११/०४/२०१६

Maharashtra Government Frequently changing rules and regulation in primary,higher primary and high school. Due to Lack of long term policy and vision its affecting on the quality education.

क्या लगाई मच-मच?
      सुसूत्रता नसलेले,दुरदृष्टीहीन असे निर्णय लादले गेले किंवा एकापाठोपाठ एक व पूर्वीच्या निर्णयांशी सुसंबद्ध नसलेले नियम आणले गेले कि ज्यामुळे कार्यप्रणाली सोयीस्कर न राहता डोक्याला तापदायक ठरते आणि त्रास होतो तेंव्हा हिंदी भाषेत क्या लगाई मच-मच? असे म्हणतात.सध्या शिक्षण क्षेत्र हे विविध प्रयोगांचे क्षेत्र झालेले दिसून येत आहे.दिवस निघाला कि समोर काय ताट वाढून ठेवले आहे?याची चिंता शिक्षकांना असते.रोज काही ना काही नवीन पत्रक येते.इंग्रजीत एक म्हण आहे “Too Many Cook Spoil The Foodअशीच काहीशी स्थिती शिक्षण क्षेत्राची झालेली दुसून येत आहे.लोकप्रतीनिधी,तथाकथित सुज्ञ,तज्ञ लोकांच्या समित्या,सचिव,कार्यालयीन कर्मचारी यांनी शिक्षण क्षेत्राची अगदी “खिचडी” करून टाकली आहे.सर्व काही सुरळीतपणे सुरु असते व अचानक एखादे पत्रक येवून धडकते.आता तर “व्हॉट्स अॅप” आहेच.घ्या निर्णय आणि द्या “फॉरवर्ड” करून.एकLong Term Policy नाही.बुलढाणा जिल्ह्यात असेच एक पत्रक 4/5 दिवसापुर्वी येऊन धडकले.काय तर म्हणे “व्दितीय सत्र परीक्षा रद्द करा आणि नवीन चाचणी आणि मुल्यमापन परीक्षा घ्या व शाळा ३० एप्रिल पर्यंत सुरु ठेवा”.अचानकपणे हे पत्रक आल्याने सर्व शाळांची तारांबळ उडाली.काहींची तर व्दितीय सत्र परीक्षा झाली होती मग आता मुले शाळेत कशी येतील?नाही आली तर “आर टी ई” नुसार पुन्हा हजेरीचा प्रश्न आहेच?या पत्रकामुळे सर्व शाळांना मोठी कसरत करावी लागणार आहे.टीन टपरांच्या शाळांत,पंखा काय वीज नसतांना एकदा बसून पहा म्हणावे.शिक्षक तर बसतोच पण अहो लहान मुलांचा तर विचार करा.सध्याच तापमान ४० आहे.३० एप्रिल पर्यंत किती उन असेल ते याचा काही विचार !.शेतक-यानंतर दुसरा पापभिरू प्राणी म्हणजे शिक्षक.काहीहि आदेश आला,कसाही असला त्यात चुकाही असल्या तो आदेश दुरदृष्टीहीन असला तरी शिक्षक मूग गिळून आपला कामकाजाला लागतो.समाजाला जरी शिक्षकाची नोकरी मोठी सुखदायी वाटत असली तरी ती आता तशी राहिली नाही.मुले अतिशय व्रात्य झालेली आहेत.अशा मुलांना शिक्षा करता येत नाही.डोळे सुद्धा वटारून पाहता येत नाही.मग ती मुले बसत आहेत पालक आणि शिक्षकाच्या डोक्यावर आणि वाटत आहेत मिरे.आता जर दहावीच्या परीक्षा रद्द केल्या तर मग पहा मुले अजून बिघडायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रगत महाराष्ट्र होण्यासाठी पायाभूत चाचण्यांचे पेपर शाळाच फोडत असल्याचे ऐकिवात आहे.खिचडी,शिष्यवृत्ती,प्रशिक्षणे,कागदोपत्री कामे अशा कार्यामुळे शिक्षकाचे जे मुख्य विद्यादानाचे कार्य आहे तेच शिक्षक योग्यरीत्या करू शकत नाही.विना अनुदानित शिक्षक बिचारा उपाशी पोटी कसा शिकवतो हे वातानुकुलीत कक्षांमध्ये “आर ओ” पाण्याचे घोट घेत चर्चा करीत बसणा-यांना काय ठावूक?शाळांचा सर्वे करा तुमच्या शिक्षकांना जो देशाचे भावी आधारस्तंभ निर्माण करीत आहे त्यांना जरा भेटा,त्यांची दु:खे जाणून घ्या.नवीन धोरणे तर निव्वळ शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याची धोरणे वाटत आहेत.शासनाला गरिबांसाठीच्या शाळा बंद करून गल्लोगल्ली उघडलेल्या इंग्रजी शाळा फक्त सुरु ठेवायच्या आहेत काय?नुसते पोपटपंची करणारे,आधीच सांगितलेल्या “पोर्शन” वर आधारीत पेपर घेऊन सर्वच विद्यार्थी ९० टक्के  पेक्षा जास्त गुण देतात. मग आपला बाबू म्हणजे लई हुशार झाला असा भ्रम या इंग्रजी शाळा पालकांमध्ये निर्माण करीत आहेत.इंग्रजी शाळा आणि त्यातील शिक्षण हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.जे आपल्या देशाला अभियंते,चिकित्सक,तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ देणार आहे नेमके तेच  क्षेत्र उपेक्षित,दुर्लक्षित होत आहे.निव्वळ दररोज विविध पत्रके,विविध बदल करून शिक्षकांच्या नाकी नऊ आणत आहे.गरीब,कार्यबाहुल्याने पिचलेला शिक्षक मात्र शासनाला क्या लगाई मच-मच?असेही म्हणू शकत नाही आहे.

ता.क.- लेख लिहिणे झाल्यावर ई लर्नीग पद्धतीत बदल केल्याची बातमी येवून धडकली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा