१९/०७/२०१८

They are making biopics on criminals and forgetting real heros like Batukeshwar Dutt


देशद्रोही दत्तचा उदोउदो, देशभक्त दत्त मात्र उपेक्षित
भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाली. परंतू काही वर्षातच सर्व चित्र बदलले. हिन्दी चित्रपट जोरात झळकू लागले त्यांचीच चर्चा होऊ लागली व देशभक्तीची लाट झपाटयाने ओसरली इतकी की ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता , क्रांतिकार्यात भाग घेतला होता ते अडगळीस जाऊन पडले. त्यांची तीव्र उपेक्षा झाली , त्यांचे विस्मरण झाले. कुणालाही हयात असलेल्या ,प्रत्यक्ष ‘इन्कलाब’ करणा-या  क्रांतीवीरांकडे बघण्याची सुद्धा फुरसत नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात निदान काही वर्षे तरी उत्तम दर्जाचे चित्रपट होते परंतू नंतर देमार, गुन्हेगारी उदात्तीकरणाचे, उत्तान दृश्ये असणारे चित्रपट निघू लागले. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे त्याच पठडीतला आणखी एक चित्रपट ‘संजू’ नुकताच प्रदर्शित झालेला. दत्त आडनांव असलेल्या टुकार,देशद्रोही अभिनेत्याच्या(?) जीवनांवर आधारीत असलेला हा चित्रपट. हा जरी देशद्रोही असला तरी याच्या ‘दत्त’ या आडनावावरून एका देशप्रेमी ‘दत्त’ आडनाव असलेल्या उपेक्षित क्रांतिकारकाची आठवण झाली. पहिला देशद्रोही तर दुसरा कट्टर देशप्रेमी, पहिला चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला तर दुसरा सर्वसामान्य. पहिल्याने व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन, तीन लग्नांपूर्वी अनेक स्त्रिया उपभोगून, आपल्याच भारतवासियांना मारण्यासाठी आणलेली शस्त्रे घरात लपवून नाना त-हेची दुष्कृत्ये केली. तर दुस-याने ऐन तारुण्यात लग्नादी इच्छा बाजूला सारून देश स्वतंत्र करण्याचा ध्यास घेऊन भारतीयांना स्वतंत्रता मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी बॉम्ब बनवण्याचे शास्त्र शिकले, असेंब्लीत बॉम्ब फेकले व अंदमानात कारावास भोगला,राजकीय कैद्यांना मिळणा-या हीन दर्जाच्या वागणुकी विरोधात उपोषण
केले ,सुटल्यानंतर ‘चले जांव’ चळवळीत सह्भागी झाला.यातील पाहिल्याचे नांव वाचकांना त्वरीत आठवले असेल परंतू दुस-याचे नांव मात्र कदाचित काहींनाच आठवले असेल.या दोहोंपैकी पहिला म्हणजे अनेक बुद्धीभ्रष्ट भारतीयांचा लाडका,त्यांच्या दृष्टीने भोळा संजू बाबा म्हणजेच संजय दत्त तर दुसरा म्हणजे महान क्रांतीकारी बटुकेश्वर दत्त. उद्या 20 जुलै रोजी बटुकेश्वर दत्तचा स्मृती दिन आहे.किती जणांना ठाऊक आहे? किती शाळांत व इतर ठिकाणी त्याला अभिवादन केले जाणार ? असे प्रश्न विचारल्यास 130 करोड जनतेच्या या देशात बोटावर मोजता येतील एवढे लोक निघतील.स्वतंत्रता मिळाल्यावर अनेक नेत्यांनी सत्तेचे फळे उपभोगली,काही वर्षातच संरक्षण खात्यात घोटाळे केले.बटुकेश्वरला काय मिळाले? उपजिविका करण्यासाठी या इंग्रजांना घाबरवणा-या महान क्रांतीकारकास कधी सिगारेटच्या कंपनीचा एजंट बनावे लागले तर कधी टूरिस्ट गाईड. बटुकेश्वरला टी.बी. झाला होता त्याला सरकारी दवाखान्यात भरती केले होते परंतू त्याच्याकडे कुणीही फिरकले नाही. त्याच्या एका मित्राने “क्या दत्त जैसे क्रांतीकारी को भारत मे जन्म लेना चाहिये?” असा एक लिहिल्यावर गुलजारीलाल नंदा व इतर काहींनी एक हजार रुपयांची मदत केली. 17 ला बटुकेश्वर दत्त कोमात गेला व 20 जुलै 1965 रोजी त्याने प्राण सोडले. भगतसिंग , सुखदेव व राजगुरू यांच्यावर जेथे अंतिम संस्कार झाले त्याच्या शेजारीच माझ्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची त्याची अंतिम इच्छा होती, ती पूर्ण करण्यात आली.बटूकेश्वरच्या हयातीत तर त्याची उपेक्षा झालीच परंतू आपण त्याच्या मृत्यूनंतरही त्याची उपेक्षा करीत आहोत. आमचेच लोक भारताच्या भावी आधारस्तंभ असणा-या आमच्याच तरुणांसाठी बटुकेश्वर दत्तचा चित्रपट तर सोडा साधा माहितीपटही न काढता डॉन दाऊद, सनी लिओनि व देशद्रोही,सजा भोगून आलेल्या संजय दत्त यांचे biopic दाखवतो हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे.

ता.क. – आज 19 जुलै रोजी मंगल पांडे जयंती आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा