१९/०९/२०१८

Article describes the changing way of celebrating Lord Ganesh festival in Maharashtra


बिभित्स नृत्ये व नोटांची उधळण
काल एका वृत्तवाहीनीवर यंदाच्या गणेशोत्सवातील बातमी प्रक्षेपित होत होती. बातमी होती परळीच्या वैद्यनाथ गणेशोत्सव मंडळातील नृत्याबाबतची. आता नृत्य म्हटले तर चौसस्ट कलांपैकी एक कला. भारतीय शास्त्रीय नृत्य म्हटले तर एकापेक्षा एक असे  शास्त्रीय नृत्यप्रकार आपल्या भारत देशाने जगाला दिले आहेत. कथकली, भरत नाट्यम, कुचीपुडी, आपले लोकनृत्य लावणी असे हे भारतीय नृत्यप्रकार. यांत निपूणता प्राप्त करण्यासाठी कलाकारांना कित्येक वर्षांची साधना करावी लागते. परंतू वरील पैकी एखादे नृत्याविष्कार आपल्या मंडळात सादर करण्याऐवजी परळीच्या वैद्यनाथ गणेश मंडळाने आयोजन केले ते हरीयाणातील सपना चौधरी नामक कुण्या एका स्त्रीचे ओंगळवाणे, बिभित्स नृत्य. नृत्य कसले ते तर निव्वळ शरीराचे विशिष्ट अंग प्रत्यांग हलविण्याचे हिडीस प्रदर्शनच होते. हे सर्व सुरू होते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत. नेत्यांच्या उपस्थितीत असले नृत्य प्रकार होणे ही देशातील सर्वात सुसंस्कृत म्हणवणा-या महाराष्ट्राच्या अध:पतनाचीच सुरुवात होय. नुकतेच राम कदम यांनी स्त्रीयांविषयी अनुद्गार काढण्याची जी अक्षम्य चूक केली होती तेंव्हा मुंडे महाशय तुम्ही त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. आणि आता तर तुमच्या देखत असले बिभित्स नृत्यप्रकार ते सुद्धा बुद्धीची आराध्य देवता मानल्या जाणा-या गणराया समक्ष. गणेशोत्सवात असले बिभित्स नृत्य आयोजन करते वेळी आयोजकाना काही गैर कसे वाटले नाही ? मुंबई दहीहंडीत सुद्धा असेच सिनेमातील नट-नटयांना आणून नेते त्यांच्यासह नाचले होते. परळीमध्ये गणेशोत्सवात नृत्य काय? तिकडे मुंबईत चांदिवली भागातून आमदार असलेले तसेच व माजी पालकमंत्री राहीलेले नसीम खान यांच्यावर नोटांची उधळण काय ? कार्यकर्त्यांवर प्रभाव पाडण्यासाठी , त्यांना खुश करण्यासाठी हे असले प्रकार करणे कितपत योग्य आहे? गणेशोत्सव आयोजकांनो तुमचे गणपती पहाण्यासाठी सर्वसामान्य,मध्यमवर्गीय कुटुंब आया-बहीणींसह मोठया भक्ती भावाने, तुमचे नवसाला पावणारे असे म्हणवणा-या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि तुम्ही त्यांना काय दाखवता हे असले थेरं? कलेला राजाश्रय असलाच पाहीजे परंतू त्या कला सुद्धा तितक्याच स्ंदर,निपुणतेचे,साधनेचे दर्शन करणा-या असाव्यात.तिकडे ख-या कलावंतांना मानधनासाठी,अनुदानासाठी खस्ता खाव्या लागतात, मंत्रालयाच्या वा-या कराव्या लागतात. इकडे नेते मात्र नाच गाण्यात मश्गूल, नोटा उधळण्यात मग्न असतात. एकीकडे बारबालांसाठी यांचेच नेते धडपड करीत होते आणि आता हे बारऐवजी बालांना चक्क गणपती समोर नाचवत आहेत व पैसे स्वत:च्याच आंगावर उधळून घेत आहेत. पैसे उधळणारे भानूशाली अंगावर पैसे उधळण्याची आमची परंपरा आहे व ते पैसे आम्ही दान करतो असा बिरबली युक्तीवाद करतात. अनेक थोर नेत्यांची,साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या नेत्यांची परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. कुठे गेले असे नेते ? आता निव्वळ चमकोगिरी सुरू असते. पाच वर्षात काही कामगिरी,विकास केलेला नसतो मग जनतेला खुश कसे करायचे?दाखवा मग बिभित्स नृत्य आणि उधळा पैसे. नेहमीप्रमाणेच मग नेत्यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देतांना केलेल्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी येनकेन प्रकारे सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तरुणाईसाठी हा कार्यक्रम घेतल्याचे मुंडे म्हणतात. वा मुंडे साहेब चांगली वाट दाखवत आहात तरुणाईला (की वाट लावत आहात).गणेशोत्सवात हे असले कार्यक्रम साजरे करणे म्हणजे महाराष्ट्राची व लोकमान्यांनी सुरुवात केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेची एकप्रकारची शोकांतिकाच म्हणावे लागेल. आजही काही चांगले नेते या देशात नक्कीच आहेत परंतू हे बुद्धीच्या देवा गणनायका नेहमी संविधान, देशप्रेम, माता भगीनी बाबत आदर दाखवण्याचा देखावा करणा-या आमच्या नेत्यांना व त्यांच्या प्रेरणेने कार्य करणा-या मंडळांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सदबुद्धी दे रे बाप्पा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा