११/१०/२०१८

Visited Dnyanganga Wildlife Sanctuary, Botha Dist Buldana, Maharashtra on the occasion of Wildlife week 2018

“रमणीय ज्ञानगंगा अभयारण्य”
     बुलढाणा व खामगांव या दोन 
शहरांच्या मध्यभागी ज्ञानगंगा अभयारण्य वसले आहे. बुलडाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास हाच सोयीचा रस्ता असल्याने कित्येकदा तरी या अरण्यातून येणे-जाणे झाले आहे. याच रस्त्यावर कित्येकदा बिबट,हरीण,नीलगाय,रोही,तडस यांनी दर्शन दिले आहे व त्या स्मृती आजीवन स्मरणीय केल्या आहेत. या जंगलात जाण्याचा योग मात्र कधी आला नव्हता. नाही म्हणायला देव्हारी जवळील गणेश तलाव, अस्वलीचा खोरा,चिंचीचा खोरा असे खामगांव-बुलडाणा रोडच्या लगतचा भाग तेवढा पहिला होता. 5 ऑक्टोबर रोजी मात्र वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने या जंगल सफारीचा योग आला. आजोबा नानासाहेब हे त्यांच्या काळात सरकारी परवानाधारक शिकारी, तसेच डिंकाचे व्यावसायिक असल्याने जंगलांचे ठेके घेत असत. लहानपणी त्यांनी सांगितलेल्या
जंगलातील गोष्टी, घरी पाळलेले मोर, हरीण, अस्वल या सर्वांमुळे वन्यजीव, वनसंपदा यांचे वेड आहेच. त्यामुळे उत्साहाने या सफारीसाठी निघालो. अगदी प्रवेश करतांनाच वनविभागाने ज्ञानगंगा अभयारण्याच्या आकर्षक स्वागत कमानीवर “मानवाच्या जगण्यासाठी- जंगल,प्राणवायू,पाणी,प्राणी “ असे लिहिलेले समर्पक वाक्य दृष्टीस पडले. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच वन्यजीव व जंगले ही सुद्धा मानवी जीवनासाठी आवश्यकच आहेत.परंतू मानव मात्र त्याच्या स्वत:च्या स्वार्थासाठी वन्यजीवांच्या हक्काच्या जंगलांवर अतिक्रमण करीत आहे, वृक्षतोड करीत आहे. परंतू जर का एखादा वन्यजीव शहरात आला तर त्याचा ठपका प्रशासनावर ठेवत आहे. या विचारात आमची चारचाकी मोटार नक्षत्र वनात प्रवेशित झाली. स्वागतास व आमच्या सफारीच्या नियोजनास मन:पूर्वक सहकार्य करणारे वनविभागाचे श्री गोरे तेथे पूर्वीच येऊन पोहोचले होते.त्यांची भेट झाल्यावर उभयता अधिकच आनंद झाला कारण आम्ही गो.से. महाविद्यालयात एन.सी.सी., शिबीर यात बरेच बराच मैत्रीपूर्ण काळ व्यतीत केला होता त्या आठवणी निघाल्या. आजकालचा अत्यावश्यक असा फोटोसेशनचा सोपस्कार झाला. भोजनांती पलढग धरणाकडे निघालो, आमच्या सोबत मेळघाटचे STPF चे महिला वनरक्षक पथक व वनविभागाची गाडी होती. माझ्या जंगलाच्या आवडीने मला आमच्या गाडीतून वनविभागाच्या गाडीत बसण्यास भाग पाडले. त्या गाडीत बसलो. सोबत वनरक्षक शारदा कसबेकर ,विलास दारशिम्बे इतर वनरक्षक व वन कर्मचारी होते. धरण येईतो त्यांच्याशी वन्यजीव, वृक्ष यांबाबत माहितीपूर्ण चर्चा झाली. मानवी हल्ल्याच्या बाबतीत सर्वात बेभरवशाचा प्राणी अस्वल असल्याचे त्यांच्याकडून समजले. रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत असतो हे सुद्धा त्यांनी आवर्जून कथन केले. ही चर्चा सुरु असता कुठे काही प्राणी दिसतो का हे पाहण्यासाठी म्हणून नजर मात्र जंगलात खिळलेली होती. हे हेरून “आता काही दिसणार नाही,कारण तुम्ही जंगलात उशिरा दाखल झाले” असे वनरक्षकाचे शब्द कानी पडले. नागमोडी जंगली वाटेतून बळीराम भाऊ हे चालक निष्णातपणे गाडी चालवत होते. गाडी “फोर व्हील ड्राइव्ह” असल्याचे त्यांनी सांगितले. गाडी धरणाजवळ थांबली. धरणापासून ते एका कुटी पर्यंत पायी गेलो रस्त्यात अनेक झाडे, वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसल्या. मुख्यत: साग व शिसम असलेल्या या जंगलात मोह,बेहडा,अंजन अशी भली मोठी वृक्ष दिसली. येथेच एका वृक्षाच्या छायेत विसावलो असता गौतम बुद्ध,समर्थ रामदास व अनेक ऋषी मुनींचे स्मरण झाले.त्यांच्या ज्ञान संपादनात,त्यांच्या तपश्चर्येत,त्यांच्या तत्त्वज्ञानात,त्यांच्या लेखणीत नक्कीच अरण्यातील ही नीरव शांतता सहाय्यकारी ठरली असल्याची जाणीव झाली. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर हे सुद्धा निसर्गातच वावरले होते. शांतीनिकेतन येथे आजही निसर्ग सानिध्यातच ज्ञानदान होते. आपण मात्र आपल्या पुढच्या पिढीला सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलातच बंदिस्त करीत आहोत, बंदिस्त जागेत शिक्षण देत आहोत, त्यांना म्हणावे तेवढे निसर्गजवळ नेतच नाही. केवळ वृक्षारोपण करून तेवढे साध्य होणार नाही. निसर्ग शिबीर,अरण्ये भेटी आदी उपक्रम सुद्धा राबवणे जरुरी आहेत. त्याने नवीन पिढीला सुद्धा निसर्ग, वने, वन्यजीव यांचा लळा लागेल. वृक्षवल्ली, वनचरे ही आपली सोयरे आहेत,सहचरे आहेत अशी संतवचने काय उगीच आहेत? या विचारात मग्न असतांना गाडी उर्वरीतांना घेऊन आली. गाडीच्या आवाजाने तंद्री भंग झाली. परतीचा प्रवास सुरु झाला अदयाप वन्यजीव मात्र काही दृष्टीस पडला नव्हता. विद्यार्थ्यांना एखादा तरी वन्यजीव दिसावा असे मला वाटत होते तेवढ्यात एक नीलगाय गाडी समोरून पळत गेली. नीलगाय दर्शनाने प्रवासाचा सर्व क्षीण त्या नीलगायीच्या सारखाच धूम पळून गेला व त्या मुक्त वन्यजीव दर्शनाने सर्व सुखावले.मुक्त वन्यजीव दिसणे हे सुद्धा एक भाग्याचेच लक्षण असते. आपल्या शहरासमीप इतके सुंदर अभयारण्य आहे हे आपण आपले भाग्य आहे. तेथे सहकुटुंब भेट द्यावी. भेट देतांना जंगलात कुठेही प्लास्टिक, कचरा होणार नाही किंवा वन्य प्राण्यांना हानी होईल असले काही प्रकार,गोंगाट,गाणी वाजवणे हे प्रकार टाळावेत.अभयारण्याच्या स्वागत कमानीवरचे “मानवाच्या जगण्यासाठी-जंगल,प्राणवायू,पाणी,प्राणी” हे वाक्य सदैव स्मरणात ठेवावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा