२०/०७/२०२३

Aarticle about changing the name of opposition alliance UPA to India

 भारतीयत्वाचा अभाव असलेली "इंडिया"



आघाडीचे नांव नामकरण India असे केले. त्यांच्या या आघाडीच्या नांवाचे पुर्ण रूप Indian National Developmental Inclusive Alliance असे आहे. National Development असे शब्द आघाडीच्या नांवात वापरणा-यांनी  सत्तेत असतांना स्वत:ची व परीवाराची तेवढी Development केली आहे. जनता हे सारे ओळखून आहे.

इंडिया म्हणजे भारत अशी ओळख  जगभर आहे. खरेतर आपल्या देशाला महाभारतील कौरव -पांडवांचे पुर्वज असलेल्या राजा भरत या पराक्रमी राजाच्या नावावरून भारत असे नांव पाडले असे लहानपणी वाचलेल्या गोष्टींच्या पुस्तकात वाचल्याचे स्मरते. (आता असे काही सांगितले / लिहिले की काही आधुनिक काळातील असूनही आजही प्रत्येक गोष्टीला जातीच्या चष्मातून पाहणा-या अनेकांना पुराणातील गोष्टी म्हणजे फेका-फेकी , भाकडकथा वाटते. असो ! त्यांना तसे वाटते म्हणून त्या पौराणिक कथांचा संदर्भ न घेणे , न लिहिणे हे सुद्धा योग्य नाही. अशा लोकां आपलेच म्हणणे तेवढे खरे असे वाटत असते.) तऱ राजा भरत याच्या नांवावरून पडलेले भारत हे नांव पुर्वी भारतवर्ष असे होते. जेंव्हा आपल्या या भारतावर विदेशी आक्रमकांनी अनेक आक्रमणे केली तेंव्हा सिंधु नदी व नदीच्या खो-या वरुन  Indus , Indus Vally  असे  शब्द रूढ झाले. या Indus वरूनच India असे नांव पडले जे आता भारत देशाला इंग्रजीत इंडिया असे म्हणण्यासाठी वापरतात. तसेच हिंदु या शब्दावरून भारताला हिंदुस्तान हे सुद्धा एक नांव पडले आहे. मध्यंतरी कुणीतरी आपल्या देशाला इंडिया न म्हणता भारत असेच म्हटले गेले पाहिजे अशी मागणी करणारी एक याचिका सुद्धा दाखल केली होती परंतू संविधानात India म्हणून सुद्धा भारताला ओळखले जाते असे लिहिले असल्याने ती याचिका खारीज झाली. हा झाला आपल्या देशाच्या नांवाचा ऊहापोह आता विरोधकांनी त्यांच्या आघाडीला दिलेल्या इंडिया या  नांवाविषयी पाहू. 

काल विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एक सभा घेऊन UPA या त्यांच्या आघाडीचे नामकरण India असे केले. त्यांच्या या आघाडीच्या नांवाचे पुर्ण रूप Indian National Developmental Inclusive Alliance असे आहे. हे नांव ज्या बैठकीत घोषित करण्यात आले त्या बैठकीतच विरोधकांमध्ये संवाद नसल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांच्या UPA असे नांव असलेल्या आघाडीचे इंडिया हे नामकरण कोणी केले याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न सुरू झाले. इंडिया हे नांव ममता बॅनर्जी यांनी केले असे म्हटले जाते तर बैठकीत राहुल गांधी यांनी या नावाची घोषणा केल्याचे व हे नांव काँग्रेस पक्षाने दिले याचीही चर्चा झाली. आघाडीतील माकप व तृणमूल हे पक्ष बंगालमध्ये एकत्रित निवडणूका लढणार नसून तीच परिस्थिती आप व काँग्रेसची पंजाब व दिल्ली या राज्यात आहे. विरोधक केंद्रात सत्ताप्राप्तीसाठी जरी एकत्र आले असले तरी राज्यात मात्र वेगवेगळे त्यामुळे आगामी काळात त्यांच्यात सुसंवाद होतो की विसंवाद हे दिसेलच. विरोधकांच्या या बैठकीत राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताही नसलेल्या पक्षातील नेत्यांचे महत्व हे राष्ट्रीय पक्षातील नेत्यांपेक्षाही जास्त असल्याचे दिसले. NDA ला टक्कर देण्यासाठी व भारत देश, भारताप्रतीची निष्ठा प्रतीत व्हावी असे दाखवण्यासाठी आघाडीला इंडिया असे नांव जरी दिले असले तरी याच आघाडीत काही नेते असेही आहेत की ज्यांनी आपल्याच इंडियाची म्हणजे भारताची विदेशात जाऊन बदनामी केली आहे. या आघाडीच्या नांवात जरी  National Development असे शब्द असले तरी पुर्वी जेंव्हा या आघाडीतील लोक सत्तेत होते तेंव्हा यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती, काहींवर तर खटले सुद्धा दाखल आहेत, National Development असे शब्द आघाडीच्या नांवात वापरणा-या लोकांनी सत्तेत असतांना स्वत:ची व परीवाराची तेवढी Development मात्र केली आहे. जनता हे सारे ओळखून आहे. विरोधकांना नांव बदलवून काही परीणाम होईल असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. भारतीय जनतेला आता विकास हवा आहे. शिवाय केवळ नांव बदलवून काहीही साध्य होत नाही. कोणत्याही संघटनेचे, पक्षाचे नांव काहीही असू देत त्या संस्थेला , संघटनेला , पक्षाला त्यात काम करणा-या व्यक्तींच्या कार्यामुळे नावलौकीक प्राप्त होत असतो.  धोरणे, कल्पना, जाहीरनामा त्यात दिलेली वचने, त्यांचे पालन, शिवाय घोटाळे व भ्रष्टाचारास थारा न देणे या सा-या गोष्टींचा विचार व देशविकासासाठी योग्य ती पाऊले जर विरोधकांकडून उचलली जातील अशी जनतेला खात्री पटायला हवी. परंतू या आघाडीस योग्य नेतृत्वच नसल्याने शिवाय विरोधकांपैकी अनेक नेत्यांमध्ये जनतेला अस्सल भारतीयत्व दिसतच नाही, विदेशात भाषणे देतांना, शत्रूराष्ट्रासंबंधी भाष्य करतांना अनेक विरोधी नेते भारत विरोधीच सुरू आवळतांना जनतेने पाहिले आहे. आपल्या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांत असलेल्या मातृभूमीप्रती प्रेम, निष्ठा, भ्रष्टाचाराची चीड, राष्ट्र प्रथम मानणे, राष्ट्राला काही अर्पण करणे असे गुणसमुच्चय म्हणजेच भारतीयत्व असते व नेमक्या याच भारतीयत्वाचा अभाव नांव इंडिया असलेल्या या आघाडीत आहे. आता जनता या आघाडीला काय कौल देते हे लवकरच दिसेल.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा