१२/०१/२०१७

Government forgot Swami Vivekanand on his birth anniversary 2017

असे कसे विसरता ?


परवाच्या सांज दैनिकात एक वृत्त  आले होते. ते वृत्त वाचून आश्चर्य आणि खेद दोन्ही वाटले. अभाविप खामगाव ने शासनास एक निवेदन दिल्याचे ते वृत्त होते. हे निवेदन शासनाच्या शासकीय कार्यालयात साज-या केल्या जाणा-या थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी हे कार्यक्रम असणा-या परिपत्रकात स्वामी विवेकानंद जयंतीचा अनुल्लेख झाला होता याबाबत दिले होते. स्वामी विवेकानंद जयंतीचा शासनास विसर पडला तो सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना. फडणवीस हे अभाविपच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय झालेले आहेत आणि स्वामी विवेकानंद अभाविप ला प्रात:स्मरणीय आहेत.शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुध्दा या “योद्धा संन्यासास” आदर्श मानतात. म्हणजे स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानणारे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असतांनाही असे कसे काय झाले? किंवा अशी चूक हे परिपत्रक काढणा-या संबंधितांकडून कशी काय झाली? याचे कारण आपल्याकडे चूक झाल्यावर त्या चूक करणा-यास दंड मात्र अगदीच सौम्य होतो. त्यामुळे मग “क्या होता?, देख लेंगे” अशी कर्मचा-यांची मानसिकता असते आणि ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातही बहुतांश कर्मचारी हे बुद्धिमत्तेच्या जोरावर शासकीय सेवेत आलेले नाहीत.त्यामुळे यांच्याकडून अपेक्षित असे कार्य होतच नाही. मग काय काहीतरी थातूर-मातूर काम केले अर्धावेळ चहाच्या टपरीवर व्यतीत केला की घरी.“बारभाई खेती आणि काही ना लागे हाती” या स्वरुपाचा कारभार शासनाचा असतो.त्यामुळे मग राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नावच उत्तरांच्या पर्यायांमध्ये नसते,विजेची बिले चुकीची येतात,शिक्षकांना देशाची राजधानी माहेत नसते,कृषी विभाग कर्मचा-यास भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात ते माहित नसते,रस्ते एका वर्षातच खराब होतात,पाण्याच्या नवीन बांधलेल्या टाक्या पडतात अशा कितीतरी अक्षम्य चुका शासकीय कर्मचा-यांकडून होतांना आपण पहात असतोच त्यातलीच एक चूक म्हणजे परिपत्रकात स्वामी विवेकानंद जयंतीचा झालेला अन्नुलेख.अर्थात चूक लक्षात आल्यावर नेहमीप्रमाणे मग पुन्हा नवीन परिपत्रक काढून केलेल्या चुकीला ठिगळ लावले गेले तो भाग वेगळा.ज्या स्वामी विवेकानंदानी जगाला भारत हा कसा देश आहे याची जाणीव करून दिली,जे स्वामी विवेकानंद भारतीय तरुणांचे गेल्या कित्येक वर्षांपासून “युथ आयकॉन” आहे. त्यांना कसे विसरता? एवढी तुमची स्मरणशक्ती कमी आहे ? आणि असेलच कमी स्मरणशक्ती आणि ती वाढवण्याची मनापासून ईच्छा जर असेल तर त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला स्वामीजींची ग्रंथ संपदा वाचल्यावर मिळेल.ती वाचा, त्यातून कामातील एकाग्रता सुद्धा प्राप्त करता येईल.हे शासकीय कर्मचा-यानो स्वामीजी म्हणतात, “तुम्ही जे कार्य अंगिकारले आहे ते जीव ओतून करा, इतर सगळे विसरा तुम्हाला यश हमखास मिळेल” आणि येथेच तुमची चूक होते तुम्ही इतर सर्व काही करता परंतू तुमचे जे मुख्य कार्य आहे ते विसरता.जीव ओतून, कर्तव्य भावनेने कार्य करणे आता शासकीय क्षेत्रातून दुरापास्त झाले आहे मग तेथे यश-अपयश ते काय ? यश मिळो अथवा न मिळो “पगार तो शुरू ही है“ आणि म्हणून तुमच्या कडून वर सांगितल्या आहेत तशा चुका घडतच राहतात.अशा चुका खाजगी क्षेत्रात मात्र फार कमी होतांना दिसून येतात कारण तेथील कर्मचारी हे फक्त आणि फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर निवडलेले असतात.आपले नेते ज्यांना आदर्श मानतात,संपूर्ण देशातील जनतेला जे वंदनीय आहे अशा थोर पुरुषांची जयंती,पुण्यतिथी हे दिवस तुम्ही असे कसे विसरता?               
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा