१२/०६/२०१६

'Modi Doctrine': Prime Minister's Vision Gets A New Name In Washington

पुनश्च “नरेंद्र”.....A Modi Doctrine  
11 सप्टेंबर १८९३ स्थळ विश्व धर्म परिषद शिकागो अमेरिका.वक्ता “नरेंद्र” त्यांच्या “बंधू आणि भगिनींनो” अशा भाषणाच्या सुरुवातीने सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. त्यानंतर  विश्वात भारताचा नावलौकिक आणि आदर वाढला.भारत हा देश सर्व धर्मांना सामावून घेणारा एकमेव देश आहे हे,सहिष्णू देश आहे हे जगाला कळले.
     दिनांक ८ जून २०१६ स्थळ वॉशिंग्टन,पुन्हा अमेरिकाच विश्वातील गणमान्य व्यावसायिक व राजकारण्यांची सभा वक्ता पुनश्च “नरेंद्र”,आपल्या भाषणाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट पुन्हा एकदा संपूर्ण विश्वास भारत हा कसा देश आहे हे कळले.एका “नरेंद्रने” सुमारे 125 वर्षांपूर्वी भारतास सा-या विश्वात मान सन्मान मिळवून दिला होता.आज पुन्हा दुस-या एका “नरेंद्राने” भारताचा दबदबा निर्माण केला आहे.पहिला नरेंद्र म्हणजेच नरेंद्र विश्वनाथ दत्त म्हणजेच स्वामी विवेकानंद आणि दुसरा नरेंद्र म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी.येथे काही दोघांची तुलना वगैरे करावयाची नसून केवळ त्यांच्यातील देशप्रेम,वक्तृत्व,सभाधीटपणा अशी साम्यस्थाने प्रकट केली आहेत.दुस-यावर पहिल्याचा मोठा प्रभाव.दोघांच्याही पायाला भोवरा.स्वामीजींनी जसे विश्वभ्रमण केले तसे आता मा. पंतप्रधान करीत आहे.हेतू हाच कि भारत वासियांचे कल्याण.दोघांनाही भारताचा प्रचंड अभिमान,भारताविषयी प्रचंड प्रेम आणि या भारतातील असंख्य गरीब आत्म्यांच्या उद्धारासाठी काहीतरी करण्याची प्रचंड तळमळ.त्यासाठीच सतत भ्रमंती सुरु.दोघांनीही घर दार सोडून एकांतात ध्यान धारणा केल्या.भ्रमंती केली आहे.देश जाणून घेतला आहे.त्यांच्या या सततच्या दौ-यांचे फलित येण्यास काही कालावधीचा अवधी लागेल.अनेकांची टीका त्यांना या फिरस्तीमुळे सहन करावी लागत आहे.मोदींच्या भाषणात 60 ते 70 वेळा टाळ्या वाजल्या.10 वेळा मानवंदना देण्यात आली.जे मोदींना पूर्वी त्यांच्या देशात येण्यास मज्जाव करीत होते तेच आता मोदींच्या भाषणाचा गौरव करीत होते,मानवंदना देत होते.देशाने आणि देशाच्या राजकारण्यांनी सकारात्मक राजकारण करून चांगल्यास चांगले म्हटलेच पाहिजे. आपल्या देशात तसे नाही नेते काहीही मागण्या करतात.नशीब की त्या अमेरिकेत “आप”ल्या सारखे नेते नाहीत, नाहीतर लगेच मोदींच्या पदवीची मागणी केली असती.या भाषणामुळे भाजपा किंवा मोदींचा गौरव झाला नसून हा भारताचा गौरव आहे कारण पंतप्रधानांनी तेथे भारताचे प्रतीधीनित्व केले हे सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे दुरचित्रवाहिन्यांवरून या भाषणाची तशी कमीच प्रसिद्धी झाली.काहीही थातूर-मातुर बातम्या प्रक्षेपित करण्यापेक्षा देशाच्या आत्मसन्मान बळावणा-या बातम्या दाखवणे कधीही चांगलेच.माध्यम प्रतिनिधी,अधिकारी यांचे विदेश दौरे कमी केले तर त्यात देशाचेच हितच आहे ना. याचाही विचार निश्चितच व्हायला हवा.मोदींनी भारत हा अमेरिकेचा समविचारी आहे हे सांगितले.तसेच अमेरिकेचे गुण-गान सुद्धा गायले.त्यांच्या या भाषणात एक ‘परफेक्ट’ व ‘चतुर’ राजकारणी दिसून आला दहशतवादा बाबत बोलतांना त्यांनी पाकिस्तानला अमेरीकेतून होणा-या मदतीचा उल्लेखही केला नाही.त्यांच्या या भाषणाने भारतवासीयांच्या मनात देशप्रेम उफाळून आले आहे.आपला देश सक्षम आहे, प्रबळ आहे असा आत्मविश्वास भारतीयांत आला आहे.मोदींच्या या भाषणाचा “Modi Doctrine” अर्थात “मोदींचा सिद्धांत किंवा शिकवण” असा उल्लेख अमेरिकेच्या दक्षिण आशियाच्या सहाय्यक सचिव निशा बिस्वाल यांनी केला आहे.त्यांच्या या सभा विजयाने कोट्यावधींची गुंतवणूक येत्या काळात भारतात होईलच अशी आशा निर्माण झाली आहे.स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे 125 वर्षांपूर्वी धर्मसभेत केलेल्या भाषणाचा आपणास मोठा गर्व.परंतु त्यानंतर 125 वर्षे आपल्यातून कुणीही स्वामीजींसारखा नावलौकिक भारतास मिळवून देऊ शकला नाही. का देऊ शकला नाही? कारण आपण नकारात्मक भावनेने ग्रस्त होतो, आपल्या  मनांत न्यूनगंड झाला होता. आपण आपला देशाभिमान, आत्मसन्मान जणू हरवूनच बसलो होतो.आपल्याला आपल्या लोकशाहीचा आणि बाजारपेठेचा आपल्या देशातील तरुणाच्या संख्येचा विसरच पडला होता.परंतू आता पुढच्या पिढीला भारताच्या गौरवाच्या,विश्वात भारताचा नावलौकिक वाढवणा-या व्यक्तींच्या कथा सांगण्यासाठी आता एकच “नरेंद्र” नसून दुसरा सुद्धा “नरेंद्र” आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा