला. त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदविका व राजशास्त्राची पदव्युत्तर पदवी असे त्यांचे शिक्षण झाले आहे.

        राम माधवजी यांचा असा मोठा परीचय आहे. आपल्या खामगांव  नगरीचे भाग्य असे की स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योत्तर काळात इथे अनेक मोठ-मोठे नेते व अमोघ वक्तृत्व शैली असलेले वक्ते येऊन गेले आहेत. खामगांवकर जनतेने नेहमीच अशा वक्त्यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद , प्रतिसाद दिला आहे व त्यांच्या अमुल्य विचारांचा ठेवा जतन केला आहे.  टिळक स्मारक मंदिर , विदर्भ साहित्य संघ यांसारख्या खामगांवातील अनेक संस्थांनी अनेक वक्त्यांना आमंत्रित केलेले आहे. येथील नामांकित महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनात सुद्धा अनेक नामांकित वक्ते येऊन गेले आहेत. असेच आता  राम माधवजी सुद्धा आता येत आहे. राम माधव हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले असून त्यांनी आपली पत्रकारीता व लिखाण तसेच आपल्या वैचारीक भूमिकेने सर्वदूर आपली छाप पाडली आहे. दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची खामगांव येथील नॅॅशनल हायस्कूलच्या मैदानावर सायं 6 वा 15 मि. सभा संपन्न होणार आहे. राम माधव हे जेष्ठ व विविध ठिकाणी कार्य केलेले असल्याने त्यांचा व्यापक दृष्टीकोन आहे त्यांचे विचार ऐकणे म्हणजे एक पर्वणीच ठरेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी श्रवण, मनन, निधीध्यासन जसे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे लौकिक जगात , प्रपंचात सुद्धा श्रवणाला महत्व आहेच. त्यामुळे खामगांवकर जनता व विशेष करून युवक वर्गाने ही संधी सोडू नये व त्यांचे व्याख्यान जरूर ऐकावे.  तसेच या निमित्ताने एक स्मरण होते एकदा खामगांव येथे बाबासाहेब पुरंदरे व्याख्यानासाठी आले असता उपस्थित श्रोत्यांना उद्देशून म्हणाले होते की , " थोर पुरुषांचा इतिहास ऐकण्यासाठी आलेली ही खामगांवकर जनता म्हणजे खामगांव शहराचे भूषणच आहे" अशी त्यांनी खामगांवकर जनतेची स्तुती केली होती. राम माधव यांच्या सारख्या नामांकित, प्रभावी वक्त्याच्या सभेला सुद्धा सुज्ञ खामगांवकर जनतेने सहपरिवार उपस्थित राहावे व  यंदाच्या  विजयादशमीचे वैचारीक सोने लुटावे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्या खामगांवकर जनतेची तारीफ केली होती ते खामगांवकर नागरीक व युवा राम माधव यांच्या विचारांचे सोने लुटायला नक्की येतील अशी खात्री आहे. सर्वांना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

✍️विनय वि.वरणगांवकर ©

०३/१०/२०२२

Article about renowned , beautiful bollywood actress of 1960s, 70s Asha Paresh

 ... मुझसा कोई कहाँ ?

आशा पारेख तेंव्हा आणि आता

...हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या गाजल्या परंतु आशा पारेख या अभिनेत्री बाबत असे म्हणता येईल की कोणत्याही नटासोबत त्यांची जोडी जमून दिसत असे...

   सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आणि परवा त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे कळतात सर्वप्रथम त्यांच्याच गाण्याची ओळ आठवली. जिद्दी चित्रपटात आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे आहे "रात का समा झुमे चंद्रमा" या गाण्यांमध्ये अभिनेता नायक जॉय मुखर्जीला उद्देशूूून आशा पारेख म्हणतात "तेरी तरह जा रे जा बहुत देखे मुझसा कोई कहाँ".  तशा तर त्या काळात अनेक सुंदर व अभिनय संपन्न अशा अभिनेत्री होत्या परंतू आशा पारेख यांच्यात काहीतरी वेगळेपण निश्चितच होते व म्हणूनच त्यांना त्यांच्याच गाण्यातील मुझसा कोई कहा ही ओळ लागू पडते. खरे तर आशा पारेख यांंनी अभिनेत्री म्हणून 60 च्या दशकात रुपेरी दुनियेत पदार्पण केले, म्हणजे आमच्या पिढीच्या कित्येक वर्षे आधीच्या त्या अभिनेेत्री. पण 30/35 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर जुने चित्रपट मोठ्या प्रमाणावर दाखवत असत, तसेेेच टॉकीजमध्ये सुद्धा पुन: प्रदर्शीत होत असत. शिवाय गणेश उत्सव असला की गल्लोगल्ली व्ही. सी. आर. (व्हीडिओ कॅसेट रेकॉर्डडर) आणून सिनेमा दाखवण्याचा कार्यक्रम होत असे त्यामुळे अनेक जुन्या कलाकारांची ओळख झाली त्यातीलच एक आशा पारेख. ही ओळख झाली ती एन.सी.सी.च्या कॅम्पमध्ये. त्या काळात एन.सी.सी.च्या कॅम्प मध्ये कॅडेट्सला मनोरंजन व्हावे म्हणून सिनेमा दाखवत असत. आम्ही जेव्हा कॅम्पला गेलो होतो तेव्हा आया सावन झुमके हा सुमधुर गीतांचा, ही मॅन हिरो धर्मेंद्र सोबतचा आशा पारेख यांचा चित्रपट दाखवला होता. हा सिनेमा व त्यासोबतच आशा पारेख सुद्धा लक्षात राहून गेल्या. पुढे असेच जब प्यार किसी से होता है, आये दिन बहार के, तिसरी मंजिल, आन मिलो सजना, कटी पतंग, दो बदन, कन्यादान (त्यावेळी मिटकरी असते तर त्यांनी कन्यादान या चित्रपटावर आक्षेप घेतला असता, असो !) आशा पारेख यांचे असे अनेक चित्रपट पाहण्यात आले. धर्मेंद्र सोबतचा शिकार हा सुद्धा एक लक्षात राहिलेला चित्रपट आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या गाजल्या परंतु आशा पारेख या अभिनेत्री बाबत असे म्हणता येईल की कोणत्याही नटासोबत त्यांची जोडी जमून दिसत असे. आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेली गीते सुद्धा खूप लोकप्रिय झालेली आहेत. जब चली थंडी हवा जब उठी काली घटा मुझको ये जाने वफा तुम याद आये, अच्छा तो हम चलते है, ओ हसीना जुल्फोवाली, कितना प्यारा वादा, आजा पिया तोहे प्यार दु, जिया हो जिया कुछ बोल दो, महल चित्रपटातील देवानंद सोबतचे आंखो आंखोमे हम तुम हो गये दिवाने अशी अशी कितीतरी हिट गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली आहेत जी आजही ऐकली जातात. 80 च्या दशका नंतर आशा पारेख या चित्रपटातून दिसणे बंद झाले. कालिया चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चनच्या वहिनीची भूमिका केली होती आणि त्यानंतर त्या बॉलीवूड पासून दुरावल्या. अनेक अभिनेत्यांना जशी चरित्र भूमिका करण्याची संधी मिळते तशा दमदार भूमिका आशा पारेख यांना मात्र मिळाल्या नाहीत आणि त्या बॉलीवूड पासून दूर झाल्या. 90 च्या दशकात त्यांनी काही मालिकांची निर्मिती केली होती. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले गेले आहे व फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. दमदार अभिनयाच्या भूमिका आशा पारेख यांना काही फार मिळाल्या नाही. त्यांचे सिनेमे म्हणजे नटीला शोभेची बाहुली सारख्या भूमिका असलेले होते पण तरीही कटी पतंग, मेरे सनम, दो बदन, मै तुलसी तेरे आंगन की, सारख्या चित्रपटातून आशा पारेख यांचा सुंदर अभिनय रसिकांना पाहायला मिळाला आहे. त्यांच्या बद्दल आणखी एक उल्लेख आवर्जून करावासा वाटतो की त्यांचे कुणाशी अफेअर असल्याचे कधीही ऐकिवात, वाचनात आले नाही किंवा ताशा वावड्याही कधी उठल्या नाही.अविवाहित आशा पारेख या जरी आता चित्रपटातून दिसत नसल्या तरी त्या अनेक चित्रपट रसिकांच्या स्मृतीत मात्र आहे व कायम राहतील. आशा पारेख यांची अभिनय क्षेत्र , सेन्सॉर बोर्ड, दूरदर्शन आदीतील कामगिरी पाहून केंद्र सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यांंना शुभेच्छा व त्या सिने पडद्यावर पुनश्च दिसोत हि "आशा"

✍️विनय वि.वरणगांवकर ©