२३/०६/२०१६

Trespasses by educated and eminent persons in various cities

सुशिक्षीतांचा अशिक्षीतपणा
     ”व्यक्ती तितक्या प्रकृती” असे म्हटले जाते.खरे आहे ना ! किती नानाविध स्वभावाचे लोक असतात. क्रोधी,शांत,प्रेमळ,कठोर कुणी निर्मोही तर कुणी लोभी.यातील काही लोक सुशिक्षीत तर काही अशिक्षीत असतात.सुशिक्षीत अनेकदा त्यांचा अशिक्षीतपणा दाखवून ते निव्वळ कागदोपत्री सुशिक्षीत असल्याचे सिद्ध करीत असतात.उदा. सार्वजनिक सभागृहांच्या कोप-यात गुटका आणि पान खाऊन थुंकीच्या पिचका-या मारणे. “येथे वाहन लावू नये” असे लिहिले असतांनाही तेथेच वाहन उभे करणे,चालत्या गाडी वरून थुंकणे,रस्त्यांवर गरज नसतांनाही वाहनांचे कर्कश्श हॉर्न वारंवार वाजवणे,सुशिक्षीत व्यक्ती जर लोभी असेल तर मग इतरांच्या अथवा सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे.अशा एक ना अनेक त-हा या सुशिक्षीत असूनही अशिक्षीतांरखे वागणा-यांच्या असतात.अतिक्रमणाच्या बाबतीत म्हणाल तर काही सुशिक्षीत लोक विविध मार्गांनी “स्वत:च्या पात्रात तूप कसे ओढता येईल?” याच प्रयत्नात असतात.या सुशिक्षीत लोकांचा डोळा मग लोभामुळे दुस-याच्या संपत्तीकडे,दुस-याच्या जमिनीकडे जातो.मूळच्या लोभी स्वभावाच्या व्यक्तीने कितीही अथवा कोणतेही उच्च शिक्षण घटले तरी त्याचा मुळची लोभी वृत्ती काही जात नाही.“आधी होती दासी पट्टराणी केले तिसी तिचे हिंडणे जाईना मुळ स्वभाव जाईना” या म्हणी नुसार माणसाचा मुळ स्वभाव बदलत नाही हे समजते.दासीला राणी जरी केले तरी तिचे दासीपण काही जात नाही.ती राणी असूनही तिची वागण्याची    त-हा एखाद्या दासी सारखीच राहते.तसेच सुशिक्षित असलेला लोभी व्यक्ती लोभ सोडू शकत नाही.येथे दाखलेच द्यावयाचे झाले तर एक नाही अनेक दाखले देता येतील.
काही सुशिक्षित लोभी जमिनीच्या लोभापाई “सर्विस लाईन” मध्ये अतिक्रमण करतात.त्यातून त्यांच्या घरचे सांडपाणी रहिवाशी भागात सोडतात.त्यांना आपण रोगराई पसरवत आहोत हे सुद्धा कळत नाही.“आपल्याला कोण काय करणार?”अशी मग्रुरी असतेच.हो खरच !कोणी काही करत नाही.यांच्या जवळच्या पैस्यामुळे हे सर्व ‘मॅनेज’ करीत असतात.यांच्या घरचे सांडपाणी रस्त्यावर तर जातेच परंतु यांच्या अलीकडून जे सांडपाणी येत असते ते कुठे जाणार? ते अडते आणि मग यांच्या घराच्या दोन्ही बाजूने पुन्हा अस्वच्छता निर्माण होते.काही सुशिक्षित लोभी रस्त्यावर अतिक्रमण करतात.त्यांच्या कुंपणाच्या भिंती कश्या रस्त्यावर आल्या आहेत हे शेंबड्या पोरालाही समजते.परंतु प्रशासनास नाही.कुण्यातरी पक्षाचे सदस्य बनायचे किंवा अमक्या ढमक्या सेल चे पदाधिकारी म्हणून मिरवायचे आणि सुशिक्षित असूनही अशिक्षितासारखे कृत्य करावयाचे.गरीब,झोपडपट्टी मध्ये राहणारे,रोजगार नसल्याने पोटासाठी अतिक्रमण व्यवसाय करणा-यांवर वेळप्रसंगी बुलडोजर फिरवले जाते परंतु सुशिक्षित(?) आणि धनदांडग्या सर्विस लाईन आणि रस्त्यांवर घराच्या कुंपणाच्या भिंती बांधून वाहतुकीची कुचंबणा करणा-या यांच्यावर प्रशासन कारवाई करतांना क्वचितच दिसून येते.
अति लोभी सन बिरति बखानी 
अर्थात लोभी व्यक्तीशी लोभ सोडण्याबाबत बोलू नये तरी थोड्या जमिनीचा लोभ ठेवून सुशिक्षित असूनही “सर्विस लाईन”,रस्ता अशा ठिकाणी अतिक्रमण करून सर्वसामान्य जनतेला त्रस्त करणा-यांना “तुम्ही तुमच्या नैसर्गिक स्वभावानुसार वर्तन करा परंतु तुमच्या लोभामुळे दूस-यास त्रास तर होत नाही आहे ना निदान याची तरी काळजी घ्या सुशिक्षित असूनही अशिक्षितपणा करू नका” हे आवर्जून सांगावेसे वाटते.

मध्यप्रदेश मधील इंदोर येथील एका रहिवाशी भागातील नागरिकांनी अतीक्रमण हटविण्यास आलेल्या कर्मचा-यांना स्वत;चे घर,दुकान पडत असूनही विकासासाठी चहा पाजून सहकार्य केले आणि आपले अतिक्रमण काढू दिले अशी घटना काल घडली.अशीच कायद्याचा सन्मान करण्याची सद्बुद्धी ईश्वर सर्वांना देवो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा