२७/०७/२०१७

Article describes children problems and primary teacher must know child psychology


बालकांना जाणून घ्या

       मागे एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला होता.कार्यक्रम सुरु झाला.मी व्यासपीठावर इतर गणमान्यां समवेत बसलो होतो.कार्यक्रम पुढे सरकत होता, भाषणे होत होती. माझी बोलण्याची वेळ येण्यास वेळ होता. मी आपला श्रवणभक्ती करीत जमिनीवर बसलेल्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करीत होतो. वर्ग ५ ते १० मधील ते विद्यार्थी श्रोते म्हणून समोर बसले होते. विद्यार्थी शांततेने कार्यक्रम ऐकत होते आपसात बोलत नव्हते की चूळ- बुळ करीत नव्हते. परंतू एक लहान विद्यार्थी मला वाटते वर्ग ५ मधील असावा थोडा अस्वस्थ वाटत होता.कधी मागे तर कधी आजू-बाजूला पहात होता.त्याला काहीतरी विचारायचे होते परंतू कुणाचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. शेवटी तो स्वत:च उठला आणि मागे फिरून घाईने जाऊ लागला. तो व्यासपीठापासून जास्त लांब नव्हता त्यामुळे तो मागे फिरून जातांना त्याची थोडी ओलसर झालेली हाफ पँट माझ्या नजरेतून सुटली नाही. तो गेला. सर्वांची भाषणे झाली होती.आभार प्रदर्शन सुरु झाले.कार्यक्रम संपुष्टात येत होता.त्याची जागा अजून रिकामीच होती. माझ्या मनात त्याचाच विचार होता. कार्यक्रम संपला. मला एक मनुष्य एका मुलाशी काहीतरी बोलत असतांना दिसला. तो त्याच मुलाशी बोलत होता. बहुधा ते त्याचे शिक्षक असावेत. उत्सुकतेमुळे मी तेथे गेलो. तो रडत होता. त्याला तेंव्हा लघुशंका अनावर झाल्यामुळे त्याची अवस्था खराब झाली होती. मी त्वरीत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला गाला वरुन हात फिरवला,तो हिंदी बोलत होता. त्याला खूप वाईट वाटत होते. मी त्याला म्हटले “अरे बेटा कुछ नही होता,ऐसा तो बहोत बच्चो के साथ होता है, तू तो बडा प्यारा बच्चा है” त्याला शांत केले त्याच्या त्या स्थितीवर हसणा-या त्याच्या समवयीन मुलांना सुद्धा समजावले मग त्याला सुद्धा धीर आला.तो घरी गेला. मग मी सुद्धा घराकडे निघालो ,मनात त्याचेच विचार करीत. मनात आले तो तर पाचवीतला मुलगा होता. आज काल अगदी लहान वयात मुलांना शाळांत टाकतात. या लहान मुलांचे कसे होत असेल. नर्सरी सोडा तेथे लहान मुलांच्या शरीर धर्मासाठी सेविका, आया असतात. के जी 1 पासून तसे नसते. परंतू के जी 1 मध्ये वय तरी असे किती असते? या वयात तर मुलांना त्यांच्या हाफ पँटची चेन सुद्धा उघडता आणि बंद करता येत नसते. अशी बालके क्वचित प्रसंगी वर्ग किंवा बेंच सुद्धा खराब करीत असतील. याचवेळी त्या बालकांना समजून घेणे त्या शिक्षकांची जबाबदारी असते. यासाठी हवे बाल मानसशास्त्र जाणणारे प्रेमळ शिक्षक. त्या अज्ञान बालकाला सुद्धा मनात त्याने केलेली चूक समजत असेल परंतू व्यक्त करता येत नाही. घरी पालकांसोबत बोलतांना त्यांना काही संकोच नसतो परंतू हीच बालके शाळा किंवा इतर ठिकाणी वावरतांना लाजतात, लवकर मोकळी होत नाहीत अशावेळी शिक्षकांनी त्यांना प्रेमाने, आपुलकीने आपल्या पुत्रवत समजून घेणे गरजेचे असते. आज-कालच्या या अति “प्रोफेशनल” काळात आत्मीयता जणू हरवत चालली आहे आहे. अति व्यवसायिकतेमुळे मुलांना आपलेसे केले जात नाही, त्यांच्याशी प्रेमळ वागणूक आणि आत्मीयता लोप पावत चालली आहे. शाळांची फी, डोनेशन , विविध परीक्षा व त्यांची फी. शिकवणी फी यासंबधी बोलतांना पालक घरी “सर्व पैश्यासाठी करतात” असे संवाद व्यक्त करीत असतात. हे संवाद लहान बालके ऐकतात आणि “पैसा म्हणजे सर्वस्व” अशी भावना त्यांच्या मनात  अगदी लहानपणापासून रुजू लागते. म्हणूनच परीक्षाविधीन कर्मचारी ज्यांना नियुक्ती सुद्धा मिळाली नसते ते  भ्रष्टाचार करतात.जुन्या काळात गुरु म्हणजे पिता समजला जाई आणि त्याच्याच घरी म्हणजे आश्रमात शाळा असल्याने गुरुची पत्नी मातेच्या भूमिकेत असे. आता सुद्धा शाळा, शिक्षक, शिक्षिका हे विद्यार्थ्याला आपले घर, पालक वाटायला हवे. मुलांचे मन समजून घ्यायला हवे, त्यांना समजून घेतले तर त्या समजून घेणा-या शिक्षकास विद्यार्थी जन्मभर विसरत नाही. विद्यार्थी अध्यापनाने ज्ञानवंत होतात तर गुरुजनांच्या वागणूकीमुळे,बोलण्यामुळे, आपुलकीमुळे ते सुसंस्कारीत होत असतात आणि देशाला सुद्धा ज्ञानी व सुसंस्कारीत आधारस्तंभ हवे आहेत. 

२०/०७/२०१७

Article related Indo- China tense situation on Doklam border and Made in China products

किती वस्तू बहिष्कृत कराल ?
नुकतेच डोकलाम सिमेवरील  हिंदी चीनी सैनिकांचे हमरी-तुमरी चे व्हिडीओ सर्वत्र पसरले आणि संदेश पाठवणे सुरू झाले की युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे, जनतेनेच “चिनी वस्तूंवर बहिष्कार करा” अशा आशयाचे संदेश पाठवणे सुरु केले. ब्रिटीशांच्या वेळी बहिष्कार चळवळ करणे हे योग्य होते कारण सरकार ब्रिटीशांचे होते.आता सरकार आपलेच आहे आणि आपल्याच  सरकारच्या सोपस्कारानंतर चिनी माल भारतात येतो आहे. 1990 च्या दशकात भारताने मुक्त अर्थ व्यवस्थेचे धोरण स्विकारले आणि परदेशी वस्तू भारतात विकल्या जाऊ लागल्या. तशा आपल्या वस्तू सुद्धा इतर देशात विकल्या जातात परंतू तुलनेने कमी.चिनने हीच मुक्त अर्थ व्यवस्था 1970 च्या दशकात स्वीकारली.भारत व चिन थोड्याफार फरकाने स्वतंत्र झाले भारत 1947 ला तर चिन 1949 मध्ये.म्हणजे दोघांनीही विकासाची पाऊले टाकण्यास सोबतच सुरुवात केली.“हम दोनो एकही फुटपाथसे खडे हुए थे,लेकीन आज तुम कहाँ और मै कहाँ” दिवार मधील या संवादा प्रमाणे आज उत्पादनाच्या बाबतीत चिन कुठेच्या कुठे जाऊन पोहोचला आहे तर भारत मात्र “मेक इन इंडिया” म्हणत अजूनही पाऊले टाकतच आहे.नेमका या बहिष्कार चळवळीच्या कालावधीतच माझा भ्रमणध्वनी फुटला.मी नवीन भ्रमणध्वनी घेण्यासाठी मार्केट मध्ये शोध सुरु केला.काही अपवाद वगळता जो भ्रमणध्वनी पहाल तर तो चिन मध्ये उत्पादित केलेला.काही भारत, जपान व इतर देशांनी बनवलेले भ्रमणध्वनी सुद्धा सापडले परंतू चौकशीअंती त्यातील अंतर्गत पार्टस सुद्धा चिन निर्मित असतात हे कळले. संगणक, वॉशिंग मशीन, गीझर आणि आणखी कितीतरी वस्तूंमध्ये अंतर्गत माल चिनी आहे. कोणत्या-कोणत्या वस्तू बहिष्कृत कराल? माझ्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी निर्माण झाली.भारतात प्रतिवर्षी लाखो इंजिनीयर त्यांच्या कॉलेजरुपी कारखान्यातून बाहेर पडतात.काय करतात हे इंजिनियर?का भारतात उद्योजक बना असे लहानपणापासून शिकवीत नाही? का अजूनही बहुतांश घरातून “तुला शिकून चांगली नोकरी मिळाली पाहिजे बरे” असेच संवाद ऐकू येतांना दिसतात? “तुला शिकून उद्योगपती बनायचे आहे” असे का ऐकू येत नाही? करोडो तरुण असलेला आपला देश उत्पादनात इतका पिछाडीवर का? इथले बुद्धिमान तरुण इतरत्र का जातात? का त्यांच्या बुद्धीची किमंत केली जात नाही? इथले तरुण करतात काय? तर ग्रामीण तरुण मजुरी न करता व्यर्थ वेळ घालवतांना नाहीतर क्रिकेट खेळतांना खेड्यातून दिसतो आणि शहरी तरुण व्हॉटस अॅप, फेसबुक सांभाळून नोकरीच्या प्रतीक्षेत बसलेला असतो. अर्थात यास काही अपवाद जरूर आहेत पण तेही अगदी थोडके.“मेक इन इंडिया” चे यश अपयश जाऊ द्या परंतू निदान त्याने विदेशातील आणि भारतातील युवकांच्या डोक्यात आपल्याच देशात जागतिक दर्जाचे उत्पादन करावे अशी भावना तर निर्माण झाली.आपली देशभक्ती मोठी क्षणिक असते अतिरेक्यांच्या आडून पाकड्यांनी काही दुष्कृत्ये केली की फक्त त्यांचे पुतळे जाळा, त्यांचा धिक्कार करा.चिनने काही केले की टाका त्याच्या मालावर बहिष्कार.अतिरेक्यांचे पुतळे जाळण्याऐवजी काहीतरी ठोस कृती करा आणि चिनच्या मालाला बहिष्कृत करायचे असेल तर आपण एक उद्दिष्ट ठेवून गुणवत्तापूर्ण निर्मितीचा ध्यास घ्या,अभियंत्यांना प्रोत्साहन द्या त्यांना उद्योग सुरु करण्यास उपयुक्त वातावरण द्या जेणेकरून चिन प्रमाणे आपण सुद्धा निदान एखाद्या देशात तरी आपली मोठी बाजारपेठ निर्माण करू शकू. असंख्य उत्पादनात आज चिनी साहित्य आहे. किती वस्तू बहिष्कृत कराल ? आणि करायच्याच असतील तर व्हीजन असलेले नेते आणि सरकार व कष्टाळू जनता हवी. निव्वळ दिखावू देशभक्ती नको. 

१२/०७/२०१७

Nation remembering Balasaheb Thakre regarding terrorist attack on pilgrims in Amamrnath, Jammu and Kashmir (India)

आठवण “वाघ” गर्जनेची 
     अमरनाथ यात्रेकरूंवर परवा हल्ला झाला आणि आठवण झाली एका वाघ गर्जनेची. याबाबत माध्यमांवर 
छायाचित्रे आणि त्या गर्जनेबाबत अनेकांनी “पोष्ट” केले. त्याच विषयावर लिहायचे म्हणजे लेखन पुनरावृत्ती करण्यासारखे होईल परंतू तरीही त्याच विषयावर लिहित आहे .कारण बाळासाहेब ठाकरेंच्या त्या गर्जनेचे   स्मरण आजही माध्यमांपासून दूर असणा-या  शिवाय बातमीसाठी केवळ वर्तमानपत्रावर विसंबून असणा-या ग्रामीण आणि जेष्ठ नागरिकांना करून द्यावेसे वाटते. परवाच्या अमरनाथ हल्ल्यात अतिरेक्यांनी बसवर गोळीबार करून सात यात्रेकरू ठार केले आणि पसार झाले.जगात तिस-या क्रमांकाची फौज असणा-या देशात अतिरेकी हल्ले करण्यास धजावतातच कसे ? परवाचा हा हल्ला होण्या अगोदर सुद्धा दोन हल्ले लष्करी तळांवर अतिरेक्यांनी केले होते. खरेतर या अतिरेक्यांची पाळेमुळे शोधल्या गेली पाहिजे. यांना जेथून रसद मिळते ती रसद नेस्तनाबूत करायला पाहिजे. येथे तर यासिन मलिक सारखे फुटीरतावादी नेते हाफिज सईदला जाऊन भेटतात. जे अतिरेकी नेते भारताविरुद्ध सतत गरळ ओकीत असतात त्यांना भेटण्याची हिम्मत यासिन मलिक सारखे लोक करतात तरी कशी? परवाच्या या ह्ल्यांमुळे स्मरण होते ते बाळासाहेब ठाकरे यांचे. 1990 च्या दशकात जेंव्हा “अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ले करू” अशी धमकी अतिरेक्यांनी दिली होती तेंव्हा सरकारने किंवा अन्य कुणीही त्यावर भाष्य केले नाही अपवाद होता फक्त बाळासाहेबांचा. 1996 साली या धमकी विरोधात मुंबईतून शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडली “अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही” बाळासाहेबांनी जसे ठणकावलं होते आता तसे ठणकावणार कुणीही नाही अगदी शिवसेनेत सुद्धा. हल्ला झाला की “भ्याड हल्ला होता”, “हम इसकी कडी निंदा करते है” असे म्हणणे किती दिवस चालणार? धटाशी धटच  हवा,युद्धनीती हवी. सर्वपक्षीयांचा एकोपा हवा. इथे तर आपले विरोधी पक्षातील नतद्रष्ट नेते मणीशंकर अय्यर पाकड्यांकडे जाऊन आपल्या पंतप्रधानास हटविण्याची भाषा बोलतात. राहुल गांधी चीनी राजदूताची भेट घेऊन लपवा छपवी करतात. डावे नेते लांगूलचालनात मग्न असतात. 1962 च्या वेळी सुद्धा या डाव्यांची चीन धार्जिणीच वागणूक होती. या अतिरेक्यांना आवर घालण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन “जशास तसे” अशी नीती आखणे जरुरी आहे. शिवाजी राजांचे नांव सर्वच राजकारणी घेत असतात. मग करा ना शिवाजी राजांसारखी  देहदंडाची, हात-पाय कलम करण्याची शिक्षा या अतिरेक्यांना. आपल्याकडे शेतक-यांवर गोळ्या आणि कसाब सारख्या अतिरेक्यांना बिर्याणी खाऊ घातली जाते. कडक शिक्षा हवीच आणि कडक शिक्षा दिल्यावर निरपराधांना मारण्याचे कृत्य करणा-यांची बाजू घेऊन मानवाधिकारवाल्यांनी सुद्धा प्रेमाचा पुळका दाखवू नये. याकूब मेमनच्या फाशी नंतर जे लोक देशद्रोह्यासाठी गर्दी करतात अशांसाठी व अतिरेक्यांना वेसण घालण्यासाठी या देशात बाळासाहेबांसारख्या एक नव्हे निदान 100 नेत्यांची गरज आहे.    

०८/०७/२०१७

8 July 1910 The Great Indian freedom fighter Vinayak Damodar Savarkar jumped into sea to escape from British

त्रिखंडात डंका वाजवणारी उडी 
        आज 8 जुलै. आज दुपारी माझे जेष्ठ बंधू श्री अरविंद ताम्हण यांचा मेसेज आला. तो मेसेज होता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ब्रिटीशांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी जहाजातून समुद्रात मारलेल्या उडी बाबत. थोर पुरुषांच्या केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून एक दिवस त्यांना स्मरून आपण पुन्हा आपल्या व्यापात मग्न होतो. परंतू थोर स्वतंत्रता सेनानी यांच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे स्मरण करणे किंबहुना ते ठेवणे हे सुद्धा आपले कर्त्यव्य नाही का ? श्री ताम्हण यांचा संदेश वाचल्यावर मनात हे विचार आले आणि ते कागदावर उतरवू लागलो. सावरकर यांच्या जीवनातील कित्येक प्रसंग प्रत्येकानी आठवणीत ठेवावे असेच आहेत. आता लोकांच्या सावरकरच लक्षात नाही तर त्यांच्या जीवनातील प्रसंग कसे माहीत असतील.“मारिया” या बोटीवरून पोर्ट होल मधून समुद्रात झेपावल्यावर जख्मांसह समुद्रात उडी मारून मार्सेलिस बेटावर पोहून जाणे हे काही कुण्या ये-या गबाळ्याचे काम नोहे.
विश्वात फक्त आहे विख्यात बहादूर दोन, जे गेले आई करीता सागरास पालांडून
हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान ||
असे वर्णन लोककवी मन मोहन यांनी केले होते.
       जिद्द, मातृभूमीला परकीयांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी असलेली प्रचंड तळमळ असणाराच हे करू शकतो. बेटावर पोहचताच आंतर्राष्ट्रीय नियम दावणीला बांधून त्यांना पुन्हा अटक झाली परंतू ते कितीही संकटे आली तरी निराशेच्या गर्तेत न जाणा-या सावरकरांनी त्याही स्थितीत
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला
 असे काव्य करून  मी काही एवढ्या लवकर हार मानणारा नाही असे इंग्रजांना बजावले. आंतर्राष्ट्रीय न्यायालयात ज्यांच्यावर लवाद चालला ते सावरकर एकमेव. सावरकरांची या देशात खूप उपेक्षा झाली. त्यांचे तैलचित्र संसदेत लागण्यास 50 वर्षे जावी लागली.साहस आणि सावरकर हे सामानार्थीच शब्द. लहानपणीच प्लेगच्या साथीचा साहसाने केलेला सामना, आई वारल्यावर लहानवयात भावंडे आणि वहिनी यांची साहसपूर्वक केलेली देखभाल,तरुणपणी इंग्रजांविरुद्ध इंग्लंड मध्ये जाऊन साहसाने केलेली स्वातंत्र्य कार्ये, अंदमानात यातनांचा साहसाने केलेला सामना, रत्नागिरीत साहसाने केलेली अस्पृश्योधाराची कार्ये आणि 107 वर्षांपूर्वी आजच्या दिनी देशासाठी समुद्र लांघण्यासाठी साहसाने मारलेली उडी. असे साहस अतुलनीय आहे, त्यासाठी  तरुणांनी आणि जनतेने स्वयंस्फूर्तीने 8 जुलै हा “साहस दिन” म्हणून साजरा करणे तसेच तो शाळांमधून साजरा करणे सुरु झाले पाहिजे. जेणे करून आजच्या विद्यार्थ्यांना साहस, धाडस, तळमळ, जिद्द, देशप्रेम या सर्व बाबी काय असतात हे माहिती होईल तसेच त्यांना प्रेरणा सुद्धा मिळेल. त्यासाठी सरकार तसे जाहीर करेल ही वाट पाहण्यात काही अर्थ नाही.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन.     

०६/०७/२०१७

article elaborates about MAHAVITARAN , frequent electricity off in many area of Maharashtra

बत्ती गुल      
     त्या दिवशी दैनंदिन कामकाज आटपून घरी आलो. घरी येतांनाच रस्त्यातच दिवे गेल्याचे दिसले.रस्ते ओले होतील इतका पाऊस झाला होता. नाल्यांतून पाणी सुद्धा वाहिले नव्हते, “वादल  वारं सुटलो गो, वा-यानं तुफान उठलो गो” अशीही परिस्थिती नव्हती आणि तरीही "बत्ती गुल" झाली होती. पूर्वी गॅस बत्त्या असत त्या विझल्या की "बत्ती गुल" झाली असे म्हणण्याची प्रथा कदाचित असावी. आजही विदयुत पुरवठा खंडीत झाला की अनेकजण बत्ती गुल झाली असे म्हणत असतात. घरी री गेलो तर सौ. चे महावितरणच्या न लागणा-या फोनवर फोन लावणे सुरू होते. मुलांचा “बाबा लाईन कधी येते ?” असा ससेमिरा सुरु झाला. ते सुद्धा गरमी आणि डासांमुळे त्रस्त झाले होते. मी ‘फ्रेश’ झालो आणि भगीरथ प्रयत्नांती लागणारा महावितरणचा तो दूरध्वनी लावण्याचा प्रयत्न आता मी करू लागलो.शेवटी एकदाचा तिकडून फोन उचलला. मनातील रागावर मोठ्या प्रयत्नाने ताबा मिळवत मी पलीकडच्या माणसाला “लाईन कधी येईल साहेब?” असा नम्रपणे प्रश्न विचारला “येईल अर्ध्या तासात माणसे गेली आहेत” हे नेहमीचे उत्तर मिळाले. तत्क्षणी मला जपान मध्ये फारच क्वचित लाईन जाते असे कुठेतरी वाचल्याचे स्मरण झाले. मी त्या पलीकडच्या माणसाला त्याबाबत सांगितले तो आश्चर्यचकीत होऊन “हो का ! बापरे !” असे म्हणाला. त्याला “आपल्याकडे असे कधी होणार? आपण कधी सुधारणार?” असे विचारल्यावर तो निरूत्तर झाला मी पण दूरध्वनी बंद केला.पहिलाच पाऊस तोही अत्यल्प, वारा नाही, वादळ नाही तरी वीज गेली होती. आश्चर्य वाटते की यांचे विदयुत वितरण खंडितच कसे काय होते ? एरवी एखाद- दुसरे विदयुत देयक ग्राहका कडून अदा न झाल्यास हे ग्राहकाच्या घरी त्वरीत येऊन धडकतात. वीज पुरवठा बंद केल्या जाईल अशी तंबी देतात आणि यांची वीज जेंव्हा वारंवार बंद होते, विदयुत दाब कमी होतो तेंव्हा मात्र यांना कुणाचीही तंबी नाही का काही कारवाई नाही. मान्य आहे की रात्री-अपरात्री कर्मचारी बंद पडलेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करून खंडीत झालेला  वीज पुरवठा पुन्हा सुरु करतात. परंतू वीज पुरवठा थोड्याश्या कारणाने खंडितच न व्हावा अशा उपाय योजना हे का करीत नाहीत? आता काही दिवसांपूर्वी केंद्रीय उर्जामंत्री यांचे मोठे पान भरून विजे बाबत अमुक करू, ढमुक करू ,प्रत्येक खेड्यात वीज पोहचवू असे मोठे रकानेच्या रकाने छापून आले होते. अहो प्रथम जेवढे आहे ते सुव्यवस्थितरित्या चालवा ना ! ठीक आहे तुम्ही प्रयत्न करीत आहात मान्य आहे ,योग्य आहे परंतू असे न होवो की खेड्यांना स्वयंपूर्ण बनवता-बनवता शहरांची “बत्ती गुल” व्हावी, शहरांचा  विदयुत दाब कमी व्हावा. आधीच खेड्या-पाड्याने जातांना आकोडे टाकलेले दिसतच असतात. तुम्ही प्रथम वीज चोरी संपुष्टात आणा, मोठ मोठ्या रकमांची थकबाकी कुणाची आहे ते जाहीर करा, ती थकबाकी वसूल करा, शासकीय कार्यालयातून होणा-या वीज अपव्यया बाबत काही योजना करा. मान्य आहे की सर्वाना वीज मिळाली पाहिजे परंतू ज्यांना-ज्यांना तुम्ही वीज देणार त्यांच्याकडून वीज देयके त्वरीत वसूल सुद्धा करा नाहीतर उद्या त्यांच्या वीज बिलाच्या माफीची मागणी होईल, मोर्चे निघतील. मग पुन्हा कोट्यवधींची बिले माफ कराल आणि मध्यमवर्गीयांच्या खिशाला ताण देणार, देश आणखी कर्जात बुडवणार. आम्ही तुमचे ग्राहक आहोत सर्व प्रामाणिक ग्राहकांचे तुम्हाला आवाहन आहे की, ते तुमची वीज वापरण्याचे पैसे देतात, प्रामाणिकपणे दर महिन्याला देयके भरतात, ठेव जमा करतात आणि वारंवार वीज जाण्याने क्लेश सुद्धा तेच सहन करतात तेंव्हा  तुम्ही “प्रोफेशनल” बना. प्रमाणिक ग्राहक काही आकोडे टाकून वीज घेत नाही तेंव्हा तुम्ही सुद्धा वारंवार बत्ती गुल होण्याला आळा घाला.