२४/०५/२०१८

Article regarding to the letter address to all churches in Delhi by Anil Couto, The Archbishop of Delhi


देशातील समस्या निराकरणासाठी व्हावेत प्रार्थना,उपवास 
ज्या प्रमाणे विविध दिशांनी येणा-या नद्या शेवटी सागरास मिळत असतात त्याचप्रमाणे विविध धर्मातील लोकांच्या पूजा, अर्चना, प्रार्थना, उपवास हे सर्व एकाच ईश्वराकडे पोहोचत असतात. नाना प्रकारचे धर्म, पंथ, जाती असल्या तरी ईश्वर सर्वांचा एकच आहे असे मानले जाते. सर्वच धर्मातील संत महात्मे,साधू यांनी हेच सांगून ठेवले आहे. ईश्वरा पर्यंत पोहोचायचे असेल तर त्याचे मार्ग सुद्धा सर्वच धर्मात   कमी अधिक प्रमाणात सारखेच आहेत. ते मार्ग म्हणजे शुद्ध आचरण, सत्य, अहिंसा, नैतिकता, प्रार्थना, उपवास प्राणी मात्रांवर दया, इतर धर्मियांविषयी सहिष्णूता हे होत. या सर्व गोष्टींचे ज्ञान सर्वच धर्मातील धर्मगुरू जन सामान्यांना देत असतात. वर्षानुवर्षे हीच परंपरा सुरु आहे. काळ बदलला विज्ञान तंत्रज्ञान आले तरी धर्मगुरू, संत, साधू, फकीर यांचे महत्व ते कायम राखून आहेत. राजेशाहीच्या काळात धर्म हा राजकारणात ढवळाढवळ करीत नव्हता, त्यास राजाश्रय असे , राजे तत्कालीन धर्मगुरू ,संत , संन्यासी, फकीर यांचे सल्ले घेत असत. परंतू धर्मगुरू,संत,संन्यासीं,फकीर हे कधी सत्ता बदल करण्यासाठी प्रार्थना, उपवास करण्यास आपल्या शिष्यांना वा    सहका-यांना किंवा जनतेला आवाहन करीत नसत. अगदी फारच हिंसक परकीय , जुलुमी राजे असतील तर अशा प्रकारच्या प्रार्थना क्वचित प्रसंगी होतही असतील. परंतू तेंव्हा माध्यमे फोफावली नव्हती त्यामुळे राज्यातील सर्व प्रजेला अशा प्रकारची माहिती सुद्धा होत नसे. कालपरत्वे राजेशाही संपुष्टात आली लोकशाही आली आणि लोकशाहीत सर्वच पक्ष सत्ताप्राप्तीसाठी धर्माचा आधार प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या घेऊ लागले. लोकशाही मध्ये वोट बँक राजकारणामुळे धर्मसंस्था व राजकीय पक्ष दोघेही आपापल्या पात्रात बरोबर तूप ओढू लागले. परदेशातून सर्रास फंडिंग मिळवणे सुरु झाले , अनुदाने मिळू लागली. पूर्वी अकबरासारखे राजे यात्रेकरूंवर कर लावत होते तर लोकशाहीत यात्रेकरूंना अनुदानाची खैरात वाटणे सुरु झाले. लोकशाहीत धर्मसंस्थांना अनुकूल सत्ताधारी असतील तर सर्व सुरळीत सुरु असते जरा कुठे देशहितासाठी काही निर्बंध आले की त्वरीत लोकशाही धोक्यात,अराजकता,राजकीय अशांतता, धर्मनिरपेक्षता धोक्यात असल्याची भाषा बोलली जाते. ही भाषा बोलण्याची वेळ सुद्धा नेमकी निवडणुका उंबरठ्यावर आल्या की सुरु होते. प्रार्थना, उपवासाचे आवाहन हे जनतेच्या कल्याणासाठी, दहशतवाद थांबण्यासाठी, नक्षलवाद कमी होण्यासाठी , युद्धजन्य स्थिती नष्ट होण्यासाठी जगात शांतता नांदण्यासाठी, आपल्या देशातीला सर्व समस्या निराकरणासाठी केले असते तर ते जास्त संयुक्तिक वाटले असते. जगातील गरीबी, विषमता, कुपोषण यांसारखे संकटे थांबण्यासाठी केले असते तर जनतेला असे आवाहन अधिक परिणामकारक वाटले असते व त्यांचा धर्मसंस्थेवरचा विश्वास अधिक वाढला असता. सतत भारतात लोकशाही धोक्यात , धर्मनिरपेक्षता धोक्यात असे बोलल्याने , तशी पत्रके काढल्याने जागतिक पातळीवर आपल्या देशाचे नांव खराब होत असते, चुकीचा संदेश जात असतो याची जाणीव सुद्धा बाळगली जात नाही ही खंत आहे. या देशाने वर्षानुवर्षांपासून सर्वाना सामावून घेतले आहे. सहिष्णूता या देशाने जगाला शिकवली आहे. ईश्वराचा संदेश देणा-यांना येथे पूजनीय मानले आहे त्यांचा तिरस्कार नाही केला किंवा त्यांना दंड नाही केला. सर्वच धर्मगुरू, साधू , संत यांनी जनतेला योग्य दिशा दाखवावी , त्यांच्यासाठी प्रार्थना , उपवास करावे ,जगाच्या कल्याणासाठी आवाहने करावीत, राजकीय परिस्थिती बाबत पत्रके काढून उगीच देशाचे नांव जागतिक स्तरावर खराब होईल अशी कृती करू काढू नये तरच जन सामान्यांचा त्यांच्या प्रती विश्वास, स्नेह वृद्धिंगत होईल. असे केले तर नंतरची सारवासारव करणे आपसूक टाळल्या जाते व हसे होत नाही.   

१७/०५/२०१८

Leader of masses freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak called as "Father of Terrorism" in reference book of Rejasthan Education Ministry, article elaborates about Tilak and his patriotism


सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

होय हा सुप्रसिद्ध प्रश्न टिळकांनी इंग्रज सरकारला आपल्या एका अग्रलेखाव्दारे विचारला होता. टिळक महाराजांचा “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?”हाच प्रश्न आता राजस्थान सरकारला पुनश्च विचारावा वाटत आहे कारण त्यांच्या शिक्षण खात्याने इयत्ता 8 वी च्या संदर्भ पुस्तकात टिळकांचा “दहशतवादाचे जनक” असा उल्लेख केला आहे. आपल्या भारतात शिक्षण क्षेत्रात काय होईल याचा काही नेम नसतो. इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात कधी एखाद्या पराक्रमी राजा अथवा सरदारास काही ओळीतच आटोपले जाते, कधी झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नांव काय आहे? अशा वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या उत्तराच्या पर्यायामध्ये त्यांच्या पतीच्या नांवाचा समावेशच नसतो, पृथ्वीराज चव्हाण,पहिला बाजीराव यांच्याबाबत अतिशय जुजबी माहिती असते. अशी वृत्ते अधून मधून प्रसिद्ध होत असतात. दोन चार वर्षांपूर्वी “सीबीएसई” च्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांबद्दल अतिशय कमी माहिती असल्याचे वृत्त आले होते. त्यात भरीस भर म्हणून परवा वासुदेव देवनानी शिक्षण मंत्री असलेल्या राजस्थान शिक्षण खात्याने लोकमान्य टिळक यांचा “दहशतवादाचे जनक” असा उल्लेख केला आहे व त्यावर सारवासारव करणे सुरु झाले आहे. परंतू “बुंदसे जो गयी वो हौदसे नही आती”. ज्या राष्ट्रपुरुषाने आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या लेखणीच्या ताकदीने इंग्रजांना भंडावून सोडले होते, ज्याने केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरु केली होती, ज्याने मधुमेह असतांना कारावास भोगला होता व कारावासातच “गीतारहस्य” हा ग्रंथ लिहिला होता, जो गणिताचा ज्ञानी होता,ज्याच्यामध्ये संशोधक वृत्ती होती व त्यातूनच वेद, नक्षत्रांच्या जागांवरून वेदांचे वय ठरवणे यांवर भाष्य करणारा “ओरायन” ग्रंथ ज्याने लिहिला होता, ज्याने “न्यू इंग्लिश स्कूल”,“डेक्कन एज्युकेशन सोसायटी” अशा शिक्षण संस्था सुरु केल्या होत्या, सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव सुरु केले होते. अशा राष्ट्रपुरुषाचा असा अपमान करणे जनतेला कदापीही सहन होणार नाही. देवनानीजी दहशतवादी कधीही शिक्षण संस्था , वृत्तपत्रे , संशोधन , लिखाण अशी सुकृत्ये करीत नसतात हे आपल्या खात्याच्या लक्षात कसे आले नाही?  इंग्रजांनी ज्यांना “The Father of the Indian Unrest” अर्थात भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख केला आहे अशा टिळक महाराजांना राजस्थानच्या शिक्षण मंत्रालयाला “The Father of Terrorisam” अर्थात “दहशतवादाचे जनक” म्हणतांना जराही शरम वाटत नाही. उलट तेथील शिक्षण मंत्री “टिळकांना इंग्रजांच्या मनात दहशत निर्माण करायची होती असा अर्थ घ्यावा त्याला सध्याचा दहशतवाद हा शब्द अभिप्रेत नाही” असे म्हणतात. देवनानीजी  दहशतवाद कोणत्या अर्थाने घ्यायचे हे जनतेला शिकवण्यापेक्षा आपली चूक तात्काळ दुरुस्त करा. इंग्रजी शब्दकोशात दहशतवादाची Unlawful use of violence especially against civilins अशी व्याख्या केली आहे. तर इंग्रजांनी टिळकांना उद्देशून म्हटलेल्या Father of the Indian Unrest मधील Unrest या शब्दाचा अर्थ A State of dissatisfaction असा होतो. टिळकांनी कधी violence especially against civilins म्हणजेच नागरिकांच्या विरुद्ध कोणते कृत्य अथवा चळवळ केली नाही मग ते “दहशतवादाचे जनक” कसे? जनता तर त्यांच्या बाजूने होती आणि म्हणूनच त्यांना “लोकमान्य” ही पदवी जनतेनेच बहाल केली होती. हे सुद्धा राजस्थान शिक्षण मंत्रालयाला माहित नसावे याचे आश्चर्य आहे. इंग्रजांनी सुध्दा त्यांना दहशतवाद्याची उपमा दिली  नाही ती तुम्ही देता आहात हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. देवनानीजी दहशतवादी किंवा त्यांचे जनक हे कदापीही लोकमान्य नसतात हे ध्यानात घ्या. आपल्या अभ्यास मंडळातील सदस्यांची कानउघडणी करा, त्यांनी अक्षम्य अशी चूक केली आहे आणि त्या खात्याचे आपण प्रमुख आहात त्यामुळे अशा घोडचूकी बाबत सारवासारव न करता ती चूक तात्काळ दुरस्त करा व झालेल्या चुकीची क्षमा प्रकट करा तरच आपल्या खात्याचे पापक्षालन होईल. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारणे टिळकांना भाग पडले होते आता आपण स्वतंत्र आहोत स्वकीयांचे राज्य आहे तरी सरकारने व सरकारी यंत्रणांनी आपले डोके ठिकाणावर ठेऊन निर्णय घ्यावेत व टिळकांचा तोच प्रश्न जनतेला पुन्हा पुन्हा विचाराण्यास भाग पाडू नये.

१०/०५/२०१८

Article about Manishankar Ayaar statement in Paksitan about Partition and V D Savarkar


एवढा सावरकर व्देष का मणिशंकरजी?
मणिशंकर अय्यर हे कट्टर सावरकर व्देष्ट्ये आहेत याची कल्पना आता सर्वांनाच आली आहे. सावरकरांनी तर मुस्लिमांचा ही व्देष केला नाही परंतू मणिशंकर तुम्ही  मात्र  सावरकरांचा अतिशय व्देष करता आहात. काही वर्षांपूर्वी याच मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातील सावरकरांच्या काव्यपंक्ती पुसल्या होत्या.मणिशंकर अय्यर यांच्यासारख्याच काही नेत्यांनी तत्कालिन राष्ट्रपतींकडे संसदेत सावरकर यांचे तैलचित्र लावू नये अशी मागणी सुद्धा केली होती. आता परवा मणिशंकर यांनी लाहोर मध्ये जाऊन आपल्याच थोर स्वतंत्रता सेनानी बद्दल गरळ ओकली. मणिशंकर अय्यर यांना सावरकरां विषयी इतके वैर का आहे की त्यांनी पाकिस्तानात जाऊन “फाळणी सावरकरांमुळे झाली” असे बेताल वक्तव्य करावे. हो सावरकर अंदमानातून सुटून आल्यावर त्यांची 1923 साली “हिंदुत्व” शब्द त्यांच्या एका पुस्तकात लिहीला. मणिशंकर अय्यर यांच्या म्हणण्याप्रमाणे “हिंदुत्व” हा शब्द कोणत्याही भारतीय धर्मग्रंथात नाही. मग मणिशंकर अय्यर यांनी हे सुद्धा सांगावे की “धर्मनिरपेक्ष” हा शब्द कुठून आला आहे? त्याची उत्पती कशी झाली? तो भारतीय धर्मग्रंथात आहे की नाही ? एकाच देशात दोन प्रकारचे लोक राहतात जे अफगाणिस्तान, इराण येथून भारतात आले त्यांची पितृभू जरी आता भारत असली तरी त्यांची पुण्यभू तिकडेच आहे अर्थात त्यांची तीर्थक्षेत्रे तिकडे आहेत. भारतीयांची तीर्थक्षेत्रे भारतातच आहेत म्हणून भारतीयांची पितृभू आणि पुण्यभू भारत हीच आहे. एकाच देशात दोन भिन्न देशांच्या विचारसरणीचे लोक वास्तव्य करीत आहेत या अर्थाने त्यांनी व्दिराष्ट्र संकल्पना मांडली होती. मणिशंकर हे सावरकरांना फाळणीबाबत दोषी ठरवत आहेत. परंतू मणिशंकर महाशय फाळणी बाबत खरे दोषी कोण आहेत हे सर्वाना माहीत आहेत. पंतप्रधान बनण्याची महत्वाकांक्षा कुणाला होती, इंग्रजांची फुट निर्माण करण्याचे धोरण, जीन्नांचा गांधीजींकडे हट्ट हे सर्वाना ज्ञात आहे तेंव्हा आपण ज्या देशात दहशतवाद पोसला जातो, ज्या देशामुळे आपले कित्येक जवान ऐन तारुण्यात हुतात्मा होत आहेत त्या आपल्या शत्रू राष्ट्रात जाऊन काहीही बरळू नका. लालबहादूर शास्त्री यांच्या काळात आपल्या सैन्याने पाकिस्तानात धडक मारली होती तेंव्हा सावरकरांची अखंड भारताची आशा पुनश्च जागृत झाली होती. आपणच आपल्या देशातील राष्ट्रपुरूषांचा अनादर करीत असू तोही शत्रूराष्ट्रात जाऊन तर आपल्या सारखे अभागी आपणच.  शत्रूराष्ट्रात  असतांना आपण पक्षभेद विसरून आपल्या देशातील नेत्यांचे गुणगान करायला हवे. परंतू वोट बँकेसाठी लांगूलचालन करणा-या नेत्यांची मांदियाळीच आपल्या देशात आहे. आपण डावे, उजवे यातच आपली एनर्जी नष्ट करीत असून इतर देश विकासाचे उच्चांक स्थापित करीत आहेत, आपण बुलेट ट्रेनचे रूळ उखाडण्याच्या चिथावण्या देत आहोत,प्रांतवाद वाढवीत आहोत, आपल्याच राष्ट्रपुरुषांचा अपमान करीत आहोत. मणिशंकर महोदय फाळणीचे खापर सावकरांवर का फोडता आहात? होय त्यांनी “हिंदुत्व” शब्द निर्मिला नव्हे  त्यांना तो निर्मित करावा लागला कारण तुमच्या नेत्यांकडून हिदूंना हीन दर्जाची वागणूक देणे सुरु झाले होते, अल्पसंख्यांंकांचे लांगूलचालन, त्यांच्या मागण्या पूर्ण करणे, त्यांना पाठीशी घालणे सुरु झाले होते, “मी चुकीने हिंदू धर्माचा आहे” अशी काहीशी वाक्ये बोलल्या जाऊ लागली होती. हिंदूंच्या मनात तुमच्याच नेत्यांमुळे असुरक्षितता निर्माण झाली होती.यासारख्या गोष्टींमुळे जे या देशातील मूळ नागरिक आहेत त्यांना डावलून परकीय आक्रमकांच्या वंशजांचे लांगूलचालन, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे, त्यासाठी प्रंसगी उपोषण करणे यासारख्या गोष्टींमुळे सावरकर व्यथित झाले व त्यांना हिंदुत्वाची भाषा बोलणे गरजेचे झाले. मणिशंकर आपण विनाकारण द्वेष भावना ठेवू नये. सावरकरांनी ज्या यातना भोगल्या त्या सुद्धा सांगा जरा, देशभक्तांच्या देशभक्तीची तुलना करू नये परंतू  कुण्या तत्कालीन मुस्लीम लीग किंवा कॉंग्रेसवाल्यास तशा यातना भोगाव्या लागल्या ते सुद्धा  सांगा व मनात एवढा सावरकर द्वेष ठेवू नका.

०३/०५/२०१८

Golden Shower Tree , article describe about it.

बहावा फुलला
भर उन्हाळ्यात बहर येणारी अनेक झाडे आहेत. त्यातील लक्ष वेधून घेणारे, केवळ लक्ष वेधणारेच नव्हे तर आकर्षक, नजर खिळवून ठेवणारे झाड म्हणजे “बहावा”. मनाला आनंद देणा-या अनेक गोष्टी असतात. आज-काल तर अशा “एन्जॉय” देणा-या गोष्टी वारेमाप झाल्या आहेत.कुणी पार्ट्या,पेग यात आनंद मानतात, कुणी मित्रांना भेटण्यात तर कुणी अजून कशातून आनंद मिळवतात. परंतू खरा “एन्जॉय” हा नैसर्गिक गोष्टीतून मिळत असतो.“तरुशिखरावर कोकिलकवीने पंचम स्वर लाविला” असे वर्णन असलेल्या कोकीळेच्या मंजूळ स्वरातून मिळणारा आनंद, कमळपुष्प पाहिल्यावर मिळणारा आनंद, वन परिसरातून सहज प्रवास करतांना आकस्मिकपणे समोर आलेला वनचर पाहिल्यावर होणारा आनंद, भर ऊन्हात मोठ्या वृक्षाच्या छायेत वामकुक्षीचा आनंद, पक्षी न्याहाळतांना मिळणारा आनंद, उंच पहाडावरून कोसळणारा धबधबा तर खळखळून वाहणारा निर्झर पाहिल्यावर त्याचा आवाज ऐकल्यावर जो आनंद मिळतो तो पैसा खर्चून सुद्धा मिळत नाही.शहरातील भर ऊन्हातून 46 ते 47 डिग्री तापमानातून बाईकवर जातांना मध्येच कुठेतरी पिवळ्याजर्द फुलांचे झुबकेच्या झुबके असलेला, फुलांनी लदबदलेला बहावा वृक्ष दिसला की सुद्धा असाच आनंद मिळतो. क्षणभरासाठी माणूस तापमान, उष्णता, ऊन, ऊन्हाळा हे सर्व साफ विसरून जातो. या बहाव्याबाबत काहीतरी लिहावे असा कधीचा विचार मनात सुरु होता. जीएसटी कार्यालय, खामगांव समोरून जात असतांना आज बहावा पुनश्च दृष्टीस पडला. आपल्या लदबदलेल्या फुलांनी माझ्या बाबतीत सुद्धा काही लिहा असाच जणू इशारा करीत होता. काही वर्षांपूर्वी कोर्टा समोरील आमच्या मित्राच्या चहाच्या दुकानावर बसलो असता दुकानासमोरच फुलांनी बहरलेला बहावा होता. अजूनही आहे. ऊन्हाळ्याचेच दिवस होते त्यामुळे बहावा फुलांनी चांगलाच लदबदलेला होता. आम्हाला तेंव्हा या वृक्षाचे नांव माहीत नव्हते. विशाल देशमुख या मित्राने “गुगल” चा आधार घेत त्वरीत शोध घेतला. बहाव्याचे चित्र, इंग्रजीतील नांव “गोल्डन शॉवर ट्री” तसेच मराठीतील नांव बहावा हे सर्वच सापडले. बहाव्याचे मूळ दक्षिण आशिया हाच म्हणजेच आपलाच भाग आहे हे सुद्धा कळले. तोपर्यंत बहाव्याशी एवढा परिचय नव्हता. चहा दुकान मालक आमचे मित्र संदीप पाटील यांनी खामगांव कोर्टासमोरील ते बहाव्याचे झाड स्व.सुभाषराव देशपांडे माजी नगराध्यक्ष, खामगांव यांनी त्यांच्या कार्यकाळात लावले असल्याची आठवण सांगितली. बहावा झाड तेंव्हा ज्ञात झाले. एखाद्याशी परिचय झाला की मग एकमेकांबाबत अनेक गोष्टी आपोआप माहीत होतात. मानवी स्वभावाप्रमाणे हे पशूपक्षी , वृक्षवल्ली बाबत सुद्धा लागू आहे. तसाच मग बहाव्याशी परीचय झाला आणि बहाव्या बाबत अनेक गोष्टी माहित झाल्या. झाड फुललेले असता त्याच्या खालून कधी स्त्री गेली की तिचा केशसंभार अधिक लांब होतो, दाट होतो असा समज म्हणा की अंधश्रद्धा असल्याचे समजले. प्रत्यक्ष अनुभवी कुणी दिसले नाही किंवा एखाद्या मोठा केशसंभार असलेल्या स्त्रीला “काय हो तुमचे केस छान लांब आहे कधी बहाव्याच्या झाडाखालून चालत गेल्या का ?” असे विचारण्याची हिम्मत सुद्धा केली नाही.हे झाड फुलले की 45 ते 60 दिवसांनंतर पावसाळा सुरु होतो. म्हणूनच याला निसर्गाचा “शॉवर इंडीकेटर” सुद्धा म्हटले जाते. या झाडाला चांगला बाहार आला की शेतकरी चांगले पिक येणार असे समजतात. त्यांना तसे वेध लागतात. पिक आणि पावसाबाबतचा हा समज बहुतांश कोकणात आहे. या झाडाचे अनेक औषधी उपयोग सुद्धा आहेत. आज-काल सप्तपर्णी हा वृक्ष मोठ्या प्रमाणात लावला जात आहे.आपण बहावा हा वृक्ष जर मोठ्या प्रमाणात लावला तर निश्चितच आपल्या विदर्भातील कडक ऊन्हाळा सुद्धा बहाव्याच्या ऐन ऊन्हाळ्यातील पिवळ्या झुबकेदार फुलांमुळे सुखदायी वाटेल.