०७/०७/२०१६

Article describes about decreasing no of small workers,road artists and hawkers etc in Maharashtra

चक्कू छुरीया तेज बनालोSSSSS
काल ब-याच वर्षांनी तो दिसला.परंतु पक्के लक्षात आहे होता तोच ज्याला मी 30-35 वर्षांपूर्वी नेहमी पाहत असे हल्ली तो क्वचितच दिसतो.पूर्वीची “हिप्पी कट” आता थोडी कमी झाली होती.पँटची बॉटम सुद्धा आता पूर्वीसारखी “बेल बॉटम” नव्हती.त्याची तीच सायकल.त्या सायकलच्या मागच्या चाकावरून एका बेल्टवर फिरणारे सायकलच्या हँडलवर बसवलेले व उभ्या असलेल्या सायकलचे पॅडल मारल्यावर फिरणारे ते एक छोटे चाक.प्रदूषणरहित पर्यावरणपूरक यंत्र. त्या हँडलवरच्या चाकावर गल्लीत एका ठिकाणी तो सायकल उभी करून कुणाच्या तरी चाकू,सु-यांना धार लावत होता.तो आपल्या कामात मग्न आणि त्याला पाहून मी विचारात मग्न झालो. “Use And Throw” च्या आजच्या काळातही पोटाची खळगी भरण्यासाठी तो त्याचा तोच जुना व्यवसाय पुढे नेत होता.तो धार लावण्यासाठी उभ्या असलेल्या सायकलला जोरात पॅडल मारीत होता आणि त्याचे ते हँडलवरील चाक जोरात फिरत होते तसेच किंबहुना त्या चाकापेक्षाही अधिक वेगात फिरत होते माझे विचारचक्र.मी भूतकाळात केंव्हा गेलो मलाही कळले नाही.त्याच्या आज अचानक दिसण्याने अनेक जुन्या कारागिरांची आठवण येण्यास सुरुवात झाली.“जाते पाते टाक र बाई” अशी आरोळी आठवली. दळणाचे घरगुती जाते टाकून(नवीन पिढीतील वाचकांनी टाकून या शब्दाचा फेकून असा अर्थ घेऊ नये) देण्यासाठी “पाथरवट” बायका अशी आरोळी ठोकत असत.त्यापाठोपाठ लगेच आठवली विशिष्ट शैलीतील “कल्हSSSSSई” अशी पितळी भांडयांना चकाकून देणा-या कारागिराची आरोळी.विचारचक्र अजून पुढे सरकले आणि मग एका उंच बांबूवर कसलातरी चिकट खाद्य पदार्थ घेवून लहान मुलांना मोर, बदक असे प्राणी करून ते खाण्यासाठी म्हणून विकणा-या बंगाली मिठाई विक्रेत्याची.तो हाताला थुंकी लावून मिठाई बनवतो अशी काहीशी अफवात्मक चर्चा लहानग्यांमध्ये चालायची.विचार पटलावर नंतर आला तो दारोदारी पटलाच्या ऐवजी “अॅल्युमिनियम”च्या डब्यात मुलांना तोंड घालून सिनेमा दाखवणा-या “बायोस्कोप” वाला. (अॅल्युमिनियमसाठी तत्कालीन प्रचलित शब्द होता ‘जर्मन’.अॅल्युमिनियम जर्मन का म्हणत? त्याचे जर्मन देशाशी काही नाते होते का हे कोडे कधी उलगडले नाही,आणि कुणी कुणाला विचारण्याच्या भानगडीत सुद्धा पडले नाही) हे असे व्यावसायिक काळाच्या ओघात गायब झाले.ते व त्यांच्याशी संबधित शब्द आजच्या पिढीला कदाचित ठाऊक सुद्धा नसतील.अस्वल घेऊन दारोदारी खेळ करणारा “दरवेशी” हा शब्द व “पाथरवट” सारखे शब्द आता फक्त एखाद्या चांगल्या प्रतीच्या वर्तमानपत्रातील शब्दकोड्यातच आढळतात.त्याचे धार लावण्याचे चाक आणि  माझ्या डोक्यातील विचारचक्र फिरतच होते.वरील सर्व छोटे-मोठे फेरीवाले म्हणा किंवा कारागीर म्हणा हे गायब का झाले?असे काय घडले की आता हे लोक क्वचितच कुठेतरी आढळतात.तर यास “काळ” हेच उत्तर आहे.काळ बदलण्यास वेळ लागत नसतो.आपल्या डोळ्यादेखत अनेक नव्या गोष्टी येत असतात आणि जुन्या गोष्टी काळाच्या ओघात गायब होत असतात.काल ज्याला अतिशय महत्व असायचे आज ते अडगळीत जाऊन पडलेले असते.वस्तूच काय तर जुन्या पिढीला सुद्धा टाकाऊ समजून दूर सारणारे नवीन पिढीत अनेक आहेत.१९८० नंतर काळ झपाट्याने बदलण्यास सुरुवात झाली.त्यानंतर मुक्त अर्थ व्यवस्था,उदारीकरण यांमुळे नवीन बाजारपेठ उदयास आली.जुने,परंपरागत छोटे-मोठे उदयोग करून पोट भरणारे मग लोप पावण्यास सुरुवात झाली.सरकारच्या “वोट बँक” केंद्रित धोरणामुळे गोर गरिबांना सर्व काही “मोफत” वाटपाच्या अनेक योजना सूरु झाल्या.जगातील वस्तूंचा भारतीय बाजापेठेत शिरकाव आणि सरकारी “मोफत” वाटपाची धोरणे यांमुळे मग मजुर मिळेनासे झाले आणि लोक आळशी बनून त्यांचे परंपरागत रोजगारचे कार्य त्याग करते झाले.या व्यावसायिकांचे समाजात मोठे स्थान होते.सिनेमामध्ये समाजाचेच प्रतिबिंब उमटत असते.“पैसा फेको तमाशा देखो“ असे बायोस्कोप व्यवसाय करणा-या मुमताजवर चित्रित केलेले गीत “दुश्मन” सिनेमात होते.”जिंदगी है खेल कोई पास कोई फेल” धरम-हेमाचे डोंबा-याचा खेळ करतांनाचे गीत.तर “चक्कू छुरीया तेज बनालो” असे म्हणत चाकू सु-यानां धार लावून देण्याचे काम करणा-या “जंजीर” मधील जया भादुरीचे गीत. एव्हाना त्याचे काम संपले होते.त्याने “चक्कू छुरीया तेज बनालोSSSS” शी आरोळी ठोकली तेंव्हा माझी तंद्री भंग झाली.त्याचे हँडलवरील फिरणारे चाक थांबले परंतु त्याच्या आणि तत्कालीन इतर किरकोळ व्यापर उदीम करून पोट भरणा-यांच्या आणि त्यांचे पोट भरणारे व्यवसाय बंद करणा-या काळाच्या विचारात माझ्या विचारांचे चाक मात्र वेगाने फिरतच राहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा