११/०१/२०१८

While speaking with each other student use abusing language, article describes it.

रोजच शिमगा 
   होळी, रंगपंचमी म्हटली की पूर्वी गलीच्छ शिवीगाळ करण्यास सुरुवात होऊन जात असे. गल्ली- गल्लीतून मुलांचे टोळके शिव्या देत जात असे. या दिवशी शिवी देण्याला , मनातील सर्व खराब भावना काढून टाकण्याला मोकळीक असते अशा काहीशा प्रथेमुळे हा असा प्रकार होता .आता शिमग्याला शिव्या देण्याचा हा प्रकार बराच कमी झाला आहे.काही राज्यात असेलही. परंतू शहरीकरण वाढले,आधुनिकता आली तस-तसा हा प्रकार कमी झाला. “बुरा न मानो होली है” यामुळे शिमगा आहे ना मग हे चालणारच म्हणून कोणीही आक्षेप घेत नसे. परंतू हे नित्याचेच झाले तर ? नित्य हे घडले तर आपल्या संस्कृतीचा –हास अत्यंत वेगाने होत आहे हे चटकन लक्षात येईल. आणि खरेच शिमगा आता नित्याचाच झाला आहे.तरुणांचा देश म्हणून आपण मिरवतो त्या आपल्या देशातील विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी हल्ली दिवस निघाल्या बरोबर शिवी आणि अश्लील शब्द उच्चारण्यास सुरुवात करतात. घरून  शाळा, महाविद्यालयात आले की आप-आपल्या ग्रुप मध्ये चर्चा करीत असतांना हे तरुण वाक्यापरत अश्लील शब्द व शिव्यांची लाखोली वाहत असतात. त्यांच्या जिव्हेवर काही अश्लील शब्द इतके रुळले आहे की ते सहजरीत्या त्यांचे उच्चारण करीत असतात. असली शिवराळ,गलीच्छ,शिव्यांनी युक्त भाषा बोलतांना आपल्या आजूबाजूला मुली,महिला किंवा अगदी त्यांच्या महाविद्यालायातीलच महिला कर्मचारी किंवा त्यांच्या महिला शिक्षिका असतील हा सुद्धा विचार हे तरुण,हे भारताचे भावी आधारस्तंभ करीत नाही.सर्वच तरुण असे नाही याची खात्री आहे.परंतू जास्तीत जास्त तरुणांना आपसांत बोलतांना ही शिव्या,अश्लील शब्द उच्चारण करण्याची वाईट सवय जडली आहे.यांच्या शिक्षक, शिक्षिका किंवा ज्या परिसरात हे शिकतात आणि आपला वेळ घालवतात त्या परिसरातील नागरिक सुद्धा हेच सांगतील की हल्ली मुले शिव्या खूप देतात.“बाष्कळपणें बोलों नये” असे रामदास स्वामींनी म्हटले आहे तरीही आजचा तरुण किती बाष्कळ बोलत आहे.जो तरुण आता रामदास स्वामीनाच विसरत चालला आहे तो त्यांचे श्लोक काय ध्यानात ठेवणार? थोर पुरुषांचे होर्डिंग लावून त्यांच्या जयंतीच्या मिरवणूकीतून उत्साहाने नाचणा-या या तरुणांच्या मुखी या शिव्या,हे अश्लील शब्द रूळण्यास मूल्य शिक्षणाचा अभाव,पालकांनी “प्ले गृप” पासून शिक्षकांवर सोपवलेली मुलांची जबाबदारी, शिक्षक व शैक्षणिक संस्थांचे केवळ फी/ डोनेशन भरणारा एक म्हणून त्याच्या कडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पहाणे, शिवी किंवा अश्लील बोलल्यावर शिक्षकाला त्यास शिक्षा न करता येणे या सर्व बाबींचा समावेश आहे. बालपणापासून शिक्षणामध्ये मूल्य शिक्षण, अध्यात्मिकता,प्रार्थना यांचा समावेश असणे अत्यंत जरुरी आहे.स्वामी विवेकानंद म्हणतात की, “प्रार्थने पासून शिक्षणास सुरुवात केली तर शिक्षक व विद्यार्थी दोघांचीही एकाग्रता वाढते” त्या देशातच आता प्रार्थने विरोधात याचिका केली जाते.प्रार्थनाही जर बंद झाली तर मग तर आणखी अधोगती होणार आणि रोजच अधिक प्रमाणात शिमगा होतांना दिसणार. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा