०५/०९/२०१८

Article on Maharashtra MLA Ram Kadam's "abduct girl" remark


घासावा शब्द,तासावा शब्द,तोलावा शब्द , बोलण्यापूर्वी 
     भारतातील लोकप्रतिनिधींना निवडून आले की कोणती गुर्मी येते कुणास ठाऊक. जनते समोर विकासाबाबत भाष्य करायचे सोडून हे लोक दुसरेच काहीबाही बरळत असतात. गेल्या काही वर्षात तर अशा वाचाळवीर लोकप्रतिनिधींनी नाना प्रकराची अशोभनीय वक्तव्ये करून अगदी वीट आणला आहे. कधी शेतक-यांबाबत अनुद्गार तर कधी महिलांबाबत अनुच्चार, कधी कर्मचा-यांना मारहाण, तर कधी थेट पंतप्रधानांवर केलेली हलक्या पातळीची टीका. यात अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. परवा तर राम कदम या आमदार महाशयांनी कहरच केला. दहीहंडी उत्सवाच्या भाषणात बोलतांना हे महाशय म्हणाले की ,”तुम्हाला कोणती मुलगी आवडते ते सांगा, तुमच्या आई वडीलांना जर मुलगी पसंत असेल तर आम्ही तुमच्यासाठी त्या मुलीला पळवून आणू“  वा रे आमदार ! तुम्हाला काय लोकांच्या मुली पळवण्यासाठी जनतेने निवडले आहे काय ? अहो काय मोगलाई आहे काय की कुणाचीही लेकबाळ उचलून न्यावी ? ज्या शिवाजी महाराजांचे नांव घेता अहो त्यांनी त्यांच्या सरदाराने पळवून आणलेल्या  कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला मातेसमान मानून तिची सन्मानाने रवानगी केली होती. एकीकडे त्या शिवरायांचा आदर्श बाळगत असल्याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे मुलींना पळवून आणण्याची भाषा करायची ! जाहीर  कार्यक्रमात वृत्तपत्र, वाहिन्यांचे कॅमेरे रोखलेले असतांना तुमची जिभ घसरतेच कशी? नुकतेच अटलजींचे दु:खद निधन झाले आपल्या सुसंस्कृत वाणीने,मर्यादाशीलतेने,अजातशत्रू व्यक्तीमत्वाने त्यांनी तुमच्या पक्षाला हे आजचे दिवस दाखवले आहेत. आपल्या पक्षातील आमदाराला असे बरळतांना पाहून त्यांचा आत्मा तळमळला असेल. अटलजी जर हयात असते तर सर्वप्रथम त्यांनीच तुम्हाला कानपिचक्या दिल्या असता. कर्मचा-यांनी लोकप्रतिनिधींशी कसे वागावे याची आचारसंहिता आहे परंतू लोकप्रतिनिधींचे वर्तन कसे असावे याचा काही उहापोह होतांना दिसत नाही. प्रत्यक्ष आमदार मुलींना पळवण्याची भाषा करतो आहे हे पाहून गुंडगिरीला तर आणखी उत येणारच. “मी प्रथम  महिलांबाबत सन्मानाने बोललो हे कुणी दाखवत नाही, माझे अर्धवट भाषण दाखवले जात आहे ” अशी सारवासारव राम कदम आता करीत आहे. परंतू ही सारवासारव करून आता काही फायदा नाही . धरणात लघुशंका करण्याचे भाष्य करणे अजित दादांना भोवले तसेच राम कदमांना हे महिलांच्या सन्मानास बाधा पोहोचवणारे वाक्य चांगलेच भोवणार आहे. यापूर्वीही अनेक लोकप्रतिनिधींनी कर्मचा-यांना मारहाण केली आहे,बेताल वक्तव्ये केली आहेत. यांत शशी थरूर,दिग्विजय सिंह,राहुल गांधी,एकनाथराव खडसे, रावसाहेब दानवे, अजित पवार, सोलापूरचे बनसोडे  आणखी अशी कित्येक नांवे आहेत. म्हणून  या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधीं करीता आचारसंहिता असावी व आचारसंहिता भंग करणा-यावर कठोर कारवाईची तरतूद असावी. संत रामदास,कबीर संत तुकाराम यांनी बोलण्या बाबत अनेक श्लोक ओव्या लिहिल्या आहेत. सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींची जिभ हल्ली अधून मधून घसरत असतेच. तेंव्हा तुकोबांनी लिहिलेल्या
“घासावा शब्द, तासावा शब्द,तोलावा शब्द बोलण्यापूर्वी“
व त्या पुढील ओळींचे जरूर वाचन करीत राहावे. दहीहंडीच्या या कार्यक्रमात महिलांना पळवून आणण्याची भाषा करणा-या मर्यादा पुरुषोत्तम रामाचे नांव धारण करणा-या राम कदम यांनी मात्र मर्यादेची लक्ष्मण रेषा ओलांडून स्वत:ची नाचक्की स्वत:च केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा