२६/०४/२०१८

India is on fourth rank in IPSOS MORI survey, article elaborates India and its Universal Tolerance and all religion acceptance concepts


सहिष्णूतेसाठी आम्हाला क्रमांकाची गरज नाही
काल ‘बीबीसी’साठी सर्व्हे करणा-या ‘इप्सॉस मुरी’ या संस्थेने सहिष्णूतेबाबत जागतिक सर्व्हे करून विविध देशांना सहिष्णूतेनुसार क्रमांक दिले. यात भारत चौथ्या स्थानी आला आहे. या क्रमवारीत कँनडा,चिन आणि मलेशिया हे भारताच्या पुढे आहेत. भारताला सहिष्णूतेबाबतचे ‘सर्टिफीकेट’ किंवा क्रमांक इतर देशाने किंवा तेथील कुण्या संस्थेने देण्याची तसदी घेण्याची तशी काही आवश्यकता नाही. भारत हा युगानुयुगे त्याच्या सहिष्णूतेसाठी सुप्रसिद्ध आहे. तसा सर्व्हे केलाच तर त्यात वास्तविकता सुद्धा असावी. ज्या चीनला या सर्व्हेमध्ये दुसरा क्रमांक दिला आहे त्या चीनमध्ये मुसलमानांना कोणत्या दर्जाची वागणूक मिळते ? तिथे त्यांच्यावर किती निर्बंध आहेत ? त्यांना तेथे रमझान ,रोजे हे पाळता येत नाही. कामगारांचे हक्क , त्यांच्यासाठी कायदे , जगात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणा-या फेसबुक व गुगल सारख्या वेबसाईटवर बंदी. चीन मधील ही वास्तविकता ‘इप्सॉस मुरी’ ला दिसली नाही का ? की त्याकडे इतर हेतूपुरस्सर डोळेझाक केली गेली. जगातील इतरही देशात विविध धर्मियांवर , विविध देशातील नागरिकांवर हल्ले होत असतात त्या मानाने भारतात हे प्रमाण कमी आहे. खरे तर आता भारत हा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहे व आंतर्राष्ट्रीय पातळीवर भारत चांगलाच प्रगतीपथावर आहे. यामुळेच काही जण चौथ्या क्रमांकावरही खुश आहे. तर काही भारतच्या प्रगतीचा वारू चौखूर उधळला आहे म्हणूनच या यादीत भारताला चौथ्या क्रमांकावर टाकले आहे असे म्हणतात. सर्व धर्मांना समावून घेण्याचे महान कार्य जगाच्या पाठीवर कुठे झाले आहे तर ते आपल्या भारतात. केवळ सामावूनच नव्हे तर त्यांना त्यांचे धर्मपालन करण्यास , धर्मप्रसार करण्यास येथे कोणतीही बंदी नाही. येथे धर्माने मुस्लिम वैज्ञानिक माजी राष्ट्रपती संतांच्या दरबारी जातो तर अनेक हिंदू अजमेर या ठिकाणी जातात. गुरुद्वारामध्ये जाती-भेद धर्मभेद बाजूला सारून रोज लंगर चालवले जातात. स्वामी विवेकानंद म्हणतात
I am Hindu, I am proud to belong to a religion which has taught the world both tolerance and universal acceptance. We believe not only in universal toleration, but we accept all religions as true.
स्वामीजी म्हणतात आम्ही जागतिक सहिष्णूता असावी असे मानतो तसेच आम्ही सर्व धर्मांचा स्विकार करतो असे म्हटले आहे. स्वामीजींच्या या वक्तव्याला भगवान श्रीकृष्णाचा “वसुधैब कुटुंबकम” तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या “अवघे विश्वाची माझे घर” यांचासुद्धा आधार आहे. युद्धातील संहार पाहून विरक्त झालेला सम्राट अशोक, जगातील दु:ख पाहून बुद्ध झालेला सिद्धार्थ, शत्रूला जीवदान देणारा पुथ्वीराज चौहान सहिष्णूतेची अशी कितीतरी उदाहरणे या भारतभू मध्ये घडली आहेत. पुरस्कारवापसी,चिमुरड्या मुलींवर होणारे अत्याचार या गेल्या काही काळत घडत आलेल्या घटना पाहता 27 देशांच्या या यादीत भारताला चौथा क्रमांक मिळाला हे सुद्धा काही थोडके नव्हे. जे कुणी भारतीय भारत असहिष्णू आहे अशी ऊठसुठ ओरड करीत असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही एक चपराक म्हणावी लागेल. हंगेरी सारखे देश तर स्वत:च त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णु मानतात. हे पाहता भारतातील 63 टक्के नागरीकांनी भारत सहिष्णू असल्याचा कौल दिला आहे. “वसुधैव कुटुंबकम” ही संकल्पना मानणारा भारत तसेच We believe not only in universal toleration, but we accept all religions as true. ही विवेकानंदांची संकल्पना स्विकारलेला भारत, महावीर, गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश पालन करणारा भारताला ‘इप्सॉस मुरी’ च्या सर्व्हेने जरी चौथ्या क्रमांकावर टाकले असेले तरी सहिष्णूतेसाठी आम्हाला क्रमांकाची गरज नाही.         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा