१७/१०/२०१८

Article on "Rajabhau", a food hawker of times in Balaji polt and some areas of Khamgaon, Maharashtra

“आज खाये दहीवडे ssssss”
  माणसाला देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विसरण्याची. वाईट गोष्टी विसरणे आणि जीवनक्रम व्यतीत  करणे हे जरी खरे असले तरी अनेक चांगल्या, वाईट स्मृती प्रत्येक व्यक्ती मनात जपतच असतो. बालपणीच्या मनावर कोरलेल्या अनेक घटना, अनेक व्यक्ती  ह्या प्रत्येकाच्याच स्मरणात असतात. असाच एक व्यक्ती, एक फेरीवाला आजपासून 30-35 वर्षांपूर्वी व त्याही आधीपासून खामगांव शहरांत दररोज खाद्य पदार्थ विक्री करीता येत असे. त्या काळी खामगांव आजच्या इतके विस्तारीत नव्हते. आज जितक्या खाद्य पदार्थांच्या गाड्या खामगांवात दिसतात तेवढ्या त्या काळात नव्हत्या. त्या काळात रुचीपालटाकरीता खामगांवकर याच एका फेरीवाल्यावर निर्भर होते. काळी टोपी,धोतर,सदरा घातलेल्या त्या व्यक्तीचे वय तेंव्हा 65 ते 70 च्या घरात असावे. संध्याकाळी “आज खाये दहीवडे ssssss” असली काहीतरी दात नसलेल्या तोंडाच्या बोळक्यातून त्याची आरोळी ऐकली “राजाभाऊ आले“ हे लोकांना समजायला वेळ लागत नसे. त्वरीत त्यांच्याभोवती लोक, लहान मुले गोळा होत व पाणी पुरी, दहीवडे व इतर अनेक पदार्थांचा स्वाद घेत असत.एक फेरीवाला व त्याचे नांव राजाभाऊ एवढेच काय ते त्या माणसासोबतचे नाते.परंतू आजही तो स्मरणात का असावा? हे एक कोडेच आहे. परंतू  कालपरत्वे राजाभाऊंचे येणे बंद झाले. त्यांचे न येण्याचे कारण काय हे कधी कुणाकडून ऐकले नाही किंवा बालवयात राजाभाऊ का येत नाही ? याची चौकशी करण्याचे कधी मनांतही आले नाही. रक्ताचे नाते असलेले कुटुंब असते आणि  मित्र, दैनंदिन परिचित फेरीवाले,परीट,भाजीवाले,चप्पल दुरुस्त करणारे, घरगुती सेवक, आपले पाळीव पशू  यांचा  समावेश असलेला तो आपला परिवार असतो. असे सरसंघचालक मोहनजी भागवतांनी खामगावच्या सभेत सांगितले होते. परंतू परिवारातील या लोकांची आपण दाखल ती काय घेतो?आपल्या परिवारात असलेल्या या वरील लोकांना आपण किमंत ती काय देतो? विविध प्रसंगी आपणास त्यांचे स्मरण सुद्धा होत नाही. राजाभाऊंचे सुद्धा तसेच झाले. ते सुद्धा एक दैनंदिन परिचयाचे फेरीवाले होते. आपल्या आपल्या परिवारातील होते. परंतू एका फेरीवाल्याचे येणे बंद झाल्याने कुणाला काही फरक पडला नाही. राजाभाऊ कुठे गेले, ते का येत नाही?याची कुणी चौकशी केली की नाही देव जाणे? कुणी चौकशी केलीही असेल तर ती बहुतांपर्यंत मात्र नक्कीच पोहोचली नव्हती.राजाभाऊ कोण होते,कुठले होते,जात काय, धर्म काय,आडनांव काय? हे आज खामगांवातील तत्कालिन तरुण आणि सध्याचे जेष्ठ नागरिक यांना सुद्धा ठाऊक नाही. जात- धर्म तर ठाऊक असण्याचे काही कारणही नाही.तसे राजाभाऊ हे काही फार मोठेही नव्हते, किंवा काही उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते वगैरे सुद्धा नव्हते.परंतू जिभेवर साखर ठेऊन सचोटीचा व्यवसाय करणारे होते.केवळ व्यवसायच नव्हे तर त्यांच्या ग्राहकांची संतुष्टी होईल हा सुद्धा त्यांचा खाक्या होता.म्हणूनच त्यांचे स्मरण झाले किंबहुना दहीवडे खातांना हमखास होते.खात्री आहे की खामगांवकर समवयीन व जेष्ठांना सुद्धा तसे होत असावे.तसेच प्रेरणा घेण्यासाठी नेहमीच काही नावाजलेल्या,फार मोठ्या व्यक्तींची गरज नसते.प्रसंगी एखादा ‘कॉमन मॅन’ सुद्धा प्रेरणादायी असतो. राजाभाऊ हे असेच प्रेरणादायी ‘कॉमन मॅन’ होते. साठी उलटल्यावरही कार्यरत राहणे,व्यवसायात सचोटी,लहान-थोर सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने बोलणे अशी राजाभाऊंची वागणूक सुद्धा नक्कीच प्रेरणादायी होती. आज चुटकीसरशी सर्व हाजीर होते, दोन मिनटात मॅगी, ऑर्डर दिल्यावर पिझ्झा त्वरीत हजर होतो परंतू त्याला “आज खाये दहीवडे ssssss” अशी आरोळी देऊन जरी व्यवसाय करीत असले तरी आपुलकीने खाऊ घालणा-या राजाभाऊंच्या दहीवडे व इतर पदार्थांची सर मात्र नाही.

1 टिप्पणी:

  1. हा लेख वाचल्यावर राजाभाऊंच्या सुनेचा फोन आला. त्यांची सुने , कुटुंबीय , राजाभाऊंचे भाऊ या सर्वांशी बोलणे झाले. राजाभाऊंवर लेख लिहिला म्हणून त्या सर्वांना आनंद झाला होता.
    राजाभाऊंचा व्यवसाय असूनही “आज शुक्रवार आहे आंबट खाऊ नका” अशी सूचना राजाभाऊ ग्राहकांना करीत अशी आठवण माझ्या जेष्ठ बंधूनी सांगितली.

    उत्तर द्याहटवा