१५/१२/२०२२

Article about actor Dharmendra on the occasion of 8 Dec , his Birthday

  साधा,सरळ, रांगडा धर्मेंद्र

जनसामान्यांचे अफाट प्रेम मिळालेला धर्मेंद्र हा एकमेव अभिनेता आहे हे त्याच्या ८७ व्या वाढदिवशी दिसून आले. जनतेचे त्याच्यावरील प्रेम आणि लोकप्रियता पाहून तो "पिपल्स ॲक्टर" असल्याचे वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा याने केले होते. एक ग्रामीण भागातून आलेला साधा , सरळ , रांगडा युवक बिकट स्थितीत आपले ध्येय साध्य करतो "पिपल्स ॲक्टर" बनतो हे ग्रामीण भागातील युवकांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चिवटपणे कार्यरत राहून यशप्राप्तीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.       
खरे तर आजच्या लेखाचे हे शीर्षक मी फार पुर्वी वाचलेल्या धर्मेंद्र बाबतच्या एका लेखाचे आहे. त्या लेखकाचे नाव मात्र स्मरणात राहिले नाही. म्हणून सर्वप्रथम त्या अज्ञात लेखकाचे या शीर्षकासाठी आभार प्रकट करतो. परंतु धर्मेंद्र या अभिनेत्याच्या लेखासाठी हेच  शीर्षक मला सर्वात जास्त समर्पक वाटले आणि म्हणून मी सुद्धा त्या अज्ञात लेखकाची क्षमा मागून त्याने दिलेले हेच शीर्षक आजच्या लेखासाठी वापरले आहे हे प्रांजळपणे कबूल करतो. गत गुरुवारी म्हणजेच आठ डिसेंबरला धर्मेंद्र या सिनेसृष्टीतील सर्वात देखण्या अशा अभिनेत्याचा 87 वा वाढदिवस साजरा झाला. नेहमीच प्रकाशझोता पासून दूर राहत असलेल्या धर्मेंद्रचा यंदाचा वाढदिवस मात्र मोठ्या जल्लोषात साजरा झाला. 1960 च्या दशकात पंजाब मधून धरमसिंग देओल हा मुंबईत दाखल झाला. सिनेसृष्टीत अभिनेत्यांना घ्यायचे आहे अशा आशयाची जाहिरात त्याने कुठेतरी वाचली होती. ती जाहिरात पाहून दिलीपकुमारला आदर्श मानणारा व सिनेसृष्टीची प्रचंड आवड असणारा धर्मेंद्र त्या सिनेसृष्टीतील जाहिरातदारांच्या निवड समिती पुढे हजर झाला. तत्पुर्वी त्याला "देखणा व्यक्ती" हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता. परंतू सिनेसृष्टी काही सहजासहजी कोणाला स्विकारत नाही. त्यात धरम प्राजी म्हणजे पंजाबच्या खेड्यातून आलेला यमला जट, हट्टा कट्टा, पहेलवान पठडीतील पठ्ठ्या. त्यामुळे सडपातळ व बेताचीच अंगकाठी असलेल्या नायकांच्या त्या जमान्यात बॉडी बिल्डर, बांका जवान अशा धर्मेंद्रला कोणीही चित्रपटात घेत नव्हते. निर्मात्यांच्या दारी तो चकरा मारत असे. काहींनी त्याला तू चांगला हट्टा कट्टा आहे तर कुस्ती खेळ, तर काहींनी फुटबॉल संघात दाखल हो असे सल्ले त्याला दिले. पण शोले सिनेमात बसंतीला प्राप्त करण्यासाठी पाण्याच्या टाकी वरून उडी मारण्यास जाणा-या चिवट विरु प्रमाणे धर्मेंद्रने सुद्धा सिनेसृष्टीत यश प्राप्त करण्याचे चिवटपणे ठरवूनच टाकले होते. तो माघारी फिरायला तयार नव्हता. शेवटी त्याला अर्जुन हिंगोरानी या निर्मात्याने पहिला ब्रेक दिला. त्याचा पहिला चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे  प्रदर्शित झाला. अर्जुन हिंगोरानी व धर्मेंद्र हे समीकरण जुळले. या द्वयीने अनेक हिट सिनेमे दिले. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात धर्मेंद्रचे सुरुवातीचे चित्रपट काही विशेष चालले नाही. पण 60 च्या दशकात त्याला काही प्रथीतयश अशा दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यात एक बिमल रॉय होते. बिमल रॉय यांच्या बंदिनी मध्ये धर्मेंद्रला भूमिका मिळाली.  दिल ने फिर याद किया, अनपढ, आकाशदीप अशा कृष्णधवल सिनेमातून त्याने भूमिका केल्या. सुमधुर संगीत असणारे हे त्याचे चित्रपट गाजले होते. फुल और पत्थर मध्ये तो उघड्या अंगाने दिसला व त्याची पीळदार शरीरयष्टी पाहून फिटनेस प्रेमी तरुण व अनेक तरुणी त्याचे फॅन झाले. मीनाकुमारी सोबत त्याने चित्रपट केले. हळूहळू धर्मेंद्र स्थिरावला आणि रंगीत सिनेमाच्या काळात त्याचे अनेक चित्रपट हिट झाले. रामानंद सागर यांचा आंखे, शिकार, आया सावन झुमके, आये दिन बहार के, आयी मिलन की बेला, हकीकत असे त्याचे अनेक चित्रपट या काळात हिट झाले. 60 च्या दशकानंतर दुसरे दशक म्हणजे सत्तरच्या दशकात धर्मेंद्र व हेमामालिनी ही जोडी रसिकांना खुप भावली. धर्मेंद्र आणि हेमामालिनीचे वीस पेक्षा जास्त चित्रपट हिट झाले. यात शोले, जुगनू, आजाद, आसपास, तुम हसीन मै जवान, दिल्लगी या चित्रपटांचा समावेश आहे. धरम व हेमा या जोडी एवढी लोकप्रियता इतर कुण्या जोडीस मिळाली नाही. आजही एखादी एकमेकांना शोभून दिसणारी विवाहित जोडी दिसली की लोक धर्मेंद्र व हेमामालिनी सारखी जोडी आहे असे म्हणतात. त्याच काळात धर्मेंद्रने ऋषिकेश मुखर्जी या प्रथीतयश दिग्दर्शकाच्या चुपके चुपके, सत्यकाम सारख्या सिनेमात काम केले. सत्यकाम, नया जमाना यातील त्याचा अभिनय वाखाणल्या गेला होता. याच काळात कर्तव्य, माँ सारख्या सिनेमातून त्याने वाघ आणि सिंह यांच्यासोबत लढाईची दृश्ये साकारली. असे म्हणतात की कर्तव्य सिनेमात सिंहाशी लढताना धर्मेंद्रने डमी वापरला नव्हता. सहसा तो डमी वापरत नसे असे म्हणतात.  मेरा गांव मेरा देश , प्रतिज्ञा सारख्या अनेक देमार सिनेमांमध्ये धर्मेंद्र शोभू लागला आणि त्याला "गरम धरम", "हि मॅन" असे संबोधले जाऊ लागले. "कुत्ते कमीने मै तेरा खुन पी जाऊंगा" असे खलनायकाला

त्याने म्हटल्यावर थिएटर मध्ये दर्शकांच्या मुठी आवळत असत. देव-राज-दिलीप नंतर राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन अशा जुबलीस्टार, सुपरस्टार यांच्या झंझावातात सुद्धा धर्मेंद्र याने आपला वेगळा ठसा उमटवला, सिनेसृष्टीत घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्याचे चाहते भारतभर त्याच्या सिनेमांना प्रतिसाद देत होते. 70 च्या दशकात शोले, सीता और गीता, चाचा भतीजा, यादों की बारात 80 च्या दशकात नोकर बीबी का,  गुलामी, आग हि आग , बटवारा, हुकूमत, ऐलान ए जंग, व इतर ॲक्शन सिनेमांमध्ये त्याने ॲक्शन मध्येही तो कमी नसल्याचे दाखवून दिले ॲक्शनसाठी तोच योग्य असल्याचे सिद्ध केले 80 च्या दशकात तर सनी देओल या त्याच्या मुलासोबत त्याचे सुद्धा सिनेमे पडद्यावर झळकत होते. श्रीदेवी, डिंपल कपाडिया, अमृता सिंग, माधुरी दीक्षित सारख्या त्याच्या मुलाच्या सहनायिकांचा तो सुद्धा नायक म्हणून शोभला. ९० च्या दशकात सुद्धा त्याने काही सिनेमे केले. काही चित्रपटांची निर्मिती केली. अपने , यमला पगला दिवाना सारख्या सिनेमात काम करून तो आज ही तो कार्यरत आहे व आगामी सिनेमात सुद्धा दिसणार आहे. बालपणी कोणत्यातरी सिनेमात तो दिसला बहुदा शोलेच असावा आणि तो आवडू लागला पुढे तो डाऊन टू अर्थ आहे, भावनाप्रधान आहे , मदतीस घाऊन जाणारा आहे , शायर आहे , आजही शेती त्याची गुरे ढोरे सांभाळून जमिनीशी नाळ जोडून आहे तसे त्याचे व्हिडीओ माध्यमातून येत असतात, प्रचंड पैसा नावलौकिक मिळवूनही तो साधा आहे, सरळ आहे , रांगडा आहे  हे कळल्यावर त्याचे दुसरे लग्न त्यासाठी धर्म बदलणे हे सर्व माहित असूनही न जाणे का पण अनेक लोक त्याचे चाहते आहे. इतकी वर्षे सिनेमात राहूनही त्याला फिल्मफेअर पुरस्कार मात्र कधी मिळाला नाही. व तो पुरस्कार प्राप्त करण्यासाठी करावे लागणारे सोपस्कारही त्याने काही केले नाही. मात्र नंतर त्याला नंतर पद्मविभूषणसह इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. तो व त्याची पत्नी दोघेही भाजपाचे खासदार झाले, पत्नी आजही विद्यमान खासदार आहे. जनसामान्यांचे अफाट प्रेम मिळालेला धर्मेंद्र हा एकमेव अभिनेता आहे हे त्याच्या ८७ व्या वाढदिवशी दिसून आले. जनतेचे त्याच्यावरील प्रेम आणि लोकप्रियता पाहून तो "पिपल्स ॲक्टर" असल्याचे वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा याने केले होते. एक ग्रामीण भागातून आलेला साधा , सरळ , रांगडा युवक बिकट स्थितीत आपले ध्येय साध्य करतो "पिपल्स ॲक्टर" बनतो हे ग्रामीण भागातील युवकांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चिवटपणे कार्यरत राहून यशप्राप्तीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.                                                                                                         विनय वि.वरणगांवकर© 
                                                खामगांव      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा