११/०५/२०२३

जुवा किसिका ना हुवा


तरुणांना उच्चभ्रू लोकांसाठी सारखी जीवनशैली जगायची ओढ लागली आहे. परंतु त्यासाठी मेहनत करणे मात्र त्यांना नको आहे. असे तरुण मग या ॲपद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराकडे आकर्षित होत आहेत.

अनेक व्यसनांसोबत एक व्यसन जुगाराचे सुद्धा असते. जुगार खेळणे हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. फक्त जुगार खेळण्याच्या पद्धती बदलत गेल्या आहेत. तसे तर हा विषय अनेकदा चर्चिला जातो आणि यावर बरेच लिखाण सुद्धा झाले आहे तरीही याच विषयावर लिहिण्याचे ठरवले. या विषयावर अधिकाधिक लिखाण आणि उद्बोधन झाल्यास कदाचीत ते नवीन पिढीस कुठेतरी विचार करण्यास भाग पाडेल व ते जुगारासारख्या महाभयंकर अशा विषसर्पाच्या विळख्यात अडकणार नाही असे वाटले व हाच विषय लिहायला घेतला.            

कोणतेही व्यसन किंवा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणे हे चांगले नसते "अति सर्वत्र वर्ज्यते " असे जे म्हटले आहे ते यासाठीच. आजकाल आपण पाहतो भौतिक सुखाची वा भौतिक सुख भोगण्याची लालसा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वस्तूंमध्ये सुख असते असे वाटून नाना प्रकारच्या चैनीच्या वस्तू , गॅजेट्स यांची खरेदी केली जाते. सुलभ कर्ज योजना सुद्धा याला कारणीभूत आहेत. आज अनेक लोक या सुलभ मिळणा-या कर्जावर वाहने आदी वस्तू खरेदी करतात व चार-पाच वर्षात त्या विक्रीस काढतात. जुन्या वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्याचे हेच कारणं आहे. अनेक प्रसंगी या वस्तू भविष्यात टाकाऊ होऊन जातात आणि मग पृथ्वीवर कचरा वाढत जातो.  भौतिक सुखे भोगण्यासाठी वित्ताची गरज असते आणि वित्त मिळवण्यासाठी नाना प्रकारच्या धडपडी मग केल्या जातात. चरितार्थाचे एक साधन असूनही मनुष्य इतर अनेक साधने शोधू लागतो आणि आपली शांती गमावून बसतो. या इतर अनेक साधनांमध्ये सध्या मोबाईलसारखी, इंटरनेट रेडी पीसीसारखी साधने त्यांना पालक सुद्धा मोठ्या हौसेने घेऊन देत आहेेेत. टीव्ही,  मोबाईल ॲपद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराची मोठ्या प्रमाणात जाहिरात होताना दिसतात आहे आणि या जाहिराती चक्क नावाजलेले नट करत आहेत. या जाहिराती करताना तरुणांना पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते आणि त्यांना जुगाराकडे आकर्षित केले जाते. याच जाहिरातीमध्ये कुठेतरी असा जुगार खेळणे एक जबाबदारीचे काम असते आणि त्यात नुकसानही होऊ शकते असे कुठेतरी बारीक अक्षरात लिहिलेले असते. तरुणांना आजकाल शानशौकीत राहण्याचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. विविध प्रकारच्या गाड्या दामटायच्या,  उंची वस्त्रे परिधान करायची आणि उच्चभ्रू लोकांसारखी जीवनशैली जगायची अशी ओढ त्यांना लागली आहे. परंतु त्यासाठी मेहनत करणे मात्र त्यांना नको आहे. असे तरुण मग या ॲपद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराकडे आकर्षित होत आहेत. अनेक प्रसंगी असे दिसून आले आहे की या जुगार खेळण्यामुळे अनेक तरुणांना, किशोरवयीन मुलांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही लहान मुलांनी हा जुगार अर्थात ऑनलाईन रम्मी खेळून आपल्या पालकांच्या बँकेच्या खात्यातील लाखोच्या घरात असलेली रक्कम गमावली आहे.  असे असतांनाही या जुगाराच्या जाहिराती एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा काय केल्या जातात ? जुगारामुळे केवढा मोठा फटका बसतो हे आपल्या भारतीयांना किती चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. यासाठी आपल्या महाभारतात एवढे मोठे उदाहरण महर्षी व्यासांनी दिलेले आहे. जुगार म्हणजे तत्कालीन द्युत. हा द्युत खेळ खेळण्यास तत्कालीन क्षत्रिय नकार देत नसत अशी महाभारतकालीन प्रथा होती. दुर्योधन धर्मराजाला द्युत खेळण्यासाठी आमंत्रित करतो व त्यात धर्मराज आपले राज्य, धन, प्रिय बंधू, पत्नी या सर्वांना गमावून बसतो आणि पुढील महाभारत घडते. परंतु ही उदाहरणे लहान मुले व तरुण यांच्यापर्यंत आपण पोहोचवतच नाहीये. अशी उदाहरणे जर त्यांना वारंवार सांगितली गेली तर कदाचित हे रम्मी, ऑनलाईन जुगार व त्याच्या जाहिराती कमी होण्याची शक्यता किंवा त्या बंद होणे शक्यच नाहीच का ? नवीन पिढीपर्यन्त जे पोहोचते आहे ते आपल्या राष्ट्रासाठी भविष्यात नक्कीच हानिकारक आहे अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. महाभारत या मालिकेमध्ये अनेक प्रसंगानुरूप अशी महेंद्र कपूर यांच्या आवाजातील समर्पक गीते लागत असत याच गीतामध्ये पुढील एक गीत होते.

जुवा किसिका ना हुवा

इसमे जीत ना हार |

सर्वनाश का खेल है,

मिटे कई घरबार ||

सिख बनती है युगोसे, नये युग का करे स्वागत ||

वरील गीत पंक्ती पालक, शिक्षक व तसेच सर्वांनी लक्षात घेऊन आपआपल्या मोबाईलधारक पाल्यांना , विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिल्या  तरच आपल्या देशाचे आधारस्तंभ असलेली आपली भावी पिढी जुगारासारख्या महाभयंकर अशा विषसर्पाच्या विळख्यात अडकणार नाही असे वाटते.

२ टिप्पण्या:

  1. तरुणांना मार्गदर्शन करणारा लेख.सुंदर लिखाण

    उत्तर द्याहटवा
  2. पालकांनी या बाबतीत सजगता ठेवावी.दुसरे असे कि सत्तेसाठी भारतीय संस्कृती ची मूल्ये पायदळी तूडवू नका.भविष्यकाळ माफ करणार नाही.

    उत्तर द्याहटवा