१४/०४/२०१६

Remembering Dr Babasaheb Ambedkars Second Wife Dr Savita Ambedkar on 125th Birth Anniversary of Dr B R Ambedkar

स्मरण बाबासाहेब आणि माईंचे

      एप्रिल महिना येताच सर्वात पहिले स्मरण होते ते महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे याचे कारण म्हणजे १४ एप्रिल हा त्यांचा जयंतीचा दिवस. तसेच १५ एप्रिल हा सुद्धा त्यांच्या जीवनातील दुसरा एक महत्वपूर्ण दिवस आहे. १५ एप्रिल १९४८ या दिवशी डॉ आंबेडकरांचा पुनर्विवाह झाला होता. थोर पुरुषांची आठवण त्यांनी केलेल्या थोर कार्यांनी आणि समाजाला वेगळी दिशा देणाऱ्या कार्यांनी जनसामान्यांना येत असते. सर्व थोर पुरुषांच्या जीवनात त्यांचे कार्य सफल होण्यासाठी पडद्यामागे मागे राहून झटणारी,अहोरात्र सेवा करणारी माणसे सुद्धा असतात परंतु त्यांचे स्मरण मात्र क्वचितच होत असते. डॉ आंबेडकरांच्या जीवनात एक व्यक्ती अशीच होती ती म्हणजे डॉ शारदा कबीर. डॉ शारदा कबीर या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोरला येथील एका ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या होत्या. त्यांचे वडील हे भारतीय वैद्यकीय संस्थेत निबंधक होते. अनेकांना हे नांव परिचीत नसेल. १९४७ मध्ये जेंव्हा बाबासाहेब आंबेडकर मधुमेहाने ग्रस्त झाले तेंव्हा वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने डॉ शारदा कबीर या डॉ आंबेडकरांच्या जीवनात आल्या. डॉ मालवणकरांनी त्यांचा परिचय बाबासाहेबांशी करून दिला होता. बाबासाहेबांची सेवा करण्यासाठी कुणी तरी कायम त्यांच्या समवेत असावे असे डॉक्टरांचे मत होते त्यामुळे त्यांनी १५ एप्रिल १९४८ मध्ये बाबासाहेबांशी विवाह केला. त्या आता डॉ सविता आंबेडकर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. हा विवाह एक श्रेष्ठ विवाह म्हणता येईल कारण एखादया व्यक्तीशी वयाची पन्नासी ओलांडल्यावर आणि ते सुद्धा तो व्यक्ती आजाराने ग्रस्त झाल्यावर त्याच्याशी विवाह करणे हे कुणी धैर्यवान स्त्रीच करू शकते. कारण हि व्यक्ती सुद्धा तसाच महान, आदर्श आणि दैवी देणगी लाभलेले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर होते. माई बाबासाहेबांच्या अंतिम दिवसांत त्याना त्रास होवू नये म्हणून अनेकाना बाबासाहेबाना भेटण्यास मज्जाव करीत असत. त्यांच्या अशा वागण्याने त्या जन-मानसांत माई एक हेकेखोर बाई आहे, मनमानी बाई आहे अशी भावना दृढ झाली होती. परंतु माईंची बाबासाहेबांवर निस्सीम भक्ती त्यामुळे त्याना लोकांत त्यांची स्वत:ची प्रतिमा खराब होणे मंजूर होते परंतु बाबासाहेबांना त्रास होणे मंजूर नव्हते. त्या घटना निर्मितीच्या आणि बुद्ध धर्म स्वीकारण्याच्या दोन्ही महत्वपूर्ण घटनांच्या एकमेव अशा सर्वात जवळच्या साक्षीदार ठरल्या. आज बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील ज्या काही घटना ठाऊक आहेत त्यांचे स्मरण झाले. या घटनांमध्ये त्यांचा द्वितीय विवाह सुद्धा आठवला आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या अंतिम दिवसांत त्यांची अहर्निश सेवा करणा-या माईंची आठवण आली. प्रथम पत्नी रमाबाई आणि द्वितीय माई या दोघी स्त्रिया या महामानवाच्या जीवनात आल्या आणि त्यासुद्धा कायम संस्मरणीय झाल्या. भारतरत्न डॉ भीमराव रामजी आंबेडकर हे नांव गेल्या अनेक वर्षांपासून भारतीयांच्या मनात घर करून आहे, महू येथे जन्मलेल्या या गरीब मुलाने मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर आपले नांव त्रिखंडात गाजवले.ग्रंथालयात पावाचे तुकडे खात खात आणि पाणी पीत तासंनतास अभ्यास करून अनेकांना जीवनात ‘शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश देणा-या बाबासाहेबांची जयंती ‘युनो’  सुद्धा साजरी करीत आहे. हा आपल्या भारताचा गौरवच आहे त्यामुळेच आज बाबासाहेब आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि माई आंबेडकर या सर्वांचे स्मरण झाले.


      बाबासाहेबांच्या पावन स्मृतीस त्यांच्या १२५ व्या जयंती दिनी विनम्र अभिवादन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा