०५/०७/२०१८

We are making biopics of criminals, They made biopic on Indian mathematician S.Ramanujan


बॉलीवूडचा ‘संजू’ हॉलीवूडचा ‘रामानुजन’  

भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे आम्हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक. दिवस सुरु होताच आमचे फिल्मी
गाणे गुणगुणणे,ऐकणे सुरु होते त्यानंतर बाजार, कार्यालये इ ठिकाणी गाणी किंवा फिल्मी गप्पा होत असतात,दिवसाचा शेवट सुद्धा चित्रपट वाहनी किंवा गाण्यांची वाहिनी पाहून होतो. गृहिणी, हॉटेलवाले, वाहन चालक यांचे सुद्धा त्यांचे कामकाज करीत असतांना गाणी ऐकणे किंवा गुणगुणणे सुरु असते. इतका चित्रपटसृष्टीचा आपल्यावर प्रभाव आहे. 1970 च्या दशकापासून भारतीय चित्रपटांनी कूस बदलली. रोमँटीक चित्रपट जाऊन अन्याया विरूद्ध पेटून उठणारा किंवा अन्यायामुळे गुन्हेगार बनलेला नायक अशा आशयांचे चित्रपट निघू लागले.त्यातूनच मग गुन्हेगारांचे हळूवारपणे Glorification अर्थात उदात्तीकरण सुरु झाले.सत्तरच्या दशकातील हाजी मस्तानच्या जीवनाशी साधर्म्य असणारा अमिताभचा दिवार, नंतर कमल हसनचा नायकन त्याचेच हिंदी रूप असलेला विनोद खन्नाचा दयावान, अनिल कपूरचा बेताज
बादशहा.आता-आताचे वास्तव, कंपनी, वन्स अपॉन टाईम इन मुंबई, मराठीत मन्या सुर्वे अशा कितीतरी चित्रपटातून गुन्हेगारांचे उदात्तीकरण झाले आहे.भारतीय चित्रपटसृष्टीला गुन्हेगारी क्षेत्रातून होणारा वित्तपुरवठा हे त्याचे एक कारण आहे. परंतू अशा चित्रपटांचा  समाजावर चांगला परिणाम होत नसून विपरीत परिणाम होत असतो. नेमके त्यातून वाईट घेतले जाते. हा सर्व उहापोह यासाठी की, इकडे आपले निर्माते गुन्हेगार, देशद्रोही यांच्यावर चित्रपट बनवत असतांना तिकडे विदेशी निर्मात्यांनी मात्र आपल्या भारतीय गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचावर चित्रपट बनवला होता. तो मात्र फार चर्चिल्या गेला नाही, ना मिडीयाने या चित्रपटावर प्रकाश टाकला. रामानुजन यांच्या वरील हा चित्रपट सर्वप्रथम 2015 मध्ये टोरँटो येथील चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता,त्यानंतर इंग्लंड व अमेरिकेत. व नंतर जगभर प्रदर्शित झाला.सुनील दत्त व नर्गिस या माजी मंत्री व खासदार,समाजसेवी व अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या दाम्पत्याच्या कुपुत्र ठरलेल्या देशद्रोही,शिक्षा भोगून आलेल्या व्यसनाधीनतेमुळे यमसदनाच्या दरवाजातून वडीलांच्या कृपेने परत आलेल्या संजय दत्त उर्फ संजूबाबाच्या जीवनावरील संजू हा चित्रपट उत्पन्नाचे उच्चांक प्रस्थापित करीत असतांना “द मॅन हू नो इन्फिनिटी” या रामानुजनच्या चित्रपटाला थीएटर सुद्धा मिळाले नव्हते. जिथे कुठे हा झळकला तिथे प्रेक्षक नाही. विद्यार्थ्यांसाठी त्याचे शो सुद्धा झाले नाहीत. संजू चित्रपटा विरोधात समाज माध्यमांवर कुणी टीकेचे पोस्ट केल्या तर त्यावर आपल्या देशातील तथाकथित अति बुद्धिमान लोक संजू कडे केवळ चित्रपट म्हणून पहावे, रणवीरचा अभिनय पहावा, संजूने जे केले ते इतर तरुण करणार नाही असे बोलून त्यांच्या अकलेचे तारे तोडत आहेत. काय म्हणावे भारतीयांच्या अभिरुचीला? एकीकडे देशप्रेमी लोकमान्य टिळक, सावरकर, रामानुजन, स्वामी विवेकानंद यांच्यावरील चित्रपट चालत नाही तर दुसरीकडे देशद्रोही संजय दत्तच्या जीवनावर आधारीत संजूवर दर्शकांच्या उडया पडत आहे.तो उत्पन्नाचे उच्चांक प्रस्थापित करीत आहे. लोक मुंबईमध्ये झालेले ते बॉम्बस्फोटच विसरले तर याच देशद्रोही संजूबाबाने अंडरवर्ल्डच्या नादि लागून घरात लपवलेली शस्त्रे यांच्या काय लक्षात असतील. संजूच्या सततच्या दुष्कृत्यांमुळे त्याच्या बापाला कसे उंबरे झिजवावे लागले होते हे सुद्धा लोक विसरले.तुकडोजी महाराज म्हणाले होते,”मला तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावरील गाणी सांगा मी तुमच्या देशाचे भविष्य सांगतो” आज आपण तरुणांना काय देत आहोत? असले देशद्रोह्यांना उदात्त करणारे चित्रपट? विधू विनोद चोप्रा,राजकुमार हिरानी तुम्हाला चित्रपट बनवायला हा संजूबाबाच काय सापडला ? या भारतभूमीत अनेक नामवंत, देशप्रेमी वैज्ञानिक, समाज सेवक होऊन गेले यांपैकी एकाच्या जीवनावर बनवाना एखादा चित्रपट, देशासाठी. परंतू ते तुम्हाला जमणार नाही कारण त्यासाठी पैसा कोण लावणार? तुम्हाला काय फायदा होणार? काय पहावे काय नाही हा वैयक्तिक मुद्दा असला, संजू सारख्या चित्रपटांना आपण जरी रोखू नाही शकलो तरी पालकांनो आपल्या पाल्यांना संजय दत्तची वास्तविकता सांगू शकतो व त्यांना यु ट्यूबवर रामानुजन, विवेकानंद यांसारखे चित्रपट दाखवू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा