२३/०२/२०२३

Article about meeting of a old college friend

..आणि ब्रिटिश सोल्जर भेटला

आमची नजरानजर झाली, काही क्षण थबकलो आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो तो चेहरा मला त्वरित आठवला त्याला पण  पूर्वाश्रमीचे सर्व दिवस आठवल्याने तो सुद्धा माझ्याकडे पाहून हसला आणि मी जोरात उद्गारलो "अरे , ब्रिटिश सोल्जर ! " मग तो दिलखुलास हसला.

हा ब्रिटिश सोल्जर म्हणजे काही खरोखरचा इंग्रज सैनिक नव्हे हे सुरुवातीलाच स्पष्ट करणे संयुक्तिक वाटते. महाविद्यालयीन जीवनात तो आमचा एक सहपाठी होता. राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन.सी.सी. मध्ये आम्ही सोबत होतो. मला स्मरते आम्ही ज्युनिअर कॉलेजला होतो तर तो सिनियर कॉलेजला. एन.सी.सी. परेडमधे मात्र आम्ही सोबत येत असू. 90 च्या दशकात खामगावात गो.से. महाविद्यालयाव्यतिरिक्त  पदवीसाठी म्हणून एकही कॉलेज नव्हते त्यामुळे मोठी विद्यार्थी संख्या होती व तशीच संख्या एन.सी.सी. मध्ये सुद्धा असे. आम्ही जरी कनिष्ठ महाविद्यालयीन असलो तरी एन.सी.सी. मुळे वरीष्ठ महाविद्यालयातील अनेक मुलांशी मित्रत्व प्रस्थापित झाले होते. या मित्रांमध्ये अशफाक, सलीम बेग, फारूक, शेख शब्बीर शेख मन्नू, अब्दुल मतीन, पठाण, फरझान हाश्मी यांसारखी अनेक मुस्लिम मुले सुद्धा होती. एक लईक नावाचा मुलगा होता त्याला सर्व लैक्या म्हणत. डोळ्यात काजळ घालणारा हसतमुख अशफाक "चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा" ही कव्वाली सुरेख गात असे. त्या एन.सी.सी.च्या दिवसात परेडमध्ये, कॅम्पमध्ये मुलांमध्ये मोठे खेळीमेळीचे वातावरण असे. एन.सी.सी.च्या गणवेशात सर्वच विद्यार्थी उठून दिसत असत, त्यांचे व्यक्तिमत्व खुलत असे, व प्रभावी वाटे. गणवेशात तीच जादू आहे. त्या सा-यातच वरीष्ठ महाविद्यालयातील तो सुद्धा एक होता. गोरापान वर्ण, तपकिरी पण विरळ केस, सरळ नाक, माध्यम उंंची आणि मजबूत बांधा अशी त्याची शरीरयष्टी मला आजही स्मरते. पु.लंच्या "नंदा प्रधान" या पात्राशी जवळपास साधर्म्य साधेल असा तो त्याकाळी दिसे. काळा गॉगल घातला की त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडत असे. एन.सी.सी.च्या  गणवेशात तर तो अधिकच सुंदर दिसत असे जणू काही इंग्रज अधिकारीच. तो आमच्या सोबतच परेड करीत असे. मधल्या सुटीत आमच्याशी जुजबी बोलणे पण होत असे. पण घनिष्ट अशी मैत्री मात्र काही झाली नाही. कदाचित तो वरिष्ठ महाविद्यालयात असल्याने तसे झाले असावे. एकदा एन.सी.सी.च्या मोकळ्या वेळेमध्ये माझा हरहुन्नरी व दिलखुलास मित्र धनंजय टाले हा त्याला प्रथमच पहात होता. रुबाबदार अशा दिसणा-या , त्याला पाहून "यार तुम तो ब्रिटिश सोल्जर ही दिखते हो" असे उत्स्फूर्तपणे तो म्हणाला व तेंव्हापासून आमचा गृप त्याला 'ब्रिटिश सोल्जर" असेच म्हणू लागला तो सुद्धा त्याला हसून दाद देत असे. "आछे दिन पाछे गये" याप्रमाणे ते महाविद्यालयीन दिवस हा हा म्हणता सरले जो तो आपापल्या रोजीरोटी शोधण्याच्या कामकाजास लागला. आयुष्यात आपले इप्सित ध्येेय गाठण्यासाठी पुढे सरसावू लागला. जीवनाच्या धकाधकीत कॉलेज जीवनातील मित्र विभक्त झाले, दुरावले, आपापल्या व्यापात गुंतले. पण देव्हा-यातील दिवा विझू नये म्हणून जसे जपतात तसेच प्रत्येकच तरुण/तरुणी शैक्षणिक जीवनातील, महाविद्यालयीन जीवनातील आपल्या आठवणी जपून ठेवत असतात. हा ब्रिटिश सोल्जर सुद्धा असाच आठवणीत जपल्या गेला, कायमचा लक्षात राहिला. त्याला आम्ही  ब्रिटिश सोल्जर असेच संबोधित होतो व त्याच नादात त्याचे मूळ नांव सुद्धा जाणून घेण्याचे भान राहिले नाही. कॉलेजमध्ये हाय हॅलो होत असे. कधीकाळी  थोडे बहुत बोलणे होई. आज गो. से. महाविद्यालय सोडून 25 वर्षे झाली परंतू हा ब्रिटिश सोल्जर मात्र कधी दिसला नाही. परंतू "छोटिसी ये दुनिया पहचाने रास्ते है , तुम कहीं तो मिलोगे , कभी तो मिलोगे, तो पुछेंंगे हाल"  या गीतकार शैलेन्द्रच्या ओळींची प्रचिती परवा आली. पण शैलेंद्रने या ओळी लिहिल्या त्यावेळी जग खरेच आजच्यासारखे सोशल मिडियामुळे जसे लहान झाले तसे नव्हते. पण तरीही उपरोक्त ओळीची प्रचिती येण्याचे निमित्त घडले ते बहिणीला सोडायला म्हणून बस स्टॅन्ड वर जाण्याचे. बस मध्ये आपली जागा पटकवण्यासाठी असलेल्या खास इंडियन शैलीचा  म्हणजे खिडकीतून रुमाल टाकून जागा मिळवण्याच्या पद्धतीचा वापर करून मी जागा मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. तितक्यात माझ्या बाजूला डोक्यावरील केस थोडे कमी झालेला, गोरापान हसमुख चेह-याचा व्यक्ती सुद्धा तसाच प्रयत्न करत होता. आमची नजरानजर झाली, काही क्षण थबकलो आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो. तो चेहरा मला त्वरित आठवला त्याला पण पुर्वाश्रमीचे सर्व दिवस आठवल्याने तो सुद्धा माझ्याकडे पाहून हसला आणि मी जोरात उद्गारलो "अरे , ब्रिटिश सोल्जर ! " मग तो दिलखुलास हसला. अनेक  जुन्या आठवणी निघाल्या मोबाईल मध्ये असलेले मित्रांचे फोटो एकमेकांना दाखवले, एकमेकांची विचारपूस झाली कॉलेजमध्ये जरी आम्ही सोबत होतो तरी त्याचे नाव मला तेव्हा माहित नव्हते. त्याने नंबर दिला मी नांव टाईप करतांना थोडा बावचळलो, त्याचे लक्ष माझ्या मोबाईलच्या स्क्रीनकडेच होते,  डोक्यात काही तरी खान आहे असे पुसटसे आठवत होते काय टाईप करावे म्हणून मी ब्रिटीश... ही तीन अक्षरे टाईप करताच ,"भाई तू नाम भूल गया, अकील खान लिख" असे तो म्हणाला मी तसे लिहिले. तो भुसावळला कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असल्याचे कळले. तोवर आम्ही इंडियन स्टाईल ने रिझर्व्ह केलेली सिट आमच्या दोघांच्याही नातेवाईकांना मिळाली होती, बस निघाली. अकील खान उपाख्य ब्रिटिश सोल्जरशी समारोपाचा संवाद साधला, सोबत जोडलेले स्वत:च काढलेले छायाचित्र काढले. दिड तासाने आलेल्या त्या बसमधे आटापिटा करून मिळवलेल्या जागेवर बसलेल्या प्रवाशांच्या मुखमंडलावर आनंद पसरला होता तर बाहेर पुनर्भेटीमुळे आमच्या, माझ्या व महाविद्यालयीन जीवनांत प्रेमाने ब्रिटिश सोल्जर असे नांव दिलेल्या त्याच्या. प्रवाशांना घेऊन बसने स्थानक सोडले व अनेक स्मृतींना घेऊन आम्ही. 

१३/०२/२०२३

Article on the occasion of "Gajanan Maharaj Pragat Din"

 शितें वेंचती दयाघन ।



आज गजानन महाराज प्रगट दिन, विदर्भात  अनेक ठिकाणी भंडारे होतात, जेवणावळी होतात. गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये समस्त भाविक गण लीन होऊन जातात. मात्र या व इतरही  कार्यक्रमात आपल्याकडून अन्नाचा सन्मान सुद्धा झाला पाहिजे.

आज गजानन महाराज प्रगट दिन माघ सप्तमी दिनी संत गजानन महाराज शेगावी प्रगटले.

बंकटलाल आगरवाला ।होता रस्त्यानें चालला ।

त्यानें हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥

याप्रमाणे बंकटलालास  ते उष्ट्या पत्रावळीवरील शिते खातांना दिसून आले.

ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।

शोधन पत्रावळीचे करी । केवळ निजलीलेनें ॥९३॥

उष्ट्या पत्रावळीवरील शिते खाणारा हा कोणीतरी श्रेष्ठ संत पुरुष दिसतो आहे अशी त्याची खात्री पटली.

शीत पडल्या दृष्टीप्रत।तें मुखीं उचलुनी घालीत ।

हें करण्याचा हाच हेत । ’अन्नपरब्रह्म’ कळवावया ॥९४॥

म्हणून बंकटलालाने त्या योगिराजास चांगले भोजन आणून दिले. ते सर्व भोजन या ब्रह्मांडनायक गजानन महाराजांनी एकत्र करून भक्षण केले आणि आणि अन्न हे पुर्णब्रह्म असल्याचे समस्तांना
निर्देशित केले.

कां कीं गर्जोन सांगे श्रुती। अन्न हेंच ब्रह्म निगुती ।

"अन्नम् ब्रह्मेति" ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ॥९५॥

दासगणू महाराज लिखित गजानन महाराजांच्या पोथीतील  या संदर्भातील ओळी आपण नेहमीच वाचत असतो, स्मरत असतो. भक्तप्रतिपालक गजानन महाराज मंदिरात जेव्हा आपण प्रसाद भक्षण करण्यासाठी जात असतो त्या ठिकाणी सुद्धा गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवरील शिते खातांनाचे चित्र आपल्याला बरेच काही सांगून जाते. संत पुरुषांनी त्यांच्या कृतीने, त्यांच्या लिखाणाने आपणास खूप काही असे मार्गदर्शन केलेले आहे परंतु आज आपण समाजात पाहतो तर अन्नाचा म्हणावा तसा सन्मान होताना दिसत नाही. आज तरुणाई जेव्हा वाढदिवस साजरी करते तेव्हा एक केक हा निव्वळ तोंडाला फासण्यासाठी म्हणून घेतला जातो. तसेच ज्याचा जन्मदिवस साजरा होतो आहे त्याच्या अंगावर टमाटे, अंडी व इतर काही खाद्य पदार्थांची फेकफाक केली जाते आणि अन्नाला
पुर्णब्रह्म समजणा-या आपल्या देशात अन्नाचा असा नाश होताना आपण पाहतो. शिवाय आजकाल विवाह कार्यामध्ये हळदीचे कार्यक्रम सुद्धा जोरात साजरे केले जातात. पुर्वी नवरदेव, नवरीस थोडीफार हळद लावून हा कार्यक्रम होत असे. परंतु आजकाल सर्वच सणसमारंभ साजरे करण्यामध्ये मोठा दिखावा, मोठी झकपक आलेली दिसते. हळदीच्या कार्यक्रमात सुद्धा हळद खेळण्याचा एक कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमात उपस्थित नवरदेव नवरीसह उपस्थित सर्वांना सुद्धा हळदीने रंगवले जाते आणि यात हळद या खाद्यपदार्थाचे व पाण्याचे मोठे नुकसान होताना आपल्याला दिसते. परंतु त्यात कोणालाही वावगे असे वाटत नाही. आज गजानन महाराज प्रगट दिन आहे बुलढाणा जिल्ह्यात, विदर्भाच्या काही भागात अनेक ठिकाणी भंडारे आयोजित केले जातात. या भंडा-यात मोठ्या प्रमाणात जेवणावळी होतात. गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये समस्त भाविक गण लीन होऊन जातात. मात्र या सर्व कार्यक्रमात  आपल्याकडून अन्नाचा सन्मान सुद्धा झाला पाहिजे. रामदास स्वामींनी सुद्धा
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म
असे आपणास सांगितले आहे त्यामुळे या गजानन महाराजांच्या प्रगट दिनी आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी वाढदिवस, हळद या कार्यक्रमांमध्ये अन्नाचा नाश कसा टाळता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिवाय आपल्या पानात सुद्धा जितके लागेल तितकेच अन्न आपण घ्यायला पाहिजे. असे जर आपण केले तर आपण संत गजानन महाराज यांनी दिलेली शिकवण थोडी का होईना आचारतो आहे याचे आपणास स्वतःला समाधान वाटेल व ते गजानन महाराजांना  जास्त आवडेल. 
गजानन महाराज की जय

०९/०२/२०२३

Article about 40 years of MAruti

 गतीशी तुळणा नसे  

एक चकचकीत शेवाळी रंगाची मारुती 800 माझ्या समोरून गेली. बहुधा मालकाने नवीन रंग दिलेला असावा. मला मारुती 800 उत्पादनास 40 वर्षे झाल्याच्या परवाच्या एका वृत्तपत्रात वाचलेल्या वार्तेचे स्मरण झाले. ती गाडी तर निघून गेली पण तिच्यासारखीच गती माझ्या विचारांना देऊन गेली.

आजच्या लेखासाठी मुलायम यांना पद्मविभूषण , अदानी, पूजा-यांनी जाती निर्माण केल्याचे हे विधान असे विषय मनात घोळू लागले. पण मुलायम यांच्या पद्मविभूषण पुरस्काराबाबत यापुर्वीच भाष्य करून झाले होते. अदानी, करोडो रुपये, श्रीमंतांची यादी, हिंडेनबर्ग अहवालाच्या कोटीच्या कोटी उड्डाणांवर व घसरणींवर भाष्य काही करावेसे यावेळी वाटले नाही. जाती या पंडीतांनी निर्माण केल्या या सरसंघचालकांच्या विधानाने सुद्धा लक्ष वेधले होते परंतू जाती व्यवस्था , वर्ण व्यवस्था निर्माण कशी झाली याचा विचार करण्यापेक्षा ती संपुष्टात कशी येईल यावरच जास्त लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे असे वाटले. या विचारांच्या गदारोळात मी रस्त्याने वाटचाल करीत जात असतांना एक चकचकीत शेवाळी रंगाची मारुती 800 माझ्या समोरून गेली. बहुधा मालकाने नवीन रंग दिलेला असावा. मला मारुती 800 उत्पादनास 40 वर्षे झाल्याच्या परवाच्या एका वृत्तपत्रात वाचलेल्या वार्तेचे स्मरण झाले. ती गाडी तर निघून गेली पण तिच्यासारखीच गती माझ्या विचारांना देऊन गेली. मी तेंव्हा प्राथमिक शाळेत असेन. 1983 मध्ये भारतात मारुती 800 या गाडीचे उत्पादन सुरु झाले.  मारुती गाडी आली असे काहीसे तेंव्हा ऐकायला मिळायचे. फियाट आणि अँबेसॅडर या गाड्या पाहिल्या होत्या. फियाट माझ्या मामांकडे होती आणि अँबेसॅडर आमच्याकडे आणि त्यापुर्वी काही काळ जिप सुद्धा होती. अँबेसॅडर सारखी राजा गाडी घरी असल्याने आमची सर्व वडीलधारी मंडळी मारुती कारला नांवे ठेवत होती हे मला स्मरते. "जुने ते सोने" या आमच्या वडीलधा-या मंडळीच्या विचारसरणीमुळे आम्ही कुठेही जायचे असले की पसंती अँबेसॅडरलाच द्यायचो. तेंव्हा अँबेसॅडरचा खप प्रचंड होता. होत्या. टँक्सी म्हणून सुद्धा त्या चालायच्या. ऐसपैस अँबेसॅडरच्या तुलनेत मारुती 800 म्हणजे अगदीच किरकोळ वाटायची, खुजी वाटायची काही लोक तर तिची "आगपेटीची डबी" म्हणून हेटाळणी करायचे. पण तरीही हळू हळू ती लोकांच्या पसंतीस उतरली. चालक धरून पाच व्यक्ती आरामशीर प्रवास करू शकतील अशी गाडी. 800 सीसी चे इंजिन, एसी, पेट्रोलला परवडेल असे मायलेज देणारी गाडी. मारुती लॉँच होताच अल्पावधीतच या गाडीला मागणी वाढली. सुनील गावस्कर या नामांकित क्रिकेटपटूच्या हस्ते पहिली मारुती 800 लॉंच झाली होती.

 लवकरच रस्त्यावर विविध आकर्षक रंगातील मारुती 800 गाड्या दिमाखात, गतीने धावताना दिसू लागल्या. सचिन तेंडूलकर , शाहरुख खान यांनी सुद्धा ही गाडी घेतली होती. सचिनकडे तर ही गाडी अजूनही आहे व त्याच्या एका जाहिरातीत ती दिसते सुद्धा. पुढे मारूतीने झेन, ओम्नी, अल्टो, वँगनार, ईको ,  आर्टिगा,  बलेनो अशा अनेक गाड्या निर्माण केल्या. अल्टो म्हणजे मारुती 800 चेच सुधारीत रूप. परंतू नवीन आलेल्या अल्टोपेक्षा जी अगदी सुरुवातीची मारुती 800 गाडी आहे ती अधिक मजबूत आहे. नवीन अल्टो व इतरही कंपन्यांच्या गाड्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिकच आहे. आता काही वर्षांपासून BS4 , BS 6 इंजीनच्या गाड्यांबाबतची नवीन नियमावली, विदेशी मॉडेलच्या अनेक गाड्यांची सहज उपलब्धता, 15 वर्ष जुन्या गाड्यांवर बंदीचे सरकारचे धोरण या सर्व गोष्टींमुळे मारुती 800 ही गाडी मागे सरली. या गाडीमुळे आणखी एक किस्सा घडला होता. तो म्हणजे या गाडीचे अनेक अपघात हे ट्रकला मागच्या बाजूने धडक दिल्याने झाले होते. कित्येक मारुती 800 गाड्या ह्या ट्रकच्या मागील बाजूने ट्रकच्या खालीच घुसल्या होत्या. त्यामुळे ट्रकला मागील बाजूने कार घुसणार नाही असा मोठा लोखंडी बार लावण्याचे आदेश सरकारनी काढले होते. अशाप्रकारच्या अपघातात बहुतांश वेळी चुक ही कार चालकाचीच होती व सुधारणा मात्र ट्रकवाल्यांना कराव्या लागल्या होता. या निर्णयाचे तेंव्हा बरेच हसे झाले होते. असो ! ती शेवाळी रंगांची मारुती 800 केंव्हाच निघून गेली होती परंतू ती गेली त्या अनेक आठवणी देऊन. मला आणखी अनेक गोष्टी आठवू लागल्या. 7/8 वर्षांपुर्वी माझा फोन खणाणला. माझे मामे भाऊ  डॉ. प्रशांत नाईक 
हे फोनवर होते. "मी तूला माझी मारुती 800 देतोय, घेऊन जा लवकर." त्याने नवीन गाडी घेतल्यावर ही मारुती 800 उभीच होती, त्याला ती विकायची सुद्धा नव्हती. मी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून गाडी घेऊन आलो. आजही ही गाडी सुस्थितीत आहे व चांगली चालते. या गाडीने मी भरपूर प्रवास केला व करतो. गाडीची व्यवस्थित निगा राखली,देखभाल केली तर ती कधीच धोका देत नाही असे माझे तिर्थरूप नेहमीच सांगत असतात. माझ्या काकांनी सुद्धा अँबेसॅडर अगदी कंडिशन मध्ये ठेवली होती. ते नेहमी गाडीचे तेल, हवा, पाणी व बॅटरी यांच्याकडे लक्ष असलेच पाहिजे असे म्हणत. तेल हवा पाणी म्हणजे पेट्रोल/डिझेल, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल आणि रेडिएटर मध्ये पाणी. आता नवीन गाड्यांमध्ये कुलंट असते. उपरोक्त तीन-चार गोष्टींकडे लक्ष असले की तुमची गाडी अनेक वर्ष चांगली चालतेच. पण आता 15 वर्षांचा नियम आला आहे, गाडीला 15 वर्षे झाली की गाडी जरी चालत असली तरी तिला भंगारात काढले जाते. आजकाल क्रयशक्ती वाढल्याने व नवनवीन मॉडेल लवकर येत असल्याने लोक सुद्धा पुर्वीसारखे वर्षानुवर्षे एकच गाडी वापरत नाही. अनेक नवीन मॉडेल, गाडीला दिलेली नवीन 15 वर्षांची वयोमर्यादा यामुळे मारुती 800 चा खप कमी झाला. आता तर 800 सीसी इंजिनच्या मारुती गाडीचे उत्पादन कंपनी मार्च 23 पासून बंदच करणार आहे. 
पहिली मारुती
70 च्या दशकात संजय गांधी या इंदिराजींच्या ज्येष्ठ पुत्रास भारतीयांसाठी एक "पीपल्स कार" लॉन्च करावीशी वाटली त्यातूनच पुढे 1981 मध्ये भारत सरकारने MUL मारुती उद्योग लिमिटेडची स्थापन केली व मारुतीचा प्रवास सुरु झाला. 1983 पासून भारतीयांच्या पसंतीस उतरलेली, मोठा खप झालेली व तत्कालीन गाड्यांच्या तुलनेत वेगाने घावणारी अर्थात गतीशी तुळणा नसणारी हि गाडी भारतीयांच्या सदैव समरणात राहील.
||इति मारुती पुराण संपूर्णम||

०१/०२/२०२३

Article about awarding Padmavibhushan Award to Lt Mulayamsing Yadav.

मुलायम तरीही कठोर

रविना टंडनने पुरस्कार समितीला अशी कोणती "अंखियोसे गोली मारली" कुणास ठाऊक परंतू तिची पद्मश्रीसाठी वर्णी लागली. रविना टंडन एक व्यवसायिक नटी आहे. कला क्षेत्रातून तीचे नांव आले असेल. एकवेळ रविना टंडनला पुरस्कार देण्यास काही हरकत नाही परंतू मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्याने मात्र जनतेत रोष व नाराजीच आहे.

मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर ज्या व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले गेले त्यांची निवड अतिशय योग्य होती. जादव पाएंग - 2015 , बीजमाता राहीबाई पोपरे – पद्मश्री 2020, 125 वर्षे वयाचे स्वामी शिवानंद – पद्मश्री 2022 , रघुनाथ माशेलकर – पद्मविभूषण 2014बी. के. एस. अयंगार- पद्मविभूषण 2014, रामभद्राचार्यपद्मविभूषण 2015. पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्यांपैकी अशी ही काही नांवे पाहून देशात आनंद व्यक्त झाला होता. दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबरच्या या काळात पद्म पुरस्कारासाठी नामांकने केली जातात. या नांवातून पद्म पुरस्कार समिती अंतिम नावांची निवड करते. पंतप्रधान हे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 नामवंत असे मिळून  पद्म पुरस्कार समितीची स्थापना दरवर्षी करीत असतात. ही समिती पुरस्कारांसाठीची नावं सुचवते. ही समिती काही नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे सुपूर्द करते आणि अंतिम मंजुरी या दोघांकडून मिळते. या पद्धतीने हे पद्म पुरस्कार दिले जातात. परंतू यंदाची दोन नांवे पाहून मात्र समस्त भारतवासियांना झटकाच बसला. यातील पहिले नांव रविना टंडन व दुसरे पद्मविभूषण पुरस्कार मरणोपरांत मिळालेले मुलायमसिंग यादव हे नांव.  एकवेळ रविना टंडनला पद्मश्री पुरस्कार भेटला तर त्यात तरी निदान काही वावगे वाटणार नाही.  परंतू केंद्रातील भाजपा सरकारने अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्या मुलायमसिंग यादव यांचे नांव पद्मविभूषण पुरस्कारासाठी घोषित केल्यावर तर रविना टंडनच्या नावाच्या झटक्यापेक्षाही कित्येक पटीने अधिक जोरो का असा झटका मुलायमसिंग यांच्या नावाने देशवासीयांना लागला. मोदी व शहा हे आपल्या निर्णयांनी तसे झटके देण्याबाबत प्रसिद्ध आहेतच. 1990 मध्ये अनेक कारसेवकांवर निर्घुणपणे गोळ्या चालवण्याचे आदेश देणा-या मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सरकारने सन्मानित करणे म्हणजे एक मोठे आश्चर्य नव्हे तर त्या कारसेवकांच्या वंशजांवर व नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले. नावात मुलायम असूनही शेकडो वर्षांच्या आक्रमकांच्या गुलामीच्या प्रतिकाच्या स्थानी आपल्या आराध्या करीता जाणा-या आपल्याच देशवासीयांवर गोळ्या घालण्याचा कठोर निर्णय मुलायम यांनी घेतला होता. त्या मुलायम यांना सन्मानित करण्याचा निर्णय हा सर्वांसाठीच मोठा धक्कादायक ठरला. राजकारणात एखादा निर्णय घेण्यामागे काय हेतू दडलेले असू शकतात याचा थांगपत्ता लागणे मोठे कठीण असते. काय दडले आहे याचा फक्त अंदाजच विश्लेषक लाऊ शकतात. काश्मीर मध्ये भाजपाने पीडीपी सोबत युती करणे हा सुद्धा एक असाच निर्णय होता पण पुढे हाच निर्णय 370 कलम हटवण्यास सहाय्यकारी झाला. नंतर भाजपाने पीडीपी युतीचा निर्णय कशासाठी घेतला गेला होता हे सर्वश्रुत झाले. आपल्या मनाचा थांगपत्ता सहसा लागू न देणा-या मोदींचा मुलायमसिंग यादव यांना भारतरत्न नंतर दुस-या क्रमांकाचा पद्मविभूषण हा पुरस्कार देण्याच्या निर्णयामागे काय राजकारण, काय हेतू असावा याचे अंदाज बांधण्यात सर्व गुंतले गेले. अनेकांचे असे म्हणणे आहे की भाजपा कडून अशा राजकारणाची अपेक्षा नाही. परंतू सर्वच पक्षात अशाच प्रकारचे राजकारण होत असते व अनेक राजकीय पक्षांचे त्यांच्या विचारसरणी विरोधी निर्णय घेतांना बरेचदा दिसून आले आहे. मुलायमसिंग यादव यांना मोदी सरकारने पद्मविभूषण दिल्यानंतर अनेकांनी विविध मते मतांतरे व्यक्त केली. सरकारच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटणा-यांना रामनाम घेण्याचा अधिकार नाही असेही मत काहींनी नोंदवले. पण सरकारने एखादा निर्णय घेतला व त्यावर समान्यजनास आश्चर्य वाटले तर त्याच्या रामनाम घेण्यावर कुणी कसा काय आक्षेप घेऊ शकतो? ते तर प्रभूचे नांव आहे व ते सज्जन, दुर्जन कुणीही घेऊ शकतो. शिवाय सरकारच्या या मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करणा-या कृतीसारख्या कृतीवर कोट्यवधी लोक त्यांना ही कृती न आवडून ते काही जाहीर वाच्यताही करणार नाही तेंव्हा मग ते सुद्धा रामनाम घेण्याचे अधिकारी राहणार नाहीत का ? असो. काहींनी शिवाजी महाराजांचे सुद्धा दाखले दिले परंतू राजेशाहीतील राजाचे निर्णय घेणे व लोकशाहीतील महत्वाच्या नेत्यांनी निर्णय घेणे यात मोठा फरक आहे. सरकारचा हा निर्णय विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, सरकार समर्थक यांच्यातील अनेकांच्या भूमिका उंचवणारा असाच आहे. "या टोपीखाली दडलंय काय, या मुकुटाखाली दडलंय काय ?" या ओळींप्रमाणे राजकीय निर्णयांचा अंदाज लावणे तितकेसे सोपे नसते. मुलायम यांनी सोनिया नांवास विरोध केल्याने अटलजींचा सत्तामार्ग सुकर झाला होता असेही सांगितले जाते, शिवाय आगामी काळात निवडणुका सुद्धा आहेत. इथे सरकारच्या या निर्णयाचे समर्थन मुळीच नाही. हा सन्मान प्राप्त व्हावा अशी अनेक नांवे आपल्या देशात आहे हे ही तितकेच खरे आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीत नावात मुलायम असूनही कारसेवकांवर गोळीबार करवण्याची मुलायमसिंग यांची कठोर कृती ही प्रभू रामचंद्रांच्या सेनेवर रावणाच्या राक्षसांनी शस्त्रे चालवण्याच्या कृतीसारखीच होती. जनता मुलायमसिंग यांची ही कृती अद्याप विसरली नसतांना त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवणे हे कुणालाच अजिबात आवडलेले नाही. मुलायमसिंग यांच्या ऐवजी बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण देता आले असते असेही अनेकांनी म्हटले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार देण्याची जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मनीषा आहे. लोककार्य या निकषातून पुरस्कार देण्यास अनेक नांवे असतांना मुलायमसिंग यांचे नांव येणे हे या सरकार कडून कुणालाच अपेक्षित नव्हते व बहुतांश जनांना ते रुचले सुद्धा नाही. रविना टंडन हिला सुद्धा कला क्षेत्रातून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. परंतू जरी रविनाचे काही व्यावसायिक सिनेमे गाजले असले तरी कसदार अभिनय प्रकट होईल अशा दमदार भूमिका मात्र तिला साकारायला मिळाल्या नाहीत. रविना टंडन हिने पुरस्कार समितीला अशी कोणती "अंखियोसे गोली मारली" कुणास ठाऊक परंतू तिची सुद्धा पद्मश्रीसाठी वर्णी लागली. रविना टंडन व्यावसायिक सिनेमातून काम करणारी नटी आहे. तीचे काही सामाजिक कार्य असलेही परंतू ते म्हणावे तितके व्यापकही नाही. तरीही एकवेळ रविना टंडनला पुरस्कार देण्यास सुद्धा हरकत नाही परंतू मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्याने मात्र जनतेत रोष व नाराजीच आहे. "मुलायम"सिंग यादव यांना जरी सरकारने हा पुरस्कार दिला असला व सरकारला त्याबाबतीत जे काही वाटले असेल ते असो पण अनेक दिवंगत कारसेवक, त्यांचे वशंज व नातेवाईक तसेच या देशातील बहुतांश जनतेला मात्र ही कृती कठोरच वाटली आहे.