२८/०५/२०१६

Nation Remembering Vinayak Damodar Savarkar on his 133th Birth Anniversary

...प्राण तळमळला
वंदनीय स्वातंत्र्यवीर सावरकर
     आपणास सविनय कोटी कोटी प्रणाम.
तुमची आज १३३ वी जयंती.परंतु तुमचे स्मरण करणारे आता फारच थोडके आहेत किंवा असूनही हेतुपुरस्सर तुमचे स्मरण टाळतात. कारण तुम्ही जाज्वल्य देशाभिमानी. तुम्ही रत्नागिरीत स्थानबद्ध  असतांना अस्पृश्यता निवारणासाठी किती झटले परंतु आज ते किती जणांना माहित आहे? हे हिंदू नृपती प्रभो शिवाजी राजा” अशी शिवाजी महाराजांची आरती लिहिणारे तुम्ही त्यांना प्रेरणास्थान मानून तुमच्या जीवनात त्यांचेच अनुसरण केले आहे. मग ती स्वतंत्रतेची शपथ असो व आग्र्याच्या सुटकेप्रमाणे तुम्ही फिरंग्यांच्या जहाजातून घेतलेली ती जगप्रसिद्ध उडी असो. तुमची हेटाळणी करणारे तुमच्या सुटका कमी करण्याच्या पत्रांचा वारंवार माफी पत्रे लिहिली म्हणून सतत उल्लेख करीत असतात. परंतु शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेब आणि अफझल खान यांना घाबरण्याचे नाटक केलेच होते ना ! म्हणून काय ते खरच घाबरले होते? सावरकर तुम्ही कळण्यास या देशातील कधीही जात न विसरणा-या जनतेला कैक जन्म घ्यावे लागतील. तुम्ही विविध गुण संपन्न तुमच्या विषयी लिहिणे म्हणजे मोठे दिव्यच कारण तुमच्या समोर आम्ही म्हणजे अगदीच कस्पट. तुम्ही स्वातंत्र्यवीर, तुम्ही मराठी भाषाप्रभू, तुम्ही क्रांतीकारी अग्रणी, तुम्ही प्रखर बुद्धीमान, तुम्ही समाज सुधारक, तुम्ही कवी, तुम्ही लेखक. कोणता असा गुण आहे कि जो तुमच्या जवळ नव्हता? काव्य आणि लिखाणाचा वारसा तुम्हाला मातृ आणि पितृ दोन्ही घरापासून मिळाला तुम्ही 9 वर्षांचे असताना तुमच्या मातेचा मृत्यु झाला. पित्याला प्लेग झाला असता तुम्ही त्यांची सेवा केली. लहानपणापासून हाल अपेष्टेतच तुमचे दिवस व्यतीत झाले ते अगदी देहत्याग करेतो. काळ्या पाण्याच्या शिक्षेत तुम्ही जेवढ्या यातना भोगल्या तेवढ्या यातना नंतर स्वातंत्र्याची फळे चाखणा-या इतर कोणत्याही नेत्याने भोगल्या नाहीत. त्यांनी भोगले सुख, सत्ता.आर.ओ.वॉटर चा शोध लागला नव्हता म्हणून सिमल्याचे ताजे पाणी पिण्यास उपलब्ध असे अश्या आणि इतर थाटात त्यांनी सत्ता भोगली. तुमचे मात्र साधे तैलचित्र संसदेत लागण्यास 40-50 वर्षे लागली. सर्वात मोठे वाईट तर त्या प्रसंगाचे वाटते कि जेंव्हा भारत स्वतंत्र झाला आणि कुणालाही तुमची आठवण झाली नाही. तत्कालीन नेत्यांनी तुम्हाला बोलावण्याचे हेतुपुरस्सरपणे टाळले आणि तुम्ही स्वत:च्या राहत्या घरी तिरंगा फडकवला. आज त्याच तत्कालीन नेत्यांची पुढची पिढी तुम्हाला गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष ठरवले असतांनाही पुन्हा तुम्ही त्या कटात सामील असल्याचे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीतच आहे. “गांधी आमचे सावरकर तुमचे” असे उद्गार भर संसदेत काढत आहे. त्यांना साधे हे सुद्धा कळत नाही की गांधी असो वा सावरकर ते सर्व जनतेचे आहेत. सावरकर कुठे तुमची पिढी कि जी शिष्यवृत्तीच्या आधारावर विदेशात गेली तुम्ही आंबेडकर, मदनलाल धिंग्रा, सेनापती बापट अशा बुद्धिमान लोकांबद्दल आजची तथाकथित बुद्धिमान आणि ऐशोआराम करण्यासाठी विदेशात जाणारी तसेच सत्तेसाठी आजही जातीभेद वाढवणारी किंवा मानणारी उच्चविद्याविभूषित पिढी बोलते तेंव्हा संताप-संताप होतो. परंतु आजच्या लोकशाही शासनात त्यांचे विरुद्ध काहीही करता येत नाही. काही करण्यासाठी आहे फक्त लेखणी. आज महाराष्ट्रात टिळक, आगरकर आणि सावरकर यांचा जणू विसरच पडला आहे मग सरकार कोणत्या का पक्षाचे असो ना. सावरकर तुम्हाला मात्र आजची हि परिस्थिती पाहून स्वर्गात फार यातना होत असतील. भारतरत्न या पुरस्काराचे तुम्ही खरे मानकरी एवढे कि तुम्हाला जर भारतरत्न दिले तर या पुरस्काराची शोभा वाढावी. परंतु जातीभेद, व्देष आणि गालीच्छ राजकारण यांच्या जोखडातून हा देश कधी मुक्त होणार नाही असेच नाईलाजाने वाटत आहे. आज जाती भेद इतका वाढला आहे कि अमुक एक जातीचा म्हणून असे केले, किंवा अमक्या बद्दल लिहिले असे तूच्छ विचार लोक करतात. तुम्ही विलायतेत असतांना तुम्हाला मातृभूमीची तीव्र आठवण आली आणि तुमचा प्राण तळमळला होता. आज तुमच्या तीव्र उपेक्षेने आमचा प्राण तळमळला आहे.

२६/०५/२०१६

Marathi Movie 'Sairat' is hit movie of 2016. Article describes meaning of marathi word 'Sairat' by refering Samarth Ramdas literature

...मना कल्पना धीट ‘सैराट’ धावे
सैराट सिनेमा प्रदर्शित झाला. माध्यमांवर खूप प्रसिद्धी मिळाली आणि तरुणाईने चित्रपटगृहांना पूर्वीचे दिवस आल्याची ‘सैराट’ चर्चा सुरु झाली. अबाल वृद्धांनी चित्रपट गृहाकडे धाव घेतली. चित्रपट पहिला नसतांना त्याच्या बद्दल कसे लिहिणार? मग चित्रपट नाही परंतु त्याच्या शीर्षका विषयी लिहिण्याची ईच्छा झाली.परंतु मराठी सिनेमा असला तरी “What is ‘Sairat’(सैराट)? असे तरुण इंग्रजीत विचारू लागले. मला सुद्धा “सैराट” म्हणजे काय? याची उत्कंठा लागली.प्रेमकथा असलेला हा चित्रपट पाहून आलेल्यांना सुद्धा “सैराट” शब्दाचा अर्थ नीट सांगता येईना.नागराज मंजुलेंना भर भक्कम फायदा करून देणा-या या सिनेमापेक्षा त्याच्या नावाचा अर्थ समजत नव्हता त्यामुळे चलबिचल सुरु होती.एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला ती मिळवण्याची तीव्र इच्छा असली कि ती मिळतेच.नागराज मंजुलेंच्या आधी फार पूर्वी ‘सैराट’ हा शब्द वापरला गेला आहे. आणि ते वापरणारे समर्थ रामदास स्वामी यांचेशिवाय अजून कोण असणार?समर्थांची शिकवण आजही चारशे वर्षानंतर उपयोगी पडेल अशी आहे. आणि मग “सैराट” शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी समर्थच आजच्या “समाज माध्यमांच्या” रूपातून अर्थ सांगण्यास धावून आले. रामदास स्वामींचे ३ श्लोक “व्हॉटस् अॅप” वर भाच्याने पाठवले. समर्थांचा “सैराट” हा शब्द तिन्ही श्लोकात होता.
क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ।।
मना कल्पना धीट “सैराट” धावे ।
त्या मानवा देव कैसेनी पावे ।।
जे लोक काहीहि न करता मनाचे वारू, कल्पनांचे घोडे सैराट सोडतात त्यांना देव कसा बरे भेटेल ? असा या वरील श्लोकाचा अर्थ. जसा श्लोक वाचला तसा सैराट म्हणजे अनियंत्रित, सुटलेले, निसटलेले  मोकाट जनावर असा काहीसा अर्थ आहे हे ध्यानात आले. आणखी पुढे दुस-या श्लोकात  समर्थ म्हणतात
धीट “सैराट” मोकाट । चाट चावट वाजट
थोट उद्धट लंपट । बटवाल कुबुद्धी ।।
येथे सुद्धा सैराट म्हणजे भीड भाड न बाळगणारा म्हणजेच मोकाट अर्थात स्थळ काळ कोणते आहे याचा काहीही एक विचार न करता वागणारा म्हणजेच कुबुद्धीचा व्यक्ती असा अर्थ दिसून येतो.
      या सिनेमातून कुणी काहीही बोध घेवो. परंतु ज्याला समाजात विवेकाने वागायचे आहे व वैराग्य प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याने कधीही चौखूर उधळलेल्या गुराप्रमाणे मोकाट, सैराट होवू नये.
परी ते होवू नये मोकाट । नष्ट भ्रष्ट आणि चाट । सीमाच नाही “सैराट” ।
याप्रमाणे समर्थांनी सांगून ठेवले आहे. या सिनेमातून नवीन तरुण काय बोध घेतील देव जाणे. सिनेमा केवळ सिनेमा म्हणून पहा.त्याच्यातील चांगले ते घ्या आपल्या घरी सुद्धा आपल्यावर प्रेम करणारे आई-वडील आणि इतर नातेवाईक आहेत याचेसुद्धा भान ठेवा. राजकारणा पासून ते स्वयंपाक कसा करावा, आणि स्वच्छता कशी राखावी इ. सर्वच आपल्यासाठी सांगून ‘दासबोध”,“आत्माराम” असा पुस्तकरूपी ठेवा ठेवून गेलेल्या रामदास स्वामींच्या ग्रंथांचे वाचन तरुणाईने केले तरी आपणास “कसे आचरण करावे ?” हे समजेल आणि तरुणांनी जर “वाचले तरच ते वाचणार आहेत” आपल्या भारतातील संत आणि त्यांचे साहित्य तसेच आपली संस्कृती याचा अभ्यास करण्यास विदेशी लोक येतात तेंव्हा आपणास सुद्धा त्याचे ज्ञान हवेच. तरुणांनी असे ज्ञान मिळवले तर आजचे तरुण हे निव्वळ “सैराट” झालेले तरुण नाही आहेत हे समाजाला कळेल.

( आधार : www.dasbodh.com)

१९/०५/२०१६

Mubarak Begum, who sang the evergreen song “Kabhi tanhaiyon mein yun hamari yaad ayegi,” from the 1961 movie “Hamari Yaad Aayegi”

...हमारी याद आयेगी?
लहानपणी रेडीओ खूप ऐकला आहे.काही बोटावर मोजता येईल इतक्याच घरी टीव्ही होता.मोठा 50-60 फुटाचा अँन्टिना आणि   ब-हाणपूर केंद्र.चित्र काही बरोबर दिसे ना. खूपच खराब दिसत असले कि अँन्टिना फिरवण्याचे उपद्व्याप होत असत. बहुतांश लोक मात्र बातम्या आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमा करिता या रेडीओवरच निर्भर होते.वृत्त,गाणी,कृषी,हवामान याबाबतच्या इत्यंभूत माहितीसाठी रेडीओ म्हणजे “बहुत जनांचा आधारू” होता.याच रेडीओवर तेव्हा ऐकलेली गाणी आजही आठवतात सिलोन केंद्र जे आता मरणासन्न अवस्थेत आहे त्यावरील कार्यक्रम, दुपारी जळगाव केंद्रावरील ‘आपली आवड”,रात्री “बिनाका” आणि “फौजी भाईयोके लिये” असलेला “जयमाला” असे सगळे– सगळे आजही स्मरणात आहे.याच रेडीओमुळे लता,किशोर,रफी,आशा आणि इतर अनेक गायक, संगीतकार यांची नावे कळली. मराठी मालिका आणि चित्रपटातील  नामांकित कलाकार रमेश भाटकर यांचे वडील स्नेहल भाटकर संगीतकार होते हे ज्ञान रेडिओ मुळेच.सकाळी जळगाव केंद्रावर प्रसारीत होणा-या “आराधना” या भक्तिगीतांच्या कार्यक्रमामुळे अनेक अभंग परिचित आणि पाठ सुद्धा झाले.“दोगाना” म्हणजे “डयूएट” याचा उलगडा रेडीओनेच करून दिला. तसेच एका गुणी परंतु उपेक्षित गायिकेचे नांव सुद्धा या रेडीओनेच ज्ञात करून दिले ते म्हणजे “मुबारक बेगम”.“ऑल इंडिया रेडीओ” येथे मुबारक बेगम यांच्या कारकिर्दीची एक संगीत कलाकार म्हणून सुरुवात झाली होती.मुबारक बेगमनी गायलेली गाणी जरी सुप्रसिद्ध झाली नसतील किंवा रसिकांना परिचित नसतील तरी जी काही गाणी गायली ती मनापासून गायली आणि रसिकांच्या आजही स्मरणात आहेत.स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले “कभी तनहाईयोमे युं हमारी याद आयेगी” आणि शंकर–जयकिशनचे  “मुझको अपने गले लगालो” ही दोन गाणी म्हणजे मुबारक बेगमची सर्वात जास्त गाजलेली गाणी.जरी जास्त गाणी गायली नसतील किंवा प्रसिद्ध गाणी कमी दिली असतील तरी हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मुबारक बेगमला वगळता येवू शकत नाही.पूर्वी सर्वच लोक जे काही कार्य करीत मनापासून करीत असत.पैसे तर मिळत परंतु निव्वळ पैस्यासाठी म्हणून काम होत नसे.राज कपूरने सतत कबीराचे दोहे गुणगुणणा-या कवी शैलेन्द्रला स्वत:च्या सिनेमासाठी ऑफर दिली असता “मै पैसोके लिये नही लिखता” असे म्हणत फिल्मी गाणी लिहिण्यास राज कपूरला प्रथम नकार दिला होता.मुबारक बेगम सुद्धा त्याच पठडीतल्या.आज वन रूम किचन मध्ये मुंबईमधील जोगेश्वरीत राहत असलेल्या मुबारक बेगम यांची प्रकृती आता खालावली आहे.निव्वळ पैस्यासाठी म्हणून काम केले असते किंवा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी समव्यवसायीकांवर गळेकापू कुरघोड्या केल्या असत्या तर कदाचित त्यांच्या जवळ सुद्धा आज बक्कळ पैसा असता.मुलगा खाजगी वाहनचालक असलेल्या मुबारक बेगम यांना सरकारनी २०११ पासून पेन्शन लागू केली आहे.काही सज्जन लोकांनी त्यांना वर्गणी जमा करून पैसे उपलब्ध करून दिले आहेत.परंतु आश्चर्य वाटते ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या निष्ठुरतेचे,आपल्याच व्यवसायातील एक व्यक्ती इतकी विपन्नावस्थेत आहे तरी तिच्याकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील कुणीही फिरकले नाही.इतर चाकरमाने किंवा व्यवसायिक त्यांच्या व्यवसायातील मित्राला काही क्षती पोहचली तर आपण पाहतो कि सर्व जमा होऊन त्याला आणि त्याच्या परिवाराला मदत करतात.हिंदी चित्रपटसृष्टी मात्र यास अपवाद आहे.एखाद्या कलाकाराच्या प्रसिद्धीचा सूर्य एकदा का अस्ताकडे झुकू लागला कि ‘बॉलीवूड’ मध्ये रुपांतरीत झालेली हिंदी चित्रपटसृष्टी त्या कलाकाराकडे पाठ फिरवते. कारकिर्दीला उतरती कळा लागली की एकेकाळच्या रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या कलाकाराकडे हिंदी चित्रपटसृष्टी ढुंकून सुद्धा पाहात नाही.ललिता पवार,विनोदवीर मेहमूद,परवीन बाबी,मनोरुग्ण झालेला व हयात असलेला राजकिरण आणि आता आजाराने त्रस्त असलेल्या मुबारक बेगम असे अनेक कलाकर त्यांच्या अंतिम दिवसात एकलकोंडे झाले.त्यांच्याकडे कुणीही फिरकले सुद्धा नाही.स्वत: गायलेल्या “मुझको अपने गले लगालो” प्रमाणे कुणीतरी आपल्याला आपुलकीने येऊन भेटावे गळाभेट घ्यावी असे मुबारक बेगम यांना कदाचित वाटत असेल.रसिकांना मात्र नेहमीच एकटेपणात मुबारक बेगम यांच्या आर्त स्वरातील “कभी तनहाईयोमे युं हमारी याद आयेगी” प्रमाणे त्यांची आठवण कायम राहील.

१३/०५/२०१६

The controversy over Prime Minister Narendra Modi's educational qualifications continues to brew with the Aam Aadmi Party

...आता काय विद्यापीठ बोगस आहे म्हणता?

पंतप्रधानाच्या पदवी वरून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी गदारोळ उठवले.आपल्या देशात जे करायचे कार्य आहे ते सोडून देऊन जनतेचे लक्ष भलतीकडे वळविण्यात राजकारणी लोक मोठे निष्णात आहे.आता मुख्यमंत्री म्हटले तर त्यांनी प्रथम त्यांच्या राज्याच्या कारभाराकडे “प्रायॉरिटी बेस” वर लक्ष देणे जरुरी आहे. ते जर निवडणुकींच्या वेळेस जसे मुद्दे उकरून काढतात तसे मुद्दे आता उकरून काढत असतील तर ते योग्य नव्हेच. “पंतप्रधानांची पदवी बोगस आहे” असा आरोप झाला.काल विद्यापीठाने स्पष्ट केले कि “पदवी बोगस नाही आहे”.असो मुळात मुद्दा हा आहे कि पदवी वैध असो अथवा अवैध हुशारी महत्वाची आहे.अनेक पदवीधर सद्यस्थितीत असे आहेत कि त्याना साधे अर्ज सुद्धा भरता येत नाही ते सुद्धा त्यांची पदवी वैध असतांना. “नॉलेज अँड वीसडम” या नावाचा एक पाठ काही वर्षांपूर्वी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होता. तो पूर्ण पाठ काही स्मरणात नाही परंतु त्या पाठाचा मतितार्थ हा होता कि, “ज्ञान आणि बुद्धिमत्ता” यातील ज्ञान हे मिळवावे लागते आणि बुद्धिमत्ता हि जात्याच अंगी असते. बुद्धिमान माणूस हा कोणतीही पदवी अथवा शिक्षण नसतांना सुद्धा त्याची प्रतिभा सिद्ध करून दाखवतो.पदवी शिक्षण नसतांना सुद्धा अनेक लोकांनी त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या हुशारीचा नमुना जगापुढे ठेवला आहे. आईनस्टाइन, जुने अनेक वैज्ञानिक, राजकारणी हे कुठे उच्चविद्याविभूषित होते हो ? अहो आपल्या खानदेशच्या बहिणाबाई चौधरी यांनी तर शिक्षणाचा  का ढ नसतांना सुद्धा त्यांनी सुंदर कविता लिहिल्या आणि त्या शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सुद्धा समाविष्ट झाल्या. तसेच जुने सातवी पास विद्यार्थी शिक्षक होत आणि त्यांचे इंग्रजी आजच्या इंग्रजी साहित्य आभ्यासणा-या विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा चांगले असे. अनेक व्यक्तिनी खूप मोठी शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा मोठे मोठे कार्य करून दाखवले आहे. मा. पंतप्रधान हे जनतेने निर्वाचित करून दिलेले आहेत. आणि मुळात आपल्या लोकशाही नुसार राजकारणात येण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रतेचा निकष दिलेला नाही.स्वातंत्र्यानंतर अनेक राजकारण्यांनी जे कि अशिक्षित होते तरी सुद्धा त्यांच्या मतदारसंघात त्यांनी विकासकामे केलेली आहेत, सकारात्मक राजकारण केले आहे. याचा अर्थ हा नाही कि राजकारण्याना शैक्षणिक पात्रता नसावी.येथे हे सांगणे अभिप्रेत आहे कि आपल्या राज्यासमोर अनेक समस्या असताना त्यांचे निराकरण करण्याऐवजी आपण पंतप्रधानाच्या पदवीचा मुद्दा उचलून का धरता? आपण  उच्चविद्याविभूषित आहात आपल्या कडून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. आपणास जनतेने कौल दिलेला आहे तेंव्हा आपण आपल्या राज्याचा विकासाला प्रथम प्राधान्य द्यावे. पतंप्रधान देशासाठी झटत आहे. ते देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत त्यांच्या विषयी गरळ ओकून तुम्ही तुमची उंची कमी करत आहात.आपल्या व आपल्यासारख्या इतर अनेकांनी नाहक निर्माण केलेया अनावश्यक मुद्द्यांमुळे सरकारी कामात व्यतय निर्माण होतो. असे असताना आपल्या सारख्या लोकांनी उचललेले मुद्दे पुढे न्यायप्रविष्ट होतात आणि आधीच विलंबित होत असलेलेली न्यायालयांनी प्रकरणे आपल्या सारख्यांनी दाखल केलेल्या मुद्द्यांमुळे अजून विलंबित होत राहतात. यापूर्वी आपण विद्यमान केंद्रीय वाहतूक मंत्री यांच्या विरुद्ध सुद्धा आरोप केले होते आणि त्यांनी केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यावर आपणास माघार घ्यावी लागली होती.काल सुद्धा विद्यापीठाने मा.पंतप्रधानाची पदवी वैध असल्याचा निर्वाळा दिला. आता तुम्ही काय विद्यापीठच बोगस आहे असे म्हणणार आहात काय ?    

०९/०५/२०१६

...ना मुंह छुपाके जियो
      विदर्भ म्हटला कि प्रचंड ऊन,अंगाची लाही लाही होऊन जाते.आताशा विदर्भच नव्हे तर ग्लोबल वॉर्मिंगचां तडाखा सर्व जगाला बसत आहे.या कडक ऊनापासून बचावासाठी पूर्वी माणसे डोक्याला मोठा रुमाल बांधत असत.बहुतांश बायका “हाउस वाईव्ह्स” असल्यामुळे घराबाहेर पडतच नसत आणि पडल्या तर डोक्यावर पदर अथवा ओढणी घेत.नाहीतर मग स्त्रिया पुरुष दोघेही गळ्याशी गाठ बांधलेला हातरुमाल डोक्यावर दोघेही बांधत असत.काही वर्षांपासून मोठे रुमाल , “स्टोल” आले आणि मग ते पूर्ण चेहरा झाकून बांधण्याची “फॅशन” आली. उन्हाळ्यात बहुतेक सर्वच फक्त डोळे तेवढे उघडे राहतील आणि बाकी डोके चेहरा झाकलेला राहील अशा अवतारात उन्हाळ्यातच नव्हे तर इतर ॠतुंमध्ये सुद्धा बाहेर पडू लागले.चहेरा झाकून बाहेर निघणा-यांमध्ये तरुण मुलींचे प्रमाण जास्त.काही प्रमाणात प्रौढ स्त्रिया व माणसे सुद्धा असे संपूर्ण चहेरा झाकून निघतात.आमचे मित्र गजानन अंबुस्कर एकदा राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करीत होते.एका स्थानकावर एक प्रौढा आणि तिच्या सोबत एक तरुणी अर्थात स्कार्फने चहेरा झाकलेली.अशा दोघी बसमध्ये येऊन बसल्या.बस मध्ये बसल्यावर प्रौढा त्या तरुणीला “स्कार्फ काढ आता उन नाही आहे” असे म्हणाली. “नाही” इति तरुणी.यावर प्रौढा म्हणाली “अग बदमाश, गैरकृत्ये करणारे लोक असे चहेरा लपवत असतात, चांगली माणसे नव्हे. आता काढ पाहू स्कार्फ” तेंव्हा तरुणीने स्कार्फ काढला.हा किस्सा गजूने मला सांगितल्यावर त्या प्रौढ बाईने किती सोप्या शब्दात चहेरा न झाकण्याचे कारण सांगितले याचे कौतुक वाटले.(आज काल अर्थाचा अनर्थ करण्याची पद्धत फार आहे. चहेरा झाकून घेणारे सर्वच बदमाश, गैरकृत्ये    करणारे असा येथे अर्थ घेऊ नये हि नम्र विनंती) “उपमा कालिदासस्य्” अशी संस्कृत मध्ये म्हण आहे. अर्थात उपमा द्यावी तर महाकवी कालिदासासारखी.कालिदासाचा उपमा देण्यात हातखंडा होता.त्या प्रौढ बाईने सुद्धा चहेरा सतत झाकून ठेवणा-यांना बदमाशांची उपमा सहजच देऊन टाकली.मान्य आहे उनापासून संरक्षण केले पाहिजे परंतु जिथे उन नाही तिथेहि बरेच जण तोंड लपवून असतात.हल्ली तर सर्वच  ॠतुंमध्ये चहेरा झाकलेला असतो. चहेरा झाकलेला व्यक्ती अपहरण, मारहाण, अपघात अशा संकटात कधी सापडला तर जवळून जाणारा परिचित अथवा नातेवाईक सुद्धा थांबणार नाही कारण कळतच नाही कोण आहे.चहेरा सतत झाकून ठेवण्याचा हा एक तोटा सुद्धा ध्यानात घ्यावयास हवा.काही लोक म्हणतील की उन्हाळा सोडून इतर ॠतुंमध्ये आम्ही चहेरा झाकतो कारण प्रदूषणापासून बचाव होतो.परंतु जर प्रदूषणापासून वाचायचे असेल तर मग घरी आल्यावर आपण आपला चहेरा स्वच्छ धुवून घेऊ शकतो ना.उन्हाळ्यात आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे हे निर्विवाद सत्य आहे.“सर सलामत तो पगडी पचास” परंतु नेहमीच चहेरा झाकून नका ठेवू.तुमच्यावर वर उल्लेखल्या प्रमाणे काही वाईट प्रसंग आला तर तुम्ही सहज ओळखले गेले पाहिजे.”लोकांची नजर चांगली नसते” असेही चहेरा झाकण्याचे कारण सांगितले जाते.परंतु चहेरा झाकून घेऊन गैरफायदा घेणारे सुद्धा आहेत.लोकशाहीनुसार आपण पहेरावा बाबत स्वतंत्र आहोत कुणालाही या लेखातून दोष द्यावयाचा नाही.आपल्या प्रकृतीची काळजी सर्वांनी घेणे चांगलेच आहे.उनापासून बचाव अवश्य व्हावा परंतु जिथे आवश्यक नसेल तिथे आपला स्कार्फ काढून टाकावा.त्या प्रौढ स्त्रीने सांगितल्याप्रमाणे आपण चांगले लोक आहोत आपण का तोंड लपवावे ? आपणास ऊन, फॅशन, आपली स्वत:ची काळजी या सर्वातून सुवर्णमध्य काढायचा आहे.गैर प्रकार,गैर कृत्ये  करण्या-यांप्रमाणे आपण आपला चहेरा सतत का झाकावा? उन असो,वारा असो,पाउस असो या सर्वाना सोसत तसेच जीवनातील दुख:ना सामोरे जात “ना मुंह छुपाके जियो और ना सर झुकाके जियो ” असे जगले पाहिजे.