०८/०३/२०१६

World Womens Day 2016 Special Story on Lady Truck Driver of Bhopal Yogita Raghuvanshi

मै निकली गड्डी लेके....महिला दिन विशेष

परवा एका वृत्त वाहिनीवर एक महिला ट्रक चालवतानाचे दृश्य दिसले आणि आपसूकच माझ्या हातचा रिमोट बाजूला ठेउन दिला.भोपाळ येथील एका ट्रक चालवणा-या महिलेबाबत तो रिपोर्ट होता.त्या महिलेची मुलाखतच होती ती.योगिता रघुवंशी हे त्या महिलेचे नाव. सन 2001 मध्ये पतीच्या निधना नंतर त्यांचाच व्यवसाय पुढे चालवण्याचा निश्चय योगिता यांनी केला.पतीच्या निधना नंतर गर्भगळीत किंवा हताश न होता किंवा आत्महत्येचा विचार मनात न आणता योगिता ह्या पुरुषी समजल्या जाणाऱ्या व्यवसायात उतरल्या.या व्यवसायात उतरण्याचे मुख्य कारण काय? तर मुलाला विदेशात शिकवण्याची इच्छा आणि त्यासाठी कितीही मेहनत करण्याची तयारी. योगिता याना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. या दोघांसाठी त्या सकाळी उठून इतर महिलांप्रमाणे घरची सर्व तयारी करून आपल्या व्यवसायासाठी त्या निघतात.कधी रात्री तर कधी दिवसा असा प्रवास करीत लोकाना माहिती विचारत त्या आपला ट्रक हाकीत असतात.या व्यवसायातील धोक्यांबाबत  विचारले असता त्या म्हणतात कोणी काही केले तर मी त्याला मारण्याची आणि स्वत: मरण्याची तयारी आधीच करून ठेवली आहे.घरून निघताना त्या मुलांना सांगून ठेवतात कि मी येईल किंवा येणार नाही तुम्ही तुमचे कार्य करीत राहायचे,अभ्यास करायचा,नाव कमवायचे.आता पर्यंत त्यांनी जवळ पास 400000 किमी चा प्रवास केला आहे.भारतातातील तामिळनाडू मधील पहिल्या महिला ट्रक चालक याना सुद्धा त्या भेटल्या आहेत.पतीच्या मृत्यनंतर एखादी महिला खचून
 गेली असती,ट्रक चालवला तर लोक काय म्हणतील याचा विचार करीत बसली असती.परंतु योगिता यांनी लोकलाज इ. क्षुल्लक बाबींचा विचार सोडून दिला आणि प्रत्यक्ष कार्यात उडी घेतली आणि यश संपादन केले.

आजच्या महिला दिनी महाराष्ट्रातील तमाम महिला,शेतकरी आणि इतर बांधवांनी योगिता रघुवंशी यांचा आदर्श उरी बालागणे जरुरी वाटत आहे. क्षुल्लक कारणामुळे लोक आत्महत्या करीत आहेत. विद्यार्थी पेपर खराब गेला कि,शेतकरी कर्जाने किंवा नापिकीमुळे आत्महत्या करीत आहेत. तसेच इतरही लोक अल्पशा अपयशामुळे, परिस्थितीमुळे आत्महत्या करीत आहेत आजच्या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सर्वांनी योगिता रघुवंशी यांचा आदर्श ठेवून परिस्थितीशी लढा देण्यास शिकणे जरुरी आहे ‘ जान है ते जहां है ‘. आज अनेकांना योगिता रघुवंशी माहित सुद्धा नसतील परंतु त्यांनी एक महिला सुद्धा पुरुषी व्यवसाय अंगीकारून यशस्वी होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले आहे.भोपाल मध्ये राहून अस्खलित मराठी बोलणा-या योगिता यांना पाहून त्यांचा आत्मविश्वास पाहून असे वाटत होते कि त्या सुद्धा वैमानिक किंवा रेल्वे इंजिन चालक, शिक्षिका किंवा हवाई सुंदरी यांच्या इतक्याच योग्यतेच्या आहेत. योगिता यांनी त्यांची योग्यता सिद्ध करून दाखवली त्यांचे माता पिता व मुले यांना त्यांच्या बद्दल अभिमान आहे.भारतातील महिलांमध्ये आजही राणी लक्ष्मीबाई, हिरकणी, आनंदीबाई गोखले, सावित्रीबाई फुले यांचे गुण आहेत हे योगिता यांनी दाखवून दिले आहे. जगातील इतर महिलापेक्षा आम्ही सुद्धा कमी नाही आहोत हे सुद्धा त्यांनी सिद्ध केले आहे. कोणी काहीही म्हणो योगिता त्यांचे कार्य सुरूच ठेवीत आहे जगाची पर्वा न करता त्या दररोज ‘मै निकली गड्डी लेके’ म्हणत त्यांचे कार्य करण्यात मग्न आहेत. जागतिक महिला दिनी योगिता यांना व त्यांच्या कार्याला अभिवादन ईश्वर त्यांना त्यांच्या व्यवसायात यश देवो व त्यांच्या पासून इतरांना प्रेरणा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा