१४/०७/२०१६

Article about Marathi TV series and vamp roles shown

घरात घुसलेल्या “व्हॅम्प”
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या मराठी वाहिनीवर “कुंकू टिकली” हा सासू आणि सुनेच्या एकमेकीवर कुरघोडी करण्याच्या कार्यक्रम प्रसारित होत असे. यात सासू सुनेतील वाद विनोदात्मक पद्धतीने चित्रित केलेला असे. परंतू नंतर मग हिंदीमध्ये मा. मंत्री महोदयांची “क्यों की.....” आणि “कहानी घर घर की” सारख्या जितु काकांच्या मुलीच्या एकता कपूरच्या मालिकांनी घरा-घरांमध्ये एका खाष्ट, कपटी सासू किंवा स्त्रीचा शिरकाव करून दिला. भारतीयांमध्ये अथवा त्यांच्या कुटुंबांमध्ये अशा स्त्रिया नव्हत्या असे काही नाही. खाष्ट आणि कपटी स्त्रिया तर मंथरे पासून तर “ध चा मा” करणा-या आनंदीबाई आणि अगदी आताच्या स्वत:च्याच मुलीला मारून टाकणा-या “इंद्राणी मुखर्जी” पर्यंत अनेक खाष्ट स्त्रिया होऊन गेल्या आणि आहेत.
”सीतेला झाला सासुरवास परोपरी तिने तो वाटून दिला घरोघरी”
त्यामुळे स्त्रिया आणि सासुरवास, भांड्याला भांडे लागणे हे वर्षानुवर्षे सुरूच आहे. परंतु या दूरचित्रवाहीन्यांनी मात्र कहरच केला आहे. यांच्या मालीकातील स्त्रिया आनंदीबाई, मंथरा आणि इंद्राणी मुखर्जी या सर्वानाही मागे टाकतील अशा रंगविलेल्या दाखवतात. या मालिकांचे निर्माते, दिग्दर्शक तर सोडाच मालिका बघणारे दर्शक सुद्धा साधा विचार करीत नाही की या मालिका त्यांच्या समवेत बसून त्यांची पुढची पिढी सुद्धा पाहते आहे. या नवीन पिढीवर बालपणापासून या मालीकांतील कपटी, कजाग स्त्रिया वाईट संस्कार करीत आहेत. आजची लहान मुले जी अशा मालिका नेहमी पाहत आहेत त्यांच्या बालमनावर नक्कीच याचा मोठा परीणाम होतो. मग ती मुले उद्धट, न ऐकणारी, द्वाड बनत आहे. अनेक लहान लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना कितीतरी घडल्या आहेत. परंतू दुर्दैवाने या मालीकांबाबत शासन, सामाजिक कार्यकर्ते, समाज काहीही आक्षेप घेतांना दिसत नाही. सर्व आनंदाने आपल्या कुटुंबियांसमवेत या निरर्थक मालिकांचा आस्वाद घेत असतात (माझे कुटुंब सुद्धा अपवाद नाही) आणि निर्माते त्यांचे गल्ले भरीत आहेत. पूर्वी संध्याकाळची वेळ म्हणजे गोष्टींची वेळ असे. रोज सायंकाळी दिवे लागले, देवाची प्रार्थना झाली की आजीच्या अवती भवती  लहान लहान नातवंड जमा होत. आजी/ आजोबा मग त्यांना रामायण, महाभारत, थोरा मोठ्यांच्या गोष्टी सांगत. या गोष्टींचा लहानग्यांवर चांगला परिणाम होत असे. ती मुले संस्कारी. आज्ञाधारक, सुशील, गुणवान बनत. लहानपणीच त्यांना घरची आणि घरच्या परिस्थितीची जाणीव होत असे. आता तर आजी, सून, नात आणि सर्व घरच सायंकाळी “आदेश भावोजी” “होम मिनिस्टर” करीत येतात तेंव्हा पासून तर मुलगी पसंत केल्यावर मग तिला कसा त्रास होईल निव्वळ याचाच विचार चोवीस तास करणा-या सासूची “पसंत आहे मुलगी” व शिव आणि गौरी जोपर्यंत घरी जात नाही तो पर्यंत त्या “इडीयट बॉक्स” च्या समोर ठिय्या मांडून असतात. पुढे मग “चला हवा येऊ द्या वाले “ आहेतच असे करत करत “रात्रीस खेळ चाले” सुरु राहतोच. जेवण सुद्धा तिथेच. भविष्यात परसाकडे सुद्धा एखाद्याने टीव्ही लावल्यास नवल नाही. कोण म्हणते मराठी अस्मिता नाही म्हणून, मराठी माणसे  जागृत नाहीत म्हणून ? मराठी माणसे जागृत आहेत ती फक्त सासू सुना, कपटी, कजास,खाष्ट, कारस्थानी स्त्रियांच्या मालिका पाहण्या बाबत. बरेच ठिकाणी माणसे सुद्धा हा “मेलोड्रामा” मोठ्या आवडीने पाहतात.पूर्वी काही चित्रपटांमध्ये अशा “व्हॅम्प” भूमिका, पात्रे असत.परंतु आता मात्र अशा व्हॅम्पचे पीक आले आहे आणि हि व्हॅम्प काही मालीकांमधली किंवा फिल्मी व्हॅम्प नसून तुमचे घर तुमची पिढी बिघडवणारी व्हॅम्प आहे. सावधान ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा