२४/०७/२०१८

People expecting various things from Government, article on this issue with the help of famous Saint Kabeer's 'Doha'


मांगन मरण समान है  (1) 
     संत कबीराने अनेक उत्तोमोत्तम दोहे लिहिले आहेत त्यापैकी एका दोहयात संत कबीर म्हणतात की कुणाला काही मागणे म्हणजे एक प्रकारचे मरणच होय. परंतू आजकाल वाचायला कुणाला वेळ आहे. त्यातच कबीर म्हणजे फारच दूरचे झाले. त्यात पुन्हा संतांना जात-पात पाहून वाटून घेतले गेले आहे. कबीरच्या या दोहयाची आठवण होण्याचे कारण म्हणजे भारतात सर्वच नागरीकांना सध्या सरकारकडे सतत काही ना काही याचना करण्याची अतिशय वाईट सवय लागली आहे. याची प्रचीती आपणास वेळोवेळी येतच असते. मागण्याची ही सवय आता इतकी जडली आही की, या मागण्या करतांना अनेकदा बाल-गोपालांना सोबतघेऊन केल्या जातात. म्हणजे त्यांना सुद्धा आपसूकच याचना करण्याचे बाळकडू पाजले जात आहे.ते सुद्धा पुढे जाऊन याचकच बनण्याची शक्यता अधिक वाटते. अनेक संघटना त्यांच्या-त्यांच्या मागण्या पुढे रेटतच असतात. ठीक आहे तुम्ही मागण्या करा परंतू तुमच्या मागण्यांमुळे इतर समाज बांधवांवर काही परीणाम होतो आहे का ? मागणी देशहीताची आहे का ? असा विचार संघटना करतांना दिसत नाही. स्वहीत जोपासण्यात सर्व इतके मश्गूल झाले आहेत की देशहीताशी कुणाला काही देणे-घेणे नाही.कुण्यातरी सत्तेपासून वंचीत असलेल्या राजकीय पक्षांनी ह्यांची माथी भडकवून दिली की हे रस्त्यावर गाड्या, टायर पेटवणे व तोडफोडी सुरू करतात. जनतेच्या मागण्या पूर्ण करता-करता सरकारच्या नाकी नऊ आले आहे व भविष्यात या सवयीने देश आर्थिक संकटात जाणार आहे. तुम्ही तुमच्या मागण्या संवैधानीक पद्धतीने का नाही रेटत बुवा? सरकारी मालमत्ता खुशाल नष्ट करणे,त्यांना हानी पोहोचवणे,स्वजातीच्या किंवा वैयक्तीक मागण्या रेटण्यासाठी रस्त्यावर अन्नपदार्थ नासाडी करणे,ते रस्त्यावर फेकणे हे अनुचित नव्हे का? विविध मागण्यांसाठी निघणारे  मोर्चे, आंदोलने एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर देशांत खचितच होत असावेत.सरकारी नोक-यांसाठी एवढी धाव का असते ? येनकेन प्रकारेण सरकारी सेवेत चिकटले,सरकारचे जावाई झाले की गंगेत घोडे न्हाले, त्या सरकारी सेवेतून स्वकुटुंबाचा उदरनिर्वाह झाला की समाजाचे देशाचे काहीही होवो अशीच स्थिती काही अपवाद वगळता दिसून येते.काहीच उदाहरणे अशी असतात की बिकट स्थितीतून सुद्धा चांगली शेती फुलवतात, उत्पन्नाचे उच्चांक गाठतात किंवा इमाने-इतबारे सरकारी नोकरी करतात.राजकीय पक्षांच्या नादी लागून मागण्या करून, आंदोलने करून  वेळोवेळी जनतेस वेठीस धरणे योग्य नव्हे. परंतू हे सांगणे सुद्धा मोठे कठीण झाले आहे. कबीराने जरी कुणाला मागणे चांगले नसते असे सांगितले असले तरी मागण्या करणे अगदीच अनुचित आहेत असेही म्हणता येणार नाही अनेकदा सरकारला जाणीव करून देणे सुद्धा जरूरी आहे. बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही असेही म्हटले जाते म्हणतात म्हणून नेहमी आपल्याच मागण्यांसाठी रडतच राहणे,जनतेस वेठीस धरणे, एकीकडे महात्मा गांधींचे नाव घेणे आणि दुसरीकडे हिंसा करणे हे कितपत योग्य आहे? परंतू लक्षात कोण घेतो ? नुकतीच पंढरपूर वारी झाली ज्ञानेश्वर माऊलींनी “जो जे वांछिल तो ते लाहो” असे पसायदान मागीतले होते. त्याप्रमाणे सर्वांना त्यांचे ईप्सित फळ प्राप्त होवो परंतू त्यासाठी इतरांना कष्ट देऊन नव्हे. तसेच सतत मागण्या व त्यासाठी जनतेला कष्ट होतील अशी आंदोलने करू नयेत कारण बरेचदा ज्याच्याकडे मागणी केली जाते त्याच्या कडून न्यायालयीन प्रणाली व प्रक्रीया यांमुळे ती मागणी पूर्ण करणे किचकट होत असते हे समजून घेणे सुद्धा जरूरी असते.“जो जे वांछिल तो ते लाहो” हे तर आहेच परंतू प्रत्येकाने मागण्या करतांना कबीराचा दोहा मात्र जरूर लक्षात ठेवावा
“मांग मरण समान है, मत मांगो कोई भीख
मांगनसे मरना भला यह सद्गुरू की सीख”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा