०१/१२/२०२२

Article about Dr. Hedgewar Pathology Lab Khamgaon, Social Project of Datta Upasak Mandal

डॉ. हेडगेवार  पॅथॉलॉजी  ; दत्तोपासक मंडळाचा स्तुत्य उपक्रम


बरेच दिवसांपासून या लेखाचा विचार मनात घोळत होता. परंतू म्हणतात ना योग्य वेळ आल्यावरच कामे बरोबर मार्गी लागतात. तशीच हा लेख लिहिण्यास योग्य वेळ आज आली, ती अशी की आजपासून दत्त जन्मोत्सव सप्ताहास सुरुवात झाली आहे व ज्या डॉ. हेडगेवार पॅथॉलॉजीबाबत या लेखातून भाष्य करणार आहे ती खामगांवला सुरू झालेली पॅथॉलॉजी ही खामगांव अर्बन या नामांकीत बँकेच्या स्थापनेउपरांत काही दिवसातच दत्त उपासक मंडळाची स्थापना झाली. वरील पॅथॉलॉजीचे स्थापनकर्ते सुद्धा दत्तगुरुचेच उपासक आहे. म्हणूनच या लेखासाठी हा चांगला योग जुळून आला आहे. दत्त उपासक मंडळाने  खामगांवला  डॉ. हेडगेवार  रुग्ण सेवा प्रकल्प या सेवा संस्थेच्या सहयोगाने ही पॅथॉलॉजी सुरू केली. देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले असावे याकडे सरकारचे नेहमीच लक्ष असते. देशातील अनेक संस्था सुद्धा आरोग्य क्षेत्रात अनेकप्रकारची चांगली मदत, सेवा करतांना दिसून येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा स्थापनेपासूनच सेवा कार्यात सतत अग्रेसर राहिला आहे यात दुमत नाही. कोरोना काळात आपण मृत्यूचे सावट व अपु-या आरोग्य सुविधा अनुभवल्या. हा अनुभव सर्वांसाठीच मोठा दु:खदायी, भयावह असा अनुभव होता.  अनेक लोक मृत्यूमुखी पडले, आरोग्य सुविधा , उपकरणे अपुरी होती त्यांची मोठी निकड निर्माण झाली होती , तपासणी प्रयोगशाळा कमी पडत होत्या. असेच सर्वत्र चित्र होते. या सर्व संकटाच्या काळात सर्वसामान्य नागरीकांची , तळागाळातील आपल्या देशबांधवांची मोठी परवड झाली. याच काळात बिकट स्थितीतही आपल्याच देशात लस निर्मिती हा एक भीम पराक्रम आपल्या देशाने करून दाखवला. केवळ निर्मितीच नव्हे तर इतर देशांना लस पुरवठा सुद्धा केला. कोरोनाच्या बिकट स्थितीत  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वत्रच वस्त्या वस्त्यातून अन्नधान्य पुरवठा केला , सरकारी दवाखान्यात कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. हे सर्व पाहून खामगांवच्या दत्तउपासक मंडळास सुद्धा आरोग्य क्षेत्रात काहीतरी सेवाकार्य करण्याची प्रेरणा मिळाली व त्यांनी यासाठी डॉ. हेडगेवार रुग्ण सेवा प्रकल्प संस्थेशी संपर्क करून  खामगांव व परीसरातील नागरीकांसाठी  डॉ. हेडगेवार  पॅथॉलॉजी सुरू करण्याचे ठरवले. तद्नंतर जागा , मनुष्यबळ, साहित्य , अत्याधुनिक तपासणी यंत्रे  इत्यादी अनेक सोपस्कार पार पाडल्यावर  दि 4 एप्रिल 2022 रोजी प्रांत संघचालक रामजी हरकरे यांच्या हस्ते या  पॅथॉलॉजीचे उद्घाटन संपन्न झाले. शेवटच्या घटकापर्यन्त आरोग्य सुविधा पोहचावी ही संकल्पना व व्याधीने ग्रस्त असलेल्या सर्व घटकातील जनते पर्यन्त पोहचून त्यांच्यासाठी चांगल्यात चांगले कार्य करण्याचे ध्येय  या पॅथॉलॉजी आहे. या पॅथॉलॉजीत सर्वच प्रकारच्या तपासण्या करण्याची सुविधा आहे. या तपासण्या सुद्धा अल्प दरात केल्या जातात. म्हणजे तपासणी शुल्क हे अत्यल्प असून 50 टक्क्यांपर्यन्त सवलत दिली जाते. या  डॉ. हेडगेवार पॅथॉलॉजी  लॅबचा आजरोजी पावेतो म्हणजेच 8 महिन्यात 1500 हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे.  या पॅथॉलॉजी लॅबला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन येथील कार्याची वाखाणणी केली आहे. या मान्यवरात राम माधवजी , विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय मंत्री मिलिंदजी परांडे ,  अरुणजी नेटके विश्व हिंदू परिषद यांचा समावेश आहे. दिनदयाल उपाध्याय यांच्या "अंत्योदय" या संकल्पनेला अनुसरून हे कार्य आहे. स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा " मै उसिको महात्मा समझता हूं जिसका हृदय गरीबोके लीये रोता है |" असे म्हटले होते. या वाक्यास अनुसरण्याची प्रेरणा बाळगून ही पॅथॉलॉजी सुद्धा समाजातील तळागाळातील जनतेसाठीच आहे. या पॅथॉलॉजीस खामगांवातील अनेक तज्ञ डॉक्टर मंडळींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य व आवश्यक ते मार्गदर्शन, सल्ला प्राप्त होत आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हा आरोग्य सेवेचा गोवर्धन उचलणे शक्य नव्हते. उपरोक्त सर्व कार्यात दत्तउपासक मंडळ व डॉ. हेडगेवार  रुग्ण सेवा प्रकल्प  चे कार्यकर्ते तत्पर असतात. खामगांव व परीसरातील गरजू जनतेने या पॅथॉलॉजी  लॅबचा  अवश्य उपयोग घ्यावा व याबाबात सर्वांना माहिती द्यावी जेणे करून  दिनदयाल उपाध्याय यांना अभिप्रेत अशा तळागाळातील जनतेला या आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल व "अंत्योदय" होईल. आजपासून दत्त सप्ताहास सुरुवात झाली आहे व आजच्याच दिवशी द्त्तोपासक मंडळाच्या या सेवा कार्याबाबतचा लेख लिहिल्या गेला ही भगवान दत्तात्रयांची कृपाच म्हणावी लागेल. जय गुरुदेव दत्त !     

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा