१५/११/२०१८

चिडचिडेपणा का वाढतोय ?
निरनिराळ्या रंग, रूपासोबतच निरनिराळ्या स्वभावाच्या व्यक्ती समाजात वावरतांना आपण बघत असतो. या स्वभावास पुन्हा नाना त-हेचे पैलू सुद्धा असतात. ज्या वातावरणात , घरगुती संस्कारात व्यक्ती वाढलेल्या असतात त्याप्रमाणे त्याच्या स्वभावाची जडण-घडण होत असते. हसमुख , अबोल, बोलके , अंतर्मुख , शिघ्रकोपी अशा एक ना अनेक स्वभावाच्या व्यक्ती आपल्या भोवती वावरत असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असे त्यामुळेच म्हटले गेले आहे.परंतू हल्ली तरुण मुले ,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा वाढता चिडचिडेपणा, त्रागा ही एक गंभीर व वाढती समस्या समाजात निर्माण होत आहे या समस्येने अनेक शालेय व महाविद्यालयीन तरुण, तरुणी सध्या ग्रस्त झाले आहेत. लहान-सहान कारणांवरून चिडून जाणे. कुणा दुस-याचा , कार्यालयातील घटनेचा राग मग आपल्या आप्तांवर निघत आहे. दुस-याचे भौतिक सुख पाहून तसे आपल्यालाही मिळावे हे सुद्धा एक कारण या चिडचिडेपणाचे असावे. म्हणूनच मोबाईल साठी खून, आत्महत्या , घरुन निघून जाणे अशा आशयाची वृत्ते वर्तमानपत्रातून येत असतात. का बरे ही चिडचिड होत असावी ? का हा चिडचिडेपणा वाढत आहे ? याचे मुळ तरुणाईने व पालकांनी शोधणे जरुरी आहे. कुण्या दुस-याची मित्राची अगर नातेवाईकाची विक्षिप्त वागणूक तुमच्या चिडचिडेपणास जबाबदार नाही ना ? तसे असल्यास त्यांचा राग तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीवर काढणे कितपत योग्य आहे ? दिवाळीच्या सुटीत धनंजय टाले या माझ्या मित्राने असाच काहीसा विषय निघाल्यावर मला सांगितले की , “एखाद्या फलंदाजाकडे जसे विविध चेंडू गोलंदाज टाकतात त्यातील काही चेंडू फलंदाजाला लागतात परंतू लागल्यावरही पुन्हा हसतमुखाने पुढच्या चेंडूवर हसतमुखाने तो निष्णात फलंदाज चौकार किंवा षटकार ठोकत असतो. तो पूर्वीचा लागलेला चेंडू विसरून नवीन चेंडूचा चांगल्या रीतीने सामना करण्याची प्रतीक्षा करतो. त्याप्रमाणे आपल्यावर सुद्धा आपल्या आप्तांचे , मित्रांचे , सभोवतालच्या व्यक्तींच्या वक्तव्यांचे, वागणुकीचे विविध चेंडू येत असतात आपण सुद्धा त्यांना त्या निष्णात फलंदाजाप्रमाणे ते चेंडू टोलवायचे असतात.” इतरांची आपल्या सोबतची वागणूक या आपल्या चिडचिडेपणाच्या एका कारणा सोबतच सोशल मिडीया हे सुद्धा या वाढत्या चिडचिडेपणाचे एक कारण आहे. सध्या तरुण, तरुणी दोन विश्वात वावरत आहेत. एक आपले प्रत्यक्ष विश्व व सोशल मिडीयाचे आभासी विश्व. या आभासी विश्वामुळे , त्यावरच्या सततच्या ओंनलाइन राहण्याने , त्यावरील ज्ञात अज्ञात व्यक्तींमुळे सुद्धा आपल्या वागणुकीवर परिणाम होत असतो. तरुणांना सुद्धा आताशा मोबाईल नसले तर करमत नाही. एक चित्र फार मोठ्या कालवधी पर्यंत आपल्या स्मरणात राहत असते. सध्या तर आभासी जगत चित्र व चलचित्रांचा भडीमार होत असतो. आभासी जगतात सतत ओंनलाइन राहण्याने तसेच स्वचीत प्रसंगी त्याचा वापर खंडीत झाल्याने सुद्धा अस्वस्थता, चिडचिड वाढत असते. अनेक 4-5 वर्षाची अनेक बालके अशी आहेत की ज्यांना मोबाईल नाही दिला तर ते आकांड-तांडव करतात. इतक्या लहान वयातच त्यांची चिडचिड सुरु झाली आहे. ही बालके मोठी झाल्यावर काय करतील ? परंतू अनेक पालकांना ही समस्या न वाटता ते आपल्या बालकाचे हे कौतुक सांगत असतात. चित्तवृत्ती शांत अशी राहील ? शालेय,महाविद्यालयीन, तरुण,नवविवाहित यांनी व त्यांच्या पालकांनी , त्यांच्या गुरुजन वर्गानी याचा विचार करणे गरजेचे झाले आहे. तरूणांनी, पालकांनी, नागरीकांनी वेळीच जागरूक व्हावे. मोबाईलच्या या विश्वास , सोशल मिडीयाच्या आभासी जगतास व अन्य कुणा दुस-या व्यक्तीस आपल्या चिडचिडेपणाचे कारण न होऊ द्यावे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा