०६/११/२०१८

Article on the cutting of many Neem Trees of Nimwadi area of Khamgaon, Maharashtra


निमवाडीची रया आणि कडूनिंबांची छाया गेली
      खामगांव शहर म्हटले की पंचक्रोशीतील   कित्येकांना         जी.एस.कॉलेज हमखास     आठवतेच. पंचक्रोशीतील या कॉलेजच्या लगतच सुटाळा ग्राम परिसरात राष्ट्रीय महामार्गावर निमवाडी नावाचा परीसर आहे. आता काही दिवसांपूर्वी कडूनिंबाच्या गर्द,थंडगार छायने आच्छादित असा हा एक छोटासा भाग होता. होय ! होताच. कारण अगदी काल-परवा पर्यंत या भागातील भले मोठे कडूनिंबाचे वृक्ष वाटसरूंना सावलीचा दिलासा देत. कडूनिंबांच्या अनेक झाडांमुळे या परिसराला निमवाडी हे नांव पडले होते. याच परिसरात कडूनिंबाच्या छायेत एक झोपडीवजा उपहारगृह आहे. हे उपहारगृह म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ठिय्या होता. जी.एस. कॉलेज मधील गेल्या कित्येक वर्षातील विद्यार्थ्यांचा हाच कट्टा होता.तासिका बुडवून येथील चहा,इतर पदार्थ यांवर गप्पांसोबत ताव मारला जात असे.क्वचित प्रसंगी काही धुरांच्या रेषाही हवेत काढत.समोर भट्टी,त्यामागे बनियान टोपी वाले चालक-मालक त्यांच्या मागे काचेचे दोन कपाट,कुडाच्या भिंतीवर अनेक देवी देवतांचे फोटो,लाकडाचे बाक,टेबल,एक छोटा टी.व्ही, कोप-यात कांदे व इतर साहित्य पडलेले, एखाद-दोन खाटा. या उपहारगृहाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे याला दरवाजा नाही. अशा या उपहारगृहात फावल्या वेळात प्राध्यापक,कर्मचारी वृंद सुद्धा येत.प्राध्यापक किंवा इतर कर्मचारी उपहारगृहात आल्यावर व्यत्यय येऊ नये म्हणून धुरांच्या रेषा काढणा-यांसाठी मागील बाजूस

रस्ता रुंदीकरणामुळे वृक्षहीन रस्ते 
कडूनिंबाच्या सावलीतच दोन बाकड्यांची पर्यावरणपूरक अशी खुली केबिनसुद्धा होती. निमवाडीतील हे उपहारगृह एकांतात असल्याने खामगावातील अनेक मित्र मंडळी कडूनिंबाच्या छायेतील या निवांत ठिकाणाचा आधार घेत होते. परंतू हळू-हळू शहर वाढले, मान्य आहे आता रुंद रस्त्यांची गरज आहे परंतू वृक्ष  लागवड  व संगोपन सुद्धा जरुरी आहे.सरकारच्या भरवश्यावर न राहता प्रत्येकाने वृक्ष लागवड संगोपन करण्याचा वसा घ्यावा.आपल्या पूर्वजांनी वृक्षे लावली,त्यांचे संगोपन केले त्यामुळे आपल्याला फळे, छाया मिळाली.पुढील पिढीसाठी निव्वळ पैसा, जमीन जुमला जमा न करता आपण सुद्धा वृक्ष लागवड व पर्यावरण रक्षणाचा वसा हाती घेण्याची नितांत गरज आहे.खामगावातील याच निमवाडीतून जाणा-या महामार्गाचे सुद्धा रुंदीकरण सुरु झाले,ते सुद्धा गर्द वनराईच्या सुटाळ्यातून.मार्ग रुंदीकरण कार्याचा पहिला हल्ला होतो तो मूक,निशस्त्र, झाडांवर.निमवाडीत या निरपराध,सदैव दुस-यांना काही ना काही देणा-या या कडूनिंबांवर व इतर अनेक झाडांवर यांत्रिक करवती कराकरा फिरू लागल्या आणि बघता-बघता निमवाडीतील ती शेकडो वर्षे जुनी, भली मोठी झाडे एका पाठोपाठ एक धारातीर्थी पडू लागली.कुणास ठाऊक का परंतू निरपराध,निश्स्त्रांवर गोळीबार झालेले जालियानवाला बाग आठवले,त्यांना मारणारा जनरल डायर आठवला.मन हेलावले,गतकाळात गेले,निमवाडीतील मित्र मंडळींच्या बैठका,चर्चा,कडूनिंबाच्या छायेतील निवांतासाठी पेट्रोल खर्च करून चहा,नाश्त्यासाठी गावातून निमवाडीत जाणे,”वो जिंदगीमे कल क्या बनेगाअशी तरुणांची ध्येये,पाहिलेली स्वप्ने सर्व स्मृती डोळ्यासमोर चलचित्रपटाप्रमाणे झर-झर येत गेल्या म्हणूनच वृत्तपत्रातील निमवाडीतील वृक्ष तोडले अशा आशयाची बातमी वाचून त्याठिकाणी गेलो. सोबतीला बालपणी पासूनचा सहपाठी मित्र विशाल देशमुख होता.मित्र मंडळीच्या गलक्यात निमवाडीत जाणारे आम्ही यावेळी मात्र दोघेच होतो.नेहमी हिरवेगार,दाट वृक्ष पाहिलेल्या व आता उजाड, भकास झालेल्या त्या जागेची छायाचित्रे टिपण्याची काही ईच्छा होत नव्हती.तरीही कसे-बसे दोन फोटो काढले. नेहमी सुरु असणारे उपहारगृह सुद्धा बंद होते.उजाड,पूर्वी नैसर्गिक छाया,रम्य वातावरण असलेल्या निवांत निमवाडीतून चहा नाश्ता व आनंददायी चर्चा याने ताजा-तवाना होऊन आम्ही परतत असू.यावेळी मात्र तेथून परततांना मी व माझा मित्र विशाल दोघेही खिन्न होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा