२७/०९/२०१८

Water problem of Khamgaon, Maharashtra

राजकीय दुरदृष्टीहीनता व खामगांवकरांची पाणी समस्या
     खामगांव शहर एकेकाळी फरशी भागापर्यंत मर्यादित होते. फरशीच्या पलीकडे फक्त शासकीय कार्यालय व काही निवासस्थाने अशी तुरळक वस्ती होती. त्या काळात फरशी भाग व इतर जुन्या भागात जनुना तलावातून पाणी पुरवठा होत असे. काही भागात पक्क्या विहिरींतून पाणी पुरवठा केल्या जात होता. कालौघाने खामगांव शहराची लोकसंख्या वाढली ज्ञानगंगा धरणातून पाणी पुरवठा सुरु झाला. परंतू जनुना पाणी पुरवठा योजना मात्र ठप्प झाली. दुर्लक्षित झाली त्यामुळे जनुना तलाव केवळ विसर्जन तलाव झाला. जनुना व ज्ञानगंगा अशा दोन्ही पाणीपुरवठा व्यवस्था समांतर सुरु ठेवल्या असत्या तर दोन्ही जलसाठयांत संकटाच्या, पाणी टंचाईच्या काळात कदाचित जास्त पाणीसाठा शिल्लक राहिला असता. किंवा जनुना तलाव म.औ.वि. मंडळच्या पाणी पुरवठ्यासाठी वापरता आला असता. परंतू राजकीय कुरघोड्या करण्यात आपली उर्जा घालवणा-यांनी खामगांवकरांना मात्र तहानलेलेच ठेवले. दुरदुष्टी ठेवली नाही. आधीच खामगांव शहर व लगतचा परीसर म्हणजे कमी पावसाचा भाग. मोठ्या नद्या नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी जुने जलस्त्रोत अर्थात विहिरींवर खामगांवकर विसंबून होते किंबहुना आजही आहेतच. खामगांव शहरात आजही चांगल्या पक्क्या पाण्याच्या विहरी आहेत त्यावर पंप बसवून  त्या-त्या भागात पाणी पुरवठा होऊ शकतो परंतू केवळ सत्तेची तहान असलेल्या राजकीय मंडळींना आणि नगर परिषद जल विभाग, मा.  मुख्याधिकारी  यांना खामगांवकर जनतेची तहान मात्र दिसत नाही. जुन्या अनेक विहिरी आता निव्वळ कचराकुंड्या झाल्या आहेत, या विहीरींकडे देशभर स्वच्छता मोहीम सुरु असतांना, गांधी जयंतीच्या 150 व्या जयंती निमित्त स्वच्छता पंधरवाडा सुरु असतांना नगर परिषद विहिरींच्या स्वच्छतेकडे मात्र साफ कानाडोळा करीत आहे. हातपंपांची दुरावस्था पहावत नाही. वर्षभर पाणी पुरेल याची पावसाळ्यातच सोय करून ठेवणारे तत्कालीन शिवराय कुठे आणि पाण्यासाठी मागणी करणा-या रयतेकडे दुर्लक्ष करणारे, पाणी पुरवठ्यासाठी काहीही एक नियोजन नसणारे सांप्रत कालीन राज्यकर्ते व त्यांचे नोकरशहा कुठे. नवीन जलवाहिन्या टाकून कित्येक वर्षे उलटली त्या तशाच पडलेल्या आहेत, नागरिकांकडून शुल्क घेऊन बसवलेले मीटरचे नळ निव्वळ अंगणातील एक छान शोभेची वस्तू बनले आहेत. पाहुणे मंडळी आली की या मीटरच्या नळाबाबत उत्सुकतेने विचारणा करतात तेंव्हा त्यांना या नळाचे पाणी अब्जावधी मीटर अंतरावर आहे त्यामुळे त्यात अजून पाणी पोहोचले नाही असे सांगितल्यावर त्या पाहुणे मंडळीची उत्सुकता सुद्धा लोप पावते. या लेखाद्वारे स्थानिक प्रशासनातील सुज्ञ मंडळींना खामगांवातील जनतेच्या पाणी समस्येची थोडीफार जरी तळमळ असेल , जनतेसाठी पक्क्या पाण्याच्या विहिरी जाणून घेण्याची तीळमात्र जरी उत्सुकता असेल तर त्यांना त्या विहिरींची यादी उपलब्ध करून देता येईल.ती तयार आहे. खामगांवकरांसाठी येता उन्हाळा मोठा कठीण असणार आहे,भयंकर असणार आहे. आधीच प्रचंड उन त्यात पाणी नाही. टँकरचे दर वाढतील, नगर परिषदचे टँकर आहेत की नाही देव जाणे? सण,उत्सव,एकमेकांवर कुरघोड्या करणे यांमध्ये अधिक मग्न असणारी नगरसेवक मंडळी स्थानिक प्रशासन यांचे या येत्या पाणी टंचाईग्रस्त भीषण उन्हाळ्याकडे लक्ष आहे की नाही कुणास ठाऊक.यंदा खामगांववासियांवर वरुण राजाची अवकृपा झाली आहे.ज्ञानगंगा धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे.जिल्हा प्रशासन, उपविभागीय कार्यालय, महसूल विभाग,मुख्याधिकारी,नगर परिषद यांनी येत्या पाणी टंचाई बाबत वेळोवेळी सभा घेणे जरुरी आहे,खामगांवची पाणी समस्या दूर कशी करता येईल?,पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल ?,टँकर दरांवर नियंत्रण कसे ठेवता येईल?  हे विषय त्यात चर्चिल्या जाणे अपेक्षित आहे. राजकीय दुरदृष्टीने केलेल्या विकासाचे अनेक दाखले आहेत. तशीच राजकीय दुरदृष्टी ठेवल्यास व जनतेच्या प्रश्नांवर एकोप्याने कार्य केल्यास निश्चितच खामगांवची पाणी समस्या दूर होऊ शकते अन्यथा हे केवळ स्वप्नरंजनच ठरेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा