१८/०९/२०१७

Marathi Sahitya Sammelan, Hivra Ashram Dist Buldhana

विघ्नसंतोष
पल्या देशात आपले स्वत:चे काम सोडून     दुस-याच्या कार्यात कसे विघ्न आणता येईल याचाच सतत विचार करणा-या लोकांचे वारेमाप पिक आले आहे. आता यात सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू सुद्धा असू शकतो किंबहुना बरेचदा तो असतोच. सरकार मध्ये सत्ताधारी काही चांगले निर्णय घेत असेल तर विरोधी विकास सोडून राजकारणासाठी त्या विकास कार्यात अडथळा अर्थात विघ्न आणतात. अनेक उदाहरणातून आपणास अशा विघ्नसंतोषी लोकांनी चांगल्या कार्यात घातलेला खोडा आठवत असेल. एकाने काही म्हटले तर दुसरी संघटना म्हणा किंवा व्यक्ती म्हणा आपली बुद्धी दुसरे काही विशेष कार्य नसल्याने त्याच्या विरोधी काहीतरी नवीन टुमणे काढतात. आता मराठी साहित्य संम्मेलनाचेच घ्या ना. बुलढाणा जिल्ह्यात हिवरा आश्रम येथे हे संम्मेलन होणार अशी बातमी येताच जिल्ह्यातील साहित्यप्रेमी सुखावला. शुकदास महाराज यांच्या बाबतीत १९८० च्या दशकात काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतू त्या बातम्यांना शुकदास महाराजांच्या असंख्य भक्तांनी थारा दिला नाही. त्यांच्या वैद्यकीय सेवेबाबत प्रश्न विचारले गेले परंतू त्यांच्या वैद्यकीय सेवेने अनेकांना फायदा झाला असेही अनेक लोक सांगतात.औषधे देण्यासाठी त्यांनी एका तज्ञ डॉक्टरची सुद्धा नियुक्ती केली होती.आश्रमाने अनेक सामाजिक कार्ये केली आहेत.अनेकांना रोजगार मिळाला आहे.तसेच सर्वदूर महाराजांची चांगलीच ख्याती आहे.आमच्या लहानपणापासून कुणालाही महाराजांबद्द्ल चांगलेच बोलतांना ऐकले आहे.महाराजांचे दोष काढणा-यांनी निर्मल बाबा सारख्या बाबां विरोधात काही आंदोलन करावे,राम रहीम बाबत तर या विघ्नसंतोषी लोकांनी अजून ब्र देखील काढला नाही. आता महाराज हयात नसतांना केवळ मराठी साहेत्य संम्मेलन त्यांच्या आश्रमात होत आहे तर त्याला विरोध का ? संम्मेलनाला विरोध होतांना आणखी एका गोष्टीचे अप्रूप वाटले की महाराजांची तुलना थेट प्रख्यात गुंड दाऊदशी केल्या गेली काय तर म्हणे, “आज हिवरा आश्रमात संमेलन भरवता आहात,उद्या दाऊद ने बोलावले तर तिकडेही संम्मेलन भरवणार.” मराठी साहीत्यिकांची बुद्धीभ्रष्ट झाली आहे असे समजता का? अंधश्रद्धेचे समर्थन मुळीच नाही व कुणीही अंधश्रद्धा ठेवू नये. परंतू भारतात सर्वच धर्मीयात लाखो खेड्यापाड्यात फार मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आजही आहे. परंतू हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा जेवढी दाखवली जाते, तिला प्रसिद्धी दिली जाते तितकी इतरांमधील नाही. असे का? एखादी संघटना अशीही निर्माण करावी की सर्वच धर्म आणि पंथातील अंधश्रद्धा निराकरण करण्याचे कार्य करेल. अंधश्रद्धा दूर करायची असेल तर इतरांचे दोष,इतरांना नावे ठेवण्याऐवजी गरीब जनतेच्या मनातील अशी भिती दूर करावी की ज्या भिती मुळे ते अंधश्रद्धा ठेवतात. मी प्रत्यक्ष पाहिलेले उदाहरण,आहे अगदी ताजे. मागील महिन्यात प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात गेलो होतो, माझा क्रमांक आला नव्हता म्हणून वाट पहात बसलो होतो तेंव्हा तेथे एका सुशिक्षित महिलेच्या मुलास गोवर झाला होता व ती याबाबत तिच्या नातेवाईकांशी बोलत होती. ती तिच्या नातेवाईकांना म्हणाली “आता शितला माता मंदिरात जावे लागेल”.महिला सुशिक्षित असूनही तिच्या मनातील शेकडो वर्षांपासून चालत आलेली अंधश्रद्धा दूर झाली नव्हती तर तळागाळातील जनतेचे काय गत असेल? सर्व भारतीयांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करायची असेल तर ठीक ठिकाणी विशेषत: ग्रामिण भागात मोठ्या पडद्यावर वैज्ञानिक पद्धतीने आरोग्य, मानसिक रोग इ बाबत सर्व घटना दाखवा, जनतेच्या मनातील भिती दूर करा तर अंधश्रद्धा दूर होईल. दुस-यांच्या कार्यात खोडा आणून किंवा हयात नसलेल्या ज्या महाराजांवर लाखो जनतेचे प्रेम आहे,आदर आहे,विश्वास आहे,श्रद्धा आहे परंतू अंध नव्हे अशा माणसाविरोधात किंवा त्यांच्या आश्रमाविरोधात बोलून विघ्नसंतोष मिळवण्यात काय अर्थ? असे कार्यात विघ्न आणून अंधश्रद्धा दूर नाही होणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा