१४/०९/२०१७

A house owner working women that her maid cheated her regarding cast

घरगडी आणि सुरक्षितता 
आपणा सर्वाना जात नावाचा गजकर्ण झाला आहे ज्याला बरे करण्यास कोणतेही जालिम लोशन नाही आहे. यास राजकारणी सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. नवतरुण,उदयोन्मुख पत्रकार यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जात-पात विषय सोडा. कोणीही कामाच्या बहाण्याने खोटे बोलून तुमच्या घरात प्रवेश करू शकते आणि पुढे काही आपत्तीजनक किंवा गुन्हेगारी कृत्यही त्याच्याकडून घडू शकते. तसे अनेकदा झालेले सुद्धा आहे. त्या घरात मोकळेपणे वावरणा-या स्वयंपाकिणीच्या मनात कदाचित पुढे अजून काही काळेबेरे आले असते तर !
नुकतेच पुण्यात स्वत:ची खरी ओळख लपवून एका स्त्रीने दुस-या स्त्रीच्या घरात स्वयंपाक करण्याचे कार्य मिळवले जेंव्हा त्या स्वयंपाक करणा-या बाईची खरी ओळख पटली तेंव्हा घर मालकिणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाकडे फक्त एकच डोळा उघडा ठेऊन पहिले गेले. खरी ओळख लपवून तर आज-काल सरकारी     नोक-या सुद्धा पटकवतात आहे. जात प्रमाणपत्रे,खोटे उत्पन्न, खोटी टायपिंगची प्रमाणपत्रे सर्वदूर खोटी माहिती दाखवली जाते आणि आपला कार्यभाग साधला जातो. वरील प्रकरणात सुद्धा तसेच झाले आहे. मुळात कुणीही जातीभेद करूच नये. परंतू आपण ए पी जे अब्दुल कलामांनी दाखवलेले 2020 चे स्वप्न पाहत आहोत आणि जात काही सोडत नाही. पूर्वी नव्हता इतका जातीभेद लोक आता करीत आहे. मी अमका तू ढमका, ही संघटना ती संघटना . काय चाललंय काय या देशात ? मोठी संत परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात. जेथे एकनाथांनी 500-600 वर्षांपूर्वी आपल्या येथील पितरांच्या जेवणावळीत तत्कालीन अस्पृश्यांना बसवले होते, ज्या सावरकरांनी रत्नागिरीत सहभोजनाचे कित्येक कार्यक्रम घेतले, पतीत पावन मंदीर खुले केले होते. त्याच महाराष्ट्रात अजूनही गरजेसाठी जात लपवतात आणि गरजेसाठी जातीचा अभिमान प्रकट करतात. आपण गौरी-गणपतीला ज्यांचे पोट भरले आहे अशांनाच जेऊ घालतो उलटपक्षी एका तरी पिडीत, गरीब व्यक्तीस, गरीब विद्यार्थ्यास जेऊ घालावे तेंव्हा ख-या अर्थाने गौरी-गणपती पावतील. परंतू पुण्यातील या प्रकरणाने उठसुठ एखाद्या विशिष्ट जातीवर सतत तोंडसुख घेणा-यांना आयते कोलीतच मिळाले. अनेकांनी या प्रकरणावर जातीय बाजूनेच टीका करणे सुरु केले. परंतू या प्रकरणातून एक शिकवण घेणे अत्यंत जरुरी झाले आहे. ते म्हणजे घरी कुण्याही अनोळखी व्यक्तीस काम द्यावयाचे असेल तर त्याची इत्यंभूत माहिती घेणे अत्यावश्यक आहे. कारण कोण कामाच्या बहाण्याने खोटे बोलून तुमच्या घरात प्रवेश करेल आणि पुढे काही आपत्तीजनक किंवा गुन्हेगारी कृत्यही त्याच्याकडून घडू शकते. तसे अनेकदा झालेले सुद्धा आहे. वरील प्रकरणात सुद्धा त्या घरात मोकळेपणे वावरणा-या स्वयंपाकिणीच्या मनात कदाचित पुढे अजून काही काळेबेरे आले असते तर ! ज्याप्रमाणे मोलकरणींना अधिकार मिळत आहे. त्या अनुषंगाने मालकांना सुद्धा काही अधिकार असावे. मालकांनी सुद्धा त्यासाठी एकत्र यावे. काही तरी काम मिळवण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करायचा आणि गैरप्रकार करायचे यामुळे प्रसंगी घरमालकाच्या जीवावर सुद्धा बेतू शकते. मोठ्या शहरांमध्ये असे कित्येक प्रकार घडले आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे लोक पैश्यासाठी काहीही करायला मागे पुढे पहात नाही आहे. यामुळेच घरात काम देतांना व्यक्ती पारखून घेणे गरजेचे झाले आहे. प्रसंगी तुम्ही कोणाला कामावर घेतले आहे मग ती स्वयंपाकीण बाई का असेना, पोलिसांना त्याची माहिती देऊन ठेवा. तुमच्यावर भविष्यात येणा-या आपत्तीची तीव्रता नक्कीच कमी होईल. पुण्यातील या प्रकरणात माध्यमांनी फक्त एकाच “अँगल” ने पाहिले आहे.घरगडी बनणारे जर अशाप्रकारे खोटे बोलून घरात दाखल होत असतील तर यात घर मालक त्याचे कुटुंबीय, लहान मुले यांच्या सुरक्षिततेची सुद्धा एक बाजू नाही आहे का? नुकतेच गुरुगाम येथील घटनेत जर बस कंडक्टर जर पारखून घेतला असता तर लहानग्या निरागस प्रद्युम्नचा जीव गेला नसता. काही वर्षांपूर्वी दिल्लीतील तलवार दाम्पत्याने जर हेमराज या आपल्या घरगड्यास पारखून घेतले असते तर षोडशवर्षीय आयुषीने हकनाक जीव गमावला नसता. पुण्यातील या प्रकरणात ही बाजू सुद्धा ध्यानात घेणे गरजेचे आहे. परंतू आपणा सर्वाना जात नावाचा गजकर्ण झाला आहे ज्याला बरे करण्यास कोणतेही जालिम लोशन नाही आहे. यास राजकारणी सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. नवतरुण,उदयोन्मुख पत्रकार यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जात-पात विषय सोडा. या प्रकरणातून घरगडी कसा खोटारडा झाला आहे,फसवा झाला आहे तो किंवा ती तुमच्या घरात बिनदिक्कत,राजरोसपणे प्रवेशीत होऊन आपला कार्यभाग साधत आहे. जे घडले ते घडायला नको होते परंतू या प्रकरणात सुरक्षितता हा सुद्धा एक विषय आहे हे सुद्धा ध्यानात असणे जरुरी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा