१६/०६/२०१६

Water Problem in the year 2016 at Khamgaon City Dist Buldhana

पाण्याचा “पैसा” असतो

     भारतीय संस्कृतीत कुणाला पिण्यास पाणी दिले तर पुण्य लाभते असे वर्षानुवर्षे ऐकिवात आहे.”पाण्याचा धर्म असतो” असे वाक्य वेळोवेळी कानी पडत आले आहे परंतु आता लोक म्हणतात मेल्यावर पुण्य काय धेता त्यापेक्षा आता पैसाच घ्या ना ! खामगावात गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.जवळपास प्रत्येकाच्याच घरी 35 रुपयांची एक पिण्याच्या पाण्याची कॅन (पाणी शुद्धच आहे की नाही हे देवच जाणे, थंड मात्र असते) व २०० रुपयांचे एक 1000 लिटरचे टॅंकर असे दोन दिवसाआड सुरु आहे.शिवाय नगर परिषदेची वार्षिक पाणीपट्टी आहेच.पैसा पाण्यासारखा खर्च होत आहे आणि पाणी मात्र गायब.परवा जेंव्हा नगर परिषदेने दवंडी पिटवली की “पाणी पुरवठा अनिश्चित राहील” लगेच २०० रुपयाचे हजार लिटरचे टॅंकर 250 ते 300 लिटर अशा भावावर पोहोचले.लोकांना पाणी नाही,लोकांची मजबुरी आहे तर या मोबदला घेऊन पाणी पुरवठा करणा-यांनी व त्यांच्यामुळे टॅंकरवाल्यांनी पाण्याचे भाव वाढवले.तुम्ही पाण्याचे पैसे घ्या,लोक सुद्धा देतात परंतु असे अडी-अडचणीच्या काळात लोकांच्या मजबुरीचा फायदा घेऊन तुम्ही स्वत:चा असा फायदा करून काय साध्य करणार आहात?शिवाय या विहिरींवरून ज्या मोटारी द्वारे पाणी ओढल्या जाते ती मोटर व्यावसायिक विद्युत कनेक्शनवर आहे की इतर कोणत्या कनेक्शनवर? याकडे कुणाचेही लक्ष नाही.मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात पाण्यासाठी अनेकांची विहिरी खोदून सोय करणा-या अहिल्यादेवी होळकरांना लोक विसरले.गंगेचे पाणी वाळवंटात गाढवाला पाजून त्यास वाचवणारे संत एकनाथ लोक विसरले.गड किल्ल्यांवर पावसाचे पाणी सुनियोजित पद्धतीने साठवून ठेवणा-या शिवाजी महाराजांना लोक विसरले नाहीत परंतु त्यांच्या पाणी व्यवस्थापन करण्याच्या व पाण्याला सोन्यासारखे जतन करण्याच्या पद्धतीला विसरले.नगर परिषदेला पाणी पुरवठा करण्यात काय अडचणी येत आहे देव जाणे.परंतु ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत हे असे का होते?जॅक वेल मध्ये गाळ काय अडकतो,तर कधी पाईप लाईन काय फुटते.घाटपुरी नाक्यापासून तर घाटपुरी गावापर्यंत 7-8 ठिकाणी पाण्याची गळती वर्षभर सुरु असते लोक तिथून पाणी भरतात.हे सामान्य लोकांना माहित आहे न.प.मुख्याधिकारी,न. प. पाणी पुरवठा विभागांस माहित नाही काय?एक तर ते लिकेज थांबवा नाहीतर तिथेच सार्वजनिक नळ बनवून टाका.परवा दिपके नामक वृद्धाचा हापशी वरून पाणी भारतांना आकस्मिक मृत्यू झाला.डोळ्यात पाणी आणणारी घटना आहे.भगीरथाने गंगा खेचून आणलेल्या या देशात एक नागरिक पाण्यासाठी मरतो.हे देशासाठी नक्कीच लाजिरवाणे आहे.या देशात पाणी भरण्यासाठी कित्येक घरचे चिल्ले-पाल्ल्ले,तरुण वृद्ध सर्वच सकाळपासून व्यस्त असतात.त्यांच्या जीवनातील निदान 5/6 वर्षे तरी निव्वळ पाणी भरण्यात जात असतील.अनेक वेळा लोक सुद्धा पाण्याचा सर्रास गैरवापर करतात.नळाला मोटर लाऊन पाणी खेचून घेतात मग पुढच्या घरातील लोकांना पाणी मिळो अथवा ना मिळो आणि स्वत:चे पाणी झाले की रस्त्यावर सुद्धा शिंपडतात.रस्त्यावर पाणी शिंपडून त्यांना काय मिळते काय माहित.पापड जमिनीवर भाजल्या जाणा-या उन्हात यांचे त्या रस्त्यावरचे पाणी दोनच मिनिटात सुकून जाते.पाणी वापराबाबत सर्वांमध्येच काही ना काही दोष आहेतच.भारतमाता आणि भारताचे मोठे गुण-गान करणारे या देशाची संस्कृती स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी साफ विसरतात आणि मग अशा पाणी टंचाई सारख्या आपत्कालीन परीस्थितीत नागरिकांना वेठीस धरतात.असे वेठीस धरतांना कुठे जातो तुमचा देशाभिमान,तुमच्या त्या “भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे” अशा प्रतिज्ञा?पाण्याचा धर्म असतो असे ग्रामीण भागात नेहमीच ऐकू येणारे वाक्य आहे.परंतु यंदाच्या या भीषण पाणी टंचाईच्या दिवसांत पाण्याचा धर्म नाही तर पाण्याचा “पैसा” असतो हेच लक्षात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा