०३/०५/२०१८

Golden Shower Tree , article describe about it.

बहावा फुलला
भर उन्हाळ्यात बहर येणारी अनेक झाडे आहेत. त्यातील लक्ष वेधून घेणारे, केवळ लक्ष वेधणारेच नव्हे तर आकर्षक, नजर खिळवून ठेवणारे झाड म्हणजे “बहावा”. मनाला आनंद देणा-या अनेक गोष्टी असतात. आज-काल तर अशा “एन्जॉय” देणा-या गोष्टी वारेमाप झाल्या आहेत.कुणी पार्ट्या,पेग यात आनंद मानतात, कुणी मित्रांना भेटण्यात तर कुणी अजून कशातून आनंद मिळवतात. परंतू खरा “एन्जॉय” हा नैसर्गिक गोष्टीतून मिळत असतो.“तरुशिखरावर कोकिलकवीने पंचम स्वर लाविला” असे वर्णन असलेल्या कोकीळेच्या मंजूळ स्वरातून मिळणारा आनंद, कमळपुष्प पाहिल्यावर मिळणारा आनंद, वन परिसरातून सहज प्रवास करतांना आकस्मिकपणे समोर आलेला वनचर पाहिल्यावर होणारा आनंद, भर ऊन्हात मोठ्या वृक्षाच्या छायेत वामकुक्षीचा आनंद, पक्षी न्याहाळतांना मिळणारा आनंद, उंच पहाडावरून कोसळणारा धबधबा तर खळखळून वाहणारा निर्झर पाहिल्यावर त्याचा आवाज ऐकल्यावर जो आनंद मिळतो तो पैसा खर्चून सुद्धा मिळत नाही.शहरातील भर ऊन्हातून 46 ते 47 डिग्री तापमानातून बाईकवर जातांना मध्येच कुठेतरी पिवळ्याजर्द फुलांचे झुबकेच्या झुबके असलेला, फुलांनी लदबदलेला बहावा वृक्ष दिसला की सुद्धा असाच आनंद मिळतो. क्षणभरासाठी माणूस तापमान, उष्णता, ऊन, ऊन्हाळा हे सर्व साफ विसरून जातो. या बहाव्याबाबत काहीतरी लिहावे असा कधीचा विचार मनात सुरु होता. जीएसटी कार्यालय, खामगांव समोरून जात असतांना आज बहावा पुनश्च दृष्टीस पडला. आपल्या लदबदलेल्या फुलांनी माझ्या बाबतीत सुद्धा काही लिहा असाच जणू इशारा करीत होता. काही वर्षांपूर्वी कोर्टा समोरील आमच्या मित्राच्या चहाच्या दुकानावर बसलो असता दुकानासमोरच फुलांनी बहरलेला बहावा होता. अजूनही आहे. ऊन्हाळ्याचेच दिवस होते त्यामुळे बहावा फुलांनी चांगलाच लदबदलेला होता. आम्हाला तेंव्हा या वृक्षाचे नांव माहीत नव्हते. विशाल देशमुख या मित्राने “गुगल” चा आधार घेत त्वरीत शोध घेतला. बहाव्याचे चित्र, इंग्रजीतील नांव “गोल्डन शॉवर ट्री” तसेच मराठीतील नांव बहावा हे सर्वच सापडले. बहाव्याचे मूळ दक्षिण आशिया हाच म्हणजेच आपलाच भाग आहे हे सुद्धा कळले. तोपर्यंत बहाव्याशी एवढा परिचय नव्हता. चहा दुकान मालक आमचे मित्र संदीप पाटील यांनी खामगांव कोर्टासमोरील ते बहाव्याचे झाड स्व.सुभाषराव देशपांडे माजी नगराध्यक्ष, खामगांव यांनी त्यांच्या कार्यकाळात लावले असल्याची आठवण सांगितली. बहावा झाड तेंव्हा ज्ञात झाले. एखाद्याशी परिचय झाला की मग एकमेकांबाबत अनेक गोष्टी आपोआप माहीत होतात. मानवी स्वभावाप्रमाणे हे पशूपक्षी , वृक्षवल्ली बाबत सुद्धा लागू आहे. तसाच मग बहाव्याशी परीचय झाला आणि बहाव्या बाबत अनेक गोष्टी माहित झाल्या. झाड फुललेले असता त्याच्या खालून कधी स्त्री गेली की तिचा केशसंभार अधिक लांब होतो, दाट होतो असा समज म्हणा की अंधश्रद्धा असल्याचे समजले. प्रत्यक्ष अनुभवी कुणी दिसले नाही किंवा एखाद्या मोठा केशसंभार असलेल्या स्त्रीला “काय हो तुमचे केस छान लांब आहे कधी बहाव्याच्या झाडाखालून चालत गेल्या का ?” असे विचारण्याची हिम्मत सुद्धा केली नाही.हे झाड फुलले की 45 ते 60 दिवसांनंतर पावसाळा सुरु होतो. म्हणूनच याला निसर्गाचा “शॉवर इंडीकेटर” सुद्धा म्हटले जाते. या झाडाला चांगला बाहार आला की शेतकरी चांगले पिक येणार असे समजतात. त्यांना तसे वेध लागतात. पिक आणि पावसाबाबतचा हा समज बहुतांश कोकणात आहे. या झाडाचे अनेक औषधी उपयोग सुद्धा आहेत. आज-काल सप्तपर्णी हा वृक्ष मोठ्या प्रमाणात लावला जात आहे.आपण बहावा हा वृक्ष जर मोठ्या प्रमाणात लावला तर निश्चितच आपल्या विदर्भातील कडक ऊन्हाळा सुद्धा बहाव्याच्या ऐन ऊन्हाळ्यातील पिवळ्या झुबकेदार फुलांमुळे सुखदायी वाटेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा