बौद्धिक भुक भागवा
खामगांव शहरात दि 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत कै.श्रीपाद कृष्ण
कोल्हटकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन विदर्भ साहित्य संघ खामगांव यांनी केले
होते.हे आयोजन प्रतिवर्षी होत असते.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा
कार्यक्रमाला वृत्तपत्रातून चांगली प्रसिद्धी देण्यात आली होती. जाहीरात, तसेच
“व्हॉटस अॅप” वर सुद्धा संदेश पाठविण्यात आले होते. शहरात मात्र कुठे जाहीरात केलेली दिसली नाही. न.प. ने कदाचित “फ़्लेक्स होर्डींग” बंद केलेले असल्याने ते लावले नसतील.असो ! अनेक
लोक वृत्तपत्रे हमखास वाचतच असतात.त्यांनी या व्याख्यानमालेची बातमी वाचली असेलच परंतू
अत्यल्प श्रोत्यांची पाऊले कोल्हटकर स्मारकाकडे वळली. पहील्या पुष्पात् हरहुन्नरी
व्यक्तीमत्व शिवराय कुळकर्णी यांचे विवेकानंद दिग्विजय विषयावर व्याख्यान
झाले.दुस-या दिवशी “गीता सर्वांसाठी” या विनयजी पत्राळे यांच्या व्याख्यानास
श्रोत्यांची चांगली दाद मिळाली. तर शेवटच्या दिवशी “गजल, विद्रोह आणि जीवन” यातील
डॉ. गणेश गायकवाड यांच्या गजल आणि शेरो-शायरीला श्रोत्यांनी “वाह वा !” म्हणत
प्रतिसाद दिला. तिन्ही दिवस श्रोत्यांना चांगले बौद्धिक खाद्य मिळाले. व्याख्यानमाला सर्वांगसुंदर झाली परंतू मनाला एक बाब खटकली ती म्हणजे श्रोत्यांची अत्यल्प उपस्थिती. पहील्या दिवशी तर फारच कमी उपस्थिती होती. अशा चांगल्या कार्यक्रमांना श्रोत्यांची घटणारी संख्या आणि गल्लाभरु नाच गाण्यांच्या
कार्यक्रमाला होणारी गर्दी पाहून सुज्ञांना खंत वाटते.प्रश्न हा आहे की,
व्याख्यानमालेसारख्या वैचारीक,बौद्धिक कार्यक्रमास श्रोत्यांची इतकी कमी उपस्थिती
का असते? आता कुणाला काही चांगले ऐकावेसे वाटत नाही का? तसे म्हणाल तर घरोघरी
वाहीन्यांवरील तद्द्न भिकारचोट कार्यक्रम, नाच-गाण्यांचा धांगडधिंगा हे मोठ्या
आवडीने पाहीले जाते.त्या कार्यकर्मातील स्पर्धक नाच करीत आहे की “जिम्नॅस्टीक” कला प्रदर्शन करीत आहे हेच समजत नाही. सुज्ञ जन
दिवसातील एक तास सुद्धा व्याख्यानमालेसारख्या बौद्धिक कार्यक्रमांना देऊ शकत नाही?
मराठी किंवा इतर कोणत्याही साहित्याचा अभ्यास करणारे युवक-युवती त्यांचे
प्राध्यापक यांना सुद्धा या व्याख्यानमालेस यावेसे का नाही वाटले? त्यांना
साहित्यात अभिरुची आहे म्हणूनच त्यांनी साहित्य विषय निवडला असेल ना ? पत्रकारांनी चांगले लिहण्यासाठी, आपल्या वृत्तपत्राची भाषा चांगली व्हावी,लेखन चांगले व्हावे
यासाठी अशा कार्यक्रमात थोडी “श्रवण”भक्ती केली तर त्यांच्या कार्यात त्यांना ते
उपयुक्त नाही का होणार? शिक्षक वृंदाना सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावावीशी
नाही वाटली.त्यांना तर शिकवीतांना विविध दाखले,उदाहरणे द्यावी लागतात मग ती मिळणार
कुठून? त्यासाठी वाचन आणि असे कार्यक्रमच उपयुक्त असतात ना ! प्रख्यात कवी, गीतकार
गुलजार यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आहे. विपुल साहित्य वाचन आणि
व्याख्यानमालांतून विविध व्याख्यानांचे श्रवण यांमुळे त्यांची भाषा समृध्द झाली, त्यामुळे चांगले शब्द असलेली गीते ते रचू शकले व म्हणून त्यांची गीते आजही ऐकली जातात.पटकथा लेखक, गीतकार जावेद अख्तर म्हणतात की आज-कालची गीते खराब आहेत कारण नवीन गीतकारांचे साहित्य वाचनच मुळी नाही, मग त्यांना लेखनासाठी काव्यासाठी चांगले
शब्द कुठून सुचतील? बरेच लोक म्हणतात की काय करणार भाषा समृध्द करून? आता ग्लोबल
लँग्वेज इंग्रजीचा जमाना आहे, म्हणून काय मराठी आपली मातृभाषा सोडून द्यायची?
चीनी-जपानी लोक त्यांच्या भाषेबाबत किती जागरुक आहेत. चांगले ऐकल्याने व वाचल्याने
आपणास आपल्या इतर दु:ख आणि इतर तणावांचे काही काळ का होईना विस्मरण होते. आपण
पुन्हा ताजेतवाने होतो. मान्य आहे आताची जीवनशैली व्यस्त आहे परंतू तरीही नियोजन
केल्यास थोडा वेळ तरी अवश्य मिळू शकतो.आता आपल्या विविध गरजा निर्माण झाल्या
आहेत.तशीच बौद्धिक भुक ही सुद्धा आपली एक गरजच आहे आणि ती आपण भागवायला नको का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा