२०/०४/२०२३

article about mafia in UP , Encounter of Asad and killing of Atik and Ashraf

खळांची व्यंकटी सांडो 

गुन्हेगार मग तो कुणी का असेना त्याची व्यंकटी ही सुटलीच पाहिजे.  गुन्हेगारांचा "विनाशायच दुष्कृताम" याप्रमाणे नायनाट हा व्हायलाच हवा तेंव्हाच इतरांना सुद्धा कायद्याचा धाक वाटेल व ते दुष्कृत्ये करण्यास धजावणार नाही व त्यामुळे  या विश्वातील सर्व जीवांचे मैत्र जडेल. अशीच प्रार्थना माऊली करतात. 

गत आठवड्यात उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद अहमद याचा झांशी येथे एसटीएफच्या चकमकीत अंत झाला. त्याला पकडून देणा-यास पाच लाखाचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले होते. तदनंतर पोलिसांच्या ताब्यात असलेले त्याचे वडील अतिक अहमद व काका अशरफ अहमद या अनेक गुन्ह्यांचे दोषारोपण माथ्यावर असलेल्या दोघांवर माध्यमांचे चित्रीकरण सुरु असतांना व पोलिसांच्या ताब्यात असतांना तीन मारेक-यांनी पत्रकारांच्या वेषात येऊन अगदी जवळून गोळ्या झाडून त्यांना यमसदनी पाठवले व स्वत: पोलिसांना शरण आले. हे मारेकरी सुद्धा गुन्हेगारच असल्याचे कळते. असद, अतिक, अशरफ या गुन्हेगार, माफियांचा अशाप्रकारे अंत झाल्यावर समाज माध्यमे, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे यांच्यातून बातम्यांना ऊत आला व अतिक आणि त्याच्या कुटुंबियांच्या गुन्ह्यांचे अनेक किस्से जनतेसमोर आले. अनेक गुन्ह्यात आरोपी असूनही बीबीसी या "वृत्तवाहिनीने मात्र माजी आमदाराची हत्या" असे शीर्षक असलेली अशी बातमी दिली. यावरून बीबीसीचा खरा दिसून येतो. अतिक हा आपल्या दबदब्याच्या जोरावर निवडून सुद्धा आला होता. अतिक हा अगदी तरुण वयातच गुन्हेगारी जगतात शिरला. त्याच्या वडीलांचा टांग्याचा व्यवसाय होता. अगदी तरूण असतांना म्हणजे केवळ 17 वर्षाचा असतांना चांदबाबा नावाच्या एका डॉनचा दबदबा होता. या चांदबाबाशी अतिकने टक्कर देणे सुरु केले व त्यामुळे त्याच्या मागे अनेक लोक उभे राहिले. पुढे अतिकवर अनेक हत्यांचे आरोप झाले, लोकांच्या जमिनी त्याने बळकावल्या असे अनेक प्रकारचे उपदव्याप त्याने सुरु केले. गुन्हेगार व राजकारण यांचे संबंध कसे येतात व ते चांगले प्रस्थापित कसे होतात हा एक प्रश्नच आहे. एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल असा या अतिकचा गुन्हेगारी जीवनपट आहे. अतिक पुढे राजकारणात सक्रिय झाला व 1989 या वर्षी चक्क आमदार सुद्धा झाला. केवळ एकदाच नव्हे तर वर्ष 2004 पर्यंत तो पाचवेळा आमदार झाला, संसदेवर सुद्धा निवडून आला. पुढे ज्यावेळी चांदबाबाची हत्या झाली व संशयाची सुई अतिककडे फिरली होती. प्रयागराज पोलीस खात्यात अनेक गुन्हे अतिक व त्याच्या कुटुंबीयांवर पोलिसांनी लावले.  राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव होणे व त्याला कोणत्या का मार्गाने होईना समाजमान्यता मिळणे ही आपल्या लोकशाहीची शोकांतिकाच आहे. 2006 मध्ये राजू पालची हत्या व यातील साक्षीदार उमेश पाल याची 2023 मध्ये हत्या हा सर्व कट अतिकनेच रचला होता. परवा अतिक व त्याच्या भावाची हत्या झाली आणि अतिकची गुन्हेगारी संपुष्टात आली. अतिकमुळे त्याचे सर्व कुटुंबीयच एक माफिया कुटुंब झाले. त्याचा एक मुलगा अद्यापही तुरुंगातच आहे. अतिकची बायको शाईस्ता परवीन ही सुद्धा एक लेडी डॉनच आहे. सध्या ती फरार आहे. अतिकच्या स्थावर मालमत्ता आणि सावकारी प्रकरणे व काळ्या पैशांचा व्यवहार शाईस्ताच पाहते असे म्हटले जाते. शाईस्ताची नणंद सुद्धा नेमबाज असल्याचे बोलले जाते. आज शाईस्ता तोंड लपवत इकडे तिकडे फिरत आहे. प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. तसेच कर्म चांगले असो वा वाईट त्याचे फळ मिळणे हे क्रमप्राप्तच असते. असदवर 101 गुन्हे आहे. भगवंताने शिशुपालचे सुद्धा १०० अपराध माफ केले होते. त्याने जेंव्हा 101 वा अपराध केला तेंव्हा भगवंताने त्याचा शिरच्छेद केला होता. असदचा सुद्धा 101 अपराधांचा घडा भरला व तो फुटला.  अनेक लोक याचा संबंध मा. योगी हे मुख्यमंत्री असल्याने धर्माशी जोडत आहे व अतिकचा मुलगा असदला मारायला नको होते अशी ओरड त्याचे शेजारी पाजारी करीत आहेत परंतू गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला कोणता धर्म नसतो. अतिक या गुन्हेगाराविषयी सहानुभूती बाळगणा-यांनी अतिकने ज्यांच्या हत्या केल्या, ज्यांच्या जमिनी बळकावल्या त्यांच्या नातेवाईकांवर काय परिस्थिती आली असेल याचा सुद्धा विचार करावा. 1985 पासून सुरुवातीला किरकोळ गुन्हे, अपहरण, हत्येचे कट करणे,  हत्या करणे, खंडणी व नंतर जमिनी बळकावून आपले गुन्हेगारी विश्वाचे साम्राज्य उभे करणा-या असदला त्याच्या  कर्माचे फळ हे मिळाले. माऊलींनी विश्वाच्या कल्याणाकरीता जे पसायदान मागितले आहे त्यात ते हेच म्हणतात की 

जे खळांची व्यंकटी सांडो 

तया सत्कर्मी रती वाढो

अर्थात खल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. म्हणजे सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी.

    गुन्हेगार मग तो कुणी का असेना त्याची व्यंकटी ही सुटलीच पाहिजे. गुन्हेगारांचा "विनाशायच दुष्कृताम" याप्रमाणे नायनाट हा व्हायलाच हवा तेंव्हाच इतरांना सुद्धा कायद्याचा धाक वाटेल व ते दुष्कृत्ये करण्यास धजावणार नाही व त्यामुळे  या विश्वातील सर्व जीवांचे मैत्र जडेल. अशीच प्रार्थना माऊली करतात. 

२ टिप्पण्या: