२६/०४/२०१८

India is on fourth rank in IPSOS MORI survey, article elaborates India and its Universal Tolerance and all religion acceptance concepts


सहिष्णूतेसाठी आम्हाला क्रमांकाची गरज नाही
काल ‘बीबीसी’साठी सर्व्हे करणा-या ‘इप्सॉस मुरी’ या संस्थेने सहिष्णूतेबाबत जागतिक सर्व्हे करून विविध देशांना सहिष्णूतेनुसार क्रमांक दिले. यात भारत चौथ्या स्थानी आला आहे. या क्रमवारीत कँनडा,चिन आणि मलेशिया हे भारताच्या पुढे आहेत. भारताला सहिष्णूतेबाबतचे ‘सर्टिफीकेट’ किंवा क्रमांक इतर देशाने किंवा तेथील कुण्या संस्थेने देण्याची तसदी घेण्याची तशी काही आवश्यकता नाही. भारत हा युगानुयुगे त्याच्या सहिष्णूतेसाठी सुप्रसिद्ध आहे. तसा सर्व्हे केलाच तर त्यात वास्तविकता सुद्धा असावी. ज्या चीनला या सर्व्हेमध्ये दुसरा क्रमांक दिला आहे त्या चीनमध्ये मुसलमानांना कोणत्या दर्जाची वागणूक मिळते ? तिथे त्यांच्यावर किती निर्बंध आहेत ? त्यांना तेथे रमझान ,रोजे हे पाळता येत नाही. कामगारांचे हक्क , त्यांच्यासाठी कायदे , जगात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणा-या फेसबुक व गुगल सारख्या वेबसाईटवर बंदी. चीन मधील ही वास्तविकता ‘इप्सॉस मुरी’ ला दिसली नाही का ? की त्याकडे इतर हेतूपुरस्सर डोळेझाक केली गेली. जगातील इतरही देशात विविध धर्मियांवर , विविध देशातील नागरिकांवर हल्ले होत असतात त्या मानाने भारतात हे प्रमाण कमी आहे. खरे तर आता भारत हा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहे व आंतर्राष्ट्रीय पातळीवर भारत चांगलाच प्रगतीपथावर आहे. यामुळेच काही जण चौथ्या क्रमांकावरही खुश आहे. तर काही भारतच्या प्रगतीचा वारू चौखूर उधळला आहे म्हणूनच या यादीत भारताला चौथ्या क्रमांकावर टाकले आहे असे म्हणतात. सर्व धर्मांना समावून घेण्याचे महान कार्य जगाच्या पाठीवर कुठे झाले आहे तर ते आपल्या भारतात. केवळ सामावूनच नव्हे तर त्यांना त्यांचे धर्मपालन करण्यास , धर्मप्रसार करण्यास येथे कोणतीही बंदी नाही. येथे धर्माने मुस्लिम वैज्ञानिक माजी राष्ट्रपती संतांच्या दरबारी जातो तर अनेक हिंदू अजमेर या ठिकाणी जातात. गुरुद्वारामध्ये जाती-भेद धर्मभेद बाजूला सारून रोज लंगर चालवले जातात. स्वामी विवेकानंद म्हणतात
I am Hindu, I am proud to belong to a religion which has taught the world both tolerance and universal acceptance. We believe not only in universal toleration, but we accept all religions as true.
स्वामीजी म्हणतात आम्ही जागतिक सहिष्णूता असावी असे मानतो तसेच आम्ही सर्व धर्मांचा स्विकार करतो असे म्हटले आहे. स्वामीजींच्या या वक्तव्याला भगवान श्रीकृष्णाचा “वसुधैब कुटुंबकम” तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या “अवघे विश्वाची माझे घर” यांचासुद्धा आधार आहे. युद्धातील संहार पाहून विरक्त झालेला सम्राट अशोक, जगातील दु:ख पाहून बुद्ध झालेला सिद्धार्थ, शत्रूला जीवदान देणारा पुथ्वीराज चौहान सहिष्णूतेची अशी कितीतरी उदाहरणे या भारतभू मध्ये घडली आहेत. पुरस्कारवापसी,चिमुरड्या मुलींवर होणारे अत्याचार या गेल्या काही काळत घडत आलेल्या घटना पाहता 27 देशांच्या या यादीत भारताला चौथा क्रमांक मिळाला हे सुद्धा काही थोडके नव्हे. जे कुणी भारतीय भारत असहिष्णू आहे अशी ऊठसुठ ओरड करीत असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही एक चपराक म्हणावी लागेल. हंगेरी सारखे देश तर स्वत:च त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णु मानतात. हे पाहता भारतातील 63 टक्के नागरीकांनी भारत सहिष्णू असल्याचा कौल दिला आहे. “वसुधैव कुटुंबकम” ही संकल्पना मानणारा भारत तसेच We believe not only in universal toleration, but we accept all religions as true. ही विवेकानंदांची संकल्पना स्विकारलेला भारत, महावीर, गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश पालन करणारा भारताला ‘इप्सॉस मुरी’ च्या सर्व्हेने जरी चौथ्या क्रमांकावर टाकले असेले तरी सहिष्णूतेसाठी आम्हाला क्रमांकाची गरज नाही.         

१९/०४/२०१८

Buttermilk is known as Nectar on the earth. article elaborates buttermilk distribution in Khamgaon city of Dist Buldhana Maharashtra

“तक्रं शक्रस्य दुर्लभम”...किंतु खामगांववासियाणाम सुलभम 
     शीर्षकाचा अर्थ ताक हे इंद्राला सुद्धा दुर्लभ आहे परंतू खामगांववासियांना पृथ्वीवरील अमृत असेलेले हे ताक मिळणे मात्र सुलभ झाले आहे. दुस-याला काहीतरी देण्याची संस्कृती असलेला भारतामध्ये विविध प्रकारे दान करणारे अनेक दाते आपणास दिसून येतात. पालख्या, जयंती मिरवणुका यांमध्ये अनेक दाते खाद्यपदार्थ तसेच शीतपेयांचे वितरण करतांना दिसून येतात. याच दातृत्वाच्या भावनेने 42 वर्षांपूर्वी आपल्या खामगांव शहरात सुद्धा एक अनोखा असा उपक्रम सुरु झाला जो आजतायागात सुरु आहे. 1970 च्या दशकात खामगावातील सरकी व ढेपेचे व्यापारी लालचंद दोशी हे काही कार्यानिमित्त इंदोर येथे गेले असता त्यांना तिथे उन्हाळ्यात “ताकपोई” दिसली. या ठिकाणी नागरिकांना अगदी मोफत ताक वितरीत होतांना पाहून त्यांच्या मनात सुद्धा दातृत्व भावना दाटून आली, त्यांना ही संकल्पना खामगांवात राबवण्याची प्रेरणा मिळाली आणि 1976 मध्ये त्यांच्या पत्नीच्या नावाने “श्रीमती मांनकुंवरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छांछ (ताक) केंद्र” स्थापन केले.विदर्भातील ऊन म्हटले की अंगाची लाही-लाही होऊन जाते. उन्हामुळे गरम झालेल्या मानवी शरीरास आल्हाददायक दोन नैसर्गिक तरल पदार्थ म्हणजे ताक आणि ऊसाचा रस.जसे ताकाचे महत्व आहे तसेच ऊसाच्या रसाचेही. भगवान ऋषभदेव यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशीच ऊसाचा रस पिऊन उपवास सोडला होता. म्हणून अक्षय तृतीयेला ऊसाच्या रसाचे सुद्धा महत्व असते. उन्हाळ्यातील ताकाचे महत्व जाणून श्रीमती मांनकुंवरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छांछ (ताक) केंद्राने 42 वर्षांपासून खामगांवकरांची ताकाची तहान भागवून लाखो लोकांचा उन्हाळा सुसह्य केला आहे. मार्च महिन्यात हा उपक्रम सुरु होतो व पावसाळा सुरु होईतो रोज सकाळी 5.30 वाजता ताक वितरीत होत असते. विशेष म्हणजे फक्त भांडे घासण्याचे काम एका माणसा मार्फत केले जाते बाकी सर्व कामे मंडळाचे सदस्य गण स्वत: करीत असतात. दररोज 20 लिटर दुधाचे ताक बनवून गरीब-श्रीमंतांना, विविध जाती धर्माच्या 800 कार्डधारक व इतर लोकांना उत्साहाने वितरीत केले जाते. या कामासाठी दररोज सुमारे 4500 रु. निव्वळ दूधावर खर्च होत असतात तर इतर वेगळा खर्च सुद्धा होत असतो. ताक वितरीत करण्यासाठी ट्रस्टने एक कार्ड बनवले आहे. प्रथम कार्डधारकांना ताक वितरीत केले जाते व नंतर ज्यांच्याकडे कार्ड नसेल त्यांना सुद्धा ताक वितरीत केल्या जाते. मोफत ताक वितरण करणारा विदर्भातील हा एकमेव उपक्रम खामगांवात असल्याचे खामगांवकरांना भूषण आहे.सद्यस्थितीत या ट्रस्टचे अध्यक्ष श्री महेंद्रभाई शहा हे आहेत. तसेच ट्रस्ट चे पदाधिकारी श्री हसमुखभाई कमाणी, श्री प्रफुल्ल कमाणी व त्यांचा परिवार , श्री नागीनभाई मेहता, श्री सुराणा, श्री खिलोशिया परिवार, व इतर सर्व सदस्य मिळून हा उपक्रम राबवीत असतात. यंदा या उपक्रमासाठी दोशी परिवार अकोला तसेच चाळीसगावचे जमनादास मोहता परिवार यांचेकडून मोठे सहाय्य झाल्याचेही श्री महेंद्रभाई शहा आवर्जून व कृतज्ञतापूर्वक सांगतात.
ताकाचे महात्म्य सांगण्यास तर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.पृथ्वीवरील  अमृत असलेले तक्र अर्थात ताक हे शक्र अर्थात देवांचा राजा इंद्र याला सुद्धा दुर्लभ असल्याचे सांगणारे “तक्रं शक्रस्य दुर्लभम” हे एक सुभाषित आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात ताकाला फार महत्व आहे. हे पृथ्वीवरील अमृतरूपी ताक अगदी मोफत वितरीत करण्याचे कौतुकास्पद व प्रेरणादायी व खामगांवकरांना भूषणावह असे कार्य खामगांवात “श्रीमती मांनकुंवरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छांछ (ताक) केंद्र” करीत आहे.म्हणूनच “तक्रं शक्रस्य दुर्लभम”... किंतु खामगांववासियाणाम सुलभम असे म्हणावेसे वाटते.

१२/०४/२०१८

Article on the sad demise of Raosaheb Varangaonkar founder of S D Varangaonkar highschool , A retired Postmaster, simple, eminent and down to earth personality in Khamgaon Dist Buldhana Maharashtra

“बहुत जनांचा आधारू” गेला 


अगदी आता-आता पर्यंत काका चालते फिरते होते.नागपूरला व्होकार्ट मध्ये जाण्यापूर्वीच्या संध्याकाळी आम्ही काकांच्या आनंद मंगल कार्यालयात भेटलो होतो. विशाल प्रिन्टर्स व जननिनाद वृत्तपत्राचे मालक श्री जयकुमार चांडक, आमचा बंधू दिनेश बोडखे सोबत होते. मी काकांना शाळेच्या कोर्ट केसेस ची काही कागदपत्रे सुपूर्द केली. काकांना शुभेच्छा दिल्या. काका काही दिवस दवाखान्यात राहिले आणि नंतर त्यांना चालता येणेच बंद झाले. नेहमी कार्यमग्न राहणारे काका त्याही परिस्थितीत आमच्या आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे मानणा-या सहका-यांच्या मदतीने गाडीत बसून बाहेरच काय बाहेरगावी सुद्धा जात. त्याही परिस्थितीत आम्हाला शाळा, मंगल कार्यालय ई. बाबत सूचना करीत. मला चालता येत नाही, काही करता येत नाही असा एका शब्दाने कधी त्रागा केला नाही. फोन धरता येत नव्हता तर त्यांनी स्पीकर ओंन करून संभाषणे केली. ते होतेच कर्मयोगी. कुटुंबियांसाठी शाळेसाठी देह कष्टविलेले, जीवनात अनेक कठीण प्रसंगांचे शर झेललेले, बिछान्यावर पडलेले काका हस्तिनापुरसाठी देह कष्टविलेल्या, शर शय्येवर पडलेल्या भिष्म पितामहाप्रमाणे भासत होते. तीन चार महिन्यातच सर्व चित्र बदलले आणि 8 एप्रिल ला काका गेले. ते सुद्धा त्यांच्याच शैलीत त्यांच्या सर्व जबाबदा-या पार पाडून.नेत्रदान करावयाचे म्हणून दोन दिवस आधी डोळे तपासून. देहदान करण्याचे आणि कोणतेही विधी न करण्याची सूचना देऊन. “वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृतदेह कमी पडतात” अशी बातमी काही वर्षांपूर्वी त्यांच्या वाचनात आल्याने देहदान करण्याचे त्यांनी पूर्वीच ठरवले होते. ते गेले आणि डोळ्यासमोर त्यांच्यासह व्यतीत केलेले क्षण, त्यांची कार्यपद्धती तरळू लागले किंबहुना अजूनही तरळत आहेत.
जलंब ग्रामातील एका परवानाधारक शिकारी वैद्य नानासाहेब वरणगांवकर यांचा हा मधला मुलगा. आई वडीलांना न जाणे काय वाटले,मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणे त्यांनी काकांना लहानपणापासून “रावसाहेब” संबोधन लावले आणि सुरेश दत्तात्रय वरणगांवकरांनी ते नांव सार्थ केले. आपल्या स्वकर्तुत्वावर अनेक धडाडया घेतल्या, अनेक उपक्रम केले. मग ते डींकाचा व्यवसाय असो, डाक विभागातील नोकरी असो, 90 च्या दशकात ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून केलेली शाळेची स्थापना असो, नगर रचना विभागाची कामे असो, वाघ छाप दंत मंजन असो की सेवानिवृत्तीनंतर अनेकांना दिलेली आयुर्वेदिक औषधे असोत. आपल्या दुस-याच्या मदतीस धाऊन जाण्याच्या वृत्तीने त्यांनी मोठा लोकसंग्रह प्राप्त केला. गरीब परिस्थितीतून उभे राहून त्यांनी स्वत: सोबत दुस-याचाही कसा उत्कर्ष होईल हे पहिले.अनेकांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. गाडीचा विमा, बिले, टॅक्स भरणे अशी आपली सर्व कामे ते चोख करीत. कपाटातील कोणत्या क्रमांकाच्या फाईल मध्ये काय आहे हे त्यांच्या पक्के स्मरणात असे.मी चौथ्या पाचव्या वर्गात असेन तेंव्हापासून काकांची सायकल, खाकी पँट व दोन खिशांचा शर्ट, एकाच प्रकारचा पेन, एकाच स्टाइलचे घड्याळ, एकाच पॅटर्न ची चप्पल.अशी राहणी पाहत आलो आहे. असे एकाच पद्धतीने राहणे सर्वाना शक्य नाही. असे साधे आणि निर्मोही राहणे काकांसारख्या शिस्तप्रिय आणि सेवाव्रती माणसासच शक्य आहे.
विज्ञान शाखेच्या पदवीधर काकांची संपूर्ण हयात खामगांवातच गेली. महाविद्यालयीन जीवनात ते एन सी सी मध्ये अंडर ऑफिसर होते.सर्वोत्कृष्ट नेमबाज म्हणून सुद्धा ते गौरविले गेले होते. तत्कालीन एन सी सी चा ड्रेस स्टार्च करत असत. माझे वडील नेहमी सांगतात काकाचा ड्रेस एकदम कडक असे. पँट जमिनीवर उभी करता येईल इतकी कडक इस्त्री. डींकाच्या व्यवसायासाठी तरुणपणीच काकांनी “फोर व्हील ड्राईव्ह स्टेशन वॅगन” घेतली होती. आजोबा शिकारी असल्याने व वन्यप्राणी पाळण्यास तेंव्हा बंदी नसल्याने घरी मोर,हरीण व अस्वल पाळले होते. काका सुद्धा अनेकदा जंगलात जाऊन आलेले त्यामुळे अंगात धाडस. याच धाडसाने त्यांनी अनेक कठीण प्रसंगातून मार्ग काढले. कठीणातील कठीण कामे लीलया पार पाडल्याने अनेक लोक त्यांना “कार्यसिद्धी” म्हणत. शाळेची कामे, काकूंच्या “ओपन हार्ट सर्जरी” साठी घेतलेले कष्ट तेच पार पाडू जाणे. स्वत:च्या पत्नी मुलांसह पुतणे,भाचे,नातू,जावाई सर्वांकडे जातीने लक्ष देत. कुणाच्या अडचणीच्या वेळी त्यांची “ कारे काही आर्थिक मदत पाहिजे का?” अशी हाक असे. आपले आनंद मंगल कार्यालय भाड्याने देतांना त्यांनी कधी जाती-पातीचा विचार न करता जो प्रथम येईल त्याला कार्यालय उपलब्ध करून दिले.व्यक्तीची परिस्थिती पाहून दर आकारले. कित्येकदा अनेकांनी जेवढी रक्कम दिली तेवढी घेतली.त्यांच्या व्यवसायात अनेकांनी त्यांना फसवले परंतू काकांनी त्यांची लोकांवर संपूर्ण विश्वास टाकून काम करण्याची पद्धत सोडली नाही. गावातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेऊन काम करीत. अनेकांची कामे काकांनी चुटकीसरशी केली. सर्वांशी त्यांची सारखी वागणूक,जाती भेदाचा लवलेश नाही. कुठे जायचे असले की आपल्या अँबेसॅडरच्या चालका सोबत घरी जेवण करून ते प्रवासाला निघत. काका Panctual, मिताहारी , शिडशिडीत शिवाय रोजचा दिनक्रम एकदम पक्का त्यामुळे चांगले वयाची नव्वदी गाठतील असे आम्हाला वाटे परंतू आयुष्यभर इतरांच्या भल्यासाठी जगलेले काका त्यादिवशी स्वत:च “आता माझे कार्य संपले”असे म्हणाले आणि काळजात एकदम धस्स झाले. “कुणासाठी थांबायचे नाही” हे सुद्धा सांगितले असल्याने त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सुपूर्द केले. त्यांच्या निधनाची बातमी अनेकांना उशिरा कळली त्यामुळे अनेक लोक भेटीस येत आहेत. खरोखर काका तुम्ही “बहुत जनांशी आधारू” होतात. तुमचे कार्यमग्नता, बहुगुणीपणा, लोकसेवा हे गुण सर्वांमध्ये उतरोत व प्रेरणा देवोत.     

०६/०४/२०१८

Article on judgement by Jodhpur court on poaching case of Salmankhan

न्याय मिळाला....आता शिक्षेची प्रतिक्षा 
20 वर्षांपूर्वीच्या त्या रात्री आम्ही दोघे आमच्याच कनकनी खेड्यातील भगोडा की धानी या आमच्याच हक्काच्या जागेत मौजेत फिरत होतो. आमचा कळप सोबत होताच. आम्ही कुणाच्याही अधे –मध्ये नसतांना अचानक आम्हाला गोळ्या लागल्या. आम्ही गतप्राण झालो. आज आम्हाला जाऊन 20 वर्षे झालीत. 20 वर्षांनतर का होईना आमची शिकार करून भगोड्यातून भगोडा झालेल्या शिकारी सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवले. कोण कुठल्या त्या सलमान खान नावाच्या नटाचे आम्ही काय घोडे मारले होते? आम्ही गेलो परंतू आमचा आत्मा टाहो फोडत आहे. आम्ही प्राणी आमच्या जंगलात आनंदात असतो मानवाशी आमचे काहीही एक वैर नाही. उलट मानवच आमच्या जागेत अतिक्रमण करून राहिला आहे. मोठ मोठे रिसोर्ट  आमच्या परिसरात बांधली जात आहे आणि तिथे “सेलिब्रेटी” का काय म्हणतात ते येतात परंतू आम्ही प्राणी मात्र “सेलिब्रेटी” काय आणि सामान्य माणूस काय एकच समजत असतो. आता हेच पहायचे आहे की लोकशाहीचे मोठे बिरूद मिरवणा-या भारतातील न्यायव्यवस्था “सेलिब्रेटी” आणि सामान्य माणूस यांना एकाच दृष्टीने पहाते की नाही? तसे तर पहातच नाही हे अनेकदा सिद्धच झाले आहे. म्हणूनच आम्हाला मारणारा कोण तो सेलिब्रेटी “बीईंग ह्युमन” लिहिलेला टी शर्ट घालून मिरवणारा तो सलमान खान मुंबई शहरातील फुटपाथवर झोपलेल्या गरीब लोकांना चिरडून पसार झाला होता त्या प्रकरणात दोषी असून सुद्धा अजूनही राजरोस फिरत आहे. माणसांना चिरडून टाकणा-या या सलमान खान समोर मग आम्ही काळवीट म्हणजे “किस खेत की मुली?”. पूर्वी राजे महाराजे सुद्धा मृगयेसाठी जात आमच्या जातकुळीतील प्राण्यांची शिकार करीत परंतू सोबतच ते आमचे संगोपन सुद्धा करीत. जंगलांचे जतन करण्याचे आवाहन राजे शिवाजी, शाहू महाराज करीत. हा कोण कुठला साधा व्यवसायिक अभिनेता, थिल्लर भूमिका करणारा आमच्या जीवावर उठला. याने काय केले आहे? आमच्यासाठी , जंगलासाठी , समाजासाठी? आता विविध प्रकरणातून निसटण्यासाठी समाजसेवेचा आव आणतो, नेत्यांशी सलगी करतो ? नावाचीही ह्युमिनीटी  नसतांना  न्यायव्यवस्था ,कायदा यंत्रणा, जनता यांची दिशाभूल करण्यासाठी “बीईंग ह्युमन” नावाची संस्था काढतांना याला जराही लाज नाही  वाटत? आज-काल वन्यप्राण्यांविषयी , पाळीव प्राण्यांविषयी आस्था दाखवणारे अनेक आहेत. आम्हाला देव समजणारी “वैष्णव” जमात आमच्यासाठी का नाही पेटून उठत? आम्ही ऐकले आहे की मनेका गांधी आम्हा प्राण्यासाठी  मोठे कार्य करीत असतात. मग आमची हत्या होऊन इतकी वर्षे झाली पण ह्या बाई आमच्या बाजूने अवाक्षरही बोलल्याचे स्मरत नाही. उठसुठ छोट्या मोठ्या प्रकरणावरून जाळपोळ करणारे व प्रसंगी सर्वोच्च न्यायसंस्थेवर सुद्धा प्रभाव टाकू पहाणारे भारतीय मग आमच्यासाठी काहीही का करीत नाही ? आता हेच भारतीय का मूग गिळून गप्प बसले आहेत ? म्हणूनच आज त्या ओळी आठवतात “ एक जानवर की जान आज इंसानोने ली है चूप क्यूं है संसार ?
आज निदान जोधपूर कोर्टाने आमच्या पदरात न्याय टाकला परंतू आमचा तो शिकारी जामिनावर सुटणारच शिवाय पुढे न्यायप्रणालीतील टप्पे आहेतच. जोधपूर न्यायालयाने त्यास दोषी ठरवले आम्हाला मात्र त्याच्या शिक्षेची प्रतीक्षा आहे.