२७/०२/२०१८

MCQ exam about Shivaji the great held on his birth anniversary by Bajrang Dal & VHP Khamgaon, Maharashtra

शिवज्ञान स्पर्धा एक स्तुत्य उपक्रम  
     गेल्या वर्षांपासून विहिंप व बजरंग दल खामगांव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करणे सुरु केले आहे. मागील वर्षी 19 फेब्रुवारी या दिनी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर यंदा शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन दोन गटात करण्यात आले होते . मागील वर्षीपासून हजारोच्या संख्येने विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग नोंद्वत आहेत. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या बाबत सर्वांनाच माहिती असणे जरुरी आहे.
“काशीजीकी कला जाती , मथुरामे मस्जिद होती अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी”

असे वर्णन कवी   ने केले आहे या एकाच ओळीवरून शिवाजी महाराज त्यांचे कार्य , त्यांची जिद्द , त्यांची धडाडी हे सर्व कळून येते त्यामुळे अशा स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे विद्यार्थी वाचन करतात आणि त्यांना इतिहास ज्ञात होतो. निव्वळ रॅली, डीजे मिरवणुका काढण्यापेक्षा थोर व्यक्तींची माहिती, त्यांचे विचार समाजात आणखी पसरविण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन हे निश्चितच जास्त सकारात्मक ठरेल , प्रेरणादायी ठरेल, त्यांचे विचार आत्मसात करण्यास बळ देणारे ठरेल. शिवाजी महाराजांची स्मारके , पुतळे तर आहेतच आणि होणारही आहेत परंतू शिवाजी आपल्या मनात आपल्या रक्तात आहे का ? लोकप्रतिनिधी शिवाजीचे नांव धेतात परंतू शिवाजी प्रमाणे विचार खरेच ठेवतात काय ? नागरिक , युवक शिवाजीच्या नावाने जल्लोष करतात परंतू शिवाजी राजांचे शंभर टक्के गुण तर कुणीच अंगी बाणवू शकत नाही. निदान शिवाजीचा एक तरी गुण हल्लीचे शब्दापरत , वाक्यापरत शिव्या , अश्लील शब्द उच्चारणारे तरुण अंगी बाणवण्याचा संकल्प करू शकतील काय ? अनेक तरुण आजही चांगले कार्य करीत आहेत परंतू त्यांची संख्या अत्यल्प. आयोजकांनी पुढील वर्षी महाविद्यालयीन तरुणांना सुद्धा या स्पर्धेत सहभागी करून घ्यावे व परीक्षेनंतर महिला, मुली यांचेसमोर तसेच शाळा , महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द व शिवीगाळ न करण्याची प्रतिज्ञा त्यांच्या कडून करून घ्यावी असे विनम्रपणे सांगावे वाटते. हल्ली कुणीही जणू काही मोठा इतिहास संशोधक आहे या आविर्भावात काहीही बरळतो आणि वाद उपस्थित करतो , राजकीय पोळी शेकण्यासाठी समाजात ,जातीत तेढ निर्माण करतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी वाचन करून अशा परीक्षांना सामोरे गेल्यावर त्यांना निश्चितच खरा तो काय इतिहास कळण्याची मोठी शक्यता निर्माण होते आणि त्यामुळे भावी पिढी निश्चितच स्वत:च्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करेल कुणाच्या सांगण्यावरून काही दुष्कृत्य करणार नाही अशी आशा आहे. आयोजकांनी स्पर्धेचे आयोजन सुनियोजितरित्या केले, विद्यार्थी उत्साहात होते , अनेक लोक स्वयंस्फूर्तीने शक्य तो हातभार लावत होते. एकूणच सर्व वातावरण शिवभक्तीने भारावलेले होते.  या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य करणारे श्री अमोलभाऊ अंधारे, श्री राजेंद्रदादा राजपूत, श्री बापूसाहेब करंदीकर, श्री बापूसाहेब खराटे व त्यांना मदत करणारे सर्व कार्यकर्ते तसेच विविध खाजगी शिकवणी वर्ग संचालक व शाळा शिक्षक हे निश्चितच अभिनंदनास पात्र ठरतात. व समाजाने सुद्धा त्यांचे अभिनंदन करणे क्रमप्राप्त आहे कारण पुढील कार्य करण्यास त्यांना उत्साह प्राप्त होतो व बळ निर्माण होते.            

२२/०२/२०१८

Nirav Modi fraud ,PNB scam and honesty of Ex Prime Minster LalBhadur Shastri's wife Mrs Lalitadevi while repayment of PNB loan

नीरव, पीएनबी घोटाळा आणि सौ शास्त्रींचा प्रामाणिकपणा    
     सध्या भारतात एका पाठोपाठ एक घोटाळे उघडीकीस येण्याचे प्रकार घडत आहेत. पूर्वीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली तर सद्यस्थितीत बँक कर्मचारी आणि अधिकारी यांचेशी साटेलोटे करून कर्ज घेऊन ते बुडवून विदेशात पसार होण्याची प्रकरणे घडत आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पळून गेलेला विजय मल्ल्या आणि आता खोटे द्स्ताऐवज करून व्यापार करणारा आणि करोडो रुपयांचा अपहार करणारा नीरव मोदी. केवळ बँकांनाच नव्हे तर आपल्या “सेलिब्रेटी” ग्राहकांना सुद्धा या नीरवने काही हजार किंमत असेलेले हिरे लाखो रुपयांत  विकले आणि फसवले. नीरवचा हा घोटाळा गेल्या अनेक वर्षात घडत आलेला आहे . सामान्य ग्राहक रीतसर पद्धतीने कर्ज घेण्यास गेला असता बँक अधिकारी त्यास जणू स्वत:च्या खिशातून पैसे देत आहे अशा आविर्भावात त्याला भिक मागायला आलेला भिकारी समजतात आणि अक्षरश: हाकलून लावतात.आणि गब्बर लोकांच्या पुढे काही हजाराच्या तुकड्यांसाठी लोटांगणे घालतात. हे गब्बर लोक आधी कर्ज मंजूर करवून घेतात आणि नंतर हे भ्रष्ट बँक अधिकारी त्यांच्यामागे कागदपत्रांसाठी फिरतात. कित्येक बँकांत तर मेंटनन्स,स्टेशनरी इ.साठी अव्वाच्या सव्वा बिले लावली जातात. नीरव, मल्ल्या आणि इतर अनेक कर्ज बुडवे या देशात आहे. एवढे मोठे घोटाळे हे करतात आणि कुणालाच काही कळत कसे नाही ! आणि कळते तेंव्हा घोटाळेबाज  विदेशात पोहोचलेला असतो. आणि आपले लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत राहतात. काही कर्मचारी आणि अधिकारी बडतर्फ केले जातात तर काहींची बदली होते. निव्वळ बँक कर्मचा-यांना बडतर्फ करून किंवा बदल्या करून फायदा नाही तर रिजर्व बँक, ऑडीट करणारी यंत्रणा , गुप्तचर यंत्रणा या कर्मचा-यांवर सुद्धा कायद्याचा बडगा उगारायला हवा. हे सर्व घडत असतांना ते काय करीत असतात ? असा प्रश्न पडतो. परंतू तसे काही होतांना दिसत नाही “ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द” असे बिरूद मिरवतात आणि कर्ज बुडवून देश आणि गरीबांना लुटतात. स्टेट बँकने म्हणे मिनीमम बॅलन्स दंड आकारून दोनशे करोड रुपये कमावले आहे. कबीर युं धन संचीये जो आगे को होय” अशा वृतीने पै-पै जोडणा-या ज्या गरिबांजवळ पैसे नाही त्यांच्याच खात्यात कमी रक्कम होते म्हणून त्यावर बँक दंड आकारते म्हणजे बँक आणि हे कर्ज बुडवे दोघेही गरीब आणि मध्यम वर्गीयांना लुटत आहेत. याचा पार्श्वभूमीवर तरुण भारत मध्ये भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पत्नी सौ लालितादेवी शास्त्री यांची बातमी वाचनात आली. पंतप्रधान झाल्यावर शास्त्रीजींकडे कार नव्हती तेंव्हा त्यांनी 12 हजार रुपयांची फियाट कार घेतली 7 हजार रुपये त्यांचाकडे होते पाच हजाराचे कर्ज त्यांनी पी एन बी कडून घेतले होते. पुढे या कर्जाची परतफेड सौ शास्त्री यांनी त्यांच्या पेन्शन खात्यातून केली होती अशी आठवण त्यांचे पुत्र श्री अनिल शास्री यांनी सांगतली. पूर्वी कर्ज असले की ते फेडायचे अशी भावना असे. आता मात्र तसे नाही राहिले. मोठे व गब्बर लोक करोडो रुपयांची कर्ज घेऊन लुटारुंप्रमाणे बँकां लुटत आहेत. सौ ललितादेवी शास्त्री यांच्यासारख्या प्रमाणिक व्यक्तींची  जमात लुप्तप्राय होत चालली आहे. बँकांनी आणि सरकारनी कर्ज फेडणा-या प्रामाणिक कर्जदारांचा सत्कार करणे किंवा त्यांना बक्षीस देणे सुद्धा सुरु केले पाहिजे जेणे करून त्यांना सुद्धा आनंद होईल व सकारत्मक भावना तसेच कर्ज फेडण्याची वृत्ती निर्माण होण्यास पाठबळ मिळेल. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कर्जासंबंधीचे नियम अधिक योग्य करण्याची आणि भ्रष्ट कर्मचा-यांना कठोरात कठोर शिक्षेची तरतूद करणे अत्यंत जरुरी झाले आहे अन्यथा हे लुटारू असेच देश पोखरत राहणार    

१५/०२/२०१८

Article describes Valentine Day and Indian culture and concept of love since thousands of years

है प्रीत जहाँकी रीत सदा....    
        “है प्रीत जहाँकी रीत सदा” अशी रीत सदैव पाळत आलेल्या अर्थात प्रेम देणे , सर्वांप्रती प्रेम बाळगणे हे जाणून असलेल्या भारतीयांना निदान प्रेमाबाबत तरी कुणाकडून काही शिकण्याची गरज नाही. कित्येक युगांपासून भारतात प्रेमाच्या महतीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. रामायणातील प्रभू रामावरील प्रेमापोटी त्यांना उष्टी बोरे देणारी शबरी आणि तिचे प्रेम पाहून ती उष्टी बोरे खाणारे श्रीराम , जेष्ठ बंधू रामावरील बंधूप्रेमापोटी त्याच्यासह वनवास पत्करणारा लक्ष्मण आणि तो येईपर्यंत अयोध्या नगरी बाहेर राहणारा भरत , महाभारतात पित्यावरील  प्रेमासाठी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेऊन नंतर भीष्म म्हणून ओळखल्या गेलेला ‘पितृप्रेमी देवव्रत’. मित्रप्रेमापोटी मित्र चुकीचा आहे हे माहीत असूनही त्याला साथ देणारा कर्ण, भगिनी प्रेमासाठी तिच्या मदतीसाठी धावून जाणारा आणि गरीब मित्राने आणलेले पुरचुंडीतील पोहे आवडीने खाणारा व्दारकाधीश भगवान श्रीकृष्ण,  प्रेम आणि शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध,भगवान महावीर,  
“पोथी पढ पढ जग मुआं पंडीत भया न कोय ढाई अखर प्रेम का पढे जो पंडीत होय”

असा संदेश देणारा संत कबीर, कृष्णप्रेमामुळे आनंदाने विषप्राशन करणारी संत मिराबाई, पतीप्रेमासाठी डोळ्यावर पट्टी बांधून घेणारी गांधारी, पतीला मृत्यूच्या दाढेतून परत आणणारी सावित्री, मातृभूमी वरील प्रेमासाठी रडत-रडत “ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला” असे काव्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच हसत-हसत फासावर जाणारे अनेक क्रांतिकारक. एवढेच काय तर मालकावरील प्रेमापोटी त्याला सुरक्षित ठिकाणी पोहचवल्यावर प्राण सोडणारा महाराणा प्रताप यांचा चेतक हा घोडा. अशी भारतातील प्रेमावरील हजारो उदाहरणे देता येतील. त्याच भारतात आज मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी एका दिवसाचा अर्थात “व्हॅलेन्टाईन डे”चा आधार घेतला जातो आहे. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे या दिवसानंतर काही दिवसांनी म्हणे “ब्रेकअप डे” सुद्धा साजरा केला जातो. म्हणजे आज प्रेम आणि उद्या पुन्हा वेगळे. निरंतर प्रेमाची महती सांगणा-या, देहाशी नव्हे तर आत्म्याशी प्रेम करा ही शिकवण जगाला देणा-या आपल्या भारतात आता प्रेम हे असे काही दिवसांपुरते क्षणिक झाले आहे. कोणते दिवस साज्र्रे करायचे आणि कोणते नाही हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी मग पोशाख आणि संस्कृती यांबाबतच का पाश्चात्त्यांचे अंधानुकरण का केले जाते ? त्यांची शिस्त, देशप्रेम, वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकाटी, अभ्यासू वृत्ती , बुद्धिमत्तेचा आदर करणे व आरक्षण नव्हे तर बुद्धिमत्तेच्या जोरावर नोकरी मिळवणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेस इजा न पोहचवणे व इतर अनेक चांगल्या अशा गोष्टींचे अनुकरण का होतांना नाही दिसत ? आपल्याकडे तर चांगली सुशिक्षित माणसे रस्त्यांवर थुंकतात, जरा कुठे काही खट वाजले की वाहने पेटवतात, दगडफेक करतात , सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. निव्वळ पाश्चात्त्यांच्या चंगळवादाचे अनुकरण सुरु आहे त्यांच्या चांगल्या बाबींचे अनुकरण मात्र होतांना दिसत नाही. तरुण पिढीने हे स्विकारणे जरुरी नाही का? त्यांना तसे पटवून द्यायला नको का ? तरुणांनो तुम्ही खुशाल पाश्चात्त्यांसारखे “व्हॅलेन्टाईन डे” सारखे दिवस “सेलिब्रेट” करा परंतू त्यासोबतच  पाश्चात्त्यांचे वर उल्लेखलेले गुण सुद्धा अंगीकारण्याचा थोडा का होईना प्रयत्न करा. “है प्रीत जहाँकी रीत सदा” अशी प्रेमाची परंपरा असलेल्या आपल्या देशात आपल्या भावी पती किंवा पत्नी समोर प्रेम भावना व्यक्त करतांनाच आपले माता-पिता, बंधू-भगिनी, मित्र परिवार, आपला देश तसेच समस्त देशवासी यांच्याबाबत सुद्धा प्रेम बाळगण्याचे ध्यानात असू द्या. 

०८/०२/२०१८

Article about saving daughter and teaching daughter as well as about joint family system

लेक वाचवा लेक शिकवा, तसेच कुटुंबव्यवस्था सुद्धा टिकवा
     
   सध्या लेक वाचवा आणि लेक शिकवा हे अभियान राबवणे जोरात सुरु आहे. या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित होत आहे. हे निश्चितच अभिनंदनीय आहे. जग आता फार पुढे चालले आहे. लेक म्हणजेच महिलांना आता कायद्याच्या अनुषंगाने मोठा आधार आणि बळ प्राप्त झाले आहे. मुलींना आज शिक्षण मिळत आहे, त्या स्वत:च्या पायावर उभ्या रहात आहेत, सक्षम आहेत, सबळ आहेत. यात सावित्रीबाई फुले यांचा महत्वाचा वाटा आहे तसेच कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, रमाबाई यांचा सुद्धा वाटा दुर्लक्षित करून चालणार नाही.आज जगात अनेक नवीन दालने करीअरच्या नवीन वाटा निर्माण होत आहे यासाठी शिक्षण संस्थानी करीअर काऊन्सिलिंगचा एक स्वतंत्र विभाग शाळा व महाविद्यालयात सुरु केला पाहेजे. कारण अनेक विद्यार्थ्यांना करीअर करण्यासाठी अनेक नवीन क्षेत्रांची जाण नसते. तसेच मुले असोत वा मुली यांनी आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देण्याची नितांत गरज आहे. किशोरावस्थेतच काही सवयी किंवा व्यसन जडण्यास सुरुवात होत असते त्याच्या दुष्परीणामांची जाण त्यांना नसते. कुण्या मित्र मैत्रिणीचे प्रलोभन, आग्रह यास बळी पडून ही सुरुवात होत असते. आज-काल सुशिक्षित लेकींमध्ये सुद्धा धुम्रपान व मद्यपान यांच्या सवयी जडल्याची अनेक उदाहरणे आहेत. महिला असो वा पुरुष दोघांच्याही शरीरावर या व्यसनांचा मोठा परिणाम होतो. महिलांच्या बाबतीत होणा-या बाळाला सुद्धा त्यांच्या आईच्या व्यसनाचा परिणाम भोगावा लागतो. आजकाल या सर्व बाबी शिक्षणातून हद्दपारच होत आहे. पूर्वी शैक्षणिक अभ्यासक्रम तर पूर्ण व्हायचाच सोबत शिक्षक इतर अवांतर अनेक गोष्टी सांगत असत. आता शिक्षक व विद्यार्थ्यातील तो संवादच हरवलाय. तसे पाहिले तर आताच्या काळात मुलींना शिक्षणासाठी विशेष प्रोत्साहन देण्याचे किंवा प्रेरित करण्याचे विशेष काम नाही. त्यांना शिक्षणाचे महत्व चांगलेच समजले आहे तसेच ते पालकांना सुधा चांगले पटले आहे. मुलींचा जन्मदर सुद्धा वाढत आहे. कायदा सुद्धा आता मुली व महिला  यांच्या बाजूने अधिक सक्षम झाला आहे. परंतू त्या बाबत अधिक निर्माण करणे जरुरी आहे. साधी मुली , महिला यांना पाहून शेरेबाजी किंवा त्यांना उद्देशून एखादे फिल्मी गाणे जरी म्हटले तरी पोलीस कारवाई करू शकतात परंतू हे मुलींना, महिलांना माहीतच नसते. त्यासाठी बहुतांश पोलीस ठाण्यांनी एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्याचे वितरण सुद्धा झाले आहे. परंतू म्हणावे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. यासाठी विविध महिला मंडळे, क्लब यांनी पोलीस विभागाच्या सहाय्याने ती महिलांच्या संरक्षण बाबतच्या कायद्याची पुस्तिका प्राप्त करून त्याचे वितरण विद्यार्थीनीना करायला हवे. लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाने निश्चितच महिलांबाबत सकारात्मक चळवळ निर्माण झाली आहे. नारी आदर हा तर भारतात अनादी काळापासून आहे. परंतू आपण आपल्याला आपल्या अनेक चांगल्या बाबींचे विस्मरण होत चालले आहे. दुर्दैवाने आज लेक शिकली आहे, नोकरी करते आहे परंतू कुटुंब मात्र तुटत चालली आहेत. आजच्या लेकीला फक्त राजा-राणीचा संसार हवा आहे. काही अपवाद आजही आहेत. कुटंब तुटण्यात फक्त लेकच दोषी असते असाही अर्थ कुणी काढू नये. तसेच लेक आता वाचवली जात आहे ,शिकवली जात आहे. लेकीने जरूर शिकावे, पुढे जावे त्यासोबतच कुटुंबव्यवस्था जी आता मोडकळीस आली आहे ती सुद्धा आपल्या नोकरी व कामच्या व्यापातून सांभाळण्याचा थोडा का होईना प्रयत्न करावा आपल्या मात्यापित्या प्रमाणेच पतीचे सुद्धा माता पिता असतात हे ध्यानात घ्यावे,एकत्र राहणे जरी शक्य नसेल तरी कार्य प्रसंगी एकत्र यावे प्रेम,आपुलकीचे शब्द बोलावे जेष्ठ नागरिकांना ते सुद्धा खूप असते.
शब्द बराबर धन नहीं, जो कोई जाने बोल |. हीरा तो दामो मिले, शब्द मोल न तो||

लेक वाचवा,तिला शिकवा तसेच वसुधैव कुटुंबकम अशी शिकवण देणा-या आपल्या भारतात आपले स्वत:चे कुटुंब सुद्धा टिकवावे अशी शिकवण सुद्धा सर्व पालकांनी आपल्या लेकीस द्यावी. 

०१/०२/२०१८

Article about remembering the days of Slate and Pencil

एका लेखणीत जादू
   लेखणी म्हणजे काय असते ? असा प्रश्न विचारला जाऊ शकणा-या आजच्या काळात थेट शीर्षकातच लेखणी शब्द वापरावा की नाही अशी शंका मनात उद्भवली परंतू विचार केला की मोबाईल, ई-बुक , ई- लर्निंगच्या काळातील स्मार्ट पिढीस  पूर्वी केवळ लेखणीनेच लिहित असत हे सुद्धा कळायला हवे आणि याच शीर्षकांतर्गत लेख लिहिणे सुरु केले. इंटरनेटने जवळ आलेल्या मित्रांच्या गप्पांमध्ये जास्तीत जास्त आठवणी असतात त्या  बालपणीच्या. आता ज्यांचे वय 30 च्या पुढे आहे त्यांच्या शालेय जीवनात तर ब-याच गमती-जमतीअसत.गळ्यात दप्तर रबराचे, त्यामध्ये पुस्तक चित्राचे हातात डब्बा कडीचा...त्यामध्ये लाडू बुंदीचा अशा रीतीने सर्वांचे गोजिरवाणे आप-आपल्या शाळांत पायीच रवाना होत.शाळेत गेल्यावर त्यांचे अजब खेळ असत. शाळेच्या बिना गजांच्या खिडकीतून हुंदडणारी ही मुले आपल्या सुपीक डोक्यातून अनेक कल्पना काढीत असत. शिक्षकांना भंडावून सोडत.शिक्षक कडक होते परंतू तेवढेच प्रेमळ सुद्धा. सांगायला वाईट वाटते पण आता विद्यार्थ्यांप्रती प्रेम, माया, आपुलकी थोडी लुप्त झाली आहे. आता प्रोफेशनल जमाना आहे ना ! असो !  ही मुले मधल्या सुटीत मातीत छोटा खड्डा करून त्यात मुंगळा टाकत आणि वरुन एखादा काचाचा तुकडा लावत मुंगळा त्यात अडकला की मग त्याची मजा पहात बसत या त्यांच्या छोट्या “झू” मध्ये त्यांना किती आनंद मिळे.मातीत खेळण्याला मनाई नव्हती. आता किती हायजेनिक जमाना आहे. मातीत खेळणे बंद झाले. जुने टायर काडीने लोटण्याचा खेळ खेळतांना पडून कधी काही लागले तर मुले प्रथम त्यात माती भरत असत. स्कूटरचे किंवा राजदूतचे टायर असणारा मुलगा भाव खाऊन जात असे. या मुलांचा अजून एक खेळ असे तो म्हणजे कुणी काही नवीन आणले की ते दाखवणे. ते सुध्दा ही मुले फुकट दाखवीत नसत. “एका लेखणीत जादू” या पद्धतीने ते आपल्या जवळील
गंमत दाखवीत असत. “एका लेखणीत जादू” ही लेखण मिळवण्याची अनोखी जादू त्या काळात सर्वच मुले करीत. दगडी आणि फुसकी अशा लेखण्या मुलांकडे असत. दगडी म्हणजे टणक लेखण आणि फुसकी म्हणजे ठिसूळ. भूश्यात लेखणी भरलेला तो लेखणीचा पुडा वडीलांनी आणला की आताच्या मुलांना एखादा टँब किंवा मोबाईल आणल्यावर जसा आनंद होईल तसा आनंद होत असे. कुणाची दगडी, तर कुणाची फुसकी तर कुणाची रंगीत लेखण असे. दुस-या जवळ आहे तशी लेखण मग आपल्याकडे सुद्धा असावी म्हणून मग “एका लेखणीत जादू” करायची,आपल्या जवळील काही तरी अनोखे दाखवायचे आणि लेखण मिळवायची. अशी युक्ती अनेक मुले करीत. ज्यांच्या जवळ मग अनोखे असे काहीच नसे,खेळणे नसे,कला नसे अशी ग्रामीण भागातील मुले मग रिकाम्या आगपेटीत थोडे गवत आणि त्यावर एक रंगबेरंगी किडा आणत आणि “एका लेखणीत जादू” म्हणून इतरांकडून लेखण मिळवली की तो किडा दाखवत.तेंव्हा तो किडा पाहण्यात किती नैसर्गिक आणि निरागस आनंद होता तोही फक्त एका लेखणीत.एका लेखणीत म्हणजे तेही अख्ख्या लेखणीत नव्हे तर लेखणीच्या एखाद्या तुकड्यात.“बचपन के दिन भी क्या दिन थे उडते फिरते तितली बनके” असे हे दिवस गेले की परत येत नाही.आता मुलांना खेळण्या बागडण्यास फार कमी वेळ असतो.तेंव्हा मुलांना चांगले खेळू-बागडू द्या.आपण नाही का किती खेळलो !आता आपल्या मुलांना सतत अभ्यास,क्लास,1760 गल्लाभरू सामान्य ज्ञान, चित्रकला, रंग भरो स्पर्धा यांत व्यस्त असलेले पाहून, त्यांच्या पाठीवरचे ते मोठे ओझे पाहून असे वाटते की कुणी तरी परत एका लेखणीत जादू करावी आणि आपल्या अनोख्या जादूने आताच्या बालकांना 1980 च्या पूर्वीच्या दशकात जसे निरागस, तणावमुक्त,अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवणारे बालपण होते तसे बालपण आणून द्यावे.