२८/०३/२०२४
Article about Sawarkar Movie by Randeep Huda
०७/०३/२०२४
Article about "Yatra" of Palshi zashi, Sangrampur Dist Buldhana
महारोटाची एक अनोखी यात्रा
महाराष्ट्रातील अनेक यात्रांत अनोख्या अशा वैशिष्ट्यपुर्ण प्रथा, परंपरा, चालीरीती गेली वर्षानुवर्षे पाळल्या जात आहे. अनेक भाविक श्रद्धा भक्तीभावाने या यात्रांच्या स्थानी विविध गाव व शहरांमधून येत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी सुद्धा तेथील अनोख्या अशा यात्रेमुळे प्रसिद्ध झाले आहे.
यात्रा अर्थात जत्रा हिंदीत मेला. पुर्वी कुठे फिरायला अथवा तीर्थाटनाला जाणे यासाठी सुद्धा यात्रा हाच शब्द प्रचलित होता. ग्रामिण भागात ग्रामदेवतेच्या ठिकाणी देवाच्या आराधनेसाठी ठराविक काळाच्या अंतराने जे भक्तांचे एकत्रीकरण होते त्याला सुद्धा यात्रा किंवा जत्रा असे म्हटले जाते. आपल्या वैविध्यपुर्ण भारत देशात प्रत्येकच राज्यात यात्रा भरत असतात. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी यात्रा आयोजित होतात. यातील अनेक यात्रांत अनोख्या अशा वैशिष्ट्यपुर्ण प्रथा, परंपरा, चालीरीती सुद्धा गेली वर्षानुवर्षे पाळल्या जात आहे. अनेक भाविक श्रद्धा भक्तीभावाने या यात्रांच्या स्थानी विविध गाव व शहरांमधून येत असतात. बुलढाणा जिल्हा हा सुद्धा तेथील अनेक यात्रांमुळे प्रसिद्ध आहे. बुलढाणा हा भिल्ल ठाणा या शब्दापासून बनलेला शब्द आहे. स्वातंत्र्यपुर्व बुलढाणा जिल्हा परीसरात भिल्ल लोकांचे ठाणे म्हणजेच ठिकाण होते. भिल्लांचा रहिवास या भागात मोठ्या प्रमाणात होता. आदिवासी व छोटी-छोटी गांवे, खेडी असलेल्या या भागात विकासाचा लवलेश नव्हता. बुलढाणा जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक वास्तू आजही आहेत. अजिंठा मार्गे बुलढाणा शहराकडे येतांना देऊळघाट नावाचे गांव आहे येथे 17 व्या शतकात टांकसाळ होती असे म्हणतात. सिंदखेड राजा हे मातोश्री जिजाबाईंचे माहेर, खा-या पाण्याचे लोणार सरोवर, खामगांव जवळ गोंधनापूर या गावात चिटणीसांचा भुईकोट किल्ला, महानुभाव पंथीयांचे जाईचा देव हे ठिकाण, चिखलीची रेणुका देवी, अमडापूरची बल्लाळ देवी, मेहकरचा शारंगधर बालाजी, देऊळगांव राजाचा बालाजी अशी कितीतरी ठिकाणे बुलढाणा जिल्ह्यात आहेत. शिवाजी महाराज यांची एक पत्नी करवंड या गावाची होती असे शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी एका व्याख्यानात सांगितले होते.
अशा या बुलढाणा जिल्ह्यात अनेक यात्रा ह्या शेकडो वर्षांपासून भरतात. येथील यात्रांची माहिती दूर-दूर पर्यंत पोहचली आहे. यातील काही प्रसिद्ध यात्रा म्हणजे पळशी झांशी, पळशी सुपो, भेंडवळ, सैलानी इ. ठिकाणी होतात. संग्रामपूर या जिल्ह्यातील अंतर्गत भागात असलेल्या तालुक्यात पळशी झाशी म्हणून गांव आहे. पळशीला जायचे असल्यास संत गजानन महाराजांच्या शेगांवला रेल्वेने उतरून मग सडकेने वरवट बकाल पासून वळण घेऊन संग्रामपूर व मग पळशी झाशी असे जाता येते. संग्रामपूर गावात प्रवेश करण्यापूर्वीच तालुका क्रिडा संकुलापासून उजवीकडे फक्त 3 किमी अंतरावर हे गांव आहे. या ग्रामी शेकडो वर्षांपुर्वी अंदाजे 150 वर्षांपुर्वी
शंकरगिरी महाराज होऊन गेले. शंकरगिरी महाराज हे प्रथम वरवट बकाल या ठिकाणी आले व नंतर पळशी झाशीला आले असे ग्रामस्थ सांगतात. पळशी जवळील वडाच्या झाडांच्या खाली स्वयंभू महादेव असल्याचा साक्षात्कार झाला व म्हणून ते त्या ठिकाणी आले असल्याचे त्यांनी तत्कालीन ग्रामस्थांना सांगितले होते. याच ठिकाणी आता शिवमंदिर व शंकरगिरी महाराज यांची संजीवन समाधी आहे. आजही हा भाग मुख्य रस्त्यापासून आडवळणास आहे. तेंव्हा तर या भागात मोठे जंगलच असेल. आपल्या गावा जवळील वडाच्या झाडांच्या खाली कुणी योगी आला आहे असे ग्रामस्थांना कळले व त्यांचा शंकरगिरी महाराजांशी परीचय झाला. महाराज याच गावाच्या पंचक्रोशीत राहत असत व शिवाची आराधना करीत असत. त्यांनी स्थापन केलेले हे मंदिर यातील स्वयंभू शिवलिंग आजही शंकर महाराजांची साक्ष देत उभे आहे. शंकरगिरी महाराज यांनी या ग्रामात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला प्रसाद म्हणून रोट अर्पण करण्याची प्रथा सुरु केली. पुढे महाशिवरात्रीला या गांवात एक यात्रा सुद्धा सुरु झाली. वैशिष्ट्यपुर्ण अशा या यात्रेत प्रसाद म्हणून एक भला मोठा रोट बनवला जातो. 129 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. परंतु त्या काळात या यात्रेचे स्वरूप अगदीच लहान होते. आजच्यासारखा साडे नऊ क्विंटलचा महारोट सुद्धा नव्हता. रोट अर्थात रोडगा. पश्चिम विदर्भात रोडगे, वांग्याची भाजी, गुळ, तुप असे भोजन भंडा-यात (महाभोजन) करण्याची प्रथा आहे. अनेक लोक रोडग्यांना बिट्ट्या असेही संबोधतात. राजस्थान, म.प्र. या भागात मिळणारी बाटी व बाफळे हे मात्र निराळ्या पद्धतीने बनवले जातात. असाच हा पळशीचा भलामोठा महारोट अर्थात महा रोडगा. रोडगे म्हणजे कणकेचे उंडे (गोळे). दोन-दोन किलोचे असे अनेक उंडे बनवून मग त्यांना एकत्र करून मग एक साडे नऊ क्विंटलचा भला मोठा रोडगा बनवला जातो. या रोडग्यात भरपूर प्रमाणात सुका मेवा आदी टाकले जाते. या रोडग्यासाठीची कणिक ही पाण्याऐवजी दूध व तुपात भिजवली जाते. पुर्वी हा रोडगा सव्वा मणाचा होता. आता हा साडे नऊ क्विंटलचा भिमकाय असा रोडगा आहे. अनेक लोक या यात्रेच्या वेळी रोडग्यासाठी मोठ्या प्रमाणात चिजवस्तू दान करतात. एवढा मोठा रोडगा आता भाजायचा तर त्याला आहार (भाजण्यासाठीली गव-यांचे निखारे असलेली जागा) सुद्धा तेवढाच मोठा लागेल ना ! म्हणून मग साडे पाच फुट खोल व तितकाच रुंद असलेला खड्डा इथे आहे त्यात हा रोडगा मोठ्या कापडावर केळीची पाने बांधून सोडला जातो.
रोडगा खड्ड्यात टाकण्यापूर्वीच तो पूर्णपणे झाल्यावर त्याला सहजरीत्या वर काढता यावे म्हणून त्या खड्ड्यात एक भला मोठा साखळदंड सोडला जातो. हा रोडगा बनवण्यासाठी गावातील अनेक धडधाकट तरुण मंडळी फक्त कटीभागी वस्त्र नेसून अग्रेसर होतात. ते आंघोळी करून या कामाचा श्रीगणेशा करतात. भल्या मोठ्या विस्तवाजवळ असल्याने त्यांना मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागतो त्यासाठी त्यांना रोडगा विधी करतांना थोड्या-थोड्या वेळाने अंगावर पाणी घेऊन यावे लागते. हा रोडगा तयार झाल्यावर त्याला मग पूर्वीच सोडलेल्या साखळ दंडाच्या साहाय्याने बाहेर काढले जाते. शंकरगिरी महाराजांच्या कृपेने आजरोजीपावेतो हा रोडगा कधीही जळाला नाही. रोडगा ज्या वस्त्रात बांधला जातो ते वस्त्र सुद्धा जसेच्या तसेच राहते. हा रोडगा दीर्घकाळ पर्यंत चांगला राहतो. रोडगा तयार झाल्यावर मग वांग्याची भाजी, गूळ, तूप अशा व्यंजनांच्या प्रसादाचे वितरण भाविकांना केले जाते. भाविक मोठ्या श्रद्धेने प्रसाद भक्षण करतात, घरी घेऊन जातात. भगवान शिव व शंकरगिरी महाराज यांच्या कृपेने आपले सर्व चांगले होईल, पीकपाणी वगैरे सर्व चांगले राहील अशी आशा त्यांना असते. यात्रा म्हटली की खेळणी, मनोरंजन साहित्य, खाद्यपदार्थांच्या दुकानांची रेलचेल असते. तसेच ते सर्व इथे सुद्धा असतेच. स्वातंत्र्यपुर्व काळात सुरु झालेली ही परंपरा आजही पळशीकर ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने पाळतात. अनोख्या अशा या महारोटामुळे या ग्रामाची ख्याती दूर-दूर पर्यंत पोहचली आहे. मंदिर परिसर सुद्धा स्वछ असतो. विशेष म्हणजे संस्थान तर्फे मुलींसाठी संस्कार, आत्मसंरक्षण असे दैनंदिन वर्ग सुद्धा घेतले जातात. 23 ऑगस्ट 1935 रोजी शंकरगिरी महाराज यांनी त्यांच्या समाधीचे स्थान निश्चित करून समाधी घेतली. त्यांच्या समाधी नंतर एकाच तासाने त्यांच्या गायीने प्राण सोडले होते. त्या गायीची समाधी सुद्धा इथे आहे. एकदा प्रसादाला दूध कमी पडले असता महाराजांनी याच वांझ गायीच्या पाठीवर हात मारल्यावर गायीने दुध दिले होते व प्रसादाची सोय झाली होती. शंकरगिरी महाराजांनंतर इथे धन्वंतगिरी महाराज व सोमवारपुरी महाराज होऊन गेले. त्यांच्याही समाधी इथे आहे.
पळशी व्यतिरिक्त जिल्ह्यात जळगांव जामोद जवळील भेंडवळ या गावाची अक्षय तृतीयेच्या दिवशी घट मांडणी करून हवामान आणि राजकीय भाकीत करण्याची 400 वर्षांची परंपरा असलेली यात्रा सुद्धा प्रसिद्ध आहे. यात सांगितलेले भाकीत सुद्धा कित्येकदा खरे ठरल्याची प्रचीती आलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी भेंडवळच्या यात्रेत शेतकरी व इतर नागरिकांची मोठी गर्दी असते. जिल्ह्यातील सैलानी, चिखली, सोनाळा येथील यात्रा सुद्धा प्रसिद्ध आहेत. चिखली या तालुकास्थानी चैत्र पौर्णिमेला रेणुका देवीच्या वहनाची यात्रा सुद्धा प्रसिद्द आणि प्राचीन आहे. परंतू बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी येथील महाशिवरात्रीला होणा-या अनोख्या अशा यात्रेची ख्याती मात्र महारोटामुळे दूर दूर पर्यंत पोहचली आहे.