२०/०१/२०१७

Navjyotsingh Siddhu changed 2 parties within very few month. Article about it.

कोलांटया उडया



    परवा भाजपा , काल आप आणि आज काँग्रेस अश्या कोलांटया उडया माजी क्रिकेटपटू , माजी खासदार , विनोद आणि शेरो शायरीचा बादशहा तसेच क्रिकेट समालोचक नवज्योतसिंग सिद्धू याने मारल्या. भारतात पक्ष बदलणे हे काही नवीन नाही सत्ते साठी मोठ-मोठ्या दिग्गज नेत्यांनी सुद्धा हे प्रताप केलेले आहेत. ज्या पक्षांनी मोठे केले त्या पक्षाला सोडून सत्तापिपासू नेते दुस-या पक्षात गेले आहेत. जेष्ठ नेत्याचा काँग्रेस ते पुलोद पुन्हा काँग्रेस आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास सुद्धा जनतेने पहिला आहे. तसेच एकाचवेळेस ब-याच नेत्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत काँग्रेस मध्ये जातांना या महाराष्ट्रानी पाहिले आहे. कालच शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर हे “व्हाया” मनसे करीत भाजपा मध्ये प्रवेश करते झाले. नारायण दत्त तिवारी आता भाजपाच्या उंबरठ्यावरच आहे. सिद्धू सुद्धा आता अशाच नेत्यांच्या मांदियाळीत जाऊन बसला आहे.राहुल गांधींना सतट पप्पू म्हणत आणि मनमोहनसिंग याना “सरदार ही पर असरदार नही” अशी निर्बात्सना करणारा सिद्धू हा त्यांच्याच काँग्रेस पक्षात समाविष्ट झाला आहे. सिद्धू हा बोल बच्चन सुद्धा आहे. आपल्या बोलण्याने सोमोरच्याला कसे प्रभावित करावे हे त्यास ज्ञात आहे. परंतू प्रत्येकवेळेस त्याच्या श्रीमुखातून बरोबर तेच निघेल असेही नसते.” मी जन्मत: काँग्रेसचा” , “भाजपा म्हणजे कैकयी” अशी मुक्ताफळे त्याने काँग्रेसच्या दावणीला गेल्यावर उधळली. तू जर काँग्रेसचा आहे  तर मग   दुस-या घरी तू का गेलास ? तुला ज्या भाजपाने  खासदार बनवले तो कैकयी कसा ? बरे कैकयी आहे तर मग तू कोण ? तू राम म्हणावास काय ? तर नाही कारण तू तर वनवासा ऐवजी सत्तेकडे चाललास. रामाने हसत हसत सर्व दु:ख स्विकारले तू तर मुख्यमंत्री पदाची लालसा बाळगत सत्तेची फळे भोगण्यास आतुर आहे. तूला भरत म्हणावे तर तो भरताचा सुद्धा अपमान होईल. कारण सत्ता अगदी हाता तोंडाशी असतांना त्याने त्या सत्तेचा त्याग केला आणि आपल्या राज्याशी निष्टा बाळगत वनवास्याप्रमाणे राहिला. मग तू जर भाजपाला कैकयी म्हणतोस तर तू मात्र ईश्वाकू वंशातील कुणीही वाटत नाहीस. तू वाटतोस तर रामायणातीलच “वाली” वाटतो . कारण किष्किंधा राज्याच्या गादीवर बसण्यासाठी त्याने बंधू सुग्रीव यास राज्याच्या बाहेर हाकलून दिले, त्यातही भरीस भर म्हणजे सुग्रीव पत्नीस त्याने बलपूर्वक आपलेसे केले असते. भाजपा कैकयी आहे तर मग तू मात्र रामायणातील वालीच आहेस. कारण वाली सत्तापिपासू होता आणि तू सुद्धा तसाच सत्तापिपासू वालीने गादीसाठी भावाला दुखावले आणि तू गादीसाठी दोन पक्ष सोडले. आता कुणी हे म्हणत असले की मला जनतेची सेवा करयाची आहे आणि ते करण्यासाठी सत्ता हवी तर हे सर्व न समजेल अशी भारतीय जनता दुधखुळी नाही. तुझ्या कडून मुष्टी प्रहाराने एका व्यक्तीने प्राण गमावला होता आणि त्या कलंकातून सुद्धा तू कधीच मुक्त झाला आहेस आणि जनता सुद्धा ती घटना विसरली आहे. सिद्धू तू खरेच उत्कृष्ट क्रिकेटपटू , उत्कृष्ट क्रिकेट समालोचक , उत्कृष्ट वक्ता , विनोदाची जाण असलेला शेरो शायरी तोंडपाठ असलेला प्रज्ञावंत आहेस. तुझे गुण पाहून तू अश्याप्रकारे दल बदल करशील अशी कुणाची अपेक्षा नव्हती मात्र तुझ्या कोलांटया उड्या ह्या डोंबा-याच्या खेळातील कोलांटया उड्या मारणा-या माकडालाही लाजवणा-या ठरल्या
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा