मी कात टाकली...
![]() |
यशवंत टॉवरवरचे घड्याळ |
विविध सौंदर्यीकरण, रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि त्यावर ट्रिगार्डसह लावलेली झाडे, त्या झाडांची कटाई करीत असलेली माणसे हे न्याहाळत मी पुढे गेलो. बस स्टॅन्डसमोर गेलो असता तिथे कवी ना. धो. महानोर यांनी रचलेले हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध "मी रात टाकली मी कात टाकली" हे गीत मोठ्या आवाजात सुरू होते.
पावसाळ्यात रिमझिम पावसात भिजत-भिजत फेरफटका मारणे मला खूप आवडते. अशाच एका निवांत संध्याकाळच्या पावसात भिजत फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. घराजवळचेच सुंदर होत असलेले राजीव गांधी उद्यान अर्थात टॉवर गार्डन, पंचायत समितीच्या त्या यशवंत टॉवरवर मा. ना. आकाश फुंडकर यांनी तातडीने निर्देश देऊन बी.डी.ओ. आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांने लागलेले नवीन घड्याळ, महाराणाप्रताप पुतळा त्या समोरचे सौंदर्यीकरण, रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि त्यावर ट्रिगार्डसह लावलेली झाडे, त्या झाडांची कटाई करीत असलेली माणसे हे न्याहाळत पुढे गेलो. बस स्टॅन्डसमोर गेलो असता तिथे कवी ना. धो. महानोर यांनी रचलेले हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले लता मंगेशकर यांनी गायलेले "मी रात टाकली मी कात टाकली" हे गीत मोठ्या आवाजात सुरू होते. बस स्टॅन्ड मध्ये बससाठी प्रवेश करण्यासाठी जे गेट आहे त्या गेटच्या अगदी समोर एक सायकल स्टोअर आहे. तिथे अजूनही सायकल भाड्याने मिळते. तुर्तास अतिक्रमण हटवल्यामुळे ते सायकल स्टोअर तिथे नाही पण त्या सायकल स्टोअरचे मालक नेहमी मोठ्या आवाजात जुनी गीते लावत. गेल्या काही दिवसात माझे त्या रस्त्याने बरेच वेळा येणे जाणे झाले. त्यामुळे तिथे लागलेली जुनी गीते माझ्या कानावर पडत. त्या दिवशी पावसात हे वरील गीत कानावर पडले. मी परत मागे वळलो नगरपरिषद जवळ झालेले भव्य सभागृह आणि त्याच्या समोरचे सौंदर्यीकरण दृष्टीस पडले, रेल्वे स्थानकाचे झालेले नवीन गेट दिसले. पुढे नटराज गार्डन कडून गेलो नटराज गार्डनचा तर कायापालटच झालेला मला दिसला. तसा तर तो कायापालट आधीच दिसला होता पण यावेळी मी निवांत असल्यामुळे तो परिसर चांगल्यारीतीने बघितला. पुर्वीचे, आम्ही लहानपणी पाहिलेले नटराज गार्डन सुद्धा सुंदरच होते पण मध्यंतरीच्या काळात त्याची अवस्था फार वाईट झाली होती. आज खूपच सुंदर, प्रेक्षणीय, झालेले नटराज गार्डन बघीतले. का कोण जाणे पण तेथील भव्य नटराजाच्या चेहऱ्यावरील भाव मला प्रसन्न असल्यासारखे वाटले. नंतर माझ्या डोळ्यासमोर यापुर्वीच विकसित झालेले नाना-नानी पार्क, छकुली गार्डन, सावरकर उद्यान ही सुंदर उद्याने आली. नवीन सार्वजनिक प्रसाधन गृहे सुद्धा चांगली बनवली गेली आहेत. ती चांगली ठेवण्याची जबाबदारी आता नागरिकांची आहे.
अनेक नव्याने झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांवरून माझी गाडी जात होती. खामगांवात बरेच चांगले बदल झालेले नागरिक बघत आहे. शासकीय यंत्रणेतून तर बदल होतच आहे परंतु रोटरी, लायन्स यासारख्या सामाजिक संस्था सुद्धा खामगावात चांगले कार्य करत आहे. खामगावातील मिशन ओटू ही संस्था सुद्धा वृक्ष लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी मोठा पुढाकार घेत आहे शंभो-शंभो गृपने सुद्धा जनुना तलाव परिसरात अनेक वृक्ष लावली आहेत. तरुणाई फाऊंडेशन सुद्धा उत्कृष्ट कार्य करत आहे. मिशन ओटूचे संस्थापक डॉक्टर के. एम. थानवी यांनी तर त्यांच्या गाडीवरच छोटी पाण्याची टाकी लावली आहे. जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांनी लावलेल्या झाडांना पाणी टाकण्यासाठी ते ही गाडी घेऊन जातात आणि झाडांना पाणी टाकतात. अशा प्रकारचे त्यांचे हे वृक्ष संवर्धनाचे कार्य अनेकांना प्रेरणा देऊन जात आहे. शासनाच्या माध्यमातून खामगांवात विकास होत आहेच पण वर उल्लेखित सामाजिक संस्था तशाच इतरही काही संस्थांच्या माध्यमातून खामगांव शहर हिरवेगार होत आहे. वृक्षांमुळे शहरातील प्रदूषण सुद्धा आटोक्यात आहे. माझे नोकरी निमित्त इतर शहरात गेलेले मित्र आल्यावर खामगांवची हवा अजूनही शुद्ध असल्याचे सांगतात. सोशल मीडियावर खामगांवच्या द्रोणच्या माध्यमातून घेतलेल्या अनेक चित्रफिती आलेल्या आहेत त्यात खामगाव खूपच सुंदर दिसते आहे. मध्यंतरी खामगाव शहरातून गेलेल्या नाल्यांचे सुद्धा सौंदर्यीकरण होणार आहे असे ऐकले आहे. ते जर झाले तर खामगांवच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार आहे. पण नवीन उद्योग खामगांवात यावे तसेच पाणीपुरवठा सुद्धा नियमित व दैनंदिन असावा याचीही नागरिकांना प्रतीक्षा आहे. पाणीपुरवठा दैनंदिन करण्यामध्ये गत काळात अनेक समस्या आल्या होत्या परंतु आता वाढीव पाणीपुरवठा लवकरच होण्याची चिन्हे दिसत आहे.
खामगांव शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे अनेक बदल बघत बघत एव्हाना मी पुनश्च माझ्या घराकडे जात होतो. यशवंत टॉवर आले पुन्हा त्या टॉवरवरच्या घड्याळाने माझी नजर खेचली आणि थोड्या वेळापूर्वी ऐकलेले "मी रात टाकली, मी कात टाकली" हे गीत मला आठवू लागले. शहरात होत असलेल्या अनेक बदल बघून खामगाव शहराने सुद्धा आता कात टाकली असा विचार माझ्या मनात आला आणि देहाने मी मानसिक आनंदाने भिजलेला मी घरी पोहचलो.
Khup khup chhan khamgaon che Paul padate pudhe ase hi mhanata yeil lekh khup chhan lihala ase vatale mi aapale anubhav kathan ekat hoto educational centers hi chalval suru karavi ase mala vatate chotya chotya abhyasika tayar vhayala pahije vel sakali 6 te ratri 9 pin drop noise madhe mag bagha hech je lok tayar hotil te khamgaon la kuthe nevun thevatil bagha
उत्तर द्याहटवा