३०/०८/२०१८

Article elaborates Raj Kapor , R K Studio, its films and news of R K Studio selling


“आग” ने सुरुवात,अंतही आगीनेच


परवाच्या वृत्तपत्रात रसिकांचे मनोरंजन होईल असे विविध चित्रपट निर्माण करणारा, समाजिक संदेश देणारे चित्रपट निर्मित करणारा सुप्रसिद्ध आर. के. स्टूडीओ विकणार असे वृत्त झळकले. पन्नासच्या दशकात राज कपूर या अभिनेत्याने हा स्टूडीओ उभारला. आमच्या पिढीच्या पूर्व पिढीचा हा काळ , ती पिढी सुद्धा त्याकाळी बाल्यावस्थेत होती. तरीही आर. के. विकणार हे वाचल्यावर कुठेतरी दु:ख वाटले. कपूर कुटुंबियांसाठी सुध्दा हा एक भावनीक निर्णय होता. कारण पन्नासच्या दशकातील सुमधुर संगीत असलेल्या चित्रपटांचा हा स्टूडीओ साक्षीदार होता. आर के नांव माहीत होण्याचे कारण ठरले ते नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर दाखवलेला बरसात हा चित्रपट. तेंव्हा सर्वप्रथम आर.के चे नांव व नटाने एका हातात व्हायोलिन धरलेला व एका हाताने नटीला धरलेले असे या आर.के स्टूडीओचे ते सुप्रसिद्ध बोधचिन्ह पहायला मिळाले. दूरदर्शन ही एकमेव वाहीनी असल्याने सर्वांना तीच वाहीनी पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे हाच चित्रपट घरी पाहून शाळेत आलेल्या एका मित्राने ज्ञानात भर टाकली. “अबे आर.के. च्या त्या लोगो मधले दोघे म्हणजे राज कपूर व नर्गिस आहे”, दूसरा म्हणाला “राज कपूरचा पहीला चित्रपट आग सपशेल पडला व म्हणून त्याने आग बुझ गयी अब बरसात लाउंगा असे म्हटले व बरसात हीट झाला. भारतात कुठेही आर.के. हा शब्द ऐकला की अनेकांना राज कपूरचा स्टूडीओ आठवतो. आर.के. शी ओळख झाल्यावर पुढे तेथे निर्मित अनेक चित्रपट पहाण्याचा योग आला. घरी रेडीओ होताच त्यामुळे बिनाका व तत्सम हिन्दी गाण्यांच्या कार्यक्रमातून “मेरा जुता है जपानी” सारखी गाणी ऐकण्यात येतच होती. राज कपूर म्हणजे चित्रपट सृष्टीतील एक मोठे व्यक्तीमत्व. “शोमॅन” बिरुद मिरवणारा. संगीतकार शंकर-जयकिशन, गीतकार शैलेन्द्र, हसरत जयपुरी यांच्यासह बरसात, श्री 420, बूट पॉलिश, डाकूंच्या पुनर्वसनावर आधारीत जिस देशमे गंगा बहती है, सुप्रर डूपर हीट बॉबी असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्याने दिले होते. सिनेतारकांचे अंगप्रदर्शन सुरु करून दर्शक खेचण्याचा ठपका सुद्धा त्याच्यावर पडला आहे. आपल्या चित्रपटातून कलात्मक पद्धतीने अंगप्रदर्शन होईल व सेन्सॉरच्या कैचीत सापडणार नाही अशी दृश्ये देण्यात राज कपूरचा हातखंडा होता. राम तेरी गंगा मैली, मेरा नाम जोकर मधील दृश्ये ही त्याची काही उदाहरणे. परंतू तरीही राज कपूर या नावाला एक वलय होते. त्याने त्याच्या आर. के. स्टूडीओव्दारे चित्रपट निर्माण करून रसिकांचे मनोरंजन नक्की केले आहे. मेरा नाम जोकर हा त्याचा दोन मध्यांतर असणारा दीर्घ चित्रपट मात्र साफ कोसळला होता, मेरा नाम जोकर सुपर फ्लॉप झाल्यावर प्राणने म्हणे राज कडून फक्त एक रुपया मानधन घेतले होते. राज कपूरने बरीच वर्षे रसिकांचे मनोरंजन केले.                                                        अखेरच्या दिवसांत त्याला दादासाहेब
फाळके पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले होते. राजने पुथ्वीराज कपूर या आपल्या वडीलांकडून अभिनयाचा वारसा घेऊन आर.के.ची उभारणी केली होती.मुंबईतील चेंबूरच्या या स्टूडीओने मोठा काळ पाहीला आहे. अनेक रंगपंचमी उत्सव पाहीले आहे. राज येथे रंगपंचमी मोठ्याप्रमाणात साजरी करीत असे. अनेक सिनेकलावंत रंगपंचमीला आर.के.त हजेरी लावत. अनेक चित्रपटांचे चित्रण या स्टूडीओ ने पाहीले आहे. न्यायालयाचा सेट तर येथे कायम बनवलेला होता. पन्नासच्या दशकापासूनच्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा स्टूडीओ मेंटेन करता येत नाही म्हणून विकल्या जाणार आहे हे ऐकून अनेक सिनेरसिकांना निश्चितच दु:ख वाटत असेल. परंतू सद्यस्थितीत स्टूडीओ ही कल्पना सुद्धा नामशेष झाली आहे. लोक आऊट डोअर चित्रण जास्त करतात. इन डोअरसाठी बंगले भाड्याने घेतात. अशा काळात कपूर परीवाराने हा निर्णय घेतला तो योगी का अयोग्य हा भाग निराळा. परंतू त्या जागेवर एखादे मल्टीफ्लेक्स, राज कपूर, पृथ्वीराज यांच्या चित्रपटांचे, दुर्मिळ छायाचित्रांचे संग्रहालय सुद्धा उभारता येऊ शकले असते असे वाटते. अत्यंत नावाजलेल्या या आर के स्टूडीओची सुरुवात “आग” चित्रपटाने झाली होती. आता काही महीन्यांपूर्वी आर के ला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. कदाचित ही आग सुद्धा हा स्टूडीओ विकण्याचे एक कारण असावे. राज कपूरचा आग हा सिनेमा आपटला होता पुढे राजने उभारी घेतली परंतू त्याचा स्टूडीओ मात्र वास्तवातील आगीतून उभारी घेऊ शकला नाही. आग चित्रपटाने सुरुवात झालेल्या या स्टूडीओचा अंत आगीनेच व्हावा हा सुद्धा एक दुर्दैवी योगायोगच म्हणावा.

२३/०८/२०१८

Former Prime minister of India Atal bihari Vajpayee, didn't left behind property for his family, he donated his home for library. Article elaborates his virtues

अपने दम पर खडे रहो....













16 ऑगष्टला अटलजी गेले. लोकसत्ताने अग्रलेखात लिहिले की ,”वाजपेयी ही हळूहळू नष्ट होत असलेली एक सर्वसमावेशी भारतीय प्रवृती आहे” खरेच सर्वसमावेशी वृत्ती ही लोप पावत चालली आहे. वाजपेयीं सारख्या नेत्यांमुळे ती वृत्ती टिकून होती. 66 दिवसांपासून एम्स मध्ये दाखल असलेल्या माजी लाडक्या पंतप्रधानास जेंव्हा लाईफ सपोर्ट सिस्टीम वर ठेवल्याच्या बातम्या आल्या तेंव्हा करोडो देशवासीयांच्या हृदयाचा ठोका चुकला. 16 ऑगष्ट ला संध्याकाळी जेंव्हा त्यांची निधन वार्ता आली तेंव्हा हा “जीता जागता राष्ट्रपुरुष” असलेला भारत देश सुन्न झाला. नेहरूंच्या काळापासूनचा साक्षीदार असलेल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या या बुद्धीमान नेत्याने आपल्या कवी मनाने, संवेदनशील वृतीने, वाक्चातुर्याने, उपजत असलेल्या सर्वसामावेशी वृतीने सर्व भारतवासीयांच्या मनावर अनभिषिक्त पुढे अभिषिक्त असतांना अधिराज्य केले. राजकारण हे समाजकारण असलेल्या काळात वाजपेयी खासदार झाले. दिल्लीतील आपल्या निवासस्थानापासून ते संसदेपर्यंत ते पायी जात. सहा महिन्यानंतर जेंव्हा सहा महिन्यांचे एकत्रित मानधन मिळाल्यावर ते रिक्षाने संसदेत गेले होते. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी आपले निवासस्थान त्वरीत सोडले होते. अखिलेश यादव व महाराष्ट्रातील नेतापुत्रांना जेंव्हा सरकारी निवासस्थान सोडण्याची वेळ आली होती तेंव्हा त्यांनी त्यांच्या निवासस्थानाची कशी अवस्था केली होती हे देशानी पहिले आहे. वाजपेयी निर्भीड, निर्मोही, निस्पृह होते. राजकारणात निव्वळ पैसे मिळवण्यासाठी दाखल होण्याच्या व तसे जाहीर बोलूनही दाखवणा-या सद्य स्थितीतील नेत्यांनी अटलजींना केवळ श्रद्धांजली देऊन उपयोग नाही तर अटलजींचा एखादा गुण आत्मसात केला तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. प्रदीर्घ काळ राजकारणात राहून सुद्धा वाजपेयी त्यांच्या मागे काही मोठी इस्टेट ठेऊन नाही गेले. आता तर कमिशनचे रेट ठरलेले असतात,
सरकारी नोकर तर पैस्यासाठी एवढे आसुसलेले असतात की प्रोबेशन पिरेड मध्येच त्यांचा भ्रष्टाचार सुरू होतो. रामाचा दाखला देत “मै डरता हुं तो बदनामी से डरता हुं” असे म्हणणा-या निष्कलंक वाजपेयी यांनी मात्र त्यांच्या कुटुंबियासाठी काही लाभ घेतले नाही, सरकारी सुविधा लाटल्या नाही. बहिणीकडे गॅस नव्हता तर खासदारांच्या कोट्यातून गॅस मिळत असूनही अटलजींनी बहिणीला गॅस कनेक्शन मिळवून दिले नाही व बहिणीने सुद्धा त्यांना मागितले नाही. मूत्रपिंडावर उपचार करण्याची गरज असतांना केवळ पैसे नव्हते म्हणून वाजपेयी विदेशात जाऊ शकत नव्हते तेंव्हा राजीवजींनी त्यांना एका शिष्ट मंडळात घेतले व न्यूयॉर्क दौरा असतांना वाजपेयींना तेथे पाठवून उपचार करून येण्यास सांगितले. अटलजी बालपणी ग्वाल्हेर येथे असतांना अकोल्याचे नारायणराव तरटे हे तेथे संघ प्रचारक म्हणून होते. नारायणरावांनी अटलजींना संघात आणले, अटलजींवर संघाचे संस्कार झाले, पुढे श्यामाप्रसाद मुखर्जी व दीनदयाल उपाध्याय यांच्या संपर्कात आल्यावर बालपणी झालेले संस्कार अधिकच दृढ झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हे गुण उपजत होतेच ते अधिक वृद्धिंगत झाले .एवढे की खासदार असतांना सुद्धा स्वत:चे कपडे ते स्वत: धुत असत अशी आठवण संघाचे जेष्ठ विचारवंत मा.गो.वैद्य सांगतात.आपण जेवढे उदारमतवादी आहोत,सर्वसमावेशक आहोत तेवढेच कणखर सुद्धा असू शकतो हे त्यांनी कारगिल युद्ध  व अणुचाचणी वेळी दाखवून दिले आहे. अणुचाचणी नंतर पाकड्यांनी अमेरिकेकडे कांगावा केला, वाजपेयी यांना अमेरिकेत बोलावले गेले तेंव्हा वाजपेयी यांनी ते झुगारून लावले व आपला बाणेदारपणा जगाला दाखवून दिला. पाच दशके पत्रकारिता, साहित्य, राजकारण असा प्रवास करूनही वाजपेयी यांनी स्थावर,जंगम अशी काही मालमत्ता जमा केली नाही. कमावले ते जनतेचे प्रेम. जमीन जुमला तर मिळवलाच नाही उलट स्वत:चे वडीलोपार्जित घर वाचनालयासाठी उपयोगात आणले. माझ्या कडून काही अपेक्षा ठेऊ नका असा परखड संदेश त्यांनी आपल्या आप्तस्वकीयांना दिला होता. “अपने दमपर खडे रहो, या भांग पीकर पडे रहो” असे त्यांनी कुटुंबीयांना म्हटले होते. पुढच्या सात पिढ्यांची चिंता वाहणा-या, त्यांच्यासाठी अवैध मार्गाने माया जमवून त्यांना दुबळे बनवणा-या सद्यस्थितील भ्रष्ट राजकारण्यांना, नोकरदारांना सुद्धा अटलजींचा हा संदेश समर्पक नाही का ?.                  


१६/०८/२०१८

Article on the critical health condition of former Prime minister Mr Atal Bihari Vajpayee


मौतसे ठन गयी
     काल जनतेचे, स्वपक्ष व विरोधी पक्षीयांचे लाडके माजी पंतप्रधान, अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती नाजूक असल्याची बातमी येऊन धडकली. सर्व देशवासी काळजीत बुडाले. 25 डिसे 1924 रोजी जन्मलेले वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक, पत्रकार, संपादक असा प्रवास करीत जनसंघात दाखल झाले. कवी मनाचे वाजपेयी सत्ताधा-यांवर आपल्या अमोघ वाणीने हल्ला करीत. त्यांच्या भाषणांच्या वेळी सभागृह स्तब्ध असे. नेहरू सुद्धा त्यांची तारीफ करीत असत. जनसंघाच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असतांना युनो मध्ये त्यांनी हिंदीतून भाषण केले होते. पुढे लालकृष्ण अडवाणी यांचे सोबतीने भाजपासाठी प्रचंड कष्ट घेतले. दोन सदस्यां पासून ते आजचे बहुमतातील सरकार म्हणजे लालकृष्ण अडवाणी व वाजपेयी यांची मेहनत. त्यातही वाजपेयी यांच्याकडे जनतेला आपल्या शुद्ध हिंदी वाणीने, कवितांनी आकृष्ट करण्याची एक कला होती. सत्ताधा-यांवर याच वाणीने प्रखर हल्ले चढवून त्यांना ते निष्प्रभ करीत असत. त्यांचे व्यक्तीमत्व अनोखे होते. जनता, इतर पक्षातील सदस्य त्यांच्यातील चुंबकीय शक्तीने त्यांच्याकडे आकृष्ट होत असत. आरोप-प्रत्यारोप करतांना कुणावर व्यक्तीगत हल्ले ते करीत नसत.1996 मध्ये 13 दिवस नंतर 13 महिने आणि नंतर 24 पक्षांचे सरकार 5 वर्षे त्यांनी चालवून दाखवले. 24 वेगवेगळी विचारसरणी असणा-या पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचे कसब वाजपेयींनी दाखवले. जगात असे दुसरे उदाहरण क्वचितच आढळेल. हे करण्याचा करिश्मा एक प्रामाणिक राजकारणी, देशाला प्रथम प्राधान्य देणारे वाजपेयीच करू जाणोत. राजकारणातील एक प्रामाणिक चेहरा म्हणून जनता त्यांच्याकडे केवळ पहात नसे तर
जनता त्यांच्यावर विश्वास ठेवून असे. वाजपेयी यांचे वक्तृत्व, त्यांची प्रतिमा ओळखून असलेल्या नरसिंहराव यांनी ते पंतप्रधान असतांना वाजपेयी विरोधी पक्षातील असूनही वाजपेयी यांना व्हीएन्ना परिषदेत पाठवले होते. भारतातील लोकशाही किती प्रगल्भ आहे हे जगाला त्यावेळी दिसून आले होते. नरसिंहरावांनी वाजपेयी यांना पाठवण्याचे कारण वाजपेयी यांची अजातशत्रू प्रतिमा हेच होते. वाजपेयी विरोधी पक्षात असूनही त्यांच्याप्रती सत्ताधा-यांना आदर असे. सद्यस्थितीतील विरोधी पक्षीयांनी वाजपेयी यांची ते विरोधी पक्षात असतांना कशी भूमिका वठवत असत याचा जरूर अभ्यास करावा. पुढे ते औट घटकेचे पंतप्रधान झाले त्यांचे 13 दिवसांचे सरकार कोसळले त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाने सारा देश हेलावून गेला होता. “सरकारे आयेंगी, सरकारे जायेंगी मगर ये देश चलाना चाहिये” असे ते म्हणाल्यावर लोकसभेत जरी विश्वासमताने हरले , तरी करोडो देशवासीयांच्या मनातील त्यांनी  यापूर्वीच कमावलेला विश्वास अधिक वाढला. पुढे जेंव्हा ते “मै आपना त्यागपत्र देने जा रहा हूं” असे म्हणाले तेंव्हा जनतेने कौल दिलेले, जनतेला हवे असलेले हे वाजपेयी सरकार कोसळले. परंतू देश प्रथम मानणा-या वाजपेयी यांनी त्यांचे सरकार पाडण्या-यांचा सुद्धा व्देष केला नाही. मतभेद असला तरी चालेल परंतू मनभेद नसावा अशी त्यांची भूमिका असे. “Right Person with wrong party”  अशी त्यांच्यावर टीका होत असूनही पार्टी सोडण्याचा विचार सुद्धा कधी त्यांच्या मनाला  शिवला नाही. पुढे जनतेने पुनश्च वाजपेयी यांनाच कौल दिला. सुवर्ण चतुष्कोण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, काश्मीर नीती,जगात भारताची मान उंचावणारी अणुचाचणी असे अनेक चांगले निर्णय वाजपेयी सरकारने घेतले. अजात शत्रू,प्रामाणिक,कवी, स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेते असलेले वाजपेयी गेल्या कित्येक वर्षांपासून मौन बाळगून आहेत. त्यांना भारतरत्न मिळाले त्यावेळी सुद्धा त्यांची प्रकृती काही ठीक नव्हती गेल्या 66 दिवसांपासून ते “एम्स” मध्ये भरती आहे. काल ते “व्हँटीलेटर” असल्याचे वृत्त आले आणि देश चिंतेच्या गर्तेत गेला आहे. वाजपेयी मृत्यूशी झुंज देत आहेत. आपल्या एका कवितेत वाजपेयी म्हणाले होते, “मौत से ठन गयी” या कवितेत वाजपेयी म्हणाले होते , “तू दबे पांव चोरी छुपे न आ , सामने वार कर फिर मुझे आजमा“ आज खरोखरच वाजपेयी यांची “मौत से ठन गयी है” सर्व देश त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करीत आहे. ईश्वर देशवासीयांची प्रार्थना पूर्ण करो व अटलजींच्या प्रकृतीत सुधारणा करो.

०९/०८/२०१८

Article about BJP victory in Sangli, Jalgaon Corporation elections and Uddhav Thackeray statement


शिकार करनेको आये ,शिकार होके चले     
     आता काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी घेतलेली उद्धव ठाकरे यांची मुलाखत चर्चेत होती. शरद पवार यांची मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत जेवढी गाजली त्या मानाने  उध्दव ठाकरे यांची मुलाखत मात्र विशेष रंगली नाही व कमी प्रभावी वाटली. परंतू या मुलाखतीत बंदूक, शिकार, सावज अशा शब्दांचा प्रयोग करण्यात आला. “सावज आता दमले आहे, शिकार आम्ही करणार” असे म्हणण्यात आले. शिवसेना तशी 2014 पासूनच भाजपावर तोंडसुख घेत आहे. अफझलखानाची फौज सारख्या अनेक शब्दांचा प्रयोग भाजपा जेष्ठ नेत्यांवर करून त्यांना हिणवण्यात आले. जनतेला या दुटप्पी भूमिकेचे मोठे अप्रूप वाटत आहे. सत्तेत सहकारी असूनही शिवसेना नकारात्मक का आहे? भाजपा त्यांची विशेष दखल घेत नाही आहे का ? शिवसेनेची दखल न घेणे , विशेष महत्व न देणे हे भाजपाला मिळालेल्या संख्याबळामुळे होत आहे व त्यामुळेच शिवसेना बिथरली आहे. बाळासाहेबांच्या काळात उलट होते शिवसेना भाजपाच्या तुलनेत खूप पुढे होती. त्यावेळी बाळासाहेब सुद्धा “कमळाबाई” सारखे शब्दप्रयोग करून भाजपाला हिणवायचे. परंतू बाळासाहेबांचा करिश्मा वेगळा होता असे तेच करू जाणोत इतर कुणी तसेच करते तेंव्हा मात्र काही वेगळेच अर्थ निघतात किंवा काढले जातात. बाळासाहेबांच्या कार्यकाळात शिवसेना मोठी प्रबळ होती, प्रभावी होती शिवाय संख्याबळ सुद्धा जास्त होते, खेडोपाडी शिवसेना चांगली फोफावली होती. आता संख्याबळ नसूनही, सत्तेची फळे चाखत असूनही सतत आपल्या सहकारी पक्षांविरुद्ध गरळ ओकत राहणे याचा विपरीत परिणाम शिवसेनेवरच होण्याची शक्यता बळावली आहे. शिवसेनची अशी भूमिका पाहून शिवसनेच्या लोकप्रियतेवर परिणाम होत आहे. शिवसेना असे का करीत आहे याचे जनतेलाच काय तर कार्यकर्त्यांना सुद्धा आश्चर्य वाटत आहे? संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना उद्धवजी ज्यांच्या सोबत सत्ता भोगत आहे त्यांचीच शिकार करायची आहे असे म्हणाले. 2019 मध्ये होणा-या निवडणूकांच्या अनुषंगाने हे म्हणण्यात आले होते. परंतू महाराष्ट्रात मात्र सावज अदयाप दमले नसल्याचे सांगली व जळगांव महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालांवरून सिद्धच झाले आहे. शिका-यांना तर सांगली निवडणूकीत खाते सुद्धा उघडता आले नाही. तर जळगांव महानगरपालिकेत काही विशेष निकाल लागला नाही. दोन्ही महानगरपालिकेत सावज वाकोल्या दाखवत शिका-यापासून खूप दूर निघून गेले. कुण्याही मुख्यमंत्र्याच्या काळात झाली नसतील तेवढी आंदोलने, मोर्चे ,मागण्या, संप हे फडणवीस मुख्यमंत्री असतांना झाले व होत आहेत. तरीही “आगमे जलके भी जो निख्ररे है वोही सच्चा सोना“ याप्रमाणे फडणवीस हे या सर्व घटनांतून  सोन्यासारखे तावून सुलाखून निघून अधिक मुरब्बी,अधिक प्रभावी,अधिक प्रगल्भ,अधिक लोकाभिमुख,अधिक लोकप्रिय  झाले आहे. विचारसरणी सारखी असल्यावर खरे तर बेरजेचे राजकारण करणे आवश्यक आहे. तुम्ही एकमेकांच्या शिकारी केल्यात तर आपसूकच सत्ता हातची जाईल. इतर पक्षांशी तुम्ही युती करणे शक्य नाही, तरी तुम्ही केलीच तर जनता तुम्हाला 2024 मध्ये फटका हमखास देण्याचीच शक्यता अधिक. आताशा जुळवून घेणे हे सहसा कुठेच आढळत नाही, पूर्वी प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे व बाळासाहेब यांची जुळवून घेण्याची मानसिकता असे. सांगली, जळगांव येथील महानगर पालिका निवडणुका निकालांतून सध्या तरी हे स्पष्टच झाली आहे की सावज काही दमलेले नाही. परंतू हे शिका-याने समजून घेणे जरुरी आहे 2019 हे सावज व शिकारी या दोहोंनाही सोपे आहे असे नाही. सांगली, जळगांव  निकालातून  सावज टिपण्यास आलेल्या शिका-याची “शिकार करनेको आये शिकार होके चले” अशी गत झाली आहे. शिका-याने उगीच सावज टीपण्यापेक्षा बेरजेचे राजकारण करीत वाटचाल करावी अन्यथा 2019 मध्ये “शिकार करनेको आये शिकार होके चले” अशी परिस्थिती होऊ शकते. अती ताणल्याने जर तुटले तर सावज व शिकारी  दोघानांही पाठशिवणीचा खेळ खेळत बसावे लागेल आणि कुणीतरी दुसराच राजा बनून तुमच्या पाठशिवणीच्या खेळाची गंम्मत पहात बसेल.

०२/०८/२०१८

Youths are dancing on "Kiki Do You Love Me" Song,by climbing down from running car , it could be dangerous for them.Article elaborate on this

प्लिज डोन्ट लव्ह किकी 

     अमेरिकेत सध्या एक चॅलेंज खूप गाजत आहे. सोशल मिडीया आल्यापासून अनेक चांगल्या गोष्टी होवू लागल्या तसेच या माध्यमाचा वापर करून तरुणाई नव-नवीन थेरं करू लागली. सुरुवात झाली ती “आईस बकेट" चॅलेंज ने. या आव्हानात थंड पाण्याची बादली डोक्यावर ओतून दाखवायची ते चलचित्र आपल्या मित्रांना फॉरवर्ड करायचे मग त्याने सुद्धा तसे करायचे. अनेक सिनेतारक-तारकांनी सुद्धा हे आव्हान करून दाखवले होते त्यानंतर आले ते पोकेमॉन व त्यानंतर ब्ल्यू व्हेल आणि आता नवीन टूम निघाली ती म्हणजे “किकी डू यु लव्ह मी?” हे गाणे. अमेरिकेत हे गाणे गाजले. धावत्या कार मधून उतरायचे, या गाण्यावर नाच करायचा ते गाणे चित्रित करायचे व आपल्या मित्रांना व्हॉटस अॅपवर फॉरवर्ड करून त्याला असा नाच करण्याचे चॅलेंज द्यायचे.सध्या अमेरिकेत तरुणाईने याची धूम चालवली आहे.धावत्या गाडीतून उतरून या गाण्यावर थिरकतांना अनेक नाच्या तरुण-तरुणींचे अपघात सुद्धा झाले. आता ही टूम भारतात सुद्धा येणार किंबहुना आली आहे. पोलीस प्रशासन या बाबत जागरूक झाले आहे. भारतातील तरुणाई सुद्धा असले नसते उपद्व्याप हमखास करणार.कारण पाश्चात्त्यांचे त्यांचे नेमके ‘एन्जॉय’ करण्याचे तेवढे अनुकरण करण्यात आपले तरुण चांगले वाकबगार आहेत. पाश्चात्त्यांचे चांगल्या बाबींचे अनुकरण टाळून त्यांच्यातील वाईट तेवढे त्वरीत आत्मसात करायचे हे आपल्या देशात पूर्वी पासून चालत आले आहे. आता दीड–दोन वर्षांपूर्वी  महाराष्ट्रात "आय ए एस" दाम्पत्यांचा एकुलता एक हुशार मुलगा ब्ल्यू व्हेल या गेमच्या चॅलेंज ला बळी पडला होता. पोकेमॉनमुळे सुद्धा अनेक अपघात झाले आहेत. परंतू “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” हे ध्यानात न ठेवता तरुण सोशल मीडियातील अशा जीवघेण्या चॅलेंजसला बळी पडतच आहेत. सध्या लहान मुले ,तरुण पालकांच्या ऐकण्यात नाहीत.बापाचा दरारा ईतिहास जमा झाला. कार्यालयातून बाप घरी येण्याची वेळ झाली, किंवा त्याच्या गाडीची चाहूल लागली की घरात पळणारा मुलगा आता बाप झाला आहे परंतू त्याची मुले मात्र तो झोपल्यावर घरात दाखल होत आहेत. कधी नाईट रायडींग करून तर कधी झिंगून. परंतू आपल्या बापाला वचकून असणा-या या आताच्या बापाची मात्र पोरांना काही बोलण्याची हिम्मत राहिली नाही. आज-काल पालकांना पाल्याचे ऐकावे लागते. ते म्हणतील तसे करावे लागते. आजचे हे तरुण , लहान मुले नकार पचवू शकत नाही. पाल्य जीवाचे काही बरे वाईट करेल अशी भीती या पालकांना असते .कारण तसे किस्से घडेल सुद्धा आहेत. म्हणून पालक सुद्धा पाल्यांना आता जास्त रागे भारत नाही, शाळेत सुद्धा शिक्षा नाहीत म्हणून मग मुले अतिशय व्दाड  होत चालली आहेत. त्यातच 1760 लांब अंतरावर असलेली क्लासेस,हॉबी क्लासेस येथे जाण्यासाठी म्हणून मग लहान वयातच त्यांच्यासाठी दुचाक्या, चारचाक्या घेतल्या जातात. गाड्या घेतल्या की हे पोर स्वैर होऊन भरधाव वेगात गाड्या पिटाळतात, त्यांना जणू गाडीच्या फक्त अॅकस्लरेटरचाच उपयोग करणे ठाऊक असते. कुणी कडून काहीही वाहन अथवा व्यक्ती अथवा जनावर येऊ शकते याचे काहीही भान न ठेवता हे षोडश वर्षीय भरधाव वेगाने गाड्या निव्वळ दामटत असतात, धोपटत असतात. भरधाव वेगामुळे हे विद्यालयीन महाविद्यालयीन तरुण ऐन तारुण्यात अपघातास बळी पडतात, जायबंदी होतात. त्यातच निघतात हे “किकी” सारखे नसते थेरं, नसते उपद्व्याप. कोण कुठला गायक हे गाणे म्हणतो काय, आपण तारतम्य सोडून धावत्या कार मधून उतरून त्यावर नाचतो काय, आपल्या घरी आपले कुटुंबीय आहे, आपले करीअर आहे नसती आफत ओढवू शकते, जन्माचे पंगत्व येऊ शकते  याचा काहीही एक विचार न करता तरुण हे किकी चॅलेंज स्वीकारत आहेत. यांना चांगले सांगितलेले सुद्धा आवडत नाही. तरी या लेखाद्वारे सांगावेसे वाटते की ,”किकी” गाण्यावर खुशाल नाचा परंतू घरात . रस्त्यांवर नाचून स्वत;चा किंवा किंवा  दुस-यांचा जीव धोक्यात आणू नका. अकॅॅडेमीक चॅलेंजेस स्विकारा. “किकी डू यु लव्ह मी" म्हणा परंतू “प्लिज प्लिज डोन्ट लव्ह टू डान्स ऑन रोड ऑन किकी साँग”