२६/०१/२०१७

Famous Lyricist Jaswant Raj Sharma Alias "Naqsh Layalpuri" passed away on 22 Jan 2017 article regarding his lyrics

.....तुझको दुंगा सदा
गाणे ऐकत ऐकत प्रवास हा एक सुखद अनुभव असतो. त्यातही जर जुनी अर्थपूर्ण गाणी असतील तर दुधात साखरच.असाच जुनी गाणी ऐकत ऐकत रविवारी प्रवास करीत होतो. “पेन ड्राईव्ह” वर सर्वात पहिले गाणे लागले “न जाने क्या हुवा” त्यानंतर “दो दिवाने शहर मे“ , “ये मुलाकात एक बहाना है “ हे खानदान चित्रपटातील सुश्राव्य गीत अशी एका पाठोपाठ एक श्रवणीय गाणी लागत होती आणि प्रवासाचे ईप्सित स्थळ येण्याच्या आधी लागले ते “ मै तो हर मोडपर तुझको दुंगा सदा” प्रवासाच्या शेवटी जे
Naqsh Layallpuri With Lata Mangeshkar
गाणे लागते तेच मग बराच वेळ ओठावर येत असते. प्रवासात सर्व गाणी ऐकत असताना वरील गीतांचा गीतकार कोण हे ध्यानी मनीही आले नाही. सोमवारी वृत्तपत्रातून वृत्त झळकले की “नक्श लायलपुरी” यांचे रविवारी 22 जाने 2017 रोजी निधन. नाव ऐकलेले असल्याने संपूर्ण वृत्त वाचन केले आणि त्यात नक्श लायलपुरी अर्थात जसवंत राज शर्मा यांच्या बाबत माहेती आणि त्यांच्या काही गीतांचा समावेश होता.रविवारी त्यांचे निधन आणि त्यांचीच गाणी मी रविवारी ऐकत होतो, आपोआपच त्यांना श्रद्धांजली दिल्या गेली होती. जुन्या काळातील मजरूह सुलतानपुरी,शैलेन्द्र,आनंद बक्षी,इंदीवर अशा अनेक प्रख्यात गीतकारांमध्ये नक्श लायलपुरी हे सुद्धा एक गीतकार होते परंतू इतर गीतकारांप्रमाणे त्यांना नावलौकिक प्राप्त झाला नाही. पंजाब प्रांतात लायालपुर या गावी जन्म झाला असल्याने त्यांनी गावचेच नाव धारण केले. लहानपणापासूनच उर्दू भाषेची गोडी त्याना लागली आणि मग नंतर कविता स्फुरू लागल्या. १९५२ मध्ये चित्रपटसृष्टीत चित्रपटांकरीता गाणी लिहिण्यास सुरुवात केली ती अगदी आजतयागत. तत्वनिष्ठ असल्याने त्यांनी इतरांच्या तुलनेत कमी गाणी दिली परंतू जी पण काही गाणी दिली ती आजही रसिकांच्या स्मरणात आहे. अमोल पालेकरच्या “घरौंदा” मधील सर्व गीते गुलजारची होती परंतू
  “दो दिवाने शहर मे....आशियाना धुंडते है“ हे गाणे आजही तेवढेच ताजे आहे आणि सामन्याला शहरात घर मिळणे किती कठीण असते अशा काळाशी सुसंगत आहे. त्यांनी बी ग्रेड चित्रपटांसाठी गाणी लिहिली ते चित्रपट भलेही रसिक विसरले असतील परंतू त्या चित्रपटांतील नक्श लायलपुरी यांची गीते मात्र रसिक आजही गुणगुणतात ती गीते आजही रेडीओ आणि विविध दुरचित्रवाहीन्यांवरून प्रसारित होत असतात. पैसे मिळतात म्हणून “त ला त” व “म ला म” त्यांनी जोडले नाही, आपल्या काव्याशी तडजोड त्यांनी केली नाही आणि म्हणूनच त्यांची गीते एवढी सरस आहेत आणि त्यामुळेच त्याना म्हणावे तितके व्यावसायिक यश मिळाले नाही. आर्थिकप्राप्ती होत राहावी , उदरनिर्वाह चालत राहावा म्हणून नक्श लायलपुरी यांनी पोस्टात नोकरी सुरु ठेवली व स्वत:ला आवडतील अशा रचना काही विशिष्ट संगीतकार जसे नौशाद,खय्याम,जयदेव यांच्याकडे करीत राहिले. नुरी तील “चोरी चोरी कोई आये “ ,आहिस्ता आहिस्ता मधील “माना तेरी नजरमे“ , “ चांदनी रातमे एकबार” हे दिले नादान मधील गीत , “प्यार का दर्द है“ तसेच अलीकडच्या  काळातील “जाते हो परदेस पिया जातेही खत लिखना “ अशी त्यांची मधुर गीते आजही रसिकांना लक्षात आहेत. उत्कृष्ट गीतकार असूनही ते उपेक्षित राहिले व आता रसिकांना सोडून गेले. ते आता कुणालाही ऐकू शकणार नाहीत परंतू तरीही रसिक मात्र त्यांच्याच शब्दात म्हणतील “मै तो हर मोड पर तुझको दुंगा सदा मेरी आवाज को दर्द के साज तू सुने न सुने”                                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा