२४/११/२०२२

Article about statements of leaders

वाचाळवीर स्पर्धा असावी. 


लोकप्रतींनिधींसाठी “वाचाळवीर स्पर्धा” का असू नये असेच वाटू लागले आहे. ही स्पर्धा 
घेतल्यावरही वाचाळवीर कोण ठरेल हेही सांगता येत नाही कारण? वाचाळपणात हे 
एकमेकांपेक्षा तसूभरही कमी नाही.                    

बालपणापासून वक्तृत्व स्पर्धा , वादविवाद स्पर्धा तुम्ही सर्व ऐकत , वाचत आले असालच परंतू आता आणखी एक स्पर्धा सुरू करण्याची वेळ आली आहे. परंतू ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी नसून लोकप्रतिनिधींसाठी असावी असे वाटते. असे सुचवण्याचे कारण हे की देश/राज्य चालविण्याऐवजी सांप्रतकालीन लोकप्रतिनिधी हे त्यांचे मुख्य कार्य सोडून , विकासादी विषयांबाबत भाष्य करणे सोडून  विविध मुद्दे खास करून जुन्या , ऐतिहासिक गोष्टी , राष्ट्रपुरुष , क्रांतीवीर , क्रांतिकारक यांच्याविषयी विनाकारणची , उपटसूंभ अशी वक्तव्येच जास्त करीत बेभान सुटले आहे. 

आताचे नुकतेच उदाहरण म्हणजे राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा चांगली सुरळीत सुरू होती, त्यांची भाषणे ही विशेष प्रभावी नसली तरी व्यवस्थित होती. महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्यावर मात्र त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विनाकारणची वक्तव्ये केली जी त्यांनी यापुर्वी सुद्धा केली आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा सर्वत्र तीव्र निषेधच झाला आणि तो होणे अपेक्षितच आहे कारण सावरकरांना अवघ्या महाराष्ट्रात मोठे सन्मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात ज्या सावरकर यांना विशेष जागा आहे त्या सावरकरांविषयी राहुल गांधी यांच्या मनात एवढा द्वेष का आहे हे ही एक कोडेच आहे ? त्यांना सावरकर यांच्याविषयी काही तरी ज्ञान आहे का ? खरे तर कुण्याही लोकप्रतीनिधीने कोणत्याही स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाविषयी द्वेष बाळगायलाच नको. सावरकर यांच्याविषयी बोलल्यानंतर टिका व्हायला लागली तेंव्हा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील भाषणांत ते बॅकफुटवर आल्यासारखे वाटत होते. “हमे किसीसे नफरत नही” वगैरे सारख्या सारवासारव करणा-या वाक्यांसारखी वाक्ये ते बोलले. त्यांचे सावरकर यांच्याविषयीच्या वाक्याचे धुमारे धूसर होत नाही तोच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार व नितीन गडकरी यांच्याशी करून आणखी एक वाद उपस्थित केला. राहुल गांधी , कोश्यारी , संजय राऊत यांच्यासह इतर सर्वच लोकप्रतिनिधी आता कमी अधिक प्रमाणात विनाकारणची वक्तव्ये करून नाहक वाद निर्माण करीत असतात. म्हणूनच या लोकप्रतिनिधींसाठी एखादी वाचाळवीर स्पर्ध्याच का असू नये असेच आता वाटू लागले आहे. महाराष्ट्रात तर हल्ली निव्वळच बोलघेवडेपणाच सुरू असतो. राज्यशकट कसा काय हाकला जातो आहे देव जाणे ? खोके , गद्दार आणखी नाना शब्दप्रयोग करून एकमेकांना डिवचणे सुरू असते. लोकप्रतिनिधी महिला सुद्धा यात काही कमी नाही पेडणेकर बोलतात  काय ? चित्रा वाघ संतापतात काय ? , नवनीत राणा पोलिसांशी अरेरावी काय करतात? अंधारे पक्ष बदलताच किती पलटी मारतात. तर या वाचाळपणात महिला सुद्धा मागे नाही. गुलाबराव पवार , राणे , खडसे , महाजन मंडळी अशी सर्वच निव्वळ एकमेकांवर चिखलफेक , एकमेकांशी शाब्दिक चकमकी करत असतात.  कोणत्याही पक्षातील नेत्यांनी जुन्या स्वातंत्र्यसेनांनी बाबत अवाक्षरही काढू नये अशीच अपेक्षा जनतेला आहे. जनतेला त्यांचे प्रश्न सोडवून हवे आहेत जुनी पेन्शन, होमगार्ड , अंगणवाडी, पाणी अशा अ नेक समस्यांचे निराकरण जनतेला हवे आहे त्यांना वृथा वलग्ना नकोत.

      लोकप्रतींनिधींनो तुमची नाहक वक्तव्ये ऐकून जनतेचे कान अगदी किटून गेले आहेत. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे ते राज्य चालवण्यासाठी तुमचा वाचाळपणा ऐकण्यासाठी नव्हे. तुमच्या वाचाळपणानंतर जनतेमध्ये सुद्धा हेवेदावे होऊ लागले आहे. खरे तर लोकप्रतिनिधी यांच्या वाचाळपणाबद्दल यापुर्वीही कित्येकदा लिहिले आहे परंतू याविषयावरचे लिखाण कधी संपेल असे वाटतच नाही एवढा यांचा वाचाळपणा हल्ली सुरू असतो आणि म्हणूनच लोकप्रतींनिधींसाठी “वाचाळवीर स्पर्धा” का असू नये असेच वाटू लागले आहे. ही स्पर्धा घेतल्यावरही वाचाळवीर कोण ठरेल हेही सांगता येत नाही कारण? वाचाळपणात हे एकमेकांपेक्षा तसूभरही कमी नाही.

१७/११/२०२२

Article on shraddha murder case Delhi

मुलींनो समाजातील आफताब ओळखा


आपल्या मुला-मुलींना आपल्या आदर्श नायकांच्या कथांचे, पौराणिक कथांचे, उपनिषद, पृथ्वीराज चौव्हाण, धर्मवीर संभाजीराजे यांच्या कथांचे, चित्तोडवर मुस्लिम आक्रमकांच्या हाती लागू नये म्हणून जोहार करणा-या राजपूत स्त्रियांच्या कथांचे बाळकडू मिळायला हवे.  या बाळकडूपासून आजच्या शिक्षणपद्धतीमुळे, चांगले वाचन नसल्याने, पालकांच्या व्यस्त जीवनपद्धतीमुळे, आजी आजोबांचा सहवास नसल्याने, दुर्दैवाने ते वंचीत झालेले आहे व सुयोग्य जोडीदार निवडण्यात त्यांची फसगत होत आहे.

परवा श्रद्धा वालेकर हत्येचे वृत्त धडकले आणि सुन्न झालो, अवघा देशच सुन्न झाला. काय ती हत्या करण्याची निर्घुण  त-हा , हत्येनंतर देहाचे तुकडे तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवणे , त्यासाठी नवीन फ्रिज घेणे , हत्या केल्यानंतर एक-एक पिशवी करून तुकडे जंगलात फेकणे या सर्व घटना ऐकून देश हादरला. कोणती ही विकृती ? , काय हा क्रोध ?  एखाद्याच्या देहाची शक्ले करून करून त्याला मारणे म्हणजे आफताब ने क्रौर्‍याची परिसीमाच गाठली. क्रौर्य, क्रूरकर्मा, काळिमा अशाप्रकारचे शब्द सुद्धा या घटनेसाठी थिटे पडू लागले. का होते आहे हे असे ? का वारंवार घडतात आहेत मुलींना जाळ्यात फसवून ठार मारण्याच्या घटना ? याला काही पायबंद आहे की नाही ? कायद्याचा धाक आहे की नाही ? यात चुकते कुठे आहे? कोण चुकते आहे? मुली, पालक, समाज, प्रशासन, शिक्षक, ओढून ताणून जबरीने प्रेम प्राप्त करणे हे दाखवणारे चित्रपट, की कमी अधिक प्रमाणात हे सारेच ? असे एक ना अनेेेक प्रश्न श्रद्धाच्या हत्येनंतर मनात घोळतच आहेत. श्रद्धासोबत जसे घडले तसे अनेक मुलींसोबत यापुर्वी सुद्धा घडले आहे पण अत्याचाराचे प्रकार मात्र वेगळे आहेत. या मुलींना प्रेमजालात फसवणारी ही कोण मुले आहेत ? मुली यांच्या प्रेमजालात  फसतात तरी कशा ? एवढ्या फसतात की आई वडीलांचा , कुटुंबीयांचा कायमचा त्याग करून  या आफताबसारख्या मुलांसह पळून जाण्याइतपत त्यांची मानसिक तयारी होते किंवा करवली जाते. त्या लिव्ह इन मध्ये राहतात लग्नाची मागणी केल्यावर ही मुले चालढकल करतात, त्या मागणीचा तगादा लावल्यावर हे आफताब त्यांना जीवे मारण्यासही मागे पुढे पाहत नाही. संत कबीराने म्हटले आहे "जैसा भोजन वैसा मन" या कबीरोक्ती नुसार त्यांचे मन व कृत्ये होत असतात. काय झाले आहे या श्रद्धासारख्या मुलींना ? प्रेम आंधळे आहे असे म्हटले जाते पण आपण कुणाच्या प्रेमात आपण पडतो आहे , प्रेमात पडल्यावर वाहवत काय जातो आहोत याचे काही एक भान या मुली का ठेवत नाही ? यांच्यावर काय जादू होते? आपण कुठे कमी पडत आहोत ? आपण अतिशय पुरोगामी विचारांचे, सुधारलेले, मॉडर्न, धर्मनिरपेक्ष असे काही स्वत:ला दाखवण्याचा का प्रयत्न करीत आहोत ? तसे दाखवण्याच्या नावाखाली आपण आपला स्वधर्म , आपले संस्कार , आपले रितीरीवाज यांचा हळू हळू त्याग करू लागलो आहोत. आपणच संस्कार , परंपरा चालीरिती यांना आपल्या पाल्यांसमक्ष तुडवत असू तर पाल्य तरी ते कुठे पाळतील ?   ते तर आणखी तुडवण्याचीच शक्यता अधिक. इतर अनेक धर्मात मात्र असे आढळत नाही ते कितीही मॉडर्न झाले, सुधारले तरी त्यांचे संस्कार, रिती, परंपरा सोडत नाही, आपण मात्र का कोण जाणे आपले संस्कार सोडत आहोत. (जे सन्मानीय अपवाद आहेत त्यांनी स्वत:ला वगळावे ) लग्न हा सुद्धा एक संस्कारच आहे परंतू हा संस्कार आता सेलिब्रेशन मध्ये लिव्ह इन मध्ये पालटला आहे. उच्चविद्याविभूषित मुली या आत्मनिर्भर झाल्या आहेत त्यामुळे त्यांना आता कुणाचेही , कशाचेही बंधन नको आहे. शिक्षणामुळे त्यांना  आपल्याला खूप समजते असे वाटू लागले आहे त्या स्वत:ला पुरुषांप्रमाणे समजू लागल्या आहेत. मग त्या श्रद्धासारखे आपल्या वडीलांना "मला आपली स्वत:ची मते आहेत, मला माझे समजते" अशाप्रकारची उत्तरे देऊन घराचा त्याग करतात. याअर्थी मुलींनी शिकू नये असा मुळीच नाही. जरूर शिकावे परंतू ज्या मातापित्यांनी आपल्याला सांभाळले, शिकवले , मोठे केले त्यांचे काही तर म्हणणे ऐकायला नको का ?  "प्यार किया नही जाता हो जाता है " असे आपल्या तरुणांना आपल्या हिंदी चित्रपट सुष्टीने शिकवले. पण तुम्ही कोणत्या मुलीवर / मुलावर प्रेम करत आहात ? तिच्या/ त्याच्या घरचे कोण ? , घराची पार्श्वभूमी काय ? ,   तिच्यावरचे / त्याच्यावरचे संस्कार कसे ? याचा विचार या तरुण मुलामुलींवर काही एक होतांना दिसत नाही आणि मग प्रेमाच्या मोठ-मोठ्या आणाभाका घेतलेले हे जीव अल्पावधीतच विभक्त होण्यापर्यन्त येऊन पोहचतात. श्रद्धासारखे इतर मुलींसोबत घडू नये म्हणून पालक, समाज, प्रशासन, शिक्षक सर्वांनाच सखोल विचारमंथन करावे लागेल. आफताबसारख्या मुलांच्या कचाटातून या मुलींना सोडवायचे असेल तर या मुलींना मुलींनाच नव्हे तर मुलांनाही आपल्या आदर्श नायकांच्या कथांचे, पौराणिक कथा, उपनिषद, पृथ्वीराज चौव्हाण, धर्मवीर संभाजीराजे यांच्या कथांचे, चित्तोडवर मुस्लिम आक्रमकांच्या हाती लागू नये म्हणून जोहार करणा-या राजपूत स्त्रियांच्या कथांचे बाळकडू मिळायला हवे. ते त्यांना आता दुर्दैवाने कमी मिळते आहे किंबहुना मिळतच नाही असेच चित्र आज दिसत आहे.  या बाळकडूपासून आजच्या शिक्षणपद्धतीमुळे, चांगले वाचन नसल्याने, पालकांच्या व्यस्त जीवनपद्धतीमुळे, आजी आजोबांचा सहवास नसल्याने,दुर्दैवाने ते वंचीत झालेले आहे आणि म्हणूनच  त्यांच्याकडून आत्महत्या , अयोग्य संस्कारहीन जोडीदार निवडणे अशा गोष्टी घडत आहेत. चुकीच्या जोडीदाराची निवड केली जात असल्याने आज घटस्फोटांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आही. न्यायालयापुढे घटस्फोटांची हजारो प्रकरणे प्रलंबीत आहेत. मुलींनो केवळ आपल्या पदव्या वाढवून , आचार्य वगैरे होऊन चालणार नाही जीवनात अनेक प्रसंग , चढ उतार पाहिलेल्या, तुमच्यासाठी पैशाची तजवीज करणा-या आपल्या मातापित्यांचे म्हणणे सुद्धा स्विकारणे शिका. डोके ठिकाणावर ठेवा, स्वधर्मातील चांगली पुस्तके वाचा,  आपल्या धर्मात सांगितलेल्या  निदान एखाद्या तरी बाबीचे अनुसरण करा. देश-विदेशातील वृत्तांवर नजर ठेवा, "अखंडी सावध राहावे" या संतोक्ती नुसार कुणीही तुम्हाला प्रलोभने देत असेल , आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असेल , जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्वरीत त्याला जाणा व त्याला आपल्या जीवनातून हद्दपार करा. मुलींनो आपल्या सुखी जीवनासाठी आपल्या माय-बापासाठी, बंधू भगिनींसाठी परीवारासाठी, समाजातील हे असे नतद्रष्ट , क्रूरकर्मा , निर्घुण, पाशवी, बाहयांगाने सुंदर भासणारे परंतू अंतरंगाने पशू असणारे  आफताब ओळखा व त्यांना थारा देऊ नका.

१०/११/२०२२

Article about Bhide Guruji Statement about Bindiya, Indian ladies holy symbol.

 तेरी बिंदीया रे ....



हल्ली बिंदीया, झुमका व अस्सल भारतीय आभूषणे लुप्त होत चालली आहेत. लग्न , समारंभ व फोटो काढण्यापुरता तेवढा त्यांचा उपयोग होतो. आभूषणांसह लज्जा हे स्त्रीचे नैसर्गिक आभूषण सुद्धा लुप्तप्राय होत चालले आहे. 
        साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे जेंव्हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते भिडे गुरुजींना प्रश्न विचारायला गेल्या असता , "तू पहिले कुंकू लाव , मग तुझ्याशी बोलेल" असे उत्तर भिडे गुरुजींनी दिले. महिलांनी कुंकू , टिकली लावावी की नाही ? यावर भिडे गुरुजींच्या वक्तव्यानंतर बराच ऊहापोह व गदारोळ सुरु झाला. अद्यापही सुरुच आहे.  तसा आपल्या देशात आता गदारोळ सुरु होण्यास काहीच वेळ लागत नाही. तोंडातून एक एक शब्द उच्चारतांना किंवा लिहितांना दहा वेळा विचार करावा लागतो. आपल्या बोलण्याचा कोण काय अर्थ काढेल , काय विपर्यास करेल याचा काही  नेमच आताशा  राहिलेला नाही. म्हणूनच या लेखात कुणाचे समर्थन अथवा कुणाचा अपमान यावर भाष्य करण्यापेक्षा कुंकू , कुंकू लावणा-या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया , कुंकू संबंधीत गीत, कुंकुवाची परंपरा  यावर भाष्य केले आहे. 

        मी व माझ्या पिढीतील प्रत्येकानेच त्यांच्या आई , आजी व इतर महिला नातेवाईकांना ठसठसीत कुंकू लावलेले पाहिलेले आहे, त्या लावायच्या म्हणून आम्ही पण लावलेच पाहिजे का ? या प्रश्नाचे उत्तर देऊन पुढे अधिक वाद वाढवण्यापेक्षा मी उत्तर न देणेच पसंद करेल. पण कुंकू/ टिकली स्त्रियांच्या सौंदर्यात अधिक भर घालेल असाच सौभाग्यालंकार आहे. माझी आज्जी कपाळाला मेण लाऊन मग त्यावर कुंकू लावत असे. माझ्या मोठ्या मामींचे कुंकू सुद्धा एकदम मोठे, ठसठसीत असे. ठसठसीत भारदस्त कुंकू लावणा-या स्त्रिया ह्या मला बालपणी रुबाबदार व करारी अशा भासत असत. त्यात नऊवारी नेसली असेल तर त्यांच्या रुबाबात अधिकच भर पडत असे. बालपणी सर्वच कुंकू लावलेल्या स्त्रिया पाहिलेल्या मला महाविद्यालयात गेल्यावर सहपाठी मुली ह्या टिकली लावलेल्या दिसत असत आणि हल्ली तर  टिकली पण गायब झाली आहे. हल्लीच्या मुलींना टिकली लावाविसी वाटत नाही त्यांना सांगूनही त्या तसे करीत नाही हा जनरेशन गॅॅप आणि काळाचा महिमा आहे. उच्च शिक्षण घ्यावे, आधुनिक व्हावे पण रिती-रिवाज, धार्मिक मूल्ये परंपरा का सोडाव्या? असे म्हटल्यावर स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या पोशाखाबाबत बोलायला कमी करणार नाही. नामांकित लेखिका , ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या सासूबाई , नारायण मूर्ती यांच्या भार्या सुधा मुर्ती धनिक, उच्चविद्याविभूषित असूनही किती साध्या राहतात म्हणूनच त्यांची एक वेगळीच छाप पडते. परवा भिडे गुरुजींना त्यांनी लवून नमस्कार केल्यावर त्यांच्यातील संस्कार व नम्रता दिसून आली. इकडे आपण पाश्चात्यांचे अनुसरण करीत आहोत आणि तिकडे विदेशातील अनेक तरुणी मात्र साड्या , कुंकू असा भारतीय पेहराव पसंत करीत आहेत. भारतीय संस्कृतीत  जे नऊ रस सांगितले आहेत त्यातील शृंगार रसात कुंकाचाही समावेश आहे व म्हणूनच कुंकू आधारीत अनेक गीते, चित्रपट सुद्धा निघाले आहेत. 70 च्या दशकात अमिताभ व जया भादुरी यांचा अभिमान हा चित्रपट झळकला होता. गायक पती पत्नीतील समान व्यवसायामुळे होणारे हेवे दावे , स्वाभिमान दुखावणे असा हा चित्रपट होता. "तेरी बिंदीया रे" हे रफी व लता चे कर्णमधूर असे गीत यात आहे. यात नायकाने नायिकेला उद्देशून असे  "तेरी बिंदीया रे" असे म्हटल्यावर "सजन बिंदीया ले लेगी तेरी निंदिया रे" असे म्हणते. आपल्या पत्नीच्या कपाळावरील बिंदीया अर्थात कुंकू हे चंद्र व ता-यांप्रमाणे भासते मग तो  "तेरे माथे लगे है युं जैसे चंदा तारा" असे म्हणतो. पुढे नायिकेच्या झुमका , कंगन या आभूषणांचे कौतुक सुद्धा तो आपल्या गाण्यात करतो. मजरूह सुलतानपुरी ने किती छान, सर्वांगसुंदर असे नायिका व तिच्या आभूषणांचे वर्णन या शृंगार गीतात केले आहे. परंतू हल्ली बिंदीया, झुमका व अस्सल भारतीय आभूषणे लुप्त होत चालली आहेत. लग्न , समारंभ व फोटो काढण्यापुरता तेवढा त्यांचा उपयोग होतो. आभूषणांसह लज्जा हे स्त्रीचे नैसर्गिक आभूषण सुद्धा लुप्तप्राय होत चालले आहे. एका नववधूस मी भर लग्न मंडपात अमिताभ बच्चन प्रमाणे सर्व उपस्थितांच्या नजरेला नजर देत चौरंगावर उभे राहिलेले पाहिले आहे. लहानपणापापासून अनेक लग्नात "नववधू प्रिया मी बावरते"  याप्रमाणे अनेक वधूंना  पाहिलेल्या मला ही डॅशिंग नववधू वेगळीच भासली होती. हा सर्व काळाचा महिमा आहे. 

    कुणी काय घालावे वा घालू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी भारतीय वस्त्रे, आभूषणे ल्यालेली व कुंकू लावलेली  स्त्री  इतकी सुंदर, सोज्वळ, इंप्रेसिव्ह वाटते की गीतकारास मग आपोआपच तेरी बिंदीया रे हे गीत व त्यातील तेरे माथे लागे युं जैसे चंदा तारा सारख्या ओळी स्फुरतात.